पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राष्ट्रनिर्मितीचा प्रणेता राष्ट्रपुरुष: राजर्षि छत्रपति शाहू महाराज

राष्ट्रनिर्मितीचा प्रणेता राष्ट्रपुरुष~ राजर्षी छत्रपती शाहू महाराज.
आज दि. ०६ मे २०२३ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीची सांगता होत आहे. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजी सत्तेचे जोखड मानेवर असतानाही या स्वयंभू राजपुरुषाने स्वतःचे सत्व अबाधित राखत मानवतेच्या भूमिकेतून प्रजाजनांचे कल्याण आणि हितरक्षण करीत राज्य कारभार केला.
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जी ध्येय धोरणे राबविली, प्रजेच्या हिताचे जे क्रांतिकारक निर्णय घेऊन अंमलात आणले ते स्वातंत्र्योत्तर काळात केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशातील राज्यकर्त्यांसाठी पथदर्शक ठरले.
१९६० मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हा त्यांनी या राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श समोर ठेवून चालविला जाईल अशी ग्वाही दिली होती.
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दि. २६ जून १८७४ रोजी झाला. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचा आणि त्यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या या उदार मनाच्या, द्रष्ट्या, दूरदर्शी आणि समाज सुधारणेचा वसा घेतलेल्या पुरोगामी विचारांच्या राजाने राज्यारोहणाच्या वेळी जो जाहीरनामा जारी केला, त्याची सुरुवातच मुळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात जो मायना वापरला जात असे त्यास अनुसरून पुढे दर्शविल्याप्रमाणे झाली आहे.
‌ " स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २२०, विजय नाम सवंत्सरे फाल्गुन वद्य ११, इंदू वासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती यांजकडून... ... या जाहीरनाम्यात ते म्हणतात" आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी; तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परिपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहान थोर जहागीरदार, आपले सरदार, मानकरी इनामदार कामगार व्यापारी अधिकृत तमाम प्रजाजन शुद्ध अंतःदकरणापासून मोठ्या राजनिष्ठेने आम्हास साहाय्य करतील अशी आमची पूर्ण उमेद आहे. ही आमची कारकीर्द दीर्घकालापर्यंत चालून सफल करावी अशी मी त्या जगन्नियंत्या परमात्म्याची एक भावे प्रार्थना करतो.
प्रजेचे सुख व कल्याण हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'हिंदवी स्वराज्याचे' अंतिम ध्येय होते आणि तेच ध्येय धोरण छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जाहीरनाम्याच्या शेवटी ईश प्रार्थनेत व्यक्त केले आहे.
राजवैभव, राज विलास यांचा सुखनैव उपभोग घेण्यासाठी आपणाला राज्याधिकार मिळालेला नसून तो आपल्या रंजल्या-गांजल्या प्रजाजनांच्या विशेषतः गरीब, अज्ञानी, जनतेच्या उद्धारासाठी मिळालेला आहे, अशी उपभोग शून्य स्वामित्वाची भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगीकारली त्याच उपभोग शून्य स्वामित्वाच्या भावनेतून राज्य कारभार चालवायचा याची खूणगाठ छत्रपती शाहू महाराजांनी राज्यरोहणाच्या समयी मनी बाळगली असावी आणि त्याच उदात्त भावनेने त्यांनी तयहयात आपला राज्य कारभार चालविला.
विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, अस्पृश्यता निवारण कायदा, वेठ बिगारी निर्मूलन कायदा असे कायदे त्यांनी आपल्या राज्यात अमलात आणले. २६जुलै १९०२ रोजी त्यांनी‌ मागास वर्गीयांना नोकरीत ५० % आरक्षण लागू करण्यासंबंधातील क्रांतिकारी जाहीरनामा जारी केला. सुप्रसिद्ध चरित्र लेखक धनंजय कीर यांनी त्या जाहिरनाम्याचे "नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत" असे यथार्थ वर्णन केले आहे. राजर्षींनी दलितोद्धाराच्या कार्यास चालना दिली त्याचप्रमाणे भटक्या विमुक्तांच्या कपाळावरचा गुन्हेगार जमाती, असा शिक्का पुसून त्यांचा उद्धार केला. त्यांनी जातीभेद निर्मूलन चळवळ सुरू केली. स्त्री वर्गाच्या संरक्षणासाठीचे कायदे अमलात आणले. कामगार चळवळीला प्रेरणा दिली. रयतेची आर्थिक उन्नती व्हावी, व्यवसाय, व्यापार उदीम वाढावेत म्हणून श्री शाहू छत्रपती मिल्स ही कापड गिरणी सुरू केली. उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. मध संकलन, काष्ठार्क उद्योगाला चालना दिली. अनेक कृषी औद्योगिक प्रदर्शने त्यांनी भरविली. सहकार चळवळीला चालना द्यावी म्हणून १९१३ साली सहकार कायदा केला. दूध संकलन करणाऱ्या सहकारी दूध संस्था उभ्या केल्या. शेतकऱ्यांना बचतीची सवय लावणाऱ्या आणि प्रसंगी अडचणीत कर्ज देणार्‍या ग्रामीण पुरवठा संस्था, सहकारी तत्त्वावरील पतपेढ्या स्थापन करण्यास उत्तेजन दिले. गुळाच्या व्यापारासाठी शाहुपुरी व्यापारपेठ त्यांनी सुरू केली. शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थांची निर्मिती केली. मल्लविद्येला प्रोत्साहन दिले. संगीत उपासक, चित्रकार, नाट्यकला नि नाट्य कलावंत यांना राजाश्रय दिला. नाट्यप्रयोगासाठी कोल्हापुरात नाट्यगृह बांधले. राजर्षी शाहू महाराजांचे चिरंतन स्मारक म्हणता येईल अशा, कोल्हापूर संस्थानातील शेतकऱ्यांना वरदायिनी ठरलेल्या राधानगरी धरणाच्या बांधकामास अत्यंत दूरदृष्टीने त्यांनी प्रारंभ केला आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा पाया रचला. राधानगरी धरण हे देशातील पहिले वहिले धरण होय. दि. ०६/०५/१९२२ रोजी छत्रपती शाहू महाराजांचे वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी निधन झाले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांइतक्या उंचीचे महापुरुष होते. त्यांनी जे अलौकिक कार्य केले ते लक्षात घेता त्यांना राष्ट्रनिर्मितीचा प्रणेता राष्ट्रपुरुष म्हणूनच गौरविले पाहिजे.


सर्जेराव कुइगडे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू