पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अनाथांची आई

पुस्तक आढावा

 पुस्तकाचे नाव - अनाथांची आई

लेखक - डी.बी.महाजन

प्रकाशक - तीर्थरूप पब्लिकेशन,पुणे ISBN- 978-81-938208-03  Bestseller

मूल्य - 250रु.


        पद्मश्री डॉ. यु. म. पठाण सरांनी या प्रस्तुत पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. अवघ्या 7 महिन्यातच ज्या पुस्तकांच्या 65,000 प्रती छपाई केल्या असे हे एकमेव अद्वितीय पुस्तक सिंधूताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी. बी. महाजन सरांनी लिहिले आहे. माई म्हणजे त्यांचीच नव्हे तर प्रत्येक अनाथांची प्रेरणा होती. माईवर जेवढं लिहावं तेवढं महाजन सरांनी लिहिलं आहे. पुस्तक वाचत असताना आपण वाचक पुस्तकात एवढे बुढून जातो की, ते कधी एकदापूर्ण करू ? असं होऊन जातं. याचाच अर्थ असा की, तुमची उत्कंठा शेवटपर्यंत वाढवणारं असं असामान्य पुस्तक आहे.

                   माईच्या सहवासात राहून माईच्या आठवणी अतिशय छान, स्मृतीपटलावर कोरतील अशा पध्दतीने महाजन सरांनी मांडल्या आहेत. एस.टी. महामंडळात नोकरी करत असताना आपल्या Busy schedule मधून वेळ काढून कसे ते माईशी जुळले आणि निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या सहवासात माईसोबत राहिले हे त्यांनी विस्तृतपणे या पुस्तकात मांडले आहे. 

                 माईचा संघर्ष खूपच मोठा व विदारक होता. त्या प्रतिकूल परिस्थितीतही माई शेवटपर्यंत डगमगली नाही. ती अखेरपर्यंत संघर्षच करायला शिकवते.कुठलंही सरकारी अनुदान नसताना सर्व आठ सेवाभावी संस्था माईंना चालवाव्या लागत होत्या, त्यासाठी त्यांना नेहमी इकडे-तिकडे महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात तसेच परदेशातही जावं लागलं. कितीही दुखणं आलं तरी माई नेहमी आपल्या कार्यात कसं तत्पर रहात असे ? हे लेखकानं वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्यापुढे मांडलं आहे. त्यातून आपल्याला आजन्म प्रेरणा मिळते.    

          शून्यातून विश्व निर्माण करणारी सिंधूताई, गोठ्यात बाळाला जन्म देऊन प्रसव वेदना सहन करणारी माई, जागोजागी भिख मागून पोट भरणारी माई स्वत:सोबत इतरांच्या वेदना जाणणारी झाली. कृतज्ञतेची तिला जाणीव होती, म्हणून ज्यांनी तिला संघर्षात मदत केली त्यांना ती शेवटपर्यंत विसरली नाही.

          माईंकडून पुढे खूप मोठं कार्य करुन घ्यायचं होतं, म्हणून विज पडून अपघात झालेल्या बसमधून तिला अगोदर काढून देवानं वाचवलं होतं, हा डी. बी. महाजन सरांनी लिहिलेला सत्य प्रसंग खूप काही सांगून जातो. डी.बी.महाजन सर निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून माईने त्यांना कसा आश्चर्याचा धक्का दिला? पुढे डी. बी.महाजन सरासाठी आश्रमात बासुंदी बनवण्यास सांगितली. एवढेच नाही तर त्यांना रेल्वेस्टेशनवर पाठवण्यासाठी सोबत माणूस पाठवला आणि पुन्हा जागा मिळाली का? तुझ्या बायकोला बासुंदी पाठवायला विसरले, असे बोलून खरंच माईंनी डी. बी. सरांचे मन जिंकलं.

            माईंना मांसाहारी जेवण आवडत नसे, त्यामुळे ती ज्या ठिकाणी ते होतंय त्या ठिकाणी न जेवता दुसरीकडे शाकाहारी माणसाकडे साधं जेवण घ्यायची. माईला भारतातील नव्हे बाहेरच्या देशातील सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले. ती नेहमी म्हणायची, "पुरस्कारानं पोट भरत नाही, माझ्या अनाथ मुलांना भाकरी पाहिजे." ती मुस्लिम राष्ट्रातील 'अहमदिया पीस फौंडेशन' हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय स्त्री होती. कारणं सांगणं तिला अजिबात मान्य नव्हतं, ती शेवटपर्यंत झगडणारी स्त्री होती.

           आजकाल थोड्याशा संघर्षाने जीवाचं बरं-वाईट करणारे बरेच भेटतात, परंतु प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुनर्जन्म घेणारी 'माई' तुम्हाला खूप काही सांगून जाते. त्यामुळे तिचा संघर्ष, तिची दुर्दम्य इच्छाशक्ती या प्रस्तुत पुस्तकातून अवश्य एकदा वाचाच.


    माझे मित्र श्री मोहन चिलवेरी सरांनी हे पुस्तक मला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार!

©®-विश्वेश्वर कबाडे(नवोदित बहुभाषिक कवी,लेखक)

रा.अणदूर

ता.तुळजापूर

भ्रमणध्वनी-9326807480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू