पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चला, लिहिते होऊ या.

चला, लिहिते होऊ या.

© डॉ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर

__________________________________________________________________________________________________________

       खरं तर निर्मितीच्या प्रांतात गद्य, पद्य, कथा, कविता असा काही भेद करावा, असं वाटतच नाही. संस्कृतात तर साहित्यिकासाठी समानार्थी शब्द कवी आहे. गद्य काव्य, पद्य काव्य असे उल्लेख संस्कृत साहित्याचे बाबतीत केले जातात.

       कवी स्वत:च्या भावनेशी जितका प्रामाणिक, तितके ते काव्य सरस घडत असावे. कविता ही तर कवीची एक चांगली मैत्रीण असते. जेव्हा खूप दिवसांनी एखादी नवनिर्मितीची ओळ आधी मनात रुंजी घालू लागते, आणि नंतर पूर्ण कविता साकार होते, तेव्हा असं वाटतं की, आपण आपल्या एखाद्या मैत्रिणीसोबत बऱ्याच दिवसांनी गप्पा मारत आहोत.

       जीवन रोजचेच असते, traffic देखील रोजचीच असते. त्यातून मार्ग काढत आपण पुढे पुढे जात असतो. पण कधी कधी या traffic मधून मार्ग काढत असताना एखादे फुलांचे दुकान आपल्याला क्रॉस होते. ते रोजच क्रॉस होत असते. पण कधीतरी आपले तिकडे लक्ष जाते. त्या दुकानात अनेक फुले असतात. एखादे नाजूक गुलाबाचे फूल आपले लक्ष वेधून घेते. मन आह्लादित होते. काव्य हे असेच असते. शब्द रोजचेच असतात. पण कधी ते शब्द मनाचा ठाव घेतात. या साठी जीवनाकडे पाहण्याची एक सौंदर्यदृष्टी विकसित झाली पाहिजे.

       कवीसाठी कासावीस करणारा क्षण म्हणजे एखादे काव्य अस्पष्ट स्फुरते. ते व्यक्तही होत नाही. आणि अव्यक्तही राहत नाही. अशा वेळेस निसर्गात एक फेरफटका मारून यावे. निसर्ग म्हणजे तरी देवाचे काव्यच असते. निसर्गात मनाचे पोषण करण्याचे एक अलौकिक असे सामर्थ्य असते. निसर्गात हरवलेले शब्द गवसतात. आणि एक काव्य साकार होते.

       म्हणून कवींनी लिहीत राहीलं पाहिजे. जसे माणसासाठी एक सुंदर उपदेश म्हणजे “चरैवेति चरैवेति......” तसे कवींसाठी छान काय, तर त्यांनी लिहित राहावं. लिहित राहावं. यातून एखादे निर्व्याज, नितांत सुंदर काव्य साकार होते.

       कवितेतून कधी वेदना व्यक्त होते, तर कधी वेदनेवर फुंकर मारलेली देखील असते. पण कवितेचे क्षेत्रफळ मात्र वेदनेपेक्षा मोठे असते. त्यामुळे कविता ही वेदनेशिवाय देखील असते. खरं तर कवीला जे वाटतं, त्या वाटण्याला मोकळं करून देण्याची वाट म्हणजे कविता असते. यात सुख, दु:ख, प्रेम अशा सर्वच भावनांचा सामावेश होतो. यात संवेदना प्रधान असते.

       कोणती कविता सुंदर? या प्रश्नाचे उत्तर आहे, जी अकृत्रिम ती कविता सुंदर. त्यात सहजता असते. ती कविता आर्द्र असते. ती कविता क्षणांना टिपणारी असते. ती कविता पापणीतच साठवलेले पाणी असते. त्या कवितेत व्यंग्यार्थ असतो. सारेच ठळक नसते. काहीसे गमक असते. ती कविता मधाळ असते. त्यात शब्द सोपेच असतात. त्यांची जुळवणी मात्र मनाचा ठाव घेणारी असते.

       तरुणांनी आणि एकंदर सर्वानीच असं विलोभनीय लिहायला हवं. ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर मन तरल व्हावं, असं बोलायला हवं, लिहायला हवं. ही लिहिण्याची सवय असेल तर आपण कोणत्याही वयात लिहू शकू. पण ही सवयच नसेल, तर ......?  कल्पनाही करवत नाही. चला तर मग लिहिते होऊ या. आपल्या स्वत:च्या आनंदासाठी लिहिण्यात एक वेगळीच मजा असते.

जागतिक कविता दिनानिमित्त कवितेविषयी सर्व कवींच्या प्रतिभेला सादर प्रणाम! 

इति लेखनसीमा......

© डॉ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू