पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमा तुझा रंग कसा

प्रेमा तुझा रंग कसा!* 

 

          रोजच्या प्रमाणे प्रभात वेळी उठून अंगणाची झाडझुड करून "तिने" पाण्यात शेण कालविले, अंगणात त्याचा सडा घालून रांगोळीपुरती  ओलसर जागा  झाडुने सारवुन घेतली. त्या जागेवर पांढऱ्या रांगोळीने सुबक  थेंबांची रांगोळी काढून सुंदर रंग भरले.

' मस्तच जमलीय  रंगसंगती आज! रांगोळीवर नजर रोखुन ती मागे सरकत  सरकत रस्त्यावर पोहचली .रस्ता व अंगण यात फारसे अंतर नव्हते.

 तिला तसं मागे येतांना बघून,

 

            "अहो! अहो!" असा आवाज देत, जोरजोरात सायकलची ट्रिंग, ‌ट्रिंग  घंटी वाजवत रस्त्यावरून येणाऱ्या  त्या तरुण सायकलस्वाराने तिला सावध करण्याचा प्रयत्न केला ,पण आपल्याच धुंदीत असणारी नंदिता मागे सरकत सायकलवर आदळली आणि तिच्या हातातला कप्पे असणारा रंगीत रांगोळीचा डबा उसळला.   तिच्या गोऱ्यापान मुख कमलावर  लाल, हिरव्या,पिवळ्या रंगाच्या छटा उमटल्या. तिचे विदुषकासारखे दिसणारे रूप बघून सायकलस्वाराला हसू आवरेणासे  झाले.

 

         एका अनोळखी तरूणासमोर झालेल्या  आपल्या फजीतीने नंदीता संकोचली. रांगोळीचा डबा तिथेच टाकून ती आपल्या कौलारू घरात पळाली.

 

     सकाळी सकाळीच ‌घडलेल्या त्या  "गोड" अपघाताला एक शुभशकुन मानतच तो तरुण  सायकलवर बसायला गेला आणि त्याची नजर परिधान केलेल्या पांढऱ्याशुभ्र  कुर्त्याकडे गेल ,

 

 'अरेच्या  स्वतःबरोबर मलाही आपल्या रंगात रंगवून गेली तर !"                                             सायकलवर बसुन  शीळ घालतच तो नदीकडे  निघाला.

 

  धावतच घरात प्रवेश करणाऱ्या नंदूवर  जयश्रीची नजर जाउन तिने विचारले                                                                                       "हे काय  , ये इकडे मी पुसून देते तुझा चेहरा."

 

    आपल्या  धडधडणाऱ्या ह्रदयाला आटोक्यात ठेवत,आईने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता  नंदिता निमुटपणे  आईसमोर जाऊन उभी राहिली.

    " वेंधळीच आहेस गं !". 

    नुकतच यौवनात पदार्पण करणाऱ्या  आपल्या लेकीची जयश्रीने मनातल्या मनात द्रुष्ट काढली.                                          '  नुसतंच सौंदर्य असुन काय उपयोग, नशीबही हवं सोबतीला !' मनातली गोष्ट ओठावर येऊ न  देता तिने नंदिता चा चेहरा पुसला.

                                            ‌            ‌                                                               सत्तर ,बाहत्तर चा काळ होता तो. शहरात‌ राहणारा  जयंत गावी आपल्या काकांकडे चार दिवस राहायला आला. सकाळच्या त्या आल्हाददायी वातावरणात सायकलवरून फेरफटका मारायला नदीकडे निघतांना पहिल्याच दिवशी "ती" धडकली होती. ‌    ‌‌                                                                   त्या संथपणे वाहणाऱ्या नदीचं त्याला नेहमीच  आकर्षण वाटे. तिथेच दगडावर बसून त्याने पाय नदीपात्रात सोडले. नदीचे पाणी ओंजळीत  घेत असताना त्याला त्या पाण्यात  स्वतःच्या प्रतिबिंबाऐवजी मघाशी  धडकलेल्या "त्या* नवयौवनेच प्रतिबिंब दिसताच तो पुटपुटला,

       'म्हणजे इतक्या तातडीनं माझ्या मनात प्रवेश केलास तू !'

  तिची आठवण येताच एक गोड अनामिक  शिरशीरी त्याच्या हृदयातून उठली आणि तो स्वतःचीच हसला.त्या निसर्गरम्य वातावरणात एखादं निसर्गचित्र रेखाटावं म्हणून त्याने सोबत कॅनव्हास व रंग आणले होते. डोळ्यासमोर सारखी 'ती' दिसायला लागल्याने त्याने आपला विचार बदलला,तीची प्रतिमा डोळ्यांसमोर आणुन त्याने चित्र रेखाटायला सुरुवात केली.पण त्याच मन त्याला स्वस्थ बसू देईना, पुन्हा एकदा तिला बघण्याच्या उत्सुकतेने  त्याने खांद्याला शबनम अडकवली, सायकलवर बसून त्याच रस्त्याने  तो परत निघाला. तिच्या घराकडे त्याने नजर टाकली, पण त्याची निराशाच झाली. वळसा घालून तो काकांच्या घरी पोहचला.

 

"काकी अगं चहा टाक !".

 

 "दुध यायचं  रे. थांबावं लागेल ,येईलच ती इतक्यात"

 

  "दुध आणलयं गं  मावशी ! म्हणत नंदिता बिनधास्तपणे समोरच्या बैठकीतून सरळ स्वयंपाक घरात प्रवेश करती झाली आणि सकाळी  धडक बसलेला तरुण आपल्या पुढ्यात उभा असलेला पाहून संकोचली,धडधडत्या‌ ह्रुदयाने  मान खाली घालुनच तिने विचारलं,

 

  " मावशी कुठे आहे? "दुध आणलं म्हणावं!

 

"आंघोळीला गेलीय! ठेवा  ना त्या टेबलवर काकी येईलच"!

अनपेक्षितपणे नंदिताला समोर बघून त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला व मनात रोमांच फुलुन आले.

 

  ती जरा संकोचाने पूढे सरकली,  डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे बघतांना तिचा अंदाज चुकला.बरणी टेबलाच्या कडेवर ठेवल्या गेली आणि  कलंडली,  धार  फरशीवर पडुन दुधाची नदी वाहू लागली.

आपल्या बावळटपणाचा तीला आणखीनच राग आला. 'सकाळपासुन सारखी फजीती होतेय या नवागतासमोर आपली.'

 

 कसचा आवाज  आहे  रे ? आणि  दुध कसं सांडल ?समोर वाहत असलेल्या दुधाकडे बघून  न यमीमावशीने नंदिताला विचारले.

"बघ न ग मावशी हा तरूण सकाळपासून माझ्या मागे लागलाय!"

 

"काय रे,काय केलंस तु?"

 ‌.      

 काही न बोलता "तो" फक्त गालात‌ हसला.

 

"मी आणुन देते दुध " म्हणून नंदीता परत‌ फिरली.          

 

   "मोठी लाघवी  आहे नंदू,"!

 

 "नंदू आहे ही  ? कीती मोठी झालीयं गं !"

 

 "तु का लहान‌ राहीलायस आता? दोन-तीन वर्षांत डॉक्टरची पदवी पडेल तुझ्या हातात!

 . पुन्हा दुध घेउन आलेल्या नंदीताने   यमुनामावशीच्या हातात बरणी दिली. भराभर पायऱ्या उतरत असतानाच , 

 

      "जयंत sss!"                                            यमुना मावशीने दिलेली हाक कानी आली. ती  थबकली, त्याबरोबरच  छुम छुम वाजणाऱ्या तिच्या पैंजणाचा आवाजही बंद झाला. हृदयात एक अनामिक तरंग उठून ते आणखीनच जोरजोरात धडधडू लागले. गच्चीवरच्या खिडकीतुन  दोन डोळे पाठलाग करत असल्याचा तिला भास झाला.  घरी पोहोचताच तिने आपले अंग बिछान्यावर झोकून दिले. ह्रदय मंदिराचे दार उघडून पंधरा वर्षांपासून आत विराजमान असलेल्या जयंतच्या मूर्तीच  जुनं रूप  बदलवुन तिथे नविन मुर्तीची स्थापना केली.

 दुसऱ्या दिवशी घराकडे नजर टाकत जाणाऱ्या  पाठमोऱ्या जयंतकडे बघत तिने दुधाची बरणी उचलली आणि ती यमी मावशीकडे निघाली.

 

" किती वर्षांनी आलाय जयु ! आम्ही दोघी बहिणी दोघी जावा. माझ्या पोटी मुल नाही. ताईला हा एकुलता एक मुलगा. भाऊसाहेब  सेलटॅक्स ऑफिसर म्हणून शहरात राहायला गेले आणि तिकडचे झाले .शहरात राहणाऱ्या आमच्या ताईचा तोरा तर काही विचारायलाच नको.पण जयु तसा नाही,मनमिळावू स्वभाव आहे त्याचा ,!" यमी मावशी सांगत होती.

 

   "मावशी चहा टाक गं आलोय मी !" 

 

जयंतला बघताच नंदीता घाईघाईने उठून उभी राहिली संकोचुन तिने आपल्या खांद्यावरचा पदर सावरून घेतला.एक चोरटी‌नजर त्याच्याकडे टाकत म्हणाली,"मावशी येते उद्या याच वेळेस! 

   सकाळी जयंतची सायकल नदीकडे जाताना बघताच तिची पावलं त्या दिशेने वळली. 

   नदीकिनारी एका दगडावर पाठमोरा बसुन तो समोर ठेवलेल्या कॅनव्हासवर तिची प्रतिमा  चितारण्यात मग्न होता.तिने हळुवारपणे पावलं टाकत जाऊन आपले दोन्ही हात त्याच्या डोळ्यावर झाकले. 

              "कोण नंदू "!                            डोळे न उघडताच त्याने आपल्या दोन्ही हातामध्ये तिचे हात धरले आणि ते हात तसेच हातात धरून पुन्हा त्याने आवाज दिला.

 

   " जयु!जयु विसरलास नाहीस तू मला?".

 

             "  बालपणीची प्रीत आहे ही नंदू,नकळत बहरून यौवनात पदार्पण केलेली. कसं विसरणार!".

 

 " किती वर्ष प्रतिक्षा करायला लावलीसं"!

 

" आता दरवर्षी येत जाईन. "

       त्याच्या बोलण्याने नंदिता शाश्वत झाली.             

 जयुचा परत निघण्याचा दिवस उजाडला.सकाळ पासूनच नंदूला भरून येत होत.

 ट्रेनची वेळ होताच हातातलं काम सोडून  ती रेल्वे स्टेशन कडे निघाली. जयंत सोडायला आलेल्या  मावशीकाकां आले होते. त्या तुरळक  गर्दीत आपण दिसू नये म्हणून ती  झाडाच्या आडोशाला झाली. जयंतच्या डोळ्यांनी तिचा वेध घेतला मुकपणे निरोप घेउन ती परत फिरली. गाडी सुरू होऊन तिने वेग घेतला.सीटवर बसुन जयंतने आपले डोळे शांतपणे मिटले आणि त्याला पंधरा वर्षांपुर्वीची  फ्राकमधलीनंदू आठवली,अशीच झाडामागुन निरोप देतांनाची आणि आठवले ते बालपणचे दिवस.

     रिकाम्या तेलाच्या डब्याची वाजंत्री करून  वाजवत चाललेली ती वरात , ते बाहुला बाहुलीचे लग्न आणि ऐनवेळी सवंगड्यांनी आपल्या डोक्याला मुंडावळ्या म्हणून  बांधलेल्या फुलांच्या माळा, नवरी म्हणून समोर उभी असणारी नंदू . कुणीतरी  भटजी बनून असंबद्ध शब्दात म्हटलेले मंगलाष्टके आणि शेवटी शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर नंदिताने आपल्या गळ्यात टाकलेली फुलांची माळ. अवघं  पाच सहा वर्षाच वय असेल तेव्हा. त्यावेळी त्याचा काहीच अर्थ कळला नव्हता. पण आज इतक्या वर्षानंतर तिच्या मनातल्या आपल्याबद्दलच्या भावना जाणून मनातली प्रीत अजुनच बहरली .'

 

"मावशी दूध आणलयं!"

 

   "नंदू ,मला मुलगा असता तर मी तुला नक्कीच सुन म्हणुन करून घेतलं असत."

 ‌‌

 "कां इतर कोणासाठी नाही करून घेऊ शकत ?" 

 

"ईतरांवर अधिकार नसतो , हो पण जयु डॉक्टर झाला की त्याचं त्याचं ठरवेल तो!"

 

 खाली बसून मुडपलेल्या टोंगळ्यावर हनुवटी टेकवलेल्या नंदीताने आपली नजर आणखीनच खाली केली.

"नंदू तुझ्या आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे ,तिला घेऊन शहरात जा. चांगला इलाज कर तिचा, कुणी कुणाचं नसतं गं तुलाच सांभाळायला हवं!"

 

"हं" हुंकार भरून नंदु उठली. "होय काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा." 

  "नंदिताने घरची गाई वासरं आणि शेतीचा व्यवहार तात्पुरता यमीमावशीकडे सोपवला.

"नंदू जाताना जयंतच्या होस्टेलचा पत्ता घेऊन जा मदत होईल त्याची!"                               नंदिताने शहरात जाऊन जयंतच्या मदतीने रूम घेतली आणि आईचा  शहरात उपचार सुरू झाला.

   

 "नंदिता मेडिकलचा अभ्यास भरपूर असतो आता वारंवार भेटता नाही येणार आपल्याला!"

 

 क्वचितच होणाऱ्या भेटीत त्यांची प्रीत आणखी बहरून भावी जीवनाची स्वप्न फुलत गेली.

 

"जयु ,आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे  जावई म्हणून तुझा स्वीकार केलाय तिने, आपला संसार सुरू झालेला बघायचा आहे तिला!"

 

 "आई-बाबांशी बोलतो मी आपल्याविषयी!". 

 

    "आई गावावरून चिठ्ठी आलीयं यमीमावशीची, जयंत आणि त्याचे आई-बाबा आले आहेत गावी, भेटायला बोलावलयं !". 

 

       आईची तब्येत बरी नसतानाही नंदिता   तिला घेऊन गावी आली. यमी मावशीच्या घरी पोचली. दिवाणखान्यात शहरी पेहराव केलेले जयंतचे आईबाबा बसले होते. हळूहळू पावलं टाकुनही नंदीताच्या आईला दम लागला .                 हात धरून नंदिताने आईला खुर्चीवर बसविले. 

पाचवारसाडी नेसलेल्या, भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेल्या, गोरा पान चेहऱ्याच्या जयंतच्या आईने, नंदिताच्या आईकडे बघुनही दुर्लक्ष केले.

यमीमावशीने ओळख करून देत म्हटले, 

 

"ताई,हिला ओळखतेस ना, जयश्री,नंदीताचीआई! आपल्या शेताला लागूनच शेत आहे यांचं!"

 

"किती जमीन आहे?"

जयंतच्या बाबांनी विचारणा केली.

 

      "तीन‌ एकड" यमी मावशी बोलली.

 

" माझ्या वाट्याला आलेल्या  नव्वद एकड  जमिनीला यांचा तुकडा जोडून घे माधवा. आर्थिक व्यवहार उरकून घे.तेव्हढाच त्यांना आर्थिक आधार!"

        " काय गं जयश्री  तब्येत बरी नाही काय?" केव्हढी क्रूश झाली  आणि  नंदीताचे बाबा?"                                            नंदिताच्या आईचं पांढर कपाळ बघून जयंतच्या आईने विचारणा केली.

एकामागोमाग एक प्रश्नाने नंदीता गोंधळली.

"नंदु  सांग बाळा!  यमी मावशीने नजरेने इशारा करत म्हटल.

 

 "  आईला दम्याचा त्रास आहे, बाबा दहा वर्षापूर्वीच गेले टीबी होता त्यांना. "

 

"कसलं रोगट घराणं आहे , आमचा मुलगा डॉक्टर होण्याआधीच का पेशंटची लाईन लावायची!यमे तुला सांगून ठेवते आतापासून जयंतला लग्नाच्या बेडीत अडकावयच नाही . माझ्या डॉक्टर मुलासाठी थोरा मोठ्यांच्या मुली सांगून येत आहेत आतापासूनच"! 

 

     आतापर्यंत नंदिता सर्व शांतपणे ऐकत होती .त्यांचे बोलणे तिला रूचले नाही.

  

       "मावशी तुझ्या शब्दाला मान देउन घेऊन आले होते आईला.परिस्थीती नसली तरी स्वाभिमान जागृत आहे मनात अजून, येते मी!"

नंदिताने यमीमावशीकडे बघुन हात जोडले.

 

 "नंदू नंदू थांब !"पण जयंतच्या हाकेकडे वळूनही न बघता नंदिता आईलाच्या खांद्याला आधार देत  पायऱ्या  ऊतरूलागली.

 

"नंदु ,खास तुला भेटायला आणलयं आई बाबांना! तुझ्या भल्याचा विचार करूनच बोलले न ते, तु असं  त्यांचा अपमान करून निघुन यायला नको होतंस!"

"कुणी कुणाचा अपमान केला जय! "

 

 " लहान आहेस तु नंदु त्यांच्या पेक्षा"

 

"पण माझी आई? तुझ्या आई बाबांचा अपमान तो अपमान आणि माझ्या आईचं काय?"

 

 "हे बरोबर नाही केलंसं तु नंदु!"

तिच्याकडे तिरस्काराने बघत जयंत उत्तरला.

 

       घरी गेल्यावर नंदीताला रडु आवरेणासे झाले. गरिबीची थट्टा तिला सहन‌झाली नाही. लेकीच्या मनाची व्यथा आईला न कळली तर नवलच ! नंदीताला यमीमावशीचे शब्द आठवले.      " कुणी कुणाचं नसतं आपलं आपल्यालाच सांभाळायला लागत". ‌.                              त्या दिवशी आईचा  वाढलेला त्रास बघताच  नंदिता‌ने जयश्रीला शहरातील सरकारी इस्पितळात दाखल केलं. डॉक्टर अपर्णा पंडितांच्या देखरेखीखाली जयश्रीचे उपचार सुरू झाले,आठ दिवस झाले पण म्हणावी तशी प्रक्रुतीत सुधारणा होत नव्हती.नंदीता दिवस रात्र आईच्या उशाशी बसून सेवा तर करतच होती पण वार्ड मधल्या इतरही पेशंटला ती मानसिक आधार देत होती. मदत करत होती. त्यामुळे नंदीता बद्दल सगळ्यांना  एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली. 

 

"डॉक्टर माझी आई बरी होईल ना हो? आई शिवाय या जगात मला कोणीही अगदी कोणीही नाही मी पोरकी होईल हो!"

            "स्वतःला कधीही एकटं समजु नकोस नंदीता, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, तुझ्याच वयाची माझीही मुलगी आहे."

  आणि एक दिवस डॉक्टर अपर्णाच्या प्रयत्नाला यश येऊ न देता, जयश्री आपल्या लेकीला पोरकं करून या जगातून निघून गेली.आणि तिच्या मनात जयंतच्या आईबाबांबद्ल आकस निर्माण झाला.

 

   डॉक्टर अपर्णां पंडीतांनी तिला आपल्या घरी नेलं.                                                         "   नंदीता अगं‌ तुझ्यात‌ल्या सेवाभावी वृत्तीचा इतरांना फायदा होऊ दे !".

     त्यांनी तिचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून डॉक्टर पंडितांच्या क्लिनिक मध्ये रूजु करून घेतलं.

नंदीतानेही रुग्णांच्या सेवेत आपले सर्व सर्वस्व वाहून दिले.                          

 

" नंदु उद्या सुप्रिया येतेय आपला फॅशन डिझाइनिंग चा कोर्स पूर्ण करून, छान गट्टी जमेल बघ तुमची!" 

         सुप्रिया अगदी गोड लाघवी मुलगी होती,आई सारखीच मनमिळाऊ. आल्या आल्या तिने दीदी,दीदी करून नंदिताला आपलंस करून घेतलं.

"मॅडम मी नवीन रूम बघितली क्लिनिक जवळच होईल म्हणते तिकडे शिफ्ट होईल म्हणते."

    

      " ठिक आहे,पण नंदू आपल्या सुप्रिया साठी स्थळ सांगून आलयं , मुलाने परदेशातून एम.डी केलेलं आहे.  कालच्या पार्टीत सुप्रियाला बघून मुलाच्या आईने लगेच मागणी घातली.स्थळाची संपूर्ण माहिती काढून होकार कळविलाय आम्ही, सुप्रियाजवळ असेल बघ त्याचा फोटो".

 डॉक्टर म्हटल्यानंतर नंदीताच्या डोळ्यासमोर जयंतचा चेहरा आला . जयंतही एव्हाना परत आला असेल. ती सुप्रियाच्या रूम कडे वळली.

 

"नंदूदी तू ? " नंदिताला बघून सुप्रियाच्या  हातातला फोटो निसटला.

 

नंदिताने  खाली पडलेला फोटो हातात घेतला ‌

           "  सुंदरच आहे , नाव काय गं?"

 

    ‌  "विराज"! तिचा चेहेरा म्लान दिसत होता.

 

"नंदुदी तू कधी कोणावर प्रेम केलंसं?"

 

सुप्रियाच्या प्रश्नाने नंदिता दचकली.

तिला जयंतची प्रकर्षाने आठवण होऊन ती म्हणाली, "कधी कधी नियती ऊलटे फासे टाकते आणि आपण जीवापाड जपलेल्या प्रेमाला आपल्यापासून दूर घेऊन जाते"!

 

"होय नंदूदी, घराण्याची मानमर्यादा, प्रतिष्ठा या सगळ्यात आपल्याला आपलं प्रेम  विसरावं लागतं"

"नंदू कुठे आहेस"? अपर्णा मॅडमनी आवाज एकताच नंदिता खोली बाहेर पडली.

"नंदू येत्या रविवारी सुप्रियाचा साखरपुडा करावयाचा ठरलंय , नक्की  ये"!                                             "होयमॅडम"! म्हणून नंदिता आपलं सामान घेऊन नवीन रूम मध्ये शिफ्ट झाली. सुप्रियाच्या साखरपुड्याच्या दिवशी नंदिता तयार होऊन हॉलवर पोहोचली. पाहुणे मंडळी जमली होती अपर्णा मॅडम आणि डॉक्टर प्रशांत पंडितही खुश दिसत होते. समोरून जयंत त्याच्या आई-बाबा , यमी मावशी व काका सोबत येतांना दिसताच  डॉक्टर अपर्णां व  डॉक्टर प्रशांत त्यांना सामोरे गेले. 

' ‌म्हणजे जयंतव सुप्रियाच लग्न ठरलयं ? खूप मोठा धक्का होता  तिला. अजूनही तिच्या मनात जयंतच्या परत येण्याची आशा होती पण आज ती आशा संपुष्टात आली.ती तिथुन बाहेर पडली.दुसऱ्या दिवशी तिने आपला राजीनामा डॉक्टर पंडितांकडे पाठवून दिला.

          आज आय स्पेशालिस्ट डॉक्टर सुशांत पत्रेच्या हॉस्पिटलमधला तीचा पहिलाच दिवस होता.

 ‌      आपल्या सुस्वभावी, आपुलकीच्या शब्दांनी नंदिता नवीन हॉस्पिटल मध्ये सर्वांचे लाडकी बनली. विशेषतः डॉक्टर सुशांतची. पण तिचं वर्चस्व नर्स शोभाला सहन झालं नाही. एक दिवस शोभाने नंदिताच्या हातात चहाचा कप दिला आणि दुसरा कप आपल्या तोंडाला लावला आणि त्या दिवसापासून नंदिताचा स्वर  हळु हळु बदलला.

" नंदा आज  आपल्या दवाखान्यात एक खास पेशंट येतोय, कालच्या वादळात त्यांच्या डोळ्यात कचरा गेलाय म्हणाले, हुशार,तरूण आणि उमदं व्यक्तिमत्व आहे. कदाचित तु ओळखत असशील डॉक्टर पंडितांचे जावई  हार्ट ‌स्पेशालिस्ट डॉक्टर जयंत!"

 

"अं ,हो!"जयंतच नाव ऐकताच ती गोंधळली. जयंतशी सामना व्हायला नको म्हणून ती डोकं दुखण्याची निमित्त करून स्टाफ रूममध्ये  बसून राहिली. 

 

"या डॉक्टर जयंत !

डॉक्टर स़ुशांतने जयंतची तपासणी केली.

        "डॉक्टर जयंत तुम्हाला  ऍडमिट रहावं लागेल."डॉक्टर जयंतला स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केल्या गेलं

       ‌ " काही सिरीयस प्रॉब्लेम तर नाही ना डॉक्टर तिने सहजतेने विचारलं ?" 

               " फक्त कचरा गेलाय, होईल पूर्ववत  आणि आपण आहोतच ना!"डॉक्टर सुशांत ने आपल्या प्रोफेशन वरचा विश्वास प्रकट केला. आणि जयंत माझ्या मित्राचा होणारा जावई आहे, मी सांगितले त्यांना कोणाला काही कळवू नका "!

 

    डॉक्टर जयंतच ऑपरेशन झालं. त्याच्या डोळ्यावर पट्टी लावलेली होती आणि त्या दिवशी नंदूने आपली ड्युटी तिथे लावून घेतली.

 

 ‌       ' कां नियती वारंवार आम्हाला एकमेकांसमोर समोर आणते ,संपलयं सगळं तरीही. नंदू तू आता  तो तुझा नाहीये, तुझा काहीही अधिकार नाहीये त्याच्यावरती, आता फक्त तो पेशंट आणि  सेवा करणे हाच तुझा धर्म!"

जयंत च्या अंगावर  पांघरून घालीत तिने आपल्या प्रेमाकडे नजरभरून पाहीले, 'तुला योग्य अशीच आहे सुप्रिया!'.      ‌                         डोळ्याच्या कडा पुसत नंदिता रूम बाहेर पडली.

                आज जयंतला सुट्टी होणार होती ,त्याच्या डोळ्यावरची पट्टी निघणार होती. डॉक्टर सुशांत जयंतला भेटायला आले.                                                

 " सर तुमच्या इथला स्टाफ फार चांगला आहे,अगदी मनमिळाऊ आणि  सेवाभावी वृत्तीचा.दोन दिवस अगदी घरच्या सारखं वाटलं मला "  

             " होय !विशेषतः आमची ही नंदा, तिने आपलं जीवन रुग्णांच्या सेवेल वाहून दिले आहे फार चांगली मुलगी आहे पण…".               जयंतशी गप्पा मारता मारता डॉक्टर सुशांतने नंदीताची संपूर्ण कहाणी जयंतला ऐकवली. जयंत डोळे मिटून शांतपणे सगळं ऐकत होता. त्याला नंदिताची बाजू पटली होती. आपल्या अहंपणामुळे आईने तिला दिलेला नकार त्याला रूचला नव्हता' काय चुकलं होतं नंदिताच!"

 

      " नंदु,माझी नंदु " त्याच्या ओठातून अस्पष्टपणे उमटले.

 

"तुम्ही ओळखता डॉक्टर जयंत, तीला?"

 

"माझं बालपणच  प्रेम आहे नंदू"!

 त्याने डॉक्टर सुशांतजवळ मनमोकळ केलं.

 

  डॉक्टर सुशांत विचारात पडले,' दोन प्रेमी जिवांच मिलन व्हायला हवं!नंदूच्या विरान झालेल्या जीवनात जयंतच मधुबन फुलवू शकतो.'

 

त्यांनी नर्सला आवाज दिला. 

"नंदाला पाठवा जरा"

             " डॉक्टर त्याची ड्युटी संपलीये, जाताना त्यांनी आपला एक महिन्याच्या सुट्टीचा अर्ज  दिलाय!"

 

  " मला न विचारता सुटीचा अर्ज?" डॉक्टर सुशांतच्या स्वरात  आश्चर्य होते.

                   नंदिता घरी जायला निघाली खरी, पण घरी जायचं तिचं मन होईना. ती रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि तिथूनच आपल्या गावी पोहोचली.

         डॉक्टर सुशांतच म्हणणं  डॉक्टर प्रशांत व अपर्णा पंडितनी ऐकून घेतलं.

 

 "काय करावं असं तुमचं म्हणणं आहे डॉक्टर ?

                   "मला वाटतं सुप्रियाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगाव्यात. शेवटी तीन जीवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे." 

                                              

     "ममा पपा! सुप्रिया आनंदाने ओरडली. आज मी खूप खुश आहे आणि तिने लगेच त्यांना तिच्या व विराजच्या प्रेमात बद्दल सांगितलं.

 

          डॉक्टर प्रशांत वअपर्णा दोघांच्याही चेहऱ्यावर खुशी झळकत होती.

 

            पंधरा मिनिटांनी विराज आणि सुप्रिया समोरासमोर बसले होते.

    "विराज मला तुझ्या मदतीची गरज आहे.!"

     सुप्रियाने आपला प्लॅन विराजला सांगितला. त्या संध्याकाळी विराज आणि सुप्रिया डॉक्टर जयंतसमोर बसले होते.

 

    " सुप्रिया माझ्यासोबत येशील नंदीताला परत आणायला?"

                       " जयंत तु मनाने तू नंदीताजवळ पोहोचलेला आहेसच ,जरा हळू गाडी चालव ना." 

 

‌‌   पण जयंतच मन त्याच्या कह्यात नव्हतं. त्याने गाडीचा वेग आणखी वाढवला.                                                      "जय, जय काय करतोस! " सुप्रिया ओरडली.

        तोपर्यंत समोरच्या गाडीला चुकवताना ब्रेक दाबल्यामुळे त्यांची गाडी शेताच्या कडेला जाऊन उलटली. सुप्रिया कशीबशी गाडीच्या बाहेर आली.  तिने जयंतला आवाज दिला, त्याच्याकडून कसलही प्रत्युत्तर आले नाही. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात केला. त्यांच्या मदतीने जयंतला बाहेर काढून तिने सरळ गाडी तिच्या पप्पांच्या हॉस्पिटलला घेतली.  

                "ममा, ममा बघ ना काय झालय जयंतला, बोलत का नाहीये तो?"

 

"सुप्रिया धीर धर, मुका मार आहे. येईल शुद्धीवर, आम्ही आहोतच ना!"                        

 

 अस्वस्थ मनाने नंदिता गावी परतली होती.

 इथे येऊन  जयंत सोबतच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या. काही व्यथा कुठेच वक्त करता येत नाही, त्या आपल्या आपण सहन करून बोथट कराव्या लागतात.

 तिला आज आईची तिव्रतेने आठवण झाली. 'आज आई असती तर तिच्या कुशीत शिरून मनसोक्त रडून घेतला असतं' ‌.                   तहानेने व्याकूळ झालेल्या ओठांना तिने पाण्याचा ग्लास लावताच एक जोरदार ठसका बसला आणि तिच्या तोंडातून  निघाले," जयु तु सुखरूप आहेस ना?"

 

  "दोन दिवस झाले तरी जयंतला ला शुद्ध आली नव्हती, प्रयत्नांची पराकाष्ठा चालू होती.

 

    "विराज आपल्याला जायला हवं नंदीताला आणायला. पण तिला यातलं काही कळता कामा नये"

  विराज आणि सुप्रिया नंदीताच्या गावी पोहोचले. 

      "नंदिता !" सुप्रियाचा आवाज ऐकतात नंदिताने मागे वळून बघितले. तिच्या सोबत फोटोतला तरुण बघून तिला आश्चर्य वाटले.

 

  " नंदू कोणाला भेटायला आणलयं बघं!हा माझा होणारा नवरा विराज!पुढच्या आठवड्यात आमचं लग्न आहे, तुला घेऊन जायलाच आले मी!". 

‌‌

"पण तुझं लग्न तर…

"रिलॅक्स नंदुदी, जयंत तुझाच आहे आणि तुझाच राहणार"!

 सुप्रिया ने तिच्या मनातला संभ्रम दूर केला.

                                                                                    "चल निघायचं ,डॉक्टर जयंत वाट बघतोय तुझी, "

 

"मग तो का नाही आला मला घ्यायला? आणि जयंतचे आईबाबा?"

 

" नंदुदी,अगं मिया बिबी राजी तो क्या करेगा…" 

 

 आणि सुप्रिया विराजकडे बघुन हसली.

 

नंदिता  यमीमावशीकडे पोहोचली.               "मावशी आज खूप आनंदात आहे मी,अगं सगळं मळभ दूर झालयं !माझ्या प्रेमाने कितीतरी रंग बदलले पण प्रेमाचा रंग एकच असतो,विश्वासाचा!"

यमी मावशीने तिला आपल्या पोटाशी धरले बाईने तिच्या डोक्यावरून पाठवून हात फिरवला. 

 

     " शेवटी रुसलेली प्रीत हसली तर…. सुखी व्हा"

यमी मावशीचा आशीर्वाद घेऊन नंदिता सुप्रिया विराज सोबत निघाले. गाडी डॉक्टर पंडितांच्या हॉस्पिटल जवळ पोहोचली.                         "इथे का आणलसं आपण घरी गेलो असतो ना तिथेच जयंतला बोलावलं असतं.!"

 

" नंदूदी डॉक्टर जयंत याच हॉस्पिटलला आहे,  तुझ्या येण्याची वाट बघत आहे"!

 

सुप्रिया नंदिता चा हात धरून जयंतच्या वार्डकडे निघाली. तिने दुरूनच जयंत कडे बोट दाखवत म्हटलं ,                                               "नंदिता आता खरी परीक्षा आहे तुझ्या प्रेमाची!"

नंदिता धावतच जयंत कडे गेली त्याचा हात हातात घेत म्हणाली,     ‌                                     " "जयंत, जयंत डोळे उघड ना, तुझी नंदू आलीय जय ,जय आपले प्रेम जिंकले!"

 

जयंतचा हात भरला हळूहळू पापण्यांची हालचाल झाली." नंदू, माझी नंदू!"

शेजारी उभ्या असलेल्या जयंतीच्या आईने नंदिताच्या पाठीवरून हात फिरवला,                 "नंदू ,जयु  आता कोणी वेगळं करू शकणार नाही तुम्हाला!"

 

 आज नंदिताच गावाकडचं कौलारू घर विजेच्या दिव्यांच्या रोशनाईने  उजळून निघालं होत. वऱ्हाड्यांची वर्दळ सुरू झाली होती. सनईच्या सुमधुर स्वरांनी वातावरण मंगलमय झाले होते. डॉक्टर जयंत नवरदेवाच्या वेषात मंडपात हजर होता. 

  "किती गोड दिसतेय माझी नंदु, नववधूच्या वेषात!" यमी मावशीने बोटंमोडून नंदिताची द्रुष्ट काढली.

 "मुलीचं कन्यादान कोण करणार"

भटजींनी विचारलं..

सुप्रियाने आवाज दिला, "ममा, पप्पा नंदूदीच्या कन्यादानाची वेळ झाली आहे !"         

       बालपणीची प्रीत कधी रूसली होती,पण आता हसत होती. ..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू