पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आय लव्ह यु

आय लव्ह यू टु…


 ही कथा आहे खेडेगावात रहाणाऱ्या 'हनुमंत' या तरुणाची.  सगळे त्याला  "हन्या" म्हणून हाका मारत.  समीक्षा नावाच्या मुलीशी त्याचं लग्न जमलं आणि समिक्षाच्या  परीक्षेनंतर  लग्न करायच ठरलं. पण हन्याले‌ रहावत नव्हत. रोजगार रोज रोज फोनवर बोलण्यापेक्षा एकदा आपण तिला प्रत्यक्ष जाऊन भेटावं असं त्याच्या मनात आलं आन  हन्यानं समीक्षाले फोन केला.


 "समे, तुयी लयी आठवण येत हाय, एकदा भेटा वाट्टे, मी येतो तुले भेटाले!" ‌.


        "अवं पन माहा पेपर हाय, मी घरी रायनार नाई. बरं, या तुमी ! तुमच्यासाठी काय सैपाक कराले लावू ?"


"कांदाभजे मले‌ लई आवडते!." 


        समीनं मायले भजे बनवायला सांगितले ,आन ते पेपर द्याले गेली.   जावई पयील्यांदाच  घरला येणार म्हुन समीच्या मायनं पुरणावरणाचा सैपाक केला. भजे तळाले घेतले.तवाच हन्या सासरी पोचला. भजाचा वास त्याच्या नाकात ‌घुसला. त्याच्या पोटात कावळे वरडाले लागले. बुलेटचा आवाज ऐकताच  हन्याचा सासरा घराबाहेर आला.


     "या ,या जावईबापू ! "म्हणून त्यायनं हन्याच स्वागत केलं

          "हात पाय धुऊन घ्या"

      सासरेबुवानं घरात आवाज दिला.

" पानं घे वं, भूक लागली आसल जावईबापूले". 

         हन्या जेवाले बसला .त्यानं ताटातल्या जिन्नसावरून नजर फिरवली पण ताटात भज्याचा पत्ताच नव्हता. त्याचा मुडच गेला.त्यानं समोर पायलं, टोपलीभर भज्यावर पापड झाकून  ठेवले होते.


        ' ईसरल्या वाटते सासूबाई भजे वाढाले !'‌‌.                                सासुबाईले आठवण द्यासाठी म्हणून त्याने यक शक्कल लढवली.  तो सासऱ्याले म्हणे,

  

"  यंदा आमी शेतात झेंडूचं पीक घेतलं. ह्या अश्शे  पिवळेशान भज्यावानी फुलं लागले हाय झेंडूले."

 ‌ ‌‌           भज्याचं नाव घेतलं तरी सासुबाईच्या भजे वाढाचं ध्यानात आलं नाय.

दुसरा उपाय म्हणून हन्या म्हणाला ,

     " मी रस्त्यांन येत होतो तवा रस्त्यावर एक  पिवळी धम्म धामण आडवी आली !"

   तितक्यात  समी घरात शिरली. समीची, हन्याची नजरानजर होताच दोघांचे चेहरे खुल्ले.

हन्या पुढं बोलला…. .                                     "त्या धामणीचे डोळे माहित हाय का केवडे होते?" 


समीले  हसायला आलं तरीपण चेहऱ्यावर आश्चर्य दाखवत  तिनं ईचारलं, "केवडे व्हते?"

           हन्या हाताची बोटं गोल गोल फिरवत बोलला,

"ह्या अश्शे भज्यावानी गोल, गोल अन पिवळे धम्म!"

 समी आन  समीचे मायबाप फिसकन् हासले.

पण ताटात भजे वाढलेले नाही हे कोणाच्या ध्यानातच आलं नाही.

खाणाखुणा करून सांगून हन्या थकला. केलेली सगळी मेहनत वाया गेली.


  भजे तं पायजे पण, तोंडानं भजे मागणं बर दिसणार नाही, म्हुन हण्यानन शेवटचा प्रयत्न केला.    

        

"थे धामण केवडी लंबी होती माईत हाय समे?"


समीन हासतच ईचारलं, "केवडी लंबी?"

 आपलं उजव्या हाताचं बोट स्व:ताच्या पायाकडे दाखवून तो बोलला ,                                  "ह्या  हितुन  त्या भज्याच्या टोपलीपर्यंत !" 


 हन्यान टोपलीकडं बोट दाखवताच, दोघ्या मायलेकीचं लक्ष पापडाखाली झाकलेल्या भज्याकडं गेलं.                                      समीनं पायलं , भज्याच्या टोपलीची शिगबी उतरली नव्हती.                                       समी वरडली, "माय वं तुले मी सांगितलं ह्वतं नं हन्याले  फक्त भजेच वाढजो म्हणून !" 

 

     समीनं ‌लगबगीन फळीतलं ताट घेतलं. टोपलीतले भजे ताटात वतले. हन्या खुश झाला. आपल्या मनातलं वळखणारी, मनकवडी बायको आपल्याले भेटली म्हणुन.समीनं भज्याच ताट  हन्याच्या हातात देऊ लागताच, ताट घेता घेता हन्यानं ताटाखालून हळूच  समीचा हात दाबला.

समी लाजली.

हण्या म्हणे "आय लव समे!

 समीनबी डोळा मारत म्हणलं, आय लव यु टू!!!


*****************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू