पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाडवा

दाराची बेल वाजली.... शालिनीताईंनी आपल्या हातातील पोथी बंद केली, कपाळाला लावून बाजूला ठेवली. गुढग्यावर एक हात ठेवून , व दुसऱ्या हाताने पलंगाचा आधार घेत त्या उठल्या आणि हळूहळू चालत दाराजवळ गेल्या. दार उघडले समोर मुलगा उमेश व सून हर्षदा दोघे उभे होते. शालिनीताई त्यांच्या मागे कोणी आहे का हे बघत होत्या . ते ओळखून उमेश म्हणाला, "आम्ही दोघेच आलोआहोत. नेहा घरीच हर्षदाच्या आईजवळ राहिली आहे. शालिनीताई म्हणाल्या , " अरे , आणायचं ना तिलाही सोबत. किती दिवसात पाहिली सुद्धा नाही तिला.."
उमेश....." बरं , बरं पुढच्यावेळी आणीन तिला. अगं, पण आता आम्हाला तरी आत घेशील की नाही ? " सुशिलाताई दारातून बाजूला होत म्हणाल्या , " हो हो या ना " दोघेही आत आले आणि सोफ्यावर बसले. सुशिलाताई पाणी आणायला किचनमध्ये गेल्या. दोन ग्लास पाण्याने भरून ट्रेमध्ये ठेवले आणि थरथरत्या हाताने घेऊन आल्या. दोघांना पाणी दिले.
उमेश....." आई , तुझ्या पेन्शनचे पैसे आणले आहेत. हे घे ."
सुशिलाताई लगेच म्हणाल्या, " त्यातील थोडेच दे . बाकीचे घेऊन जा .लागतील तेव्हा दे. मला मेलीला कुठे सांभाळता येणार एवढे पैसे.....आधीच या कामवालीने माझी चेन चोरली. दुसरी बाई पण मिळत नाही . कुठे कुठे लक्ष देऊ ? नाही रे ,....आता नाही होत एकटीने सारं सांभाळणं.... उमेश, पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे . दिवाळीपासून तुझ्याकडेच राहीन म्हणते. हे घर बंद ठेवू. नाहीतर भाड्याने देऊ."
उमेश व हर्षदा काही बोललेले नाही. दोघेही गप्पच राहिले. नंतर लगेच हर्षदा हातातील ग्लास स्टुलावर ठेवून उठली. ते पाहून उमेशही ग्लास ठेवून उठला आणि म्हणाला, " आई , आता जरा कामं आहेत. निघतो आम्ही."
शालिनीताई..... " अरे , थांबा ना काही खाऊन जा."
उमेश...." आता गडबडीत खायला नको. परत वेळ झाला की येईल भेटायला."
असे म्हणून दोघेही दाराबाहेर पडले. शालिनीताई तिथेच उभ्या राहून त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृती बघत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात केव्हा पाणी तरळले ते त्यांना कळलेही नाही
शालिनीताईंना आठवले.... त्यांचे पती विनायकराव आजारी असतांना मुलीच्या दवाखान्यात होते. तेंव्हा मुलीचे व मुलाचे बोलणे त्यांच्या कानावर पडले.
उमेश म्हणाला, " मानसी , तू आई-बाबांना तुझ्या घरी घेऊन जा. तू डॉक्टर आहेस तर त्यांना उपयोग होईल ."
" हे बघ दादा ,मी माझ्या सासू-सासर्‍यांचे केले. आता तू व वहिनी आई बाबांचे करा. मी अधून मधून चेकअप साठी येत जाईन. आत्ताच कुठे सासू - सासरे गेले आणि मला थोडी मोकळीक मिळते आहे. परत मला त्यात गुंतवू नकोस. " इती मानसी.....
त्यांचे बोलणे ऐकून सुशिलाताई तशाच मागे फिरल्या. आणि विनायकरावांजवळ जाऊन बसल्या. त्यांचे डोळे भरून आले होते.पण ते त्यांनी गुपचूप पुसले होते.
......आणि अचानक एक दिवस विनायकराव हार्ट अटॅकने गेले आणि आयुष्याचे ओझे वाहताना सुशिलाताईंची दमछाक होऊ लागली.त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावू लागली.तेंव्हा शेजारी व नातेवाईक त्यांना " आता मुलाकडे जा . एकट्या राहू नका " म्हणू लागले.म्हणून त्या उमेशला " दिवाळी पासून तुझ्याकडे येते " म्हणाल्या.पण मुलगा व सून गप्प बसले.ते पाहून सुशिलाताई मनोमन समजायचे ते समजल्या.
...... दिवाळीचा दिवस होता.संध्याकाळी सुशिलाताईंनी दिवे लावले . लक्ष्मीपूजन केले.नंतर मुलं-नातवंडांची वाट पहात बसल्या.बरीच रात्र झाली.पण मुलं न आल्यामुळे सुशिलाताईंची निराशा झाली. त्या दार बंद करून न जेवताच अंथरुणावर पडल्या.....झोप येत नव्हती. पण रात्रभर अश्रूंनी उशी भिजत होती......
दुसऱ्या दिवशी पाडवा होता. त्यांना आज विनायकरावांची खूप आठवण येत होती. विनायकराव त्यांच्यासाठी पाडव्याला काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणत. फार प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर ..दोघांच्या मनात यायचं.....आपण एकमेकांशिवाय कसं जगणार ?.....
विनायकरावांच्या आठवणीने सुशिलाताई उदास झाल्या होत्या.पण‌ तरी त्या विनायकरावांनी एका पाडव्याला दिलेली सुंदर पिंक रेशमी साडी नेसल्या. आज तरी मुलं , नातवंड नक्कीच आपल्याला भेटायला येतील असे त्यांना वाटले. त्यांनी मुलांच्या आवडीचा शिरा केला.फराळाचे काढून ठेवले. आणि त्या हॉलमध्येच दार उघडे ठेवून दारासमोरच्या सोफ्यावर दाराकडे नजर लावून बसल्या . बाहेर उडणारे फटाके, हास्यकल्लोळ..... त्यांना काही काही ऐकू येत नव्हते. सर्व लक्ष त्यांचे दाराकडेच होते.असा किती वेळ गेला ते त्यांना कळलेच नाही.सर्वत्र सामसूम झाली.पण सुशिलाताई दाराकडे नजर लावून तशाच सोफ्यावर बसून होत्या.एकेक करत साऱ्या पणत्या विझल्या. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले.अजूनही सुशीलाताईं जागच्या हलल्या नव्हत्या.....नजर दाराकडेच.....
एकाएकी दारात उजेड दिसू लागला . त्या उजेडात एक धुसर आकृती दिसू लागली. हळूहळू ती आकृती सुशिलाताईंकडे येऊ लागली. ती आकृती जवळ आली . सुशिलाताईं समोर तिने हात पुढे केला . ती आकृती म्हणाली, " चल सुशिले , पुरे आता मुलांची वाट पाहणं.... अगं पलीकडे मी तुझी वाट पाहत आहे..... आज पाडवा ना ? म्हणून आज मी तुला घ्यायला आलो आहे. " सुशिलाताईंनी चमकून नजर वर करून पाहिले. समोर विनायकराव होते. त्यांना पाहून सुशिलाताईंच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. त्यांनी आपला हात विनायकरावांच्या हाती दिला.....आणि त्यांना जाणवलं , आपलं वाट पाहणं संपलं....दुःख संपलं..... सारं सारं संपलं ..... मन अगदी हलकं झालं आहे..... पिसासारख्या हलक्या होऊन त्या विनायकरावांचा हात धरून दारापलीकडील प्रकाशाकडे हळुवारपणे जाऊ लागल्या.....

- स्मिता भलमे
- ९४२१०५८१४९

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू