पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चतुश्लोकी आणि एकश्लोकी भागवत

चतुश्लोकी आणि एकश्लोकी भागवत

- ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

 

          श्रीमद्भागवताच्या द्वितीय स्कंधातील नवव्या अध्यायात चतुश्लोकी भागवताचे वर्णन आले आहे. ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन वरदानस्वरूप असे चतुश्लोकी भागवताचे कथन सर्वप्रथम भगवंतांनी ब्रह्मदेवाला केले.

          चतुश्लोकी भागवताचे स्वरूप हे तात्त्विक अशा प्रकारचे आहे. या आधारे पुढे वेदव्यास मुनींनी श्रीमद्भागवताची रचना केली. भक्ती सांप्रदायात श्रीमद्भागवताची महती अपरंपार अशी आहे. चतुश्लोकी भागवताचे थोडक्यात स्वरूप असे की,

 

श्रीभगवानुवाच |

ज्ञानं परमगुहां मे यद्विज्ञानसमन्वितम् ।

सरहस्यं तदंगं च ग्रहाण गदितं मया ।।

 

श्रीभगवान म्हणाले - शास्त्रात वर्णन केलेले माझ्याशी संबंधित ज्ञान अत्यंत गोपनीय आहे, ते भक्तीच्या समन्वयाने प्राप्त होऊ शकते. यासाठी लागणारे साहित्य माझ्याद्वारे स्पष्ट केले आहे. तुम्ही ते काळजीपूर्वक घ्या.

 

यावानहं यथाभावो यद्रूपगुणकर्मक: ।

तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् ।।

 

माझ्या सहज कृपेने तुमच्या अंत:करणात उदित झालेल्या यथार्थ बोधाने, तुम्ही माझे खरे शाश्वत रूप आणि माझे दैवी अस्तित्व, रंग, गुण आणि कार्य या सर्व गोष्टी जाणून घेऊ शकाल.

 

अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम्।
पश्चादहं यदेतच्च  योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥१॥

 

श्रीभगवान म्हणतात - सृष्टीपूर्वी फक्त मीच होतो. सत्य, असत्य किंवा त्यापलीकडे माझ्याशिवाय दुसरे काहीही नव्हते. सृष्टी नसतानाही मी असतो. ही सर्व सृष्टीही मीच आहे आणि या सृष्टी, स्थिती आणि संहारातून जे काही उरते, तेही मीच आहे ॥१॥

 

ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि।
तद्विद्यादात्मनो मायां  यथाऽऽभासो यथा तमः ॥२॥

 

माझ्याशिवाय म्हणजे मूळ तत्वाव्यतिरिक्त जे दिसते (सत्य म्हणून भासते) पण आत्म्यात प्रतीत होत नाही, त्या अज्ञानाला आत्म्याची माया समजा जे प्रतिबिंब किंवा अंधारासारखा मिथ्या आहे ॥२॥

 

यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्॥३॥

 

ज्याप्रमाणे पंचमहाभूते (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) जगाच्या सर्व लहान-मोठ्या गोष्टींमध्ये असूनही नसतात, त्याचप्रमाणे मी देखील त्या सर्वांत व्याप्त असूनही  सर्वांपासून विभक्त आहे ॥३॥

एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा॥४॥

 

ज्याला आत्मतत्त्व जाणून घ्यायचे आहे, त्याला एवढेच जाणून घेणे योग्य आहे की अन्वय (सृष्टी) किंवा व्यतिरेक (प्रलय) या क्रमात जे तत्व सर्वत्र आणि सदैव (स्थान आणि काळाच्या पलीकडे) असते, तो आत्मा आहे. ॥

 

(श्रीमद भागवत महापुराण २। ९। ३२-३५ )

एकश्लोकी भागवत :

चतुश्लोकी भागवताप्रमाणे एकश्लोकी भागवत सुद्धा परंपरेत दिसून येते. या एका श्लोकात श्रीमद्भागवतातील महत्वपूर्ण घटनांचा उल्लेख आहे. भक्ती परंपरेत जसे एकश्लोकी रामायण आहे, तसे एकश्लोकी भागवत देखील आहे. याचा नित्यपाठ साधकाने करणे अपेक्षित आहे. एकश्लोकी भागवताचे स्वरूप असे की,

 

आदौ देवकिदेवगर्भजननं गोपीगृहे वर्धनम्

मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणम् ।

कंसच्छेदनकौरवादिहननं कुंतीसुतां पालनम्

एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् ॥

 

प्रथम देवकीच्या पोटी भगवंतांचा जन्म, गोकुळात बालकृष्णाचे संवर्धन, पुतना आदी राक्षसांचे प्राणहरण, गोवर्धन पर्वत धारण करणे, कंसाचा संहार, कौरवांचा संहार, पांडवांचे पालन, हे श्रीकृष्णलीलामृत श्रीमद्भागवतपुराणकथित आहे.

          वारकरी संप्रदायात देखील श्रीमद्भागवताचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचे महिमान वारकरी संप्रदायात सर्व संतांनी सांगितले आहे. म्हणून श्रद्धावंतांनी एकश्लोकी भागवत जाणत्यांकडून शिकून घ्यावे आणि त्याचा नित्य पाठ करावा, अशी भूमिका मांडावीशी वाटते.

टीप: याठिकाणी श्लोकांचे सरळ, सोपे अर्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू