पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संस्कृती, स्त्रिया आणि विविध विचार

●  संस्कृती, स्त्रिया आणि विविध विचार  ●

सोबत असलेल्या या चित्रासकट एक खूप सुंदर लेख वाचनात आला. तो मी त्यांच्या नाममुद्रेसह प्रसारित करत आहे (म्हणजे आजकालच्या भाषेत नावासकट शेअर करते आहे!) लेख आहे सायली चौगुले यांचा. त्या लिहितात : 

पायी पैंजणांची छम छम आणि हाती बांगड्यांची खणखण यातून इतकी सकारात्मकता बाहेर पडत असते ज्यातून घर समृद्ध होतं, चैतन्य कानाकोपऱ्यात वावरू लागतं. पारंपारिक गोष्टींमागे इतकं गूढ विज्ञान लपलेलं आहे पण हल्ली आपल्या नजरेतून ते सहजच निसटून जातंय. माझ्याच घरात रोज पैंजणांचा नाद नाही ऐकू येत, ना बांगड्यांची खणखण, पण जेव्हा असतो सण तेव्हा मात्र भलताच उत्साह अंगी येतो, घरात पंचपक्वानांचा वास पसरतो, तुळशी समोर रांगोळी आणि दाराला तोरण सजत, धूप-अगरबत्तीसोबत घंटीचा घणघणाट घुमू लागतो.

चुडा, पैंजण, छल्ला, झुमका आणि काठ पदर साडी! काय ते सौंदर्य उठून दिसतं!

सणासारखा अस्सल सण साजरा होतो तेव्हा जी सकारात्मक ऊर्जा घरात पसरते त्यातूनच पारंपारिक गोष्टींमागे विज्ञान किती खोल आहे ते जाणवू लागतं.

- सायली चौगुले, सांगली ( सध्या बेंगळुरू )

8381058992

=========================================

थोड्याच शब्दांत किती सुंदर लालित्य पूर्ण रीतीने त्या व्यक्त झाल्या आहेत. पूर्वीच्या जमान्यातले दिवस अगदी डोळ्यासमोर आले. असे वाटले माझ्या मनातली खंत यांनीच व्यक्त केली. आणि खरे सांगू, किंचित मन खट्टू पण झाले. कारण मला नेहमी असे वाटते, पण मी नाही हे लिहून काढले! असो. बालिशपणाचे झटके अधून मधून सगळ्यांनाच येत असतात की! या छोट्याशा लेखाने कितीतरी आठवणी झरझर पुढे आल्या. आई, आईचे घर, आमच्या बंगल्यातील तुळशी वृंदावन, माझे लहानपणीचे पैंजण, बांगड्या, सगळे सगळे एका क्षणात झरकन डोळ्यासमोरून तरळून गेले. काय आनंद झाला म्हणून सांगू!

पण याच लेखावर आलेली एक प्रतिक्रिया वाचून पार हलले मी. खूपच वेगळी होती. वास्तवदर्शी तितकीच आक्रमक. त्यात स्त्रियांबद्दल लिहिलेली मते वाचून मी काही क्षण बधीर झाले. 

त्यांच्या म्हणण्यानुसार हल्ली फॅशनच्या वेडापायी सर्वच, वयात न आलेल्या असो, तरुण विवाहित असो, मध्यम वयीन असो किंवा त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर, "अत्याधुनिक सिनिअर सिटीझनस् उर्फ म्हाताऱ्या" त्याचप्रमाणे "फॅशनच्या आंबटशौकीन स्त्रिया देखिल मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण, पायाच्या बोटातील जोडवी, इत्यादींचा त्याग करून पाश्चिमात्य संस्कृतीचे हिडीस दर्शन घडवितात. एवढेच नव्हे, तर कपाळावर कुंकूम्, तिलक किंवा बारीकशी कां होईना बिंदी देखील लावीत नाहीत. कारण पुरुषी किंवा पाश्चिमात्य पोशाख, जसे की जीन्स, पॅंट, टी शर्ट, तंग, अंगाला चिकटणारे, उत्तान, शृंगारिक कपडे, परिधान करून बाहेर जातात; त्यावर म्हणे बिंदी चालत नाही!( कुणी सांगितलंय???) जर लाविली, तर काय लोक ट्रोल करतील??फासावर लटकवतील?? एनोडाईज्ड, खोटे दागिने घालून मिरवतात, पण, पण ... मणी मंगळसूत्र सोन्याची कर्णभूषणे यांची मात्र ॲलर्जी... हे लॉजिक मुळी, कळतच नाही." पुढे त्यांनी असेही म्हटले की इतर धर्मांचे लोक आपले हिंदूंचे पारंपारिक कपडे परिधान करतात का? पण आपण मात्र मी मॉड, मॉड (हे वेड, वेड मजला लागलेSS) अशाप्रमाणे वागतो.

***********

हे वाचून खूप काही बोलावेसे वाटले. मात्र वितंड वाद घालण्यात मला तथ्य वाटत नाही. शिवाय विचार न करता व्यक्त झाल्याने त्यांचा कदाचित अपमान झाला असता, जो माझा यत्किंचितही माझा हेतू नव्हता. त्यामुळे मी माझे विचार माझ्या लेखणीतून मांडण्याचे ठरवले. जेणेकरून माझे विचार योग्य शब्दांत मांडता येतील आणि मुद्दा व्यवस्थित वाचकांपर्यंत पोहोचवता येईल. 

 

त्यांच्या मताचा पूर्ण आदरभाव ठेवत, मला नाण्याची दुसरी बाजू नक्कीच सांगावीशी वाटते आहे. यातून कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा नक्कीच हेतू नाही. तरी माझ्या लिहिण्याने जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी मी आधीच जाहीर माफी मागते!

**********

मला स्वतःला सोन्याच्या दागिन्यांची खूप हौस. अगदी पूर्वीच्या जमान्यात होते तसे छुम छुम करणारे पैंजण, गळ्यात सोन्याची चेन, हातात सोन्याच्या नाजूक बांगड्या, सोन्याचे कानातले इत्यादींची खूप हौस. घरी होते तोवर ठीक. पण शाळेत जायला लागल्यावर सोन्याची एक कानातली रिंग चोरली गेली. कशी ते सांगते. मी बालवाडीत होते. शाळा सुरू होणार म्हणून नवीन कपडे, नवीन दप्तर, वॉटर बॉटल, गणवेश यासोबतच हौसेने आईने मला आणलेल्या सोन्याच्या रिंग कानात घालून गेले. आम्हाला शाळेतल्या आया बाथरूमला घेऊन जात असत. तिकडे गेल्यावर त्या आयाने मला म्हटले की बघू गं जरा तुझी रिंग आणि मी कान पुढे केला. तिने काढून घेतली, पण तिने ती काढून घेता कामा नये, हे मला कळले देखील नाही. बालवाडीत कुठे एवढी समज? घरी आल्यावर आईने विचारले, "रिंग कुठे गेली?" मी सहजपणे सांगितले, "आयाला दिली." आईने डोक्याला हात लावला, पण मला रागावली नाही. फक्त एवढेच म्हणाली, "पुन्हा कुणाला आपल्या अंगाला हात लावू देऊ नकोस बरं बाळा." त्या आयाला शाळेतून काढण्यात आले, पण माझ्या रिंग परत मिळाल्या नाहीत. तिने त्या विकून तिचे कर्ज परत केले होते. मग आईने मला चांदीच्या रिंग आणल्या आणि त्या शाळा संपेपर्यंत माझ्या कानात होत्या. 

पण मोठे झाल्यावर जसे बस, ट्रेन मधून प्रवास करू लागले तसे सगळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्याकडे वळणाऱ्या नजरांची खूप भीती वाटायला लागली. मग नाईलाजाने सगळे खोटे दागिने घालायला लागले. खरं तर, अमेरिकेत मी पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र बिनधास्तपणे, अगदी खरे सोन्याचे सुद्धा घालू शकते, आणि अमेरिकन लोक, " यॉर ब्रेसलेट इज् सो क्यूट, यॉर नेकलेस् इज् सो क्यूट," असे म्हणून त्याचे कौतुकही करतात. 

भारतात येताना मी सगळे लपवून अंगावर खोटे दागिने चढवून येते. तिथे राहत होते तोवर लग्न, मुंजी इत्यादी कार्याला खोटे घालून प्रवास करायचा आणि तिकडे गेल्यावर लपवलेला खरा ऐवज चढवायचा. येताना पुन्हा तेच सोपस्कार. अर्थात स्वतःची गाडी आल्यावर हे सगळे करावे लागत नसे.

मला वाटतं की याबाबतीत अमेरिकन लोक कोणाच्या दिसण्याकडे, पेहरावाकडे अधिक सहिष्णुतेच्या नजरेने बघतात आणि एखाद्या व्यक्तीच्या पेहराव अथवा दगिन्यांवरून त्या व्यक्तीची पारख करत नाहीत, तर त्याचे गुण, त्याचे वागणे जास्त ग्राह्य धरतात. तरीही भारतात जितक्या प्रमाणात जातीयवाद, धर्मवाद आणि लिंगभेद चालतो तितक्या प्रमाणात इथे वंशवाद रोजच्या जीवनात जाणवत नाही. आणि हो, बऱ्याच अमेरिकन लोकांना भारतीय संस्कृती विषयी, हिंदू धर्माविषयी खूप आदर आहे आणि भारतीय खाद्यपदार्थ तर त्यांना प्रचंड आवडतात. असो.

दागिन्यांच्या मुद्द्याकडे परत वळूयात. हल्ली बहुतेक शाळांमध्ये दागिने घालायची परवानगी देत नाहीत. त्यामुळे मुलींना दागिने घालायची सवय लहानपणापासून होत नाही. नंतर त्यांना ते जड वाटू लागतात. मात्र नाजूक दागिने केले तर मुली काही दागिने अजूनही घालतात.

**********

गंध/ टिकलीबद्दल बोलायचे झाले तर स्वानुभवावरून सांगते की माझ्या घरी कुमारीकांनी काळे गंध लावणे अनिवार्य होते. माझे वडील अतिशय कडक शिस्तीचे होते. पण जेव्हा सेमी कॉन्व्हेन्ट शाळेत ऍडमिशन झाली तेव्हा शाळेतल्या नियमांप्रमाणे मला गंध लावता येईना. सुरुवातीला लावून गेले तेव्हा शिक्षा झाली. आता धर्मवादी लोक हेही बोलू शकतील की मराठी माध्यमाच्या शाळेत का नाही घातले? जिथे भाड्याचे घर मिळाले त्याच्या जवळपास ज्या शाळेत ऍडमिशन तर मला वाटते की त्यावेळी माझ्या आई वडिलांनी आपल्या अपत्यांसाठी जे सगळ्यात चांगले वाटले ते केले. पण त्यामुळे ते आमच्यावर कोणतेही संस्कार करण्यात कमी पडले असे मी कदापि कोणाही कडून ऐकून घेणार नाही. सगळे धार्मिक विधी, स्तोत्रे, मंत्र, ध्यान, धारणा, संस्कार, पुराणातील गोष्टी जेवढे काही त्यांना माहीत होते, ते सर्व त्यांनी आम्हाला शिकवले, जे मी आजतागायत जमेल तसे, असेल त्या परिस्थितीत पाळण्याचा प्रयत्न करते. 

पुढे हेही सांगू इच्छिते की मी इंग्रजी माध्यमाच्या दुसऱ्या एका शाळेत गेले जिथे गणवेश हा पंजाबी ड्रेस होता आणि जिथे बांगड्या, टिकल्या, वेणीला रीबिनी अगदी चपला सुद्धा घातलेल्या चालायच्या! सगळ्यात जास्त आनंद माझ्या वडिलांनाच झाला की आपली मुलगी एका हिंदू संस्कार पाळणाऱ्या शाळेत जाऊ लागली. 

अर्थात गंध लावण्याचे चांगले परिणाम आहेतच यात कोणतीच शंका नाही. कॉलेजला गेल्यावर कोणीही मला गंध लावण्यापासून थांबवू शकले नाही आणि रंगीबिरंगी, नक्षीदार गंध लावून त्याची पुरेपूर हौस मी भागवून घेतली. पण मुद्दा जेव्हा स्त्रीवर आरोप करण्याचा येतो, तेव्हा एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कित्येक दशके भारतात हिंदूंची मुले अथवा पुरुष गंध लावताना दिसत नाहीत. फक्त पुजारी, पूजा सांगणारे गुरुजी, सन्यासी अथवा सणावाराला पूजेला बसणारे पुरुष गंध लावताना दिसतात. या बाबतीत दक्षिण भारतीय हिंदू पुरुषांचा मला सार्थ अभिमान आहे की ते ऑफिसला जाताना सुद्धा गंध लावून जातात. आणि घरात अजूनही कित्येक जण शहरात सुद्धा लुंगी नेसतात जी त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. आपल्यापैकी शहरात कोणत्या मराठी घरात पुरुषांना घरी धोतर नेसून आपण पाहिले आहे? मग केवळ स्त्रियांवर साडी न नेसण्यासाठी आगपाखड कशाला?

प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे हे सत्य आहे की आधुनिक लोक आपल्याला काय म्हणतील किंवा जीन्स, पँट इत्यादी कपड्यांवर शोभून दिसणार नाही म्हणून कित्येक जण गंध लावीत नाहीत, पण यात फक्त स्त्रियांवर आरोप करणे हे एकांगी आहे, असे मला वाटते. पुरुषही तितकेच आपल्या हिंदू धर्मातील संस्कार सोडण्याला जबाबदार आहेत. आणि मला वाटते की जर आपण स्त्री पुरुष हा भेदभाव बाजूला ठेवून, लिंग भेद न करता, एकमेकांवर दोषारोप न करता, कोणताही पोशाख असू दे, कुंकू अथवा गंध लावायला लागलो, तर त्याची फॅशन व्हायला वेळ लागणार नाही. फक्त आपल्याला आपल्या धर्माचा सार्थ अभिमान बाळगता आला पाहिजे आणि आपण जे करत आहोत ते योग्य करत आहोत व यातून कोणालाही इजा पोचत नाहीये याची आपल्या मनात पूर्ण खात्री आणि स्वतःवर पूर्ण विश्वास असला पाहिजे.

मला माहितीये की इतर काही धर्मांचे लोक खूप कट्टर आहेत. प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे ते आपला पेहराव बदलत नाहीत, मग आपण का त्यांचा पेहराव घालावा? तर मला वाटते की हा प्रश्न इतका सोपा नाही. 

पहिली गोष्ट म्हणजे जागतिककरणानंतर आपणच सगळे पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करू लागलो. अर्थात यात आपण स्वतःला दोष देणे मला पूर्णतः मान्य नाही. शतकानुशतके असणाऱ्या परकीय राज्यकर्त्यांनी आपली स्वदेशाविषयीची भावना, देशभक्ती कुठेतरी मातीला मिळवली. अत्याचार सहनशक्ती पलीकडे गेला तेव्हा काही व्यक्तींमुळे ती वेळोवेळी जागृत झाली इतकेच. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात अंधानुकरण करण्याची मनोवृत्ती बळावली. पण आता आपण त्या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. किंबहुना जसे ते आपली संस्कृती जीवापाड जपतात, तशीच आपणही जपली पाहिजे, काकणभर जास्तच कारण आपली सगळ्यात समृध्द आणि पुरातन संस्कृती आहे. शिवाय संस्कृती जपणे हे मागासलेपणाचे नव्हे तर सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या समृध्दीने श्रीमंत लोकांचे लक्षण होय.

दुसरी गोष्ट अशी की सगळेच इतर धर्मीय लोक कट्टर नाहीत. ते आपले पदार्थ खातात, सण आपल्या सोबत साजरे करतात. कित्येक अमेरिकन लोकांना मी आवडीने भारतीय पोशाख घालून मंदिरात आपल्या सणावाराला येताना बघितले आहे. इतर काही धर्माचे लोक नाही तेवढे मोकळेपणाने आपला धर्म स्वीकारत. ते मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊलही टाकत नाहीत, जसे आपण त्यांच्या प्रार्थना स्थळात जातो. पण ते आपले विचार जर बदलायला तयार नसतील आणि मन मोकळे करायला तयार नसतील, तर आपण त्यात काही करू शकत नाही. मात्र त्यांच्या प्रभावाखाली येऊन आपण आपले संस्कार, धर्म आणि संस्कृती सोडावी हे बरोबर नाही. या बाबत मी त्या प्रतिक्रियेशी अगदी सहमत आहे. असे असले तरी सगळेच असे कट्टरवादी नसतात आणि काही खूप चांगले, मोकळ्या मनाचे इतर धर्मीय लोक मला भेटले आहेत हे ही तितकेच खरे. थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही धर्माबाबत आपण इंग्रजीत म्हणतात तसे, "स्वीपिंग ब्लँकेट स्टेटमेंट" शक्यतो करू नये. कारण अपवाद सगळीकडेच असतात! 

मला स्वतःला असे वाटते की कुंकू लावणे, साडी नेसणे, दागिने घालणे या बाबत स्त्रियांना निवडीचा अधिकार असू नये. किंबहुना माझे असे म्हणणे आहे की कोणत्याही धर्माने ही अशी बंधने घालणे चुकीचेच आहे आणि ती व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे होते. अर्थात व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेणे हे कोणत्याही जबाबदार व्यक्तीचे लक्षण आहे, मग ती स्त्री असो वा पुरुष. 

प्रतिक्रियेत बायका कमी कपडे घालून पाश्चात्य संस्कृतीचे हिडीस दर्शन घडवतात असे म्हटले आहे. उत्तान उत्तेजक हे घालणाऱ्या पेक्षा बघणाऱ्याच्या दृष्टीत जास्त असते असे मला प्रामाणिकपणे वाटते. कारण तसे नसते तर सहा महिन्याच्या मुलीपासून साठ वर्षांच्या आजी पर्यंत सगळ्या सगळ्या साडी आणि पंजाबी ड्रेस घालणाऱ्या साध्या सुध्या स्त्रियांचे बलात्कार झाले नसते. ते ही धर्म आणि संस्कृतीचा मोठा झेंडा फडकवणाऱ्या आपल्या भारत देशात. तेव्हा विकृती ही स्त्रिया घालत असलेल्या कपड्यात नाही, तर पुरुषांच्या नजरेत आहे. हेच कपडे उन्हाळ्यात परदेशात बहुतेक स्त्रिया घालतात, पण काही भारतीय पुरुष सोडून विशेष कोणीही ढुंकून बघत नाही, हे ही मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आहे. माझ्या बाबतीत नाही घडले, पण रात्री अपरात्री कामावरून परतणाऱ्या एकट्या स्त्रियांना दारुडे पुरुष इथेही भारतासारखे त्रास देतात हे पण बघितले आहे. 

कमी कपडे घालून उत्तान प्रदर्शन पाश्चिमात्य देशातील बायका घडवतात हा ही एक गैरसमज आहे. जे कपडे शाळा, कॉलेज, बीच अथवा पार्टीला घालतील ते कपडे कोणीही ऑफिसला नाही घालून जात. कमी कपड्यांची फॅशन आहे, हे मान्य आहे. पण रोज दुकानात, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये, इत्यादी ठिकाणी असे उत्तेजक कपडे घालून जाणाऱ्या बायका दिसत नाहीत. हॉलिवूड चित्रपटात दिसणारे सगळेच वास्तवात खरे असते असे नाही. जसे बॉलीवुड चित्रपटात दिसतात तसे सगळेच हिरो हिरोईन दिसत नाहीत ना रोजच्या जीवनात, अगदी तसेच.

एक मोठ्ठा गैरसमज आजकालच्या पिढीतील मुलांमध्ये रुजू झाला आहे, तो म्हणजे कमी कपडे घालणे म्हणजे आधुनिकपणाचे लक्षण आहे. हा गैरसमज अख्खा जगात दुर्दैवाने पसरला आहे. खरे तर प्रगतीशील विचार असणे हे कपड्यांपेक्षा कित्येक पटीने आधुनिकपणाचे लक्षण आहे. तसे नसते तर नऊवारी नसणारी आणि मोठा लाल टिळा लावणारी आपली आजी मुलाला शर्ट पँट घालून शहरात नोकरीला जाऊन यशस्वी हो, असे महणालीच नसती. पण फॅक्टरीमध्ये तुम्हीच विचार करा की धोतर किंवा लुंगी कितपत व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे असेल? मान्य आहे की प्रत्येक ठिकाणी पाश्चिमात्यांचे अनुकरण करू नये, पण काही वेळा परिस्थितीचे भान राखणे तेवढेच आवश्यक असते. 

कित्येक बायका मरणाच्या उकाड्यात साडी नेसून प्रचंड गर्दीत ट्रेनचा प्रवास करतात. त्यांना त्याचा किती त्रास होत असेल याचा कोणी विचार करते का? आपल्या धर्मातील स्त्रियांचे तर हाल होतातच. पण त्यांच्याही पेक्षा डोळे सोडून संपूर्ण शरीर झाकून घेतलेल्या स्त्रियांचा किती जीव घुसमटत असेल याचा कोणताही पुरुष विचार करत नाही. सवय होणे म्हणजे घुसमट थांबणे नव्हे हो! धर्म कोणताही असो, स्त्रियांना शक्य होईल तितके संस्कृतीच्या नावाखाली कपडे, दागिने यावर नियमावली बसवून पुरुषांनी आदम काळापासून त्यांना ठेचून आपल्या अंगठ्याखाली दाबण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. अपवादात्मक पुरुष झाले आहेतच. स्त्रियांच्या उत्थापनसाठी बऱ्याच पुरुषांनीच प्रयत्न केले असले तरी मुळातच स्त्री अधिक मजबूत आहे, हे कळल्यामुळेच आपल्या गर्वाला खतपाणी घालण्यासाठी हे विविध नियम काही अशी घालण्यात आले. आणि सगळेच पुरुष असे असतात, असे माझे अजिबात म्हणणे नाही. मी फक्त एकुणात ऐतिहासिक कल कसा होता हे मांडत आहे. 

अर्थात हिंदू धर्मात सुरुवातीला तसे झाले नव्हते. शास्त्रीय आधारांवर पुरुष व स्त्रियांची वेशभूषा, दागिने, राहणीमान ठरवले गेले. आणि कालांतराने त्याचे प्रतिबंधात्मक स्वरूप पुढे येऊ लागले. ही बंधने झुगारून आपले स्वतंत्र अस्तित्व मांडण्यासाठी स्त्रिया मग पेहराव, वागणे बोलणे इत्यादी मध्ये बदल करत गेल्या. पण आता अशी परिस्थिती झाली आहे, की आपण आपला धर्म, संस्कृती बाजूला सारून स्वातंत्र्याचा नको तो अर्थ काढतोय, हे ना पुरुष, ना स्त्रिया, कोणालाच कळत नाहीये.

*********

हे सगळे सांगण्याचा एकच मुद्दा आहे की आपण कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवू नये. बाहेरचे लोक कितीही आपल्याला बदलवू पाहत असतील तरीही आपण आपल्या धर्माबद्दल जर योग्य माहिती घेऊन, त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन समजून घेऊन ते पाळण्याचे ठरवले तर जगातली कोणतीही शक्ती आपल्याला त्यापासून भरकटवू शकत नाही. जसे की पुण्यातील काही कॉलेजचे, शाळेचे विद्यार्थी फोन उचलल्यावर हॅलो न म्हणता नमस्कार असेच म्हणतात. ह्यात मुलीही आल्या बरं का! मुद्दाम सांगत आहे, कारण आजकालच्या पिढीतील सगळ्याच मुली वाया गेल्या आहेत, हा या प्रतिक्रियेवरून दिसतो तसा बऱ्याच जणांनी समज करून घेतला आहे.  

तेव्हा सांगण्याचा मुद्दा एवढाच की सभोवतालची परिस्थिती सुरक्षित राहिली नाही, म्हणून कित्येक स्त्रियांनी खोटे दागिने घालण्याचा मार्ग अवलंबला आहे. शिवाय सोने, चांदी आता घेणे परवडत नाही. आईचे दागिने होते तेच मी घालत आहे अजून. आम्हाला खूप काही सोने खरेदी करणे जमलेच नाही. पण त्यात मला लाज वाटत नाही. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत, कर्ज फेडत आम्हाला ते शक्य नव्हते. परिसथितीमुळे कित्येक स्त्रियांना हा सोन्या चांदीचा मोह टाळावा लागतो. तेव्हा त्यांची ही अडचण देखील आपण समजून घेतली पाहिजे. 

या प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे फॅशन स्टेटमेंट म्हणून कपडे, दागिने यात बदल झाला आहे, हे मान्य आहे. त्यात मी तर म्हणेन की हिंदूंचा स्वाभिमान अगदी पद्धतशीरपणे गेले काही शतके परकीय राज्यकर्त्यांकडून नष्ट केला गेला आहे, ज्यामुळे सगळे स्वदेशी कमीपणाचे आणि सगळे परदेशी उच्च दर्जाचे वाटू लागले होते. मग तो परदेशातून येणारा भंगार माल का असेना. त्यामुळे या गोष्टी केवळ स्त्रियांच्या बाबतीत फक्त घडल्या असे म्हणणे चुकीचे ठरेल. 

भारताच्या उष्ण वातावरणात सुटाबुटात पुरुष वावरतात. आपण धोती टोपी फक्त सणावरालाच घालतो. पण यात कोणालाही काही गैर वाटत नाही. कोणतीही स्त्री उठून पुरुषांच्या संस्कृती परंपरा न पाळण्याबद्दल राग, द्वेष व्यक्त करताना आपल्याला दिसत नाहीत. तेव्हा सध्याची परिस्थिती स्वीकारून पुरुषांनी हा स्त्रीदूषणवादी स्वर बाजूला ठेवावा, असे प्रामाणिकपणे वाटते. 

आणि सगळ्यांना वाटते तितक्या प्रमाणात स्त्रिया आपला धर्म, चाली रीती, परंपरा सोडून वागतात असे नाहीये. पूर्वीच्या जमान्यात स्त्रिया फक्त घरकाम करत असत. आताच्या जमान्यात स्त्रीने नोकरी करून घर सांभाळावे ही अतिशय अन्यायकारक, बंधनकारक आणि मानसिक व शारीरिकदृष्ट्या प्रचंड तणावदायक गोष्ट आहे. आम्ही केले म्हणून तुम्हीही करावे असे म्हणणे म्हणजे आम्ही आगीत जळत राहिलो, आता तुम्हीही तसेच जळत राहिले पाहिजे, अशी उपमा न राहवून द्यावीशी वाटतेय. कपडे, दागिने मनाप्रमाणे घालणे, नटून थटून राहणे हे स्त्रीच्या दृष्टीने तिने तिच्या परीने सोन्याच्या पिंजऱ्याच्या परिघात राहून थोडे स्वातंत्र्य उपभोगण्याची एक धडपड असते. 

सरते शेवटी मी असे म्हणेन की जितक्या स्त्रिया संस्कृती सांभाळण्यासाठी जबाबदार आहेत, तितकेच पुरुषही जबाबदार आहेत. जर स्त्रियांनी नोकरी आणि घर सांभाळून सगळ्या परंपरा व संस्कृती जपावी, अशी पुरुषांची अपेक्षा असेल तर आधी त्यांनी तसे वागायला सुरूवात केली पाहिजे आणि त्याच बरोबर नोकरी करताना घरचीही निम्मी जबाबदारी उचलण्याची तयारी ठेवली पाहिजे. उदाहरण द्यायचे झाले तर आमचे आजोबा आमच्या आजीला भाजी आणणे, निवडणे, घर झाडणे, महिन्याचे सामान आणणे, यात मदत करत असत. तसेच मुलांना शाळेत सोडणे हेही ते करत असत. कारण आजीला दळण, मसाले कांडण्यापासून गाईचे दूध काढणे, गोठा साफ करणे ते शेणाने घर सारवण्या पर्यंत, स्वयंपाक चुलीवर करण्यापासून ते लाकडावर बंब तापवण्यापर्यंत अखंड कामे असायची याची त्यांना जाणीव होती. मध्यंतरी तसे होत नव्हते. सासू सासरे काय आणि नवरा काय कोणालाच घरात सुनेला मदत करायची नसायची. आजकाल पुन्हा शहरी भागांमधून चित्र सुधारत आहे, हे चांगले असले तरी बऱ्याच ठिकाणी स्त्रियांचे शोषण अद्याप सुरूच आहे.

सर्व परिस्थतीचा आरोप फक्त स्त्रियांवर केला जाऊ नये, इतकेच वाटते. अन्यथा, आपणच आपल्या संस्कृतीच्या वृक्षरुपी संसाराच्या बहरलेल्या फांद्या आपल्या हाताने कुऱ्हाडीने वार करून तोडण्यासारखे होईल. इतर लोक बसलेलेच आहेत मग तुटलेल्या फांद्या जाळायला, हे कोणत्याही टोकाच्या प्रतिक्रिया देताना लक्षात असू द्यावे!

शेवटी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की नाण्याची दुसरी बाजू सांगणे एवढाच या लेखाचा उद्देश होता. यातून कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नाही. तरी माझ्या लिखाणाने जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी मी पुनश्च जाहीर माफी मागते!

©️ तनुजा प्रधान, अमेरिका.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू