पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

केशव सृष्टी

यादोंकी बरसात(१५) 

     ......केशव सृष्टी...

 

        केशव म्हणजेच कृष्ण...कृष्ण म्हंटले की आठवते ते कृष्णाचे सवंगडी, त्याच्या भोवती पडलेला गोपगोपिकांचा गराडा...

       बरेच दिवसांपासून केशव सृष्टीत जायचा बेत आखत होतो..

 गुरुवारी (२३.०२.२०२३) "आले देवाचिया मना" आणि जायचा योग जुळून आला...

       शिवाय केशवाच्या गोकुळात, सृष्टीत जायचे तर मित्र सवंगडी सोबतच जाण्यात मजा आहे ना !! निघालो मग Sbi च्या गोपीका शालन,माधवी,वंदना, जया, आणि मी स्वतः.. अर्थात " Lead Roll" 

जयाचा होता..

       भाईंदर जवळ असणाऱ्या उत्तान या गावात निसर्गाच्या कुशीत, डॉ. अजिंक्य यांनी संघाला 

नाममात्र किमतीत दान केलेल्या २०० एकर जमिनीत ही "केशव सृष्टी" वसली आहे.

          संघाचे संस्थापक केशव बळीराम हेगडेवार, यांचेच नाव या प्रकल्पाला दिले आहे..या जमिनीवर सद्ध्या सहा वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत..

      १) उत्तान कृषी संशोधन संस्था..

      २) वनौषधी

      ३) गौशाला...

       ४) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

       ५) रजपुरिया वानप्रस्थाश्रम

       ६) राम रतन विद्यामंदिर

        आणि नाव तरी किती सुंदर..

  "केशव सृष्टी"...ज्याच्या मुखात यशोदा मातेला आख्ख्या जगाचे, सृष्टीचे दर्शन झाले होते त्या केशवची सृष्टी...

        सृष्टीत प्रवेश केल्याबरोबर सोनचाफ्याचा सडा आणि सुगंधाने आमचे स्वागत केले म्हणावे इतकी सोनचाफ्याची झाडे होती. 

    जास्वंदीच्या फुलांनी झाडे लदबद बहरली होती..

     सर्वत्र आंब्याच्या मोहरचा घमघमाट होता..प्रत्येक श्वासागणिक मन प्रसन्न होत होते..दिवसभर इतके चाललो पण थकवा म्हणावं असा जाणवलाच नाही !!..वय विसरून लहान मुलांसारखे सर्वजण झाडाखाली काट्याकुट्यात पडलेल्या छोट्या छोट्या कैऱ्या वेचू लागले, फुले तोडू लागले...

       नारळी पोफळीची उंचच उंच झाडे, आणि कोणतीही जागा रिकामी वाया जाऊ नये म्हणून त्या जागी अळूची पाने लावून उत्पादन काढण्याचे तंत्र कौतुकास्पद आहे..

       येथे कोणती भाजी पिकवली जात नाही ते विचारा? मिरची, कोथिंबीर पासून हर तऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या, कंदमुळे, फळे पिकवली जातात...

      स्वतः मेहनत करून भाज्या आणि तांदुळाचे पीक घेतात हे लोक..शेतीत आवड असणारी मुले मुली कृषी मधील दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स करण्यासाठी येथे येतात.

      कितीतरी प्रकारची औषधी वनस्पती, हर्बल वनस्पती आहेत ..

ही सर्व बघायची आणि त्यांची माहिती वाचायची म्हटली तरी अर्धा दिवस तरी नक्की लागणार

         औषधी वनस्पती पासून औषधे, चूर्ण, तसेच आवळे, कोकम पासून सरबत अन सिरप बनवली जातात.

    सकाळचा नाश्ता आणि जेवण अतिशय रुचकर आणि सात्विक, तर होतेच शिवाय शेतातून आताच आणलेल्या ताज्या भाज्यांची चव, भूक वाढवत होती..  

      भिंतीवरचे अर्थपूर्ण सुविचार, भिंतीवर काढलेले चित्र, शेतीची निगराणी करण्या पासून ते आपल्या पोटात अन्न जाईपर्यंतचे

अन्नाच्या एकेक कणाचे, एकेक घासाचे महत्व पटवून देणारे होते.. ते सुविचार लिहिल्या शिवाय राहवत नाही..म्हणून भिंतीवर वाचलेले आणि मनात घर करून गेलेले, प्रत्येकाने जेवताना लक्षात ठेवावे असे काही सुविचार मांडतेय...

     " Take what you eat...eat what you take.."

      " Plate मे खाना छोडणेसे पहले किसान के कष्ट का स्मरण 

करे "...

    " महिने लागतात पिकावयाला, अन् मिनिट लागतो फेकायला "...

      वाफाळलेला चहा, कॉफी, अन् गुलाबजामचा गोडवा तर अजूनही जिभेवर रेंगाळतोय...

        २०१४ मध्ये " सोलर ओवन कूकिंग क्लास " चे आयोजन करून गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते...हे याचे गौरवास्पद वैशिष्ट आहे..

       शेतातून भटकंती करताना ताजा ताजा भाजीपाला मोहात पाडत होता... किती घेऊ आणि किती नाही असे प्रत्येकाला झाले होते...ज्यांना शक्य होते त्यांनी पिशव्या भरभरून भाजीपाला घेतला.. पण गंमत तर खर पुढेच आहे...येताना सर्व " मुरलीधर" 

(म्हणजे प्रत्येकीचा नवरोबा हो ) रिकाम्या हाताने आले, जाताना मात्र ..."भाजीच्या पिशव्याधर" झाले..असो..

         मनमोहना च्या सृष्टीत मनाला कितीही आवर घातला तरी परत परत जाण्याचा मोह न झाला तरच नवल. 

        आठवड्यातून एकदा मुलांना त्यांचा विकास होण्यास मदत होईल अशा गप्पागोष्टी सांगणारे, मार्गदर्शन करणारे, निरनिराळ्या स्पर्धा घेऊन त्यांना उत्तेजन देणारे, कोणताही मोबदला न घेता एक आगळेवेगळे समाजकार्य करणारे, निवृत्ती नंतरचा काळ अशा प्रकारे सत्कारणी लावणारे लोक येथे येताना बघून त्यांच्याप्रति खूप आदर वाटतो...

    तिथला कर्मचारी वर्ग वागायला, बोलायला अतिशय लाघवी आहे.

लगेच आपलेसे करून घेतात. एका महिला कर्मचारीने शेतीची इत्यंभूत माहिती सांगितली...तर लॅबमधील

कर्मचाऱ्यांनी नवीन प्रॉडक्ट बनविण्याची प्रोसेस अजिबात कंटाळा न करता समजावून सांगितली. 

       रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रच्या स्वच्छ आणि प्रसन्न परिसरात राजकारण (किंवा तत्सम) या विषयात आवड असणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करणारा कोर्स घेतला जातो.. 

          राम रतन विद्यामंदिर हे "Inter national school" आहे. NRI लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि निवासस्थानाची सोय येथे करण्यात आली आहे.

       रजपुरिया वानप्रस्थाश्रमात सध्या १३० वृद्धांची काळजी घेण्याचे पुण्यकर्म येथील स्टाफ करतोय..

      विद्या मंदिरांसोबत देवदेवतांची मंदिरे सुद्धा आहेत...दुपारच्या ऊन्हातही दत्ताच्या मंदिरात अतिशय गारवा जाणवत होता... बाहेर कडक ऊन असले तरी नळाला तृष्णा भागविणारे थंडगार पाणी येत होते..

        केशव , कृष्ण म्हंटले की दूध, दही, लोणी नसेल असे होईल का? 

        येथेही दूध दुभत्याची रेलचेल आहे.. केशव सृष्टीत दोनतीन "गोशाळा", "गायघर" आहे. त्यांना ठरल्या वेळेनुसार चारा पाणी देण्यात येते .. गाईच्या शेण, गोमुत्रापासून खत, बायोगॅस, दंतमंजन, आणि उदबत्त्या बनवण्याचे काम चालते.

        स्वखुशीने डोनेशन, देणग्या देणाऱ्यांसाठी कॅश, ऑनलाईन सुविधा आहेत....त्याची रीतसर पावती देण्यात येते..

         निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर फोटोसेशन तर व्हायलाच हवे, हे वेगळे सांगायची गरज आहे का ????

         संध्याकाळी परत निघावेसेच वाटत नव्हते..पण रात्री राहण्याची सोय नसल्यामुळे थोडे नाराजीने, आणि दिवसभराची मजा आठवत निघालो. गाडीत गप्पाटप्पा आणि बँकेतल्या आठवणीत प्रत्येकाचा थांबा कधी आला ते कळलेच नाही...एरवी त्रासदायक वाटणारा " ट्रॅफिक जाम" त्या दिवशी हवाहवासा वाट होता...कारण तेवढेच जास्त एकत्र वेळ घालवता 

आला..

      येताना गोराईच्या पगोडाला धावती भेट दिली...

       एक मात्र सांगावेसे वाटते की, मुंबईच्या, सिमेंटच्या जंगलातून, धकाधकीच्या जीवनापासून, अशा शांत, आणि डोळ्यांना सुखवणाऱ्या हिरवळीच्या जंगलात एक दिवस घालवायला प्रत्येकाला नक्कीच आवडेल...

सौ.सरोजिनी बागडे

दि. २५.०२.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू