पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रसग्रहण

*मंगेश पाडगावकर ह्यांच्या कवितेचे रसग्रहण*


आज रसग्रहणासाठी मी मंगेश पाडगावकर ह्यांच *भाव भोळ्या भक्तीची ही एकतारी* हे गीत घेतलेले आहे.. मंगेश पाडगावकर ह्यांचा उत्कृष्ट कवी म्हणून नावलौकिक आहे..अतिशय सुंदर सुंदर कविता आहेत त्यांच्या.. 


सुमधुर गितांमधल  एक गीत असा ह्या गाण्याचा उल्लेख करायला हरकत नाही. ह्या गाण्याला स्वरसाज चढवलाय लता दीदींनी... आणि संगीतबद्ध केलयं श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले ह्यांनी...


आपण जगत असतांना जेव्हा आपल्या मनात जगण्याबद्दलच संभ्रम निर्माण होतो.. म्हणजे आनंदाने जगू की दु:खास कुरवाळत बसू.. अशावेळी कामास येते ती ईश्वराची निस्सीम भक्ती... अशावेळी पाडगावकरांच्या लेखनीतनं पाझरते ते *भावभोळ्या भक्तीची ही एकतारी हे गीत* तेव्हढा गहन अर्थ सांगितलाय ह्या गाण्यातनं पाडगावकरांनी.. 

 

*भावभोळ्या भक्तीची ही एकतारी*

*भावनांचा तू भुकेला रे मुरारी*


ह्या ओळींमध्ये मीराबाई बद्दल लिहिले आहे असे वाटते... म्हणजे ज्याच्या मनात शुद्ध भाव असतो... त्याला भगवंत भेटतो.. मीराबाईची भक्ती ही अगदी साधीभोळी होती.. एकतारी घेऊन कृष्ण भजन गाणारी.. पण तिच्या भक्तीत उत्कटता होती.. तीच्या भक्तीत एकरूपता होती.. तीच्या भक्तीत मोह नव्हता.. निस्सीम अशी भक्ती होती तिची.. तीची भक्ती ही बदलणारी नव्हती तर दृढ होती.. कृष्णाला फक्त भावनिक प्रेम, भक्तीभाव हवा असतो.. देवाला सुध्दा तुमचा पैसा, अडका नको असतो तर त्याला हव्या असतात तुमच्या प्रेमळ भावना, निर्वाज्य भक्ती... 


*काजळी रात्रीस होसी तूच तारा*

*वादळी नौकेस होशी तू किनारा*

*मी तशी आले तुझ्या ही आज दारी*

*भावनांचा तू भुकेला रे मुरारी*


माणसाच्या आयुष्यात जेव्हा एखादा कठीण प्रसंग येतो.. आणि सगळीकडे गच्च काळोख पसरलेला असतो.. कुठलाच मार्ग आपल्याला सापडत नाही.. तेव्हा आपण आर्ततेने भगवंताला साकडं घालतो.. तेव्हा अशा काळोख्या रात्री हाच भगवंत ताऱ्याप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवतो व आपण त्या मार्गावरून मार्गक्रमण करतो.. आयुष्यात प्रचंड तुफान आलेले आहे.. आपल्या आयुष्याची नाव वादळात गोते खाते आहे... तिला किनारा सापडत नाही आहे.. अशावेळी ईश्वराला आळवा तो आपली वादळात सापडलेली नाव बरोबर किनाऱ्यावर आणून ठेवतो.. फक्त तेव्हढी आपली भक्ती असायला हवी... 


*भाबडी दासी जनी गाताच गाणी*

*दाटुनी आले तुझ्या डोळ्यात पाणी*

*भक्तीचा वेडा असा तू तक्रारी*

*भावनांचा तू भुकेला रे मुरारी*


कवी इथे जनाबाईबद्दल सांगतात.. ते म्हणतात भक्ती असावी तर जनाबाईसारखी... अगदीच साधीभोळी... अशी ही साधीभोळी जनाबाई जेव्हा भजनं गायची तेव्हा तेव्हा तिच्यातल्या आर्तभावाने  भक्तीसाठी वेडा असलेल्या हरीच्या डोळ्यात सुध्दा पाणी यायचं... अशी आर्त भक्ती आपल्यालाही जमायला हवी.. आणि अशाच साध्याभोळ्या भक्तीचा देव हा  भुकेला असतो... 


*शापिलेली ती अहिल्या मुक्त केली*

*आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली*

*वैभवाचा साज नाही मी भिकारी*

*भावनांचा तू भुकेला रे मुरारी*


देवा तुझ्यापुढे मी अगदी भणंग भिकारी आहे रे.. मी, माझ, मी देवासाठी हे केल., मी देवासाठी मुकुट केला, मी देवासाठी छत्र केलं.. हे म्हणणारे आम्ही खरचं भिकारी आहोत... तूच दिलेल तुला द्यायच आणि मी मी करायच म्हणजे किती ढोंगी आहोत आम्ही.. तुझ्या छत्रछायेखाली जगणारे आम्ही तुझ्यासाठी काय छत्र करणार.. 

शापामुळे शिळा झालेली अहिल्या तुझ्या पदस्पर्शाने पावन होते... तिला पंचकन्यांमधे स्थान मिळतं.. केव्हढी अगाध तुझी शक्ती.. आणि तीन ठिकाणी बाक आलेली कुब्जा फक्त तुझ्या स्पर्शाने दिव्यत्व प्राप्त करते म्हणजे तू स्वयंप्रकाशीत आहेस देवा.. तुझ्यापर्यंत सगळ्यांच्या भावना पोहचतात रे फक्त त्यात आर्तता हवी ना... तुला ओळखता येण्यापर्यंत आमची भक्तीच पोहोचायला हवी... 


शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात

*अंतरीची हाक वेडी घालते रे*

*वाट काट्यांची अशी मी चालते रे*

अरे भगवंता मी अंतरातनं तुला साद घालते आहे... तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी काट्याकुट्यातून चालते आहे.. पण माझी अंतरीची हाक तुला ऐकू येईल ना रे.. माझी हाक तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझी भक्ती तेव्हढी सक्षम झाली का रे देवा.. तुझा ओ माझ्या कानापर्यंत येवू दे रे... 

*जाणिसी माझी व्यथा ही तूच सारी*

*भावनांचा तू भुकेला रे मुरारी*


माझ्या व्यथा, माझे दु:ख हे सारे तू जाणतोस.. तुला कळलेले आहे सारे.. माझ्या भोळ्या भावना तू जाणतोस देवा.. कारण तुझ्याशिवाय माझे कुणी नाही हेही तुला माहीत आहे.. माझी भक्ती तू स्वीकार कर एव्हढेच तुला मागणे चक्रधारी... 

अतिशय सुंदर आर्त अशी ही कविता आणि तेव्हढ्याच आर्ततेनं दीदीने  हे गायलेलं गीत माझ्या आवडीच अगदी ह्रदयाजवळचं... 


सौ. अलका माईणकर

अकोला

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू