पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कन्झ्युमर शॉपी

#कन्झ्युमरशॉपी

#रत्नागिरी


शॉपिंग, बाजार, खरेदी हे शब्द ऐकले तरी अंगात संचारतं नई! सलाईन लावून बरी झालेली, शक्तिपात झालेली व्यक्ती सुद्धा कशी ताडकन उठून बसते. आता तर काय सुट्ट्यांचे दिवस. रिकामं डोकं शॉपिंगचं! मग अनेक पोस्टर, जाहिराती, मेसेज दिसायला लागतात. पाऊलं कशी खरेदी करण्याकडे वळतात. आत्ता अगदी अलिकडेच बरेच जणांची पाऊलं कशी कन्झ्युमर शॉपीची मजा घेऊन आली. एकदा एकाला कळलं की कसं मग वणव्यासारखी बातमी पसरते. आपापली असलेली टाईट शेड्युल कशी क्षणार्धात शिथिल होतात. प्राधान्यक्रम बदलतो. प्राधान्याने कन्झ्युमर शॉपी ला भेट देणे हे दिवसाचे ध्येय निश्चित होते.  काही तर जितके दिवस उत्सव तितके दिवस भेट देतात.नावीन्य नावीन्य काय म्हणतात ते हेच! दररोज त्याच विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा. त्या वस्तू पण म्हणत असाव्यात रोज असं बघण्यापेक्षा एकदाचे जा घेऊन आम्हाला. नाही तर आहेच परत प्रवास त्या मोठमोठ्या बॉक्स मधून. चेंगरून चेंगरून. इकडून तिकडे. तिकडून इकडे.


सौंदर्य प्रसाधनांची बरोबरी करणारं काही असेल तर ते म्हणजे खाद्यपदार्थांची विक्री! चव बघा आणि पदार्थ घ्या या तत्वावरच आपल्याला प्रत्येक पदार्थाची चव चाखायला मिळते. कन्झ्युमर शॉपी बघायला जायचा मुख्य उद्देश च हा असतो, की विविध प्रकारचे मुखवास, आंबट चिंबट गोळ्या, चिंचा, अनारदाना वगैरे वगैरे दरवर्षी चाखून बघणे! वर्षातून एकदा मुखवास आणि तत्सम पचनाला चांगले पदार्थ चाखल्याने तब्येत ठणठणीत राहत असावी , असा अंदाज. बाकी आवळा कँडी, आवळा सुपारी, मोरावळा हे आमच्या लोकल बाजारात पण मिळतं. त्याचं काही एवढं हे नाही. पण तिथे विक्री स्टॉल वर मात्र ,"घ्या हो टेस्ट तर करा" असं वाक्य ऐकलं रे ऐकलं की मनातील शहाणे विचार दूर जातात. हात आपोआप पुढे झेपावतो. "आपण घ्यायचंच नाही तर खायचं कशाला" असा विचार मनातून पुढे येत असतानाच कधी तो पदार्थ गिळंकृत करतो याचं भानच उरत नाही. हाच की काय तो अर्थशास्त्रातला विवेकशील ग्राहक? ज्याला बरोबर कळतं आपला स्वार्थ कशात आहे!काही उन्हाच्या वेळेत भेट देणारे मात्र आवर्जून आवळा टेस्ट करतात हा. शारीरिक समतोल साधला गेला पाहिजे.  पण असं जरी असलं तरी गमतीचा भाग वेगळा, खरोखर दर्दी लोकं खरेदी ही करतातच. त्याशिवाय का टेस्ट ला पदार्थ देणं त्यांना परवडणारे? 


कन्झ्युमर शॉपी मधील आत्यंतिक महत्वाचा स्टॉल कोणता असेल तर तो म्हणजे वैविध्यपूर्ण मुखवास! मुखवास चाखायला मिळेल म्हणून एखाद्याने दुपारचं जेवण झाल्यावर अगदी खात्रीशीरपणे भेट द्यायला जावं, इतका विश्वास असलेला हा मुखवास चा स्टॉल! तो असणार म्हणजे असणारच! पण त्यांनीही एवढे वर्ष व्यापार केलाय म्हटलं. एखादा दाणा ठेवतात हातावर, जेमतेम चव कळेल एवढंच! एकदा का समोरचा माणूस १००ग्रॅम जरी वस्तू घेणारे कळलं की मग विक्रेता आत्यंतिक उत्साहाने बाकीच्या पदार्थांची चव दाखवू लागतो. हे गमतीशीर व्यवहार सुरूच राहतात! बाकी चपळाईने 5g पेक्षा जास्त वेगाने वेगवेगळ्या कटर च्या सहाय्याने भाज्या चिरून दाखवणारे विक्रेते पाहिले की वाटतं, आता बरे हे कांदे बटाटे अगदी शिस्तीत बसतात या कटर मध्ये! हेच आम्ही यांना मशीन मध्ये बसवलं की एक तर मशीन तरी तुटतं नाही तर या भाज्या उडून तरी बाहेर येतात. इथे बघायला 'भारी' वाटतं! विकत घेतलं की मात्र 'भारी' पडतं.


उदबत्त्या, अत्तरे, धूप, परफ्युम इत्यादी गोष्टींचे स्टॉल कसे आल्हाद देणारे असतात. या स्टॉल च्या इथे गेलं की वाटतं दोन ऐवजी चार हात जरी असते तरी कमीच पडले असते, किती मनगटं अत्तराने भरू नी किती नाही. वासांची सरमिसळ अगदी! हात वापरून संपले की ड्रेस आहेच फवारणी करायला! काय गो आणलंस कन्झ्युमर शॉपी तून? तर काही नाही तरी सुगंध आणलाय तरी नक्की म्हणू शकतो! 


"पापडांच काही कौतुक नव्हे! काही तरी फॅन्सी नावं सांगून भुलवता होय आम्हाला? आमची अंगणं बघा एकदा येऊन. इथे वस्तू आहेत त्यापेक्षा रंगीबेरंगी दिसतील. एक रंग सोडत नाही तर चिकवड्या घालताना!", असे विचार मनात येत असतानाच मात्र ,"जरा आकार वेगळाच आहे नई? आहेत साबुदाण्याचेच पापड-फेण्या, पण जरा आकर्षक दिसतायत म्हणत न कळत केव्हाच दोन पाकिटं पिशवीत चेंगरून बसलेली दिसतात. 


"घरात शंभर प्रकारचे कानातले, गळ्यातली आहेत. हे आणि आता कुठे रचायचेत? घरात एक-एक पडलेल्या वस्तू उचलायला भर! तू बघू ही नकोस या स्टॉल कडे!" अशी अदृश्य वाक्य बरोबर च्या व्यक्ती च्या नुसत्या नजरेतून जेव्हा तुम्ही ओळखता तेव्हा त्या आकर्षक आणि रंगीबेरंगी झगझगत्या स्टॉल कडे जायची काय  बिशाद आहे तुमची! 

हरकत नाही दुसऱ्या दिवशी येऊन काही तरी नेऊच,असा मनाशी निर्धार करत माणसं पुढे पोचलेली दिसतात.


विविध औषधें, डायट करण्याची सामग्री, अतिशय हेल्दी अश्या चटण्या, चिवडे, बिस्किटं हे ते अनेक गोष्टी तुम्हाला हाका मारून बोलवत असतात. वेगवेगळी पाम्प्लेट, जाहिराती तुमच्यापर्यंत अनेक लोकं तिथे उभ्या उभ्या पोचवत असतात. पर्स, वॉलेट, घड्याळं, टेबलं, खुर्च्या, वेगवेगळी यंत्र यांचा भरणा जिथे तिथे दिसतो. कपडे आणि त्यांचे असंख्य प्रकार बघताना कधी दिवस संपतो कळतही नाही. हरकत नाही. पहिल्या दिवशी हजेरी लावायचं हेच तर कारण असतं. आपला एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे ते बघणे आणि कुठल्या स्टॉल चा जास्त अभ्यास करायचाय याची मनाशी खूणगाठ बांधणे हाच तो पहिल्या दिवशी चा टास्क!


शेवटी लोकं विक्रेत्याशी हुज्जत घालून थकले, चार चार पैसे कमी करून भागले की मग अशा ठिकाणी पोचतात जिथे एक रुपया सुद्धा कमी करायची ताकद नसते आणि सहसा आकारलेल्या किंमतीला प्रश्न ही करत नाही. अर्थातच फूड स्टॉल! चाट खा, फास्ट फूड खा, गोळे खा, नाही तर सरबतं प्या. काही तरी द्या आता अशी अवस्था असताना समोर उसाचा गाडा दिसतो. गटागटा रस पिऊन मन शांत होतं. मुलं एव्हाना उडया मारायला गेलेली असतात त्या भावल्याकडे! त्यांच्या डोक्याला ताप नसतो. इतका वेळ दाबून ठेवलेली शांतता तिकडे दुप्पट वेगाने बाहेर पडत असते. 


अनेक ओळखीचे लोकं भेटतात. पोटच्या मुलांचं कौतुक करावं तसं आवडलेल्या स्टॉल आणि वस्तूंचं कौतुक करतात. घनिष्ठ संबंध असल्यास घेतलेल्या वस्तू दाखवतात. सेल्फी आणि स्टोर्या टाकून कन्झ्युमर शॉपी ला भेट दिल्याचं सार्थक होतं. घरी जाताना पिशवीतून डोकावणाऱ्या अनेकविध वस्तू मागे वळून  वळून स्टॉल वरच्या वस्तुंना खिजवत असतात. आमचे इथले दिवस संपले. आता जातो दुसऱ्या घरी! तुम्ही आजमावा तुमचं नशीब! टुक टुक!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू