पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी मातृभाषा: मराठी

२१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो तर २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात. आपल्या सर्वांनाच मराठी भाषिक म्हणून आपल्या माय मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. आणि खरोखरच अभिमान करण्यासारखीच आपल्या माय मराठीची गाथा आहे. 

 

अगदी पूर्वापार आपल्याला संतांची परंपरा लाभली आहे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव ह्याबरोबरच संत मीरा, जनाबाई, बहिणाबाई इ.इ. ह्यांच्या रचना, ओव्या अजरामर झाल्या आहेत. 

 

आजतागायत अनेक साहित्यिकांनी मिळून मराठी साहित्यात मोलाची भर घालून मराठी भाषेचे संवर्धन केले व मराठी भाषेला, मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. कथा, कविता, लेख ह्या व्यतिरिक्त ललित लेखन, नाटक, समीक्षा, प्रवास वर्णन, त्याचबरोबर गंभीर, मार्मिक, रहस्यमय, विनोदी, माहितीपूर्ण अशा विविध शैलीत लेखन करून सर्व लेखक व वाचकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. आजच्या काळात 'शॉपीझेंन मराठी'सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्म मराठी भाषेकरता खूप मोलाचे कार्य करीत आहेत. 

 

गुगलच्या स्त्रोत नुसार, भारतात एकूण १९५६९ बोली भाषा आहेत. त्यातील अनेक बोली भाषा आता नामशेष होत चालल्या आहेत. दहा हजारांहून अधिक लोक एकच भाषा बोलणारे असतील अशा भाषांची संख्या भारतात १२१ इतकी आहे. भारतात मान्यताप्राप्त अशा एकूण २२ अधिकृत भाषा आहेत, ज्यात मराठीचा समावेश आहे. ज्यांची  मातृभाषा मराठी आहे अशा लोकांच्या संख्येनुसार मराठी ही भाषा जगात १०व्या क्रमांकावर तर भारतात ३ऱ्या क्रमांकावर आहे. 

 

आजच्या काळांत मराठी भाषेचे संवर्धन करणे व मराठी भाषेला समृद्ध करणे हे प्रत्येक मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी घरांत, कार्यालयात जेथे शक्य आहे तेथे प्रत्येक ठिकाणी आपण मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा. मी महाराष्ट्राबाहेर दिल्लीत रहात असल्यामुळे मला घराबाहेर नाईलाजाने दुकांदारांशी, रिक्षावाल्यांशी हिंदीमध्ये बोलावे लागते पण जेव्हा मी महाराष्ट्रात जाते आणि तिथली लोक दुकांदारांशी किंवा रिक्षावाल्यांशी हिंदीमध्ये बोलतात तेंव्हा मला फार वाईट वाटते. आपण महाराष्ट्रात आहोत आणि तरीही हिंदीमध्ये बोलावे लागत आहे कारण त्याला मराठी येत नाही हे दुर्दैव आहे. मला वाटते हिंदी भाषिकांना पण मराठी बोलता येत नसले तरी तिथे राहिल्याने  मराठी समजते तेंव्हा आपण शक्यतो मराठीतूनच बोलायला हवे. 

 

लहान बाळांना भाषेचे ज्ञान कसे होते तर ते जे ऐकतात तेच ते बोलायचा प्रयत्न करतात. तेव्हा आपल्या घरातील लहानग्यांशी बोलतांना आपण जाणूनबुजून मराठीतूनच संवाद साधायला हवा. असे केल्याने ते सहज व नकळत मराठी भाषा शिकतील. 

 

परंतु काही घरांमध्ये मॉडर्नपणाच्या नावाखाली लहान मुलांशी मराठीच्या ऐवजी इंग्रजीमध्ये बोलले जाते. इंग्रजी मिडीयममधून शिकणाऱ्या मुलांना "ए फॉर ऍपल" आणि "बी फॉर बॉल" शिकवतांना ऍपलला मराठीत सफरचंद म्हणतात आणि बॉलला चेंडू हे शिकवायचे राहून तर जात नाहीना हे आपल्याला पाहायला हवे. काळानुसार मुलांनी इंग्रजी शिकणे गरजेचं आहे पण जे शिकतोय ते समजून घेणं जास्त महत्वाचे आहे आणि आपण आपल्या मातृभाषेत लवकर व विनासायास शिकू शकतो. म्हणूनच मातृभाषा विसरून चालणार नाही. तसे झाले तर आपली गत "धोबी का कुत्ता न घरका न घाटका" अशी होऊ शकतं. 

 

अनेकदा मराठी भाषा दिवस साजरा करताना एका दिवसासाठी सगळेजण माय मराठीचे भरभरून कौतुक करताना दिसतात. पण वर्षभर आपल्याला मराठीचा अभिमान, प्रेम वाटत असते का हा मोठाच प्रश्न आहे. जर कोणी इंग्रजीतून बोलतांना आढळले तर त्याला सुशिक्षित, हुशार, यशस्वी अशी लेबलं आपण लगेच लावून टाकतो. तर कुणी मराठीतून संवाद साधत असेल तर तो जुनाट विचारांचा आहे असे ठरवून टाकतो. पण भाषा हे फक्त एक माध्यम आहे ते हुशारी किंवा यशस्विता मोजण्याचे प्रमाण नाही. आपण ज्या भाषेत खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो ती भाषा आपण सोयीनुसार निवडू शकतो जर ऐकणार्यांनाही ती भाषा येत असेल तर. शेवटी माध्यमापेक्षा एक सुयोग्य संभाषण होणे व विचारांची देवाणघेवाण होणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे फक्त एक दिवस नाही तर रोजच आपण घरी, दारी, दुकानात, ऑफिसमध्ये सर्वत्र मराठीचा पुरस्कार करायला हवा. मराठीमधील लेखन जास्तीतजास्त वाचायला हवे. जमेल त्यांनी जमेल तसे लिहीत राहायला हवे. मला वाटतं हेच खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन साजरे करणे असेल. 

 

शेवटी एव्हढच म्हणेन...

 

एक दिवस नाही तर रोज मराठीतून साधुया संवाद, 

मराठी भाषेचे संवर्धन आहे आपले कर्तव्य निर्विवाद

मराठी भाषा समृद्ध होत जाओ हीच सदिच्छा,

मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 

 

धन्यवाद

@ राधिका गोडबोले

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू