पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काव्यांजली: काव्यफुलांचा दरवळणारा गंध

 "कविता लिहिणे ही त्यांच्या जगण्याची उत्कृष्ट खूण आहे. कविता हा त्यांच्या अनुभूतीचा सर्जनशील अविष्कार आहे"- साहित्याच्या नभांगणात चमचमणारे नक्षत्र मंगेश पाडगावकर जेव्हा एका काव्यसंग्रहाला प्रास्ताविक देतात, तर साहजिकच वाचकांच्या अपेक्षा अजूनच वाढतात आणि कविता वाचण्याची त्यांची दृष्टी व मानसिकता बदलते, हे एक फार मोठे आह्वान असेल कवयित्री समोर.. आणि सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की कवयित्री सुषमा ठाकूर यांनी हे आह्वान लीलया पेलले आहे! 


"काव्यांजली" खरंतर हे काव्य संग्रह हातात घेताच एखाद्या घनदाट झाडाच्या सावलीत, मखमली गवताच्या गालीच्यावर बसून हळुवार कविता वाचण्याचा एक 'माहौल' म्हणजे वातावरण तयार होतं. कवयित्रीचे निसर्ग प्रेमही दिसून येतं. 

मनोगत वाचूनच कळून येते की कविता लिहिल्या नाहीत तर जगल्या आहेत! 


संग्रहात सुषमा जीं च्या अगदी सुरुवातीच्या काळातील कविता आहे. मुक्त छंदात केलेल्या या उन्मुक कविता त्यांच्या हसतमुख, प्रसन्न व आनंदी व्यक्तिमत्त्वाचा जणू आरसाच आहे. शिवाय त्यांच्या हळुवार व संवेदनशील मनाच्या भावना पण या कविता व्यक्त करतात. 


कविता कशी असावी, जी नेहमी आपलीशी वाटावी, वाचून असे वाटायला पाहिजे की 'अरे, हेच तर सांगायचे आहे आपल्याला!' 

सुषमा जीं च्या कविता नेमक्या तशाच आहेत. त्यांच्या मनापासून आपल्या मनापर्यंत येणाऱ्या.. मनाचा ठाव घेणाऱ्या! 

"मी ही अशी, मी ही तशी" कवितेत बघा ना, आयुष्यात येणऱ्या लहान लहान गोष्टींचा आस्वाद घेत जगणाऱ्या एका आनंदी तरुणीचे किती सुंदर वर्णन आहे! 


"धुंद मन" ही तशीच आयुष्याच्या संध्याकाळी सकारात्मकता शोधणारी एक अर्थपूर्ण कविता आहे… 

काळ्या कुट्ट अंधारातही

गगनावर झुकलेली चांदण्यांची वेल दिसतेच नं!

मुक्या हिरव्या झाडाचेही गाणे सुरेल भासतेच नं!


बहुतांश कवितांमधून कवियत्रीची सकारात्मक दृष्टी दिसून येते. "प्रतीक्षा" कवितेत उमलणाऱ्या कळीचे प्रतीक घेऊन त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टीकोन मांडला आहे, कविता वाचून असे वाटते की अजूनही 'जगणं सुंदर आहे..!'

देवघरातील समईच्या शांत प्रकाशात

ममतामयी प्रेमाची स्निग्धता अनुभवांना

जाणवते की जग सुंदर आहे…

आणि म्हणूनच जगणेही सुंदर आहे..

किती आशावादी आणि निरागस भाव आहे!

सुषमाजी यांचे निसर्गप्रेम तर प्रत्येक पानावर ओथंबून वाहात आहे.. सुरेख उपमा दिल्या आहेत आणि सुरेख प्रतिके वापरली आहेत.

 

कवयित्रीच्या रसिक मनाचे साक्ष देणाऱ्या पण अनेक कविता संग्रहात आहेत.. 

श्रावणातल्या पावसा सारखाच लहरी तू

कधी प्रेम हळुवार तर कधी बरसलास मुसळधार तू

जुईच्या कळ्या, प्रणयगीत, रातराणी, माझा श्रावण, कवडसा या सारख्या अनेक कविता कवयित्रीच्या मनातील लपलेल्या प्रेयसीचे दर्शन घडवतात. 


फक्त हेच नव्हे तर काव्यसंग्रहात तिच्या विविध रूपांचे दर्शन घडते. आईच्या भेटीसाठी आसुसलेल्या एका लेकीने लिहिलेली कविता 'स्वर्ग-सुख' असो, पाडगांवकरांच्याच गाजलेल्या कवितेची लय उचलून केलेली 'आई म्हणजे आई म्हणजे आई असते' असो, किंवा शेवटली कविता 'आई' असो. या सर्व कविता एका लेकीच्या मनातील भावना सुंदर रित्या व्यक्त करतात. 


तीच लेक जेव्हा स्वतः आई होते तेव्हा ती एका चिमुकल्या जीवाचे 'स्वागत' काव्य रूपात करते. 

'छोटासा तू' आणि 'एक फाटका पदर आईचा' मध्ये आईच्या मनाची व्यथा मांडते . 


एक प्रेयसी, लेक, पत्नी, आई.. असून सुद्धा ती सामाजिक जाणिवेचे भान ठेवून 'आतंकवाद' व 'सांगा ह्यात स्त्रियांचा काय दोष असतो? ' सारख्या प्रश्न उपस्थित करणाऱ्या कविता पण समाजासमोर ठेवते. 


संग्रहात 'तो क्षण आला आहे' 'स्तब्ध मन' 'वठलेलं झाड' 'नाही अजून कळले' 'मलाही यायचे आहे' सारख्या गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या कविता पण आहेत. 


शेवटी काही हिंदी कविता पण आहेत. सुषमा जी यांचे संपूर्ण शिक्षण मराठीत झाल्यावर सुद्धा त्या हिंदीत अर्थपूर्ण काव्य करतात, हे कौतुकास्पद आहे. 


मला अतिशय आवडलेली एक कविता म्हणजे 'सत्य'. या कवितेत वापरलेली प्रतिके उदाहरणार्थ सूर्याची कोवळी किरणे, पाखरांचे गाणे, पांढराशुभ्र धबधबा, हवाहवासा गारवा, नाजूक फुलांचा मंद सुवास, झाडावरची कोकिळा.. अहाहा! एक अप्रतिम निसर्गदृश्य डोळ्यासमोर उभे करते ही कविता! 


'तू कोण आहेस' सारख्या कवितेत अगम्य अगोचर ईश्वराचे वर्णन आहे तर 'एका कवीची बायको होणे' यात विनोदाची झालर आहे. मराठी भाषेची महती सांगणारी कविता "मी मराठी" आहे तर बाल मनाला भावणारी "परी राणी" पण आहे. 


एकुण, विविध विषयांच्या, भावनांच्या सुगंधी पुष्पांची ही काव्यांजली आहे, जिचा सुवास मनात कायम दरवळत राहणार… . 


सुषमा ठाकूर जी, म्हणजेच माझ्या सुषमा ताईला अनेकानेक धन्यवाद, मला हा काव्यसंग्रह वाचायला दिला यासाठी आणि मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी! 


©ऋचा दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू