पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माणुसकीचा झरा

..... यादोंकी बरसात..(१६)

...माणुसकीचा झरा...

सौ. सरोजिनी बागडे.

दर महिन्याच्या २७ तारखेला सकाळी सकाळी पेन्शन जमा झाल्याचा msg येतो...आणि आपण किती सुखावतो !!

आपसूकच नोकरीत असताना, दरवाजा उघडल्या उघडल्या आत येण्यासाठी धडपडणारी आनंदी चेहऱ्याची पेन्शनरांची झुंबड डोळ्यापुढे येते..

त्याच गर्दीतले काही चेहरे मला अजूनही आठवतात.. त्यांच्या नकळत, त्यांच्याच छोट्याश्या कृतीतून आनंद देऊन गेलेले ...

एरंडोल, माझी पहिली branch. एक दोन तारखेला
एक म्हातारी आजी यायची.. तिचे ठरलेले दोन transaction होते..
एका हाताने पेन्शन घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने त्यातले काही पैसे तिच्या मुलाने शेती कर्ज घेतलेल्या खात्यात भरायचे. शिल्लक राहिलेले कापडी पिशवीत ठेऊन खुशीत घरी जायचे.. एरवी तिची सारखी किरकिर चालायची.. उभे राहवत नाही..लवकर पैसे द्या... पासबुक भरून द्या. आणि पेन्शन हातात पडले की कर्ज भरायला तेवढीच घाई...

मी बँकेत लागल्या पासून तिची पेन्शन काऊंटरवरची आणि एकूणच आधी स्वतःचे काम
करून घ्यायची धांदल गडबड बंदच झाली..हे मला आधी त्या
काऊंटरवर बसणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांकडून कळले. ती आजी आली की माझेही नकळत तिच्याकडे लक्ष जायला लागले.. ती माझ्याकडे खूप मायेने बघतेय. माझी तिला खूप काळजी वाटते असे वाटायचे.

तिच्या बरोबर एक तिच्याच वयाची आजी यायची..तिलाही तिचा हा वागण्यातला फरक जाणवला असावा..एकदा तिने विचारले की " ही पोरं या जागी बसायला लागल्या पासून तू घाई करत नाही. भांडत नाही. चिडत नाही. मुकाट्याने उभी राहते. तेव्हा आजीने दिलेले उत्तर ऐकून, आम्ही सर्वच सुन्न झालो..
आजी ( अहिराणी भाषेत ) म्हणाली "हा राहू दे ग, काय बिचाऱ्या बापाविना पोरीला त्रास द्यायचा"...मी उडालेच. "ओ आजी काय बोलताय तुम्ही...कोण बापाविना पोरं... इकडे या आधी ".
आजी म्हणाली " तू औषधवाल्या भाऊची पोरं ना?"
ती बाई मला मेडिकल दुकानवाल्या, म्हणजे एक वर्षापूर्वी देवाज्ञा झालेल्या, माझ्या काकांची मुलगी समजत होती..

माझ्या वडिलांचे कापडदुकान
होते आणि काकांचे औषधाचे....
तिला कुणीतरी माझी ओळख "आपल्या दुकानवाल्या भाऊंची
मुलगी " अशी करून दिली होती..
पण कोणत्या दुकानवाल्या भाऊंची
ते सांगायचे राहिले असेल.... योगायोग असा की तिने मला काकांच्या दुकानात जास्तवेळ बघितले होते.
भाबड्या मनाच्या आजीला वाटले, आता दुकान बंद झाले, म्हणून ही पोरं नोकरी करायला बाहेर पडली. तिला हे वाटणे
साहजिकच होते.. मी बँकेत लागण्यापूर्वी बँकेत लेडीज स्टाफही नव्हता.. आणि
नेमके काका गेल्यानंतर आठ दहा महिन्याने मी बँकेत लागले..

मी तिला सांगितले " आजी
तू समजते ते औषध दुकानवाले माझे काका होते " ...मी कापड दुकानवाल्या बाळकृष्ण भाऊंची मुलगी. माझ्या वडिलांचे नाव ऐकताच आनंदाने काय चेहरा फुलला तिचा !! ती कायम आमच्या दुकानातून कपडेलत्ते घ्यायची.
तिने प्रेमाने माझ्या चेहऱ्या वरून हात फिरवला आणि कडाकड बोटे मोडून नजर काढली.
.."बाय सुखी राघ पोरी", म्हणताना डोळे ओले झाले.. कुठेही नाटकीपणा नव्हता....
अरे काय म्हणावं या प्रेमाला ? अशिक्षित, अडाणी, गरिबीने गांजलेल्या लोकांमध्ये भलेही "पैशाचा पाऊस" पडत
नाही, पण त्यांच्या मनात प्रेमाचा, अन् "माणुसकीचा झरा" वाहत
असतो हे असे प्रसंग घडल्यावर कळत ...

असेच दोन पेन्शनर कायम सोबत यायचे...सतत किटकिट करायचे. त्यांचे मुद्दे चुकीचे असायचे असेही नाही... पेन्शन वाढीचे पत्रक कधी आले...ती वाढ कधी दिली..त्याच महिन्यात का
नाही दिली..उशीर का झाला?. MT advice मिळाला नाही की, कधी MT केली, कधी dispatch केली, सर्व रेकॉर्ड मागायचे..एक ना दोन प्रश्न....कॅश काऊंटरवरही लवकर पेमेंट करा..अमुकच नोटा पाहिजे..घेतलेल्या नोटा परतपरत बदलून घेणे वगैरे.. त्यांच्या या त्रासाला मी (म्हणजे "त्यांच्या भाऊंची" मुलगी) अपवाद होते... काही चुकले तर चिडायचे नाही.. साहेबांकडे तक्रार नाही की भांडण नाही..साहेबही त्यांच्या वागण्याचा फायदा घेऊन त्यांचे काही काम करायचे राहिले तर, सरोज विसरली सांगून माझं नाव पुढे करायचे. लगेच हे दोघं शांत ... "जाऊद्या कामाच्या गडबडीत पोर विसरली असेल" म्हणायचे..त्या काऊंटरला कुणीही असो त्यांच्या तक्रारीला सॉरी म्हणुन त्यांचे काम करून द्यायचे, ही duty माझीच..

मला टायपिंग करायला आवडायचे नाही..त्या ऐवजी मी एक दोन तारखेला पेन्शन काऊंटर वर बसायचे..हे माझे आणि साहेबांचे हसत खेळत झालेले
" Deal " होते...आहे की नाही मज्जा...

असेच एक म्हातारे काका होते....जाड भिंगाचा चष्मा.
थरथरणारे हात... मी त्यांचा हात धरून स्लीपवर अंगठा लावायचे.
पासबुक भरून द्यायचे...कॅश मध्ये withdrawal नेऊन द्यायचे...खुश व्हायचे...जाताना जाड चष्म्यातून कौतुकाने बघायचे..

एवढं गर्दीच काऊंटर पण ते मला कधीच "Heavy Counter"
वाटले नाही....कारण मी माझ्या वडिलांची नाही तर आख्ख्या एरंडोल गावाची लाडकी लेक झाली होती...

सौ.सरोजिनी बागडे.
डोंबिवली
दि.१०.०३.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू