पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मिटवा भेद सारे

आजकाल परिस्थिती खूप बदलली आहे. शिकल्या-सवरलेल्या घरातून एक आई म्हणून नक्कीच आपण मुलगा असो की मुलगी अगदी एक समान वागणूक देत आहोत. दोघांना चांगले शिक्षण, करिअरसाठी प्रोत्साहन देत आहोत. एक आई म्हणून तिचे लेकरू हे तिला तेव्हढेच प्रिय असते आणि तिची काळजी दोघांसाठी एकसारखीच असते. पण तरीही जेंव्हा एका मुलाची आई दुसऱ्याच्या मुलीला आपली सून म्हणून घरी आणू पाहते तेंव्हा मात्र तिचे विचार अजूनही पूर्वीसारखेच बुरसटलेले व भेदभाव, पक्षपात करणारे आहेत ह्यात काहीच शंका नाही.

मुळात मुलाचे लग्न लावून त्याच्यासाठी एक सहचारीणी आणण्याचा मोठा विचार अनेक आयांच्या मनात नसतोच मुळी. सून म्हणून त्यांना एक सर्वगुणसंपन्न, एक "complete woman" हवी असते. अशावेळी मात्र मुलगा आणि दुसऱ्याची मुलगी म्हणजे सुन हयात अजूनही दुर्दैवाने खूप तफावत केली जाते. सुनेकडून त्यांना वारेमाप, अवास्तव अपेक्षा असतात. घरची सगळी कामे व्यवस्थित करणे, घरच्यांची वेळापत्रके सांभाळणे, उत्तम स्वयंपाक करणे, गृहकर्तव्यदक्ष असणे, व्यवहार, नातीगोती संभाळणे इ.इ. .... न संपणारी लिस्टच आहे. आणि त्यांच्या मुलाकडून मात्र अजिबात काहीच अपेक्षा नसतात असा भेदभाव का?

उदाहरणादाखल मला जाणवलेले काही प्रसंग मी इथे दिले आहेत ज्यात दाखवलेला भेदभाव, पक्षपात पाहून म्हणावेसे वाटते, "मिटवा हे भेद सारे..."

प्रसंग 1
"संपदा, मेट्रिमोनी साईटवर माझ्या मुलाची माहिती टाकायला जरा मला मदत कर ना."
"हो काकू, करते ना. सांगा मला माहिती, मी टाईप करते, वेबसाईटवर."
"वय, शिक्षण, उंची, नोकरी, सगळे झाले लिहून. इतर माहितीमध्ये स्मोकिंग, ड्रिंक्स करतो का?"
"अगो बाई हे पण विचारले आहे का त्यात, कधीकधी करतो पार्टीमध्ये लिही."
"बरं, सगळे झाले आता अपेक्षांमध्ये काय लिहू ते सांगा काकू."
"वय, उंची, शिक्षण, सगळे मुलापेक्षा कमी हवे आणि हो नोकरी करणारी हवी पण पगार मात्र मुलापेक्षा कमी हवा. आणि ते स्मोकिंग, ड्रिंक्स अजिबात घेणारी नको हो."
त्यांनी सांगितल्या प्रमाणे संपदाने फॉर्म भरला. काकू घरी परत गेल्यावर संपदाने विचार केला असे का? हा भेद का बरं. जर चुकीच्या सवयी, व्यसने ही वाईटच आहेत तर मुलाने कधीमधी केलेले कसे काय चालते? आणि सुनेने कधीच न करावे असे का? कधी मिटणार हा भेद. (माझे म्हणणे असे मुळीच नाही की मुलींनी पण व्यसने करावीत पण मुलांची व्यसने चालवून घेऊ नयेत असे मला वाटते.)

प्रसंग 2
शशांकची आत्या आणि तिचे लेक व जावई घरी जेवायला आले होते. समृद्धीने सगळा स्वयंपाक केला, आग्रहाने जेवायला वाढले. जेवणे झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले. समृद्धी सगळे आवरता-आवरता त्यांच्याशी गप्पा मारत होती. शशांक मात्र काहीच जास्त बोलत नव्हता. मंडळी निघाल्यावर समृद्धीच्या सासूने तिला आत बोलावून स्वतःच्या जवळची एक नवीन साडी देऊन म्हंटले, "आत्यांच्या लेकीची ओटी भर. एखादा शर्टपीस असेल तर जावयाला दे". त्यावर समृद्धी म्हणाली, "मला माहीत नाही शशांकला विचारते शर्टपीस आहे का" "त्याला काय कळते त्यातले. तो लहान आहे, तूच पहा. त्याला काही माहीत नाही व्यवहारातले. घेणेदेणे, रितभात बघायचे काम तुझेच आहे."
समृद्धीच्या मनात आले हे सारे कळत नाही तर लग्न कशाला लावले मुलाचे. माझ्याच जीवावर करणार आहे का हा संसार. त्याला जे कळत नाही ते मला कसे कळेल. तो लहान कसला माझ्यापेक्षा चांगला तीन वर्षांनी मोठाच आहे. पण त्याच्यावर जबाबदारी टाकल्याशिवाय त्याला कसे जमेल. त्याच्याकडून कसली अपेक्षाच नाहीये. तो आपला निवांत बसलाय आणि नाती सांभाळण्याची कसरत मात्र फक्त मीच करते आहे सकाळपासून.

प्रसंग 3

निधीची सासू मुलाला डब्बा द्यायचा म्हणून पोळ्या करत होती. आज निधीला उठायला जरा उशीरच झाला होता.
सासऱ्यांचा प्रश्न, "तुला उशीर झाला उठायला?" रवीला ऑफिसला उशीर करून चालत नाही. त्याला डब्बा नको का करून दयायला."
"बाळ रात्री उशिरापर्यंत जागे होते त्यामुळे मला झोपायला उशीर झाला, म्हणून मला जाग नाही आली सकाळी. रवीला एक दिवस बाहेर जेवण घ्यायला सांगा ना."
"मी दिलाय करून डब्बा. मला माझ्या मुलासाठी करायलाच हवे ना तेव्हढे. तुझा काही भरवसा नाही म्हणून मग मीच उठून केले सगळे." इति सासूबाई. सुनेचे रोजचे काम, स्वतःकरून तिच्यावर मोठे उपकार केल्याचा आव आणत सासूबाई म्हणाल्या.
निधीच्या मनात आले मूलाने कधीमधी बाहेर जेवले तर बिघडले कुठे. त्याने तेव्हढेतरी ऍडजस्ट करायला काय हरकत आहे. मी बाळासाठी जागी होते आणि हा मात्र रात्रभर ढाराढूर झोपला होता. फक्त मी आई झालीये आणि तो बाप नाही का झाला? तो तर अशातर्हेनें कायम बॅचलरच राहील. त्याला ना घरातले काही काम येते ना बाळाचे काही करता येते. मी काय सगळे शिकून आकाशातून पडलेली नाही. मीही पहिल्यांदाच आई झालीये. पण मला मात्र सगळे सांभाळावे लागते तेही त्यांच्या अपेक्षांच्याप्रमाणे. मला मात्र कशातच आणि कधीच सूट मिळत नाही असा भेदभाव का?

प्रसंग 4
"स्वाती, माझी उद्या किटी पार्टी आहे तू सुट्टी घेशील ना? नाहीतर लवकर तरी ये ऑफिसमधून."
"तुम्ही मला विचारून ठरवायला हवी होती ना पार्टी. शनिवारी केली असती, उद्या बुधवार आहे मला कसे जमेल?"
"शनिवारी त्या प्रमिला काकुंचा उपवास असतो म्हणून बुधवार ठरला आहे आमचा. दहा जणींचे करायला मला जरा मदत हवी असते आणि बायका पण नावे ठेवतात सून नसली घरी की. मागच्या खेपेला त्या मंदाताईंची सून आलीच नाही बाहेर बोलायला सुद्धा. तोंडदेखले तरी नको का सगळ्यांशी बोलायला? उशिरा आली ऑफिसमधून आणि नुसती स्माईल देऊन सरळ आत गेली."
"बरं, बघते मी रजा सांगीतली नाहीये त्यामुळे मला जावे तर लागेल पण लवकर येईन मी ऑफिसमध्ये सांगून."
स्वतीच्या मनांत आले, माझा जॉब म्हणजे टाईमपासच वाटतो ह्यांना. मैत्रिणींसमोर मिरवायला माझा बळी का द्यायचा. मदतीला किंवा मैत्रिणींशी बोलायला सूनच हवी असते ह्यांना तसा एरवी मात्र मुलगा लाडका असतो.

सासू म्हणवणारी स्त्री ही मुलाची असली तरी  एक आईच आहे आणि त्याही आधी ती एक स्त्री आहे व तिच्या मनांत आपल्या सुनेबद्दल म्हणजेच  दुसऱ्या स्त्री बद्दल स्वतःच्या इतकाच आदर, सन्मान असायला हवा असे मला वाटते. असे झाले तर आणि तरच स्त्रियांचे आयुष्य बदलेल.

एक मुलगी जेंव्हा सून होते तेंव्हा सासरच्यांच्याकडून तिच्या शिक्षण वा करियरचा विचार तिच्या घराच्या प्रति असलेल्या जबाबदाऱ्यांच्या आधी प्रायोरीटीवर केला जाईल. तिच्याकडून त्याग व समर्पणाच्या अवास्तव अपेक्षा न करता तिचे अस्तित्व, स्वातंत्र्य, तिची मते, स्वप्ने, विचार ह्यांना योग्य महत्व दिले जाईल. तेंव्हा खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आली असे म्हणता येईल.

त्यासाठी समाजाचा दुसरा घटक म्हणजे पुरुष ह्याच्यावर असणारी 50% जबाबदारी त्याला सांभाळायला जेव्हा घरातील दुसरी स्त्री म्हणजे त्याची आई त्याला शिकवेल तेंव्हा हा समन्वय साधणे शक्य होईल. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कामे करीत आहेत पण अजूनही म्हणावे तसे पुरुष घरच्या कामात स्त्रियांच्या बरोबरीने कामे करताना दिसत नाहीत. सध्या अनेक मुली उच्च शिक्षण घेऊन तारेवरची कसरत करत घर, नवरा, मुले, नातीगोती, सगळे सांभाळत स्वतःचे करिअर करत आहेत. पण सगळ्यानाच सगळे साधणे शक्य नसते अशावेळी ह्या कर्तृत्ववान स्त्रिया उगाचच आपापसात स्पर्धा करतात. काही स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करून स्वतःला महान म्हणवून घेतात किंवा काही दुसऱ्या स्त्रियांना स्वतःपेक्षा कमी लेखतात तेंव्हा मात्र मला वाईट वाटते. हे चित्र बदलायला हवे त्यासाठी प्रत्येक पुरुषाने स्त्रियांना सन्मान देत घरकामात 50%भागीदारी सांभाळायला हवी.  सगळ्या स्त्रियांनीही मनावर घ्यायला हवे व दुसऱ्या स्त्रियांशी आपापसात तुलना, स्पर्धा, हेवेदावे, सगळे सोडून मदतीचा, मैत्रीचा हात पुढे करायला हवा तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल असे मला वाटते.

तुम्हाला काय वाटते? नक्की सांगा मला कमेंटमधून...

© राधिका गोडबोले

#मिटवा भेद सारे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू