पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमविवाह

                    प्रेम विवाह                                            शाळेत शिकत असल्यापासूनच आम्ही चौघीजणी अगदी जिवश्च कंठश्च मैत्रिणी होतो.आम्ही सर्वांनीच अकरावी पूर्ण झाल्यावर एकाच कलामहाविद्यालयात प्रवेश घेतला घेतला. त्यावेळी अकरावी बोर्ड होता.त्यानंतर चार वर्षाचा पदवी कोर्स होता .सर्वजणींना दाखला कसा भरायचा तेही माहित नव्हते.प्रत्येकीच्या घरून हेच उत्तर असायचे , " प्रयत्न करा म्हणजे शिकाल.आम्ही फक्त पैसे भरणार बाकी सर्व खटपट तुम्हीच करायची.आमच्यावर अवलंबून राहू नका."माझ्या मोठ्या भावाने आम्हां सर्वजणींना थोडी मदत केली.परंतु ब-याच प्रक्रियांतून जावे लागले.आधीच सर्व वातावरण नवीन होते. मुलामुलींचं एकत्र शिक्षण वगैरे. .आम्ही मुलींच्या शाळेत शिकत असल्याने मुलांशी वगैरे कसं बोलायचं त्यातून काही वात्रट मुलं,त्यांचं आमच्याकडे टक लावून पहाणं सगळच कस विचित्र वाटायचं.चांगलीच धडकी भरली होती. अखेर कसंबसं रांगेत लागून दाखला भरून पैसे भरले आणि महाविद्यालयात हजर झालो.
सुरूवातीचे आठ दहा दिवस सर्व काही सुरळीत होण्यात गेले.एक दिवस एक नवीन मुलगी आमच्या वर्गात आली .पहाताच कुणालाही आवडेल अशी. उंच ,सावळी ,कुरळे केस आणि चेह-यात अतिशय गोडवा असलेली शिवानी लवकरच आमची मैत्रिण झाली. आमच्यासारखीच तिची अवस्था देखील भेदरलेली होती.आम्ही सर्वजणी कायम बरोबर असायचो.कारण मुलांची भिती वाटायची.काही वात्रट मुलं मुद्दाम त्रास द्यायचे.अशावेळी एकमेकींचा खूप आधार वाटायचा.हळूहळू आम्ही सर्वजणी रूळलो.पहिल्या वर्षीच आम्ही वार्षिक संमेलनात
भाग घेतला .आम्ही सगळ्यांनी मिळून नाटक पण बसवले.त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. आम्हा सर्वजणींना त्याच नावांनी वात्रट
मुलांनी चिडवायला सुरूवात केली.अगदी रडकुंडीला आणलं.बरं घरात मोठ्या भावांना
वगैरे काही सांगू शकत नव्हतो कारण उगाच त्यावरून मारामारी झाली असती.पहिलं वर्ष असच थोडं भिण्यात गेलं .तरी ती मजा काही
वेगळीच होती.
    दूस-या वर्षी मात्र एक वेगळीच घटना झाली. एक दिवस शिवानी येत असतांना काही मुलांनी तिची छेड काढली .त्यानंतर ती मुलं तिला रोजच त्रास द्यायला लागली.तिच्या घरी ती सर्वात लहान आणि आईवडिलांना उतारवयात झाली होती. मोठ्या बहिण-भावाचं लग्न झालं होतं .ती दोघेही दूस-या गावाला होती.त्यामुळे ही घाबरली आणि आठ दिवस आलीच नाही. आम्ही सर्वजणी काळजीने तिच्या घरी गेलो तेव्हा तिने सर्व सांगितलं. त्यानंतर दोघी मैत्रिणी तिला बरोबर घेऊन यायला लागल्या.त्यावेळी आमच्या कुणाच्याच लक्षात एक गोष्ट आली नव्हती ती म्हणजे ,एक उंच गोरा तरूण मुलगा सतत शिवानीवर लक्ष ठेवून होता.एकदा कुणीतरी तिचं नाव घेतल्यावर घाबरून तिच्या हातातील वह्या पुस्तकं पडली.त्याने लगेच पुढे होऊन तिला मदत केली.वह्यापुस्तकांच्या निमित्ताने एकमेकांना झालेला चोरटा स्पर्श त्याचे ते टपोरे डोळे, गालावरची खळी पाहून शिवानीचं चित्त हरपून  गेलं.हळूहळू शिवानी शांत राहू लागली.नेहमी बडबड करणारी मोठ्याने हसणारी शिवानी एकटीच गालातल्या गालात हसू लागली.आम्ही कारण विचारताच काही न सांगता लाजायला लागली.एक दिवशी मात्र आम्ही तिला खोदून खोदून विचारलं तेव्हा तिने राजेशबद्दल सांगितलं. पण तिला हे कळत नव्हतं की राजेशच पण तिच्यावर प्रेम आहे किंवा नाही. आम्हाला पण काय करावं ते कळेना.पण अस वाटत होतं की दोघांच प्रेम जुळून यावं.तस अधुनमधून तो काही कारण काढून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा.पण याला प्रेम तरी कसं म्हणणार ?कारण असं तर पुष्कळ वेळा मुलंमुली आपापसात बोलत असत.मग आम्हाला एक युक्ती सुचली.आम्ही शिवानीला चार पांच दिवस महाविद्यालयात येऊच नको असं सांगितलं. तिनेेही आमचं ऐकलं.नेहमीसारखं आम्ही मैत्रिणी महाविद्यालयात घोळका करून फिरत होतो.पण आमच्याबरोबर शिवानी नव्हती .आमच्या लक्षात आलं राजेशची नजर तिला शोधत होती.पण तो काहीच बोलला नाही. दोन तीन दिवस आम्ही राजेशची गंमत पहात होतो.तो अगदी अस्वस्थ दिसत होता.त्याचा चेहरा उतरला होता.अखेर पांचव्या दिवशी न राहवून त्याने आमच्याजवळ शिवानीची चौकशी केली.तिकडे शिवानी पण रोज त्याच्याविषयी आम्हाला विचारत होती.दोन्हीकडे आग बरोबर लागली होती.राजेशने विचारताच आम्ही सर्वांनी त्याची फिरकी घ्यायला सुरूवात केली.अखेर त्याने कबुल केलं की त्याचं शिवानीवर प्रेम आहे.हे कळताच शिवानीला खूप आनंद झाला.मग हळूहळू एकमेकांना निमित्त काढून दोघही एकमेकांना भेटू लागले .सर्वकाही सिनेमात घडल्यासारखच वाटू लागलं.आम्ही सर्वांनी पण तिला चिडवायला सुरुवात केली.अखेर तरूण वय मोहात पाडणारच.तो एम ए करत होता.त्याचं नाव राजेश होतं.गाणं खूप छान म्हणायचा.आम्हां सर्वांजणींना पण हे खूप छान वाटत होत.आमच्याही नकळत आम्ही त्यांच्या प्रेमकथेत गुंतलो होतो.जे काही घडत होतं ते सर्व आमच्या नजरेसमोर .कधी चोरून भेटणं वगैरे असं काही नव्हतं म्हणा किंवा हिंमत नव्हती म्हणा .आम्ही सर्वजणी त्यांची भेट कशी घडवता येईल याच विचारात असायचो. त्याचबरोबर आम्ही सर्व मैत्रिणी पुढे काय होणार या चिंतेत असायचो.कारण शिवानीच्या घरी आणि राजेशच्या घरी हे चालण्यासारखं नव्हतं कारण तो तिच्यापेक्षा हलक्या जातीचा होता.पण म्हणतात ना प्रेम काही ठरवून केल जात नाही. ते तर अंतरातूनच उमलतं.म्हणून तर प्रेमात मनुष्य आंधळं होतं अस म्हणतात.
     हळूहळू ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी रमले होते .कधीकधी आम्ही एखाद्या रात्री आम्ही एकमेकींकडे जमायचो आणि पुढे काय करायचं यावर रात्रभर चर्चा करायचो.त्यातच वार्षिक संमेलनात भाग घेणं वगैरे चालू असायचं .दोघांनी मिळून युगलगीत पण गायलं होतं.फावल्या वेळात महाविद्यालयाच्या एखाद्या वर्गात रिकाम्या तासांना सर्वांनी मिळून धमाल करायची.प्रेमाची रंगत वाढत होती.राजेश दिसला की शिवानीच्या गालावर फुललेले गुलाब न्याहाळण्यात एक वेगळीच गंमत वाटायची.तिचं लाजणं हसणं बोलणं सगळच बदललं होतं .कधीकधी तर ती आमच्यात असूनही नसल्यासारखी असायची.एखाद दिवशी राजेश आला नाही की ती कावरीबावरी व्हायची.राजेश पण ती दिसली नाही की चिंतातूर व्हायचा.त्या दोघांची जोडी अगदी दृष्ट लागेल अशीच होती.त्यातच शेवटचं वर्ष आलं सर्वजणी चांगले नंबर मिळवण्यासाठी खूप अभ्यास करत होतो राजेशचे शिक्षण होऊन.तो एल एल बी करत होता.अभ्यासात हूशार होता.आता त्याचं क्षेत्र बदललं होतं . तो वेळ काढून मुद्दाम शिवानीला भेटायला यायचा बाकी विद्यार्थ्यांच्या पण ही गोष्ट लक्षात आली.त्यातल्याच कुणीतरी शिवानीच्या घरी चुगली केली होती आणि त्यांचे प्रकरण उघडकीस आले.ही गोष्ट शिवानीच्या भावाला कळली त्याने आईवडिलांना कळवले.ते बिचारे वय जास्त असल्याने घरीच असायचे.
     एक गोष्ट मात्र होती दोघही आपल्या मर्यादा जाणून होते.घरून.विरोध होणार याची जाणीव
होती.अभ्यासावर मात्र दोघांनीही लक्ष केंद्रित केलं होतं.उज्वल भविष्याचे स्वप्नंही रंगवत होते.
अचानक एक दिवशी शिवानीचा मोठा भाऊ आला होता.तो कोपरगावला महाविद्यालयात प्रोफेसर होता .त्याच्या कानावर शिवानी-राजेशचे प्रकरण आले होते.त्याने आल्याबरोबर सर्व मैत्रिणींना घरी बोलावलं. आम्ही सर्वजणी घाबरलो.शिवानीच्या भावाला खरं काय ते सांगून टाकलं. आतापर्यंत गंमत वाटत होती .पण आता लपवून फायदा नव्हता .राजेश हलक्या जातीचा असल्याने शिवानीच्या घरी हे मान्य नव्हते.मग काय तिच्या भावाने शिवानीचं महाविद्यालयात जाणं बंद केलं.आईवडिल वयस्कर असल्याने त्यांचीही हिंमत होत नव्हती.त्यातून राजेशच्या घरूनही विरोध होताच.काय कराव काही कळत नव्हतं.राजेश आणि शिवानीची अवस्था पाहवत नव्हती. त्यातून आम्ही मैत्रिणींनी या सर्व गोष्टीत शिवानीची मदत केली म्हणून तिच्या घरच्यांचा आमच्यावर राग होताच.आम्ही तिला भेटायला घरी गेलो तरी आम्ही काय बोलतो यावर तिची आई लक्ष ठेवायची.आम्ही तिच्या आईबाबांना 'राजेश खूप चांगला आहे. आता नोकरी पण करतो.तो वेगळं रहायला तयार आहे ' .असं सारखं सांगायचो.शिवानीच्या आईला हळूहळू आम्ही विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला. अधुनमधून ती शिवानीला आमच्याबरोबर बाहेर पाठवू लागली.त्यामुळे राजेशची आणि तिची भेट घडवून आणू लागलो. दोघांनाही मनातून आशा होती की आईवडिल तयार होतील. अभ्यासाच्या नोटस् वगैरे आम्ही तिला घरी द्यायला लागलो .फक्त परिक्षा देण्यासाठी ती आली.त्यांनतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिचा मोठा भाऊ तिला कोपरगावला घेऊन गेला.मग राजेशसाठी परिस्थिती आणखीनच बिकट झाली. आम्हा सर्व मैत्रिणींचा जीव हळहळत होता.त्यात माझं लग्न ठरलं .चार महिन्यांनी लग्न होतं.
      आता मात्र सर्व मैत्रिणींचा धीर संपला .कारण या सर्व प्रकरणात मी शिवानीची पुष्कळच मदत केली होती .मध्यंतरी माझ्या मोठ्या दादाचं पण लग्न झालं.तो राजेशला चांगलच ओळखत होता.तो एकदोन वेळा शिवानीच्या भावाला पण भेटला.पण काही उपयोग झाला नाही. आम्ही सर्व निराश झालो होतो.त्या काळात एकदा घरातून विरोध म्हटलं म्हणजे सगळं काही संपल्यासारखच असायचं.तिकडे कोपरगांवला शिवानीच्या भावाने तिच्यासाठी मुलं पहायला सुरूवात केली.हे समजताच राजेशचा जीव वरखाली झाला होता.त्याने माझ्या दादाला भेटून गळ घातली.दादाने त्याला धीर धरायला सांगितले. इकडे माझ्या लग्नाची पण धावपळ सुरु असल्याने दोन महिने तसेच गेले.माझ्या आईबाबांना पण वाटत होते की उगाच दूस-यांच्या भानगडीत आपण पडू नये.उगाच पोलिस कोर्ट कचेरी नकोच.पण दादाला वाटत होतं की दोन प्रेमी जीवांची ताटातूट नको व्हायला .त्याला कारण म्हणजे भावाचा पण प्रेमविवाह झाला होता पण दोघांच्याही घरातले सुशिक्षित असल्याने संमतीनेच झाला होता. दिवाळीच्या सुमारास शिवानी परत आली.भावाने तिच्यासाठी स्थळ पाहिलं होतं.उन्हाळ्यात लग्न ठरवलं होतं.मुलगा चांगला इंजिनिअर होता.नोकरी चांगली होती.शिवानीच्या भावाने तिचा लगेेेच
साखरपुडा उरकला होता.शिवानीची अवस्था बघवत नव्हती.त्या काळात साखरपुडा झाला म्हणजे अर्धलग्न पार पडल्या सारखच असायचं.
माझ लग्न होऊन मी पण सासरी आले . पत्रांमधून शिवानी-राजेशची अवस्था कळत होती.तीन चार महिन्यांनी मी चैत्रगौरीसाठी माहेरी आले होते.बाकीच्या मैत्रिणी एम ए करत होत्या.शिवानीचे लग्न पण जवळ आले होते.आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून तिचं केळवण करायचं ठरवलं.त्यादिवशी शिवानीची अवस्था पाहून दादाला पण गलबलून आलं.अधुनमधुन राजेश भावाला भेटायचा तेव्हा भावाला खूप वाईट वाटायचं.शिवानी घरी गेल्यावर मात्र आम्ही मैत्रिणींनी दादाला आणि वहिनीला शिवानीची मदत करण्याची गळच घातली.आईबाबा नाहीच म्हणत होते.मग त्यांनापण न सांगता एक बेत ठरवला.भावाचा एक मित्र गावाला गेला होता.त्याचे घर गावाबाहेर होते. एक किल्ली दादाकडेच असायची .दादाने राजेशला सांगितले आणि आम्ही शिवानीला तयार केले.परस्पर तिच्यासाठी महागाची साडी ब्लाऊज सर्व तयार केले सर्वांनी मिळून एका शुभमुहूर्तावर त्यांचे लग्न लावून द्यायचा बेत होता.त्यात दादाचे बरेच मित्र पण होते त्याचप्रमाणे राजेशचे वकील मित्र वगैरे.राजेशचे लग्नाचे कपडे वगैरे त्यांनीच विकत घेतले होते.दादाने ब्राम्हण वाजंत्रीवाला फोटोग्राफर वगैरे कुणाला कळू नये म्हणून बाहेर गावाहूनच बोलावले होते .हार गुच्छ सर्व तयारी करून ठेवली होती.वहिनीचा पण आमच्या बेताला पाठिंबा होताच तिनेच सर्व गोडाधोडाचे पदार्थ घरी बनवले. माझे आईबाबा दोन दिवस जवळच्या नात्यात लग्नासाठी जाणार होते .तोच दिवस लग्नासाठी पक्का केला होता म्हणजे आईबाबांना पण काही सांगितले नव्हतं.कारण त्यांना हे कधीच पटलं नसतं .परंतु सर्वात मोठी अडचण तर ही होती शिवानीला घरातून बाहेर कसं काढायचं. तिच्या घरीही लग्नाची तयारी सुरू होती .आम्ही सर्वजणी तिच्या घरी जमू लागलो.तिच्या आईला वहिनीला काही मदत हवी का विचारू लागलो .गप्पा मारणं हसणं खिदळणं सुरू असायचं.शिवानीच्या कानावर सगळा बेत टाकल्याने ती पण खुश राहू लागली.आता तिचे घरचे पण आमच्याशी चांगलं वागत होते.लग्न पंधरा दिवसांवर आलं होतं.एके दिवशी आम्ही तिच्या आईला आणि वहिनीला आम्ही,' शिवानीला दिवसभरासाठी घेऊन जाऊ का विचारलं मग नंतर कुठे ती आम्हाला भेटणार?'अस गोड बोलून विचारलं.अखेर इतक्या दिवसांचे आमचे कष्ट फळाला येण्याचा दिवस आला होता तिच्या आईने परवानगी दिली.
दादा वहिनीने आणि राजेशच्या मित्रांनी सर्व तयारी करून ठेवलीच होती सकाळी १०वाजताचाच मुहूर्त होता.आम्ही सकाळी शिवानीला घ्यायला तिच्या घरी गेलो.ती तयार होतीच.परंतु नाही म्हटलं तरी आईवडिलांना नकळत आपण हे पाऊल उचलणार आहोत याची तिला भिती वाटत होती आणि त्यांना कायमचं सोडून जायचं म्हटल्यावर तिला वाईट वाटत होत.डोळे पाणावले होते .पाऊल अडखळत होतं.आम्ही सर्व तिची अवस्था जाणून होतो.आम्ही तिला नजरेनच आश्वासन दिलं आणि तिला घेऊन पटकन बाहेर पडलो.आता पुढील सर्व हालचाली वेगाने करायच्या होत्या .कुठलाही गोंधळ व्हायला नको होता. आम्ही रिक्षाने दादाने दिलेल्या पत्यावर आलो .आता आम्ही सर्व मित्रमैत्रिणीच
तिचे सगेसोयरे होतो.गुरूजींनी कन्यादान कोण करणार अस विचारल्यावर आम्ही एकमेकींकडे पाहू लागलो.लगेच माझा दादाआणि वहिनी पुढे सरसावले .त्यांनी शिवानीचे कन्यादान केले.पुढचे सर्व विधी पण निर्विघ्नपणे
पार पडले.भावाने जेवणाची व्यवस्था केली होती.सर्वकाही सुरळीत पार पडलं .अखेर दोन जीवांची प्रेमकथा पूर्णत्वास पोचवण्यात आम्हा सर्वांना यश मिळाले होते.राजेश आणि शिवानीच्या चेह-यांवरचा आनंद अवर्णनीय होता.आम्हा सर्व मित्रमैत्रिणींना पण खूप आनंद झाला होता.एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद होता.त्यापुढे त्या दोघांच्या घरी कळल्यावर पुढे काय परिणाम होतील ते आनंदाने भोगण्यासाठी आम्ही सर्वजणी पुन्हा एकदा सज्ज झालो होतो.
सर्व कार्यक्रम आटोपल्यावर शिवानीला परत घरी सोडायचं ठरलं होतं .योग्य वेळ पाहून तिच्या आणि राजेशच्या घरी सांगायचं असं ठरलं होतं.पण ते इतकं सोपं नव्हतं कारण लग्न होऊन परत दोघांची ताटातूट करण्याचं पाप करायला मन धजत नव्हतं.पण नाईलाज होता.अखेर दोघांनी न राहवून एकमेकांना घट्ट मिठी मारली होती.ते दृश्य पाहून आमच्या सर्वांचे डोळे भरून आले .पण दादाने दोघांना समजावलं.संध्याकाळी आम्ही सर्वांनी जणू काही घडलच नाही या थाटात शिवानीला घरी पोचवलं.शिवानी खूप खुश होती.त्यामुळे तिच्या घरी कुणालाच काही शंका आली नाही. दोन तीन दिवस असेच निघाले आता तिच्या लग्नाला आता अगदी चार पांच दिवस राहिले होते.नेमकं त्याचवेळी माझ्या दादाला अचानक ऑफिसच्या कामाला दोन दिवसासाठी मुंबईला जावं लागलं.आम्हा सर्वांना खूप भिती वाटत होती.तिकडे राजेश पण खूप बेचैन होता.पुढे काय होणार याचा काहीच अंदाज लागत नव्हता.ईश्वराला प्रार्थना करण्याखेरीज काही उपाय नव्हता.शिवानीच्या चेहऱ्यावर पण चिंता दिसत होती.परंतु तिच्या घरी मात्र माहेर सोडून सासरी जायचं त्यामुळे ती उदास वाटत आहे,असा समज होता.
लग्नाच्या तीन दिवस आधी दादा पण परत आला.आम्ही सर्वांनीच त्याला घेरलं होतं. त्याने आम्हाला धीर दिला पण त्याच्या नजरेत पण चिंता दिसत होती. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सर्वजणी शिवानीकडे रहायलाच जाणार होतो.तिच्या आईवहिनीने आम्हाला लग्न होईपर्यंत रहायलाच बोलावलं होतं.आम्ही सर्वजणी संध्याकाळी पेट्या घेऊन तिच्या घरी पोचलो.पहातो तर काय घरातील वातावरण उदास होतं .आईबाबा डोक्याला हात लावून बसले होते.मोठा भाऊ संतापला होता.एका कोपऱ्यात बसून शिवानी रडत होती.तिची मोठी बहिण शिवानीची समजुत काढत होती आत्तापर्यंत हसत खिदळणारं घर एकदम उदास झालं होतं.आम्हाला काही कळत नव्हतं कुणाला विचारावं ते.अखेर हिंमत करून.मी शिवानीच्या वहिनीला विचारलं ,तेव्हां कळलं की मुलानं लग्नाला नकार दिला आहे.त्याच दूस-या मुलीवर प्रेम होतं.त्याने आईवडिलांना पण सांगितलं नव्हतं.त्यांनी पण असमर्थता दाखवली.त्या काळी काही घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ट्रंककॉल लावूनच गोष्टी कराव्या लागायच्या.नवरा मुलगा घरातून बाहेर गेला तो चिठ्ठी लिहूनच गेला.सर्व ऐकल्यावर आम्हा सर्वांनाच खूप धक्का बसला होता. पण मनातून मात्र आनंदच झाला होता.कारण आता आम्हाला वेळ मिळाला होता.आम्ही लगेच भावाला सर्व हकीकत सांगितली .परंतु शिवानीच्या घरी परिस्थिती वेगळी होती.दोन दिवसांनी लग्न असल्याने नातेवाईक येणार होते.पत्रिका वाटल्या होत्या.सर्वांसमोर नाचक्की होणार होती ती वेगळीच .परत मुलींच एकदा जमलेलं लग्न मोडलं म्हटलं की त्यांच्या समाजात कोणी तिला पत्करलं नसतं.या विचाराने घरातील सर्वांची भूक तहान हरपली होती.
लग्नाच्या एक दिवस आधी दादा त्यांना भेटायला गेला.त्यांची समजूत काढली. शिवानीचा मोठा भाऊ दादाला ओळखत होता.दादा त्याला बाहेर घेऊन गेला आणि या परिस्थितीत घराण्याची नाचक्की होऊ नये म्हणून " राजेशशी शिवानीचे लग्न लावून द्यावे .तसंही ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात आणि राजेश चांगला मुलगा आहे तुम्ही हो म्हणत असाल तर मी राजेशला तयार करतो."
शिवानीच्या भावाला देखील म्हातारे आईवडिल,घराण्याची अब्रू, समाजात होणारी मानहानी या सर्वाचा अंदाज होताच.त्याने दादाच्या बेताला संमती दिली.दादा राजेशच्या घरी गेला आणि त्याच्या आईवडिलांना पण समजावले .मुलाच्या आनंदासाठी का होईना तेदेखील तयार झाले. मग काय ठरलेल्या मुहुर्तावर शिवानी आणि राजेशचे लग्न सर्वसंमतीने परत एकदा पार पडले.सगळ्यांनाच आनंद झाला होता.आम्ही सर्वजणी खुश होतो .अखेर दोन प्रेमी जीवांचे प्रेम सफल झाले होते. लग्न लागल्यावर दादा वहीनींनी डोळे मिचकावत आम्हाला विचारलं काय कशी होती आमची दूसरी योजना ?
आम्ही सर्व आश्चर्याने त्यांच्याकडे पहातच    राहिलो !

       सौ ऐश्वर्या डगांवकर .इंदूर
          भ्रमणध्वनी 93297 36675.









पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू