पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हळवा कोपरा

          मंबादेवीकडून मस्तगड मार्गे चमनकडे जाणारा रस्ता. साहजिकच दुपारची वेळ असल्यानं वर्दळ कमी. तेथील रस्त्याच्या उतारावर ऑटोची वाट पाहत उभा असलेला मी. तेवढ्यात रस्त्यानं जाणारी एक भरधाव स्कुटी अन त्यावर बसलेली एक स्त्री माझं लक्ष वेधून घेते. बहुदा महाविद्यालयात सोबत शिक्षण घेत असलेली "तीच". डोळ्याची पापणी लवते न लवते. तोच वाऱ्याच्या धुंद वेगाणं ती पुढं निघून जाते. इकडे माझ्या मनात मात्र विजेचा सरसर संचार सुरु होतो. मन सैरभैर होऊन जातं. दुपारच्या उन्हातही पावसाच्या चिंब चिंब सरींनी न्हाऊन निघाल्याचा गोड भास होतो. पार वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या गतकाळात मन गढून जातं. महाविद्यालयाचे ते मंतरलेले दिवस आठवू लागतात. काळाचा एक सुरम्य प्रदीर्घ पट डोळ्यासमोर तरळायला लागतो.

       मनात उमदा गहिवर दाटून येतो. मनाच्या सांदीतील विझलेल्या आठवांचा हळवा नाजूक कोपरा लख्खपणे पुन्हा तेजाळू लागतो. भिरभीरणारं सैरभैर महाविद्यालयीन जीवन. दिवास्वप्न पाहण्याचे गोड गहिरे दिवस. चंचल बेभान वय. पण तरीही तरलत्या वयात परिस्थितीनं दिलेलं

आत्मभान तेवत ठेवणारं. मनातल्या मनात दुहेरी पेटलेलं युद्ध. कधी ऐलतीरावर तर कधी पैलतीरावर झोके घेणारं जिवंत वादळ.

          अशाच परिस्थितीतले शाळा सरून नुकतेच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेले ते दिवस. नुकतेच महाविद्यालय सुरु झालेले. नियमित वर्ग भरू लागलेले. वर्गात मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त. मुलं अल्प मतात अन मुली बहुमतात. त्यामुळं साहजिकच त्यांचा बोलबाला जरा वाजवीपेक्षा जास्तच. इतर ठिकाणी वर्गात जशी, सर्वच प्रकारची मुलं मुली असतात. तशीच काही खोडकर, काही अभ्यासू, काही टवाळक्या करणारी, तर काही निव्वळ पुस्तकी किडे. आपण भलं नी आपलं काम भलं. अगदी तशाच प्रवृत्तीची मुलं मुली आमच्याही वर्गात होती. मराठीवर माझं लहान वयापासूनच प्रेम असल्या करणानं, मी आवर्जून मराठी विषय घेतलेला. मराठी विषय शिकवायला नावाजलेले महाविद्यालयाचे उप प्राचार्य श्री राम भाले सर. सेवानिवृत्ती जवळ आलेले. तरीही तरुणालाही लाजवेल अशी उमेद बाळगून असणारे. मराठीवर कमालीचे प्रभुत्व असणारे. अशा उतारवयातही प्र.के.अत्रे यांची सुप्रसिद्ध "प्रेमाचा गुलकंद" ही कविता शंभर सव्वाशे मुलांमुलींना शिकवता शिकवता सरांसगट संपूर्ण वर्ग प्रेमाच्या चिंब सरींनी न्हाऊन निघायचा. -----

 

     "बागेतुनि वा बाजारातुनि कुठूनि तरी त्याने

      गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने

      कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते

      तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते"

 

अशा ओळीनी सुरु झालेली कविता. प्रेयसीवर एकतर्फी जीव जडलेल्या प्रियकराचे शेवटी कसे हसे होते याचे प्र.के.अत्रेनी केलेले विडंबन. अतिशय रममान होऊन सर जेंव्हा शिकवत, तेंव्हा एका वेगळ्याच विश्वात भरारी मारून आल्याचा भास वर्गातील संपूर्ण विध्यार्थ्यांना होई.

         पुढे याच कवितेचा परिणाम म्हणून की काय. माझी आणि तिचीही नजरा-नजर व्हायला नुकतीच सुरुवात झालेली. मी लहान-सहान कविता लिहितो. राम भाले सरांना दाखवतो. भरगच्च वर्गात भाले सर कवितेची वाहवा करतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यावर लिहिलेली कविता. इतरही निसर्गपर लिहिलेल्या कवितांचं भाले सर सर्वांसमोर तोंडभरून कौतुक करतात. याचं माझ्याबरोबर तिलाही अपरूप वाटायचं.

             असंच वर्ष सरता सरता महाविद्यालयात गॅदरिंगचं आयोजन करण्यात आलं. प्रत्येकजण कशात नी कशात भाग घेत होता. माझ्याकडे कवितेशिवाय कसलंच भांडवल नव्हतं. मी अगदीच चाळून चाळून विचारपूर्वक दोन कवितांची निवड केली. एक --"हे करत जा...!" आणि दुसरी --"पानमंदिराचे पूजारी". एकीचा आशय विद्यार्थिनीवर बेतणारा.... तर दुसरीचा आशय विद्यार्थ्यावर बेतणारा होता. सर्वांसमोर स्टेजवर उभं राहून काहीतरी सादर करण्याचा हा पहिलाच अनुभव. त्यामुळं अंगात बसल्याजागीच कापरं भरायला सुरुवात झाली. पण कसं तरी जीव मुठीत धरून सावरलं अन -------

 

         कपाळावारची टिकली

         मेणावरती चिटकवत जा

         प्रेम कोणी एकावरतीच

         करत जा....

 

         वेणीमधील फुल

         देठासगट बसवत जा

         ज्याच्यावरती प्रेम करते

         त्याचीच वाट बघत जा.....

 

असं उसनं आवसान आणून का होईना, पण बहारदार धिरोदात्तपणे कविता पेश केली, अन आयुष्यात पहिल्यांदा टाळ्यांचा कडकाडाट मिळाला. पुढे स्पर्धेच्या अंतिम निकालात कवितेचा पहिला नंबर आला. कलेक्टर श्री श्रीधर पाळसुले यांच्या शुभ हस्ते बक्षीस म्हणून डाक्युमेंट फाईल मिळाली. मी तीला अगदी नौकरी लागेपर्यंत जपून ठेवली होती.

          कविता वाचनाचा इम्पॅक्ट म्हणून की काय. पण तिनं धाडस करून कवितेची डायरीच वाचनासाठी मागितली. तेंव्हा मनात तनमोराचा नाच सुरु झाला. अंधारात शुभ्र चांदणं पडल्याचा भास होऊ लागला. कुणीतरी अनाम पक्षी मनात घर करून निवारा शोधत असल्याची हळवी जाणीव झाली. असेच बरेच दिवस निघून गेले. दीर्घ सुट्टया संपून जेंव्हा दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली. तेंव्हा जरासं लाजत, मुरडत, गोड गालात हसत तिनं वही हातात सरकवली. आवडलेल्या कवितांच्या खाली तिच्याच हातानं लिहिलेल्या सुंदर हस्ताक्षरांतल्या तळटिपा आजही मी कवितेसह सुरक्षितपणे जपून ठेवल्या आहेत.                  

             पुढं बरेच दिवस असंच नजरा-नजर होणं, हसणं-रुसणं, पुन्हा कवितांची देवाण-घेवाण, तळटिपा लिहिण्याचा हा सिलसिला सुरूच राहिला. बघता बघता महाविद्यालयीन दिवसं संपले. अन जसं इतरही बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. अगदी तसंच आमच्याही बाबतीत घडलं. गाडी जीथपर्यंत रुळावर आली होती. त्याच स्टेशनवर सोडून दोघंही आपापल्या मार्गी मार्गस्थ झालो. आता कधीतरी अथांग पाण्याच्या पृष्ठभागावर लाटा दाटून येतात......किनाऱ्याला आदळून परत आल्यापावली माघारी जातात....... तसंच मनाचे हळवे कोपरे आठवणी दाटून आल्या की, अस्वस्थ होतं.......पण "विसर" हे काळानं बहाल केलेलं जालीम औषध अशावेळी कामी येतं. काळाच्या ओघात त्याचा विसरही पडतो....... महाविद्यालयातील साथ संगतीनंतर खुप दिवसांनी तीला साडीत, अन तेही स्कुटीवर भुर्रकण नजरेसमोरून दिसेनाशी होतांना पाहिलं........अन मनातल्या हळव्या कोपऱ्याला पुन्हा पाझर फुटु लागले.......ते दिवसं पुन्हा आठवू लागले...... दोन ओळी कविता होऊन ओठावर आल्याच पुन्हा तिच्यासाठी --------

            वाऱ्यावरती पदर सोडून

            साडीवर तू गेली गं

            डोळ्यामधुनी आज सांडते

            कविता माझी ओली गं

 

                       -भानुदास धोत्रे

                        परभणी

                        7972625086

bhanudasdhotre2015@gmail.com 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू