पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी भाषेचे महत्त्व आणि तिच्या संवर्धनाचा उपाय

मातृभाषा म्हणजे साक्षात आई कडूनच मिळालेली भाषा.

 

आई करता जितके प्रेम एखाद्याचे असते तितकेच प्रेम हे मातृभाषे साठी देखील असावे. अगदी सोपे आहे, कारण ही भाषा आई सारखीच जवळची वाटणारी असते. मनात येणारे भाव मातृभाषेत मांडणे जास्त सोपे असते. कारण ह्या भाषेत जाणवणारी आपुलकी आणि जिव्हाळा नक्कीच जास्त असतो. नैसर्गिक पणे ह्या भाषेत आपण खूप छान बोलू शकतो. 

 

" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " हे अगदी प्रत्येक मराठी भाषिक माणसाच्या मनात भिनलेले गाणे आहे. मराठी बोलतो हे आमचे भाग्य आणि मराठी ऐकणे हे दिखील आमचे भाग्य...अनेक साहित्यिकांनी आपल्या ह्या भाषेला समृद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. 

 

त्यांच्या केलेल्या भाषेच्या सेवे मुळे आपण खूप काही वाचू शकतो. कादंबऱ्या, कविता, लेख असे अनेक साहित्य मराठीत लिहिले गेले आणि मराठी भाषा ही शब्दां मुळे समृद्ध होत गेली. 

 

ह्या भाषेत वेळे अनुरूप खूप काही बदल आले. ह्या बदलांचे एक स्वरूप म्हणजे ही भाषा ज्या ज्या प्रांतातले लोक बोलू लागले ते ते त्यांच्या प्रांतातले काही शब्द ह्यात वृद्धिंगत करू लागले. 

 

उदाहरणार्थ एखाद्या गुजराती बोलणाऱ्या व्यक्ती ने मराठी बोलण्याचा प्रयत्न केल्यास खूपदा ते म्हणतात " अहो भाऊसाहेब हे सर्वे लीहीले तर काही वांदा नाय ना ?", किंवा एखाद्या हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीने मराठी बोलण्याचा प्रयत्न केला असता बऱ्याचदा ह्या शब्दाचा उच्चार असा केला जातो.  

 

ह्या सर्व करण्याने भाषेचा ह्रास होतो असे मला नाहीं वाटत, तर ह्या उलट विशेष आकलन नसतानासुद्धा लोक आपल्या भाषेचा वापर करायचा प्रयत्न करतात हे अभिमानास्पद वाटते.

 

परंतु आपल्या भाषेत हळू हळू वाढणारा इंग्रजी भाषेचा प्रभाव मला थोडा काळजीत टाकणारा आहे. 

हल्ली मराठी भाषेत म्हटले जाणारे एक वाक्य आणि त्यात वापरले जाणारे अनेक इंग्रजी शब्द मला ऐकायला खूप आवडतं नाहीं. अक्च्युअली, फॉर्चूनेटली ह्या सारखे अनेक शब्द म्हणजे भाषेला लागलेल्या ग्रहाणा सारखे वाटतात मला. 

 

" खरतर मी खूप भाग्यवान आहे " हे म्हणण्यापेक्षा " अक्च्युअली मी खूप फॉर्चूनेट आहे " असे म्हणणे लोक जास्त पसंत करतात. 

मला असे वाटते की आजन्म आपल्या माते सोबत लेकराची नाळ जोडून ठेवणारी एक गोष्ट म्हणजे मातृभाषा

 

त्यामुळे मातृभाषा आणि त्यातले शब्द हे नेहमीच जवळीक साधणारे असावेत. बाहेरच्या जगात जरी इंग्रजी महत्वाची असली तरी ममतेचे आणि परंपरेचे मोती ज्या दोऱ्याने व्यक्तीशी जोडलेले असतात तो दोरा म्हणजे मातृभाषा

 

त्यामुळे किमान सभाशिक व्यक्तींनी तरी एकमेकांशी मातृभाषेत संवाद साधायला हवा. इंग्रजीत असणारे पुस्तक वाचन हे महत्वाचे आहे, कारण त्यामुळे आपल्या शब्दकोशात वाढ होते तसेच मराठी चे वाचन सुध्धा खूप महत्वाचे आहे. कारण मुळात आपले शब्दचं आपल्याला अवगत नसतील तर आपली भाषेचा अपभ्रंश होणे निश्चितच आहे. 

 

माझ्या मते ज्याचे स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व आहे त्यास इतर कोणतीही भाषा आकलण्यास खूप त्रास होत नाही, कारण मुळ मजबूत असेल तर पुढील प्रवास हा अधिकच सुखकर असतो. 

 

मला आजही लक्षात आहे की माझ्या आईने कधी ही मला " तू good boy आहेस ना " असे कधीच म्हटले नाहीं कारण Good boy किंवा Good Girl ही संकल्पना पालकांच्या अंगवळणी तेंव्हा पडलीच नव्हती.

 

आपल्या मुलाने किंवा मुलीने एक चांगलं व्यक्ती किंवा माणूस व्हावे असा पालकांचा अट्टाहास असे. परंतु आजकाल आमच्या पिढीचे बरेचसे पालक आपल्या मुलांशी इंग्रजीत बोलणे पसंत करतात जे कुठे तरी मर्यादेत असायला हवे.

 

एक लहान मुल, जे नुकतंच शाळेत जाऊ लागते ते मूल आपल्या आजी आजोबां सोबत मराठीत बोलण्याचा प्रयत्न करते, आपल्या आई वडिलाबरोबर मोजक्याच मराठी आणि जास्त इंग्रजी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करते आणि बाहेरच्या जगात किंवा शाळेत हिंदी मिश्रित इंग्रजी किंवा इंग्रजी मिश्रित हिंदी बोलायचा प्रयत्न करते. 

 

इतक्या लहानशा जिवावर विविध भाषांचे किती दडपण आपण टाकत असतो. हे जर थांबवायचे असेल तर लहान मुलांशी मातृभाषेत संवाद साधणे फार गरजेचे आहे.

 

आपल्या मराठी भाषेचे मूळ संस्कृतातून आहे.

 

संस्कृतभाषेमुळे शब्दां करता जिभेचे वळण सुसह्य होते. लहान मुलांना श्लोक शिकवणे, सायंकाळी सोबत बसून प्रार्थना म्हणणे हे संस्काराच्या बाबतीत जितके महत्वाचे आहे तितकेच भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने पण महत्वाचे आहे. 

 

त्यामुळे आज ह्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रगल्भते साठी प्रयत्न करूया आणि आपली भाषा अजून समृद्ध करूया.

 

माझ्या सर्व वाचकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

अमेय पद्माकर कस्तुरे 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू