पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परीसस्पर्श

        सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच होत्या; तशीच माझीही!

“व्वा समिधा, किती छान दिसतेस ग अजून!”, तिला अशी बऱ्याच जणांची प्रशंसा ऐकायला मिळत होती. ती कोल्डड्रिंकचा ग्लास हातात घेऊन हॉलमध्ये फिरत-फिरत सगळ्यांशी गप्पा मारत असताना, आमच्या जुन्या प्राध्यापकांना भेटून नमस्कार करत असताना आणि तिच्या जुन्या मैत्रिणींना घट्ट मिठी मारून भेटत असताना, मी संपूर्ण वेळ तिच्या कडेच पाहत होतो. "ओह माय गॉड, किती जादुई व्यक्तिमत्व आहे हिचं, किती आकर्षक दिसते आजही! ", मी मनातल्यामनात स्वतःशीच बोलत होतो.

        समिधा सबनीस - माझ्या इंजिनियरींग कॉलेजच्या बॅचमधील सर्वात लोकप्रिय विद्यार्थिनी. तिला फक्त 'आकर्षक' म्हणणे कमीपणाचे ठरेल; फक्त 'सुंदर ' म्हणणे हा सौंदर्याचा अपमान ठरेल! नाजूक, सडपातळ, मुलायम शरीरयष्टी आणि मोहक स्मित असलेली ती एक नैसर्गिक सौंदर्यवती होती. पण ती बाहेरून जितकी कोमल कळी दिसत होती, तितकीच समिधा ही एक तीक्ष्ण बुद्धीची, प्रगल्भ मुलगी होती; आणि हे व्यक्तिमत्त्व तिने हेतुपुरस्सर जोपासले होते. ती प्रत्येक परीक्षेत किंवा चाचणी परीक्षेत सुद्धा अव्वल स्थान मिळवायची आणि स्वाभाविकपणे सर्व प्राध्यापकांकडून ‘आवडती विद्यार्थीनी’ हा टॅग तिने मिळवला होता . आमच्या कॉलेजचे इतरत्र प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी कॉलेजच्या प्राध्यापकांनी तिच्यावरच भिस्त ठेवली होती.

        तिच्यात परिपक्वता होती. तिची तीव्र विचारसरणी आणि कोणत्याही गोष्टीवर सोप्पी उपाययोजना, समजावताना चेह-यावर दिसणारा आत्मविश्वास, ह्यामुळे अगदी मोजक्या संवादातही प्रत्येकजण तिच्याकडे आकर्षित होत असत. पहिल्या वर्षापासून तिने स्वेच्छेने विद्यार्थी मंचाचे काम करण्यास सुरुवात केली होती आणि शेवटच्या वर्षापर्यंत, तिची मंचाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ता हे तिचे प्रमुख वैशिष्ठ्य होते आणि ते खुलवण्यासाठी, समिधाकडे एक आकर्षक फॅशन सेन्स होता. ती प्रसंगानुसार कपडे घालायची आणि सर्वच प्रकारच्या कपड्यांमध्ये ती आकर्षक दिसायची.

        खरंतर समिधाचे व्यक्तिमत्व आमच्या बॅचमधील सर्व मुलींना हेवा वाटावा असेच होते ; परंतु त्याच वेळी, प्रत्येक मुलीला कॉलेजच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी तिच्या निकटच्या वर्तुळात राहण्याची इच्छा असायची . समिधा अजिबात गर्विष्ठ नव्हती; ती तिच्या आजूबाजूच्या लोकांशी खूप जिव्हाळ्याने वागायची. पण म्हणून तिला कोणीही गृहीत धरू शकत नव्हते, कारण ती तर्कसंगत आणि अगदी सरळ वागणारी होती.

        आमच्या बॅचमधील जवळपास निम्म्या मुलांचा तिच्यावर क्रश होता, पण समिधाच्या रोखठोक स्मार्ट स्वभावाला सर्व अनावश्यक प्रस्ताव, डेट रिक्वेस्ट आणि त्रासदायक माणसे कशी हाताळायची हे चांगलेच माहीत होते. तिने प्रेमाने पागल झालेल्या कोणत्याही मुलाचे कधीही, क्षणभरही स्वागत केले नाही, उलट ती त्यांना त्यांच्या पात्रतेची जाणीव करून देत होती. अशाच परिस्थितीत सापडलेल्या इतर मुलींसाठीही ती नेहमी आधार बनून उभी राहताना दिसली.

        ही होती समिधा सबनीस !

        आज रात्री मी पार्टी हॉलच्या खिडकीपाशी उभा राहून तिच्याकडे पाहताना, कॉलेजच्या दिवसातील सर्व विचार माझ्या मनात तरळत होते. तिने काळ्या आणि चंदेरी रंगाचा सुंदर गाउन घातला होता. हलका मेकअप करून केस मोकळे सोडले होते. "आता १० वर्षे झाली", मी विचार केला, "ती थोडीही बदलली नाही. त्या दिवसांत तिच्या नकळत मी तिच्यावर किती प्रेम करायचो. आजही तिच्याकडे पाहून, मी खात्री देऊ शकतो, तिच्यावरील माझे प्रेम थोडेही बदललेले नाही. खरं तर, कालांतराने ते अधिकच वाढले आहे. होय! समिधा ही एकमेव स्त्री आहे जिच्यावर मी प्रेम केले आहे.”

        आमचे कॉलेजचे अंतिम वर्ष संपून १० वर्षे झाली. आज रात्री, कॉलेज कॅम्पसमध्ये आमच्या बॅचसाठी १० वर्षांची विशेष पुनर्भेट पार्टी आहे. इथे असलेले प्रत्येकजण उत्साहाने त्यांच्या जुन्या मित्रांना भेटत आहेत.

        आणि मी ….

        थांबा, मी माझी ओळख करून देतो ! खरंतर मी कोणत्याही परिचयासाठी पूर्णपणे ‘नॉट वर्थी’, नगण्य विद्यार्थी होतो. मी सुरेश आहे; खूप पारंपरिक नाव , ज्यासाठी माझ्या अर्ध्या आयुष्यात माझी थट्टा केली गेली आहे. मी नेहमीच मित्रांशिवाय होतो. एकलकोंडा, लाजाळू, अंतर्मुख, अगदी सामान्य दिसणारा माणूस! “तू रोल नंबर २३ ना?”, मला संबोधित करण्याचा हा एक सामान्य मार्ग होता, तो देखील फक्त मुलांद्वारे! सरळ सांगतो , मी दखलपात्र नव्हतोच! मी वर्गात किंवा कॉलेजमध्ये असलो-नसलो तरी कोणालाच पर्वा नव्हती. पण काही लोक होते, ज्यांना माझ्यामध्ये अवाजवी रस होता. आणि आत्ता , १० वर्षांनंतरही मी त्यांना माझ्याकडे तशाच नजरेने येताना पाहिले!

        “अरे माकडा , कसा आहेस ब्रो?”, शंभू दादाने पूर्ण ताकदीने माझ्या पाठीवर थाप दिली. कॉलेजच्या गुंडांच्या त्याच्या छोट्याशा टोळक्याने त्यावेळेस माझ्याभोवती फेर धरला. “दादा , मी ह्याचं नाव विसरलोय”, गुंड नंबर दोनने चेष्टा केली. शंभू दादाने उत्तर दिले, "मला वाटतं, तो रमेश किंवा सुरेश ... किंवा काहीतरी... कोणाला पर्वा आहे? आपण त्याला 'माकड' म्हणायचो नाही का?" टोळी हसली.

         आम्ही पहिल्या वर्षाला असताना शंभू दादा आमचा सिनियर होता. तो आणि त्याची गुंडगिरी करणारी टोळी आमच्या बरोबर जेमतेम शेवटच्या वर्षापर्यंत पोहोचू शकले होते . रॅगिंग आणि गुंडगिरी हे त्यांच्या आवडीचे विषय होते, ज्यात त्यांनी चार वर्षांत प्रभुत्व मिळवले होते. काही इतर भित्री मुलेही त्यांचे टार्गेट होती; पण मला वाटते, मी त्यांचा आवडता निशाणा होतो. ही टोळी रोज माझे कपडे, माझे बूट, माझा चष्मा, माझे तेलकट केस, माझी चाल, माझी वागणूक आणि माझी बोलण्याची गावठी पद्धत यावर भाष्य करत असे. पण मी खंतावत नव्हतो, कारण कमीतकमी या लोकांचे माझ्याकडे लक्ष जायचे ; इतर सर्वांसाठी मी जणू अदृष्यच होतो. मी नेहमी त्यांची टिंगल वा-यावर सोडून दिली ; त्या दिवसापर्यंत!

         शंभू दादाच्या टोळीला समिधाबद्दलच्या माझ्या छुप्या भावना कळल्या आणि मग त्यांची गुंडगिरी आणखीनच वाढली. ती किती हॉट, हुशार, स्मार्ट आणि मादक आहे आणि मी तिच्यासाठी किती अयोग्य , ह्याचे टोमणे मारण्यात त्यांना गंमत वाटायची “तू स्वत:ला पाहिलं आहेस ना माकडा, ”, “कॉलेज संपले तरी तिची तुला सरही येणार नाही”, “तुझ्या मर्यादेत राहा, ती आपल्या कॉलेजची हिरॉईन आहे आणि तू फक्त एक्स्ट्रा आहेस”…. तेव्हापासून मी रोज असेच काही टोमणे ऐकायचो . खरंच, ह्यात तथ्यही असल्यामुळे मी तसा उदासच होतो. "समिधा सारखी मुलगी माझ्याशी कधी बोलेल का किंवा माझ्याकडे बघेल का? मी तिच्यावरचे माझे प्रेम व्यक्त करू शकेन, असा कोणताही मार्ग आहे का? अंदाज नाही!”, मी दररोज स्वतःशीच म्हणायचो, " कॉलेजचा शेवटचा दिवस तिला बघायचा शेवटचा दिवस असेल" हे जाणून मी अनेकदा एकटाच रडायचो!

        “मग, माकडा, तू कसा आहेस?”, शंभू दादाने मला विचारले. कॉलेजच्या दिवसांप्रमाणे त्याने माझ्या खांद्यावर थोपटले आणि माझी कॉलर सरळ केली. मी कफलिंक्स लावलेला एक छान सूट घातला होता; माझ्या मनगटावर एक महागडे ब्रँडेड घड्याळ होते; मी चांगल्या प्रतीचा परफ्यूम लावला होता; माझे शूज व्यवस्थित पॉलिश केलेले होते; माझे केस आणि दाढी छान मेन्टेन्ड होती; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझा आत्मविश्वास उंचावला होता.

        शंभूदादाने काही सेकंद माझे निरीक्षण केल्यानंतर टिप्पणी केली, “तू खूप बदलला आहेस, हं! स्मार्ट दिसत आहेस , माकड! मागच्या दहा वर्षांत तू चांगले काम केलेले दिसतेय!”

        मी हसून उत्तर दिले, “हो दादा , मी आयटीमध्ये एका नामांकित कंपनीत काम करतो. मी तिथे उच्च पदावर आहे”, मी पूर्वीप्रमाणेच नम्र होण्याचा प्रयत्न केला.

        “छान!”, तो म्हणाला, "हा कॉलेजमध्ये कसा होता ते आठवा , माकडांचा सरदार! ”, टोळी एकत्र हसली. पण आज मला त्याचं काही वाटलं नाही. मी त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि स्वतः परत एक कोपरा पकडला. माझी नजर पुन्हा समिधावर खिळली.

         मी जिथे उभा होतो त्या खिडकीतून मला कॉलेजची जुनी इमारत दिसत होती. मी तिथे गेलो आणि सरळ आमच्या वर्गात गेलो. रविवार असल्याने एकही विद्यार्थी जवळपास नव्हता. मी पहिल्या बाकाकडे पाहिले, जिथे समिधा बसायची आणि मग कुठेतरी मागे जाऊन माझा बाक शोधायचा प्रयत्न केला. मी त्या वर्गात घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण झाली . प्रत्येक वेळी समिधा दरवाज्यातून आत आली, की माझ्या हृदयाचे ठोके चुकायचे . प्रत्येक वेळी ती मंचावर उभी राहिली, की मला आशा वाटायची की माझी तिच्याशी नजरानजर होईल. भूतकाळात माझे मन रमले होते. मला आमचे शेवटचे वर्ष आठवले.

         मी एका विशिष्ट खिडकीकडे गेलो, ज्याची दारे १० वर्षांपूर्वी होती, तशीच अजूनही शाबूत होती. त्यावर कंपासच्या सहाय्याने एक मोठे हृदय कोरलेले होते, त्यामधून बाण जात होते आणि मध्यभागी ‘सुरेश समिधा’ ही नावे लिहिलेली होती. शंभू दादाच्या टोळीने हे दुष्कृत्य केले होते आणि मला खोटे आश्वासन दिले होते की ह्यामुळे तिचे लक्ष माझ्याकडे आकर्षित होईल. मी खूप प्रतिकार केला, पण ते हे कोरीव काम करतच राहिले. मला माहित होते की ही खूप वाईट गोष्ट आहे आणि त्यातून काहीही चांगले निष्पन्न होणार नाही. पण ते फालतू विनोद करत राहिले. समिधाने हे बघितले तेव्हा ती खूप चिडली. ती माझ्याशी पहिल्यांदाच बोलली होती. पण तिचा आवाज, तिचा रागीट स्वर आणि तिचे कठोर शब्द माझ्या हृदयात घुसले. “तुझी हिम्मत कशी झाली?”, ती संपूर्ण वर्गासमोर रागाने ओरडली, “तुम्ही हेच फालतू चाळे करायला कॉलेजमध्ये येता? अभ्यासाच्या नावाने शून्य !", तिने टिप्पणी केली. त्या दिवशी त्या टोळक्याला खूपच मजा आली. मी माझ्या चेहऱ्यावरची लाज आणि चिंता सावरत, घाबरून थरथरत्या पायांनी माझ्या हॉस्टेलकडे पळत सुटलो.

         दुसऱ्या दिवशी वर्गात येण्याची हिंमत माझ्यात नव्हती. आता मी तिला तोंड दाखवू शकणार नाही, हे मला माहीती होते. पण मी विचार केला, "काय फरक पडतोय? सर्व काही पूर्वीसारखेच राहणार! ना ती माझ्याशी ह्यापूर्वी बोलली, ना यापुढे बोलणार!"

         आणि मग आला १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे.

         विद्यार्थी समितीच्या अध्यक्ष समिधा सबनीसच्या सूचनेनुसार कॅम्पस लाल आणि पांढर्‍या गुलाबांनी, लाल फुगे आणि रिबिनींनी सजवले होते. त्यांनी ड्रेस कोड ठरवला होता - लाल किंवा पांढरे कोणतेही कपडे! कॉलेजच्या वेळेनंतर त्यांनी एक लहान फन-फेअरची योजना आखली होती. तो दिवस सर्वांसाठी आनंदाने भारलेला होता. समिधाने स्वतः लाल रंगाचा टी-शर्ट आणि निळी जीन्स परिधान केले होते. तिने समितीचा पांढरा बिल्ला लावला होता आणि अध्यक्ष म्हणून ती आपले काम तत्परतेने करत होती . ती सर्व कार्यकारिणी सदस्यांना त्या दिवशी कसे वागावे ह्याच्या सूचना देत होती. प्रत्येकाने योग्य आचारसंहितेचे पालन करावे अशी तिची इच्छा होती आणि कोणताही मुलगा कोणत्याही मुलीशी गैरवर्तन करणार नाही याची जबाबदारी तिच्या टीमने घ्यावी अशी तिची इच्छा होती. “प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेची खात्री करा आणि जो कोणी सभ्यपणे वागत नसेल , त्याला सरळ मुख्याध्यापकांकडे घेऊन जा. समारंभ सभ्यतेने पार पडावा अशी माझी इच्छा आहे!”, तिने जोरात घोषणा केली आणि ती आपल्या कामाला लागली.

         तेवढ्यात शंभू दादा आणि टोळीने मला गाठले! "काय रोमियो" , तो मला उपहासाने म्हणाला," समिधाला आज गुलाब देणार नाहीस का?" त्याचा आवाज अगदी छद्मी आणि रांगडा होता. मी गडबडलो आणि सतत बोलत राहिलो , "नाही... नाही!" मी ह्या विशेष कार्यक्रमादरम्यान कोणताही अपप्रसंग टाळण्यासाठी अधिक धैर्य गोळा करण्याचा प्रयत्न करत होतो . पण शंभू दादा हार मानण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने सजावटीतून तीन-चार लाल गुलाब काढले आणि माझ्या हातात दिले. "जा आणि तिला प्रपोज कर! हा माझा आदेश आहे, मूर्खा! बघू आज ती काय नाटक करते ते! ”, त्याने आज्ञा केली आणि सगळे हसले. परिणामांचा विचार करून मी आधीच थरथर कापत होतो, पण तो आणि त्याच्या टोळीने मला समिधा असलेल्या काउंटरकडे ढकलायला सुरुवात केली. मी प्रतिकार केला, पण व्यर्थ. काही सेकंदात, मी तिच्या मागे होतो, आणि टोळी तेथून गायब झाली होती. जवळच दबा धरून पुढे घडणारे नाटक पाहण्यासाठी सर्वजण उभे होते .

         गोंधळ ऐकून ती मागे वळली आणि तिला मी तिच्या शेजारी लाल गुलाबांचा गुच्छ धरलेला दिसलो. आदेशाप्रमाणे , मी उदास आवाजात "आय लव्ह यू" म्हणालो. खिडकीच्या घटनेपेक्षा ही गोष्ट संतापजनक होती, ह्याची मला कल्पना होती; पण मी ते नाईलाजाने केले. समिधाने माझ्याकडे तिरस्काराने बघितले आणि माझ्या हातातले गुलाब ओरबाडून जमिनीवर फेकले. त्यानंतर तिने माझ्या गालावर जोरात थप्पड मारली. “मी तुला त्या दिवशी स्पष्ट बोलले होते ना? माझ्यावर असल्या फालतू युक्त्या वापरू नकोस! निघ इथून! ” ती माझ्यावर ओरडली. कॅम्पसच्या मध्यभागी एक मोठा देखावा निर्माण करण्याइतपत जोरात थप्पडेचा आवाज आणि पाठोपाठ कोपऱ्यातून जोरजोरात हसण्याचा आवाज आला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समिधा सबनीसला प्रपोज करणारा मी जोकर बनलो होतो.

        मी तिथेच उभा राहिलो. मला माझे अश्रू आवरता आले नाहीत. एरवी मी सार्वजनिकपणे रडलो नसतो, परंतु हे माझ्यासाठी खूप त्रासदायक होते. मी जमिनीवर विखुरलेल्या गुलाबांकडे पाहिलं, ज्यांना समिधाने पायाने कुस्करले होते . मी माझे अश्रू पुसत मागे वळलो. आणि अचानक , गुंड टोळीच्या हसण्याचा आवाज मोठा होताच, समिधाने वळून माझ्याकडे पाहिले. तिच्या लक्षात आले की माझे डोळे पाणावले आहेत. तिने हळूच माझ्या डाव्या खांद्यावर हात ठेवून मला थांबण्याचा इशारा केला. मला तिच्या नजरेतला सौम्यपणा जाणवला. ती आता चिडलेली दिसत नव्हती. तरीही ती धारदार स्वरात बोलली, “आता जा, थोडे धैर्य गोळा कर , आणि जसा तू मला प्रपोज करायला आला होतास; तस्साच त्या गुंडांच्या टोळीकडे आणि त्यांचा म्होरक्या शंभू दादाकडे जाऊन त्यांना ठामपणे सांग की "त्यांचे रॅगिंग तू ह्यापुढे सहन करणार नाहीस." हा मूर्खपणा थांबवायला त्याला स्पष्टपणे सांग. तसेच, त्याला हे सुद्धा सांग की तुला किंवा इतर कोणालाही पुन्हा त्रास दिल्यास त्याला अतिशय वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. सांग त्याला की समिधा सबनीसने असे सांगितले आहे." ती परत सहजपणे आपल्या कामाकडे वळली .

        मी आश्चर्यचकित झालो; मला असे वाटतेय की तिने काही सेकंदातच हे सर्व अंदाज लावले होते. समिधाच्या धीट, निःसंकोच स्वभावाविषयी मी खूप ऐकले होते , पण आज पहिल्यांदाच अनुभवले. "ही हिरॉईन नाही, काॅलेजचा हिरो आहे!" माझ्या मनात आले.

        त्यानंतर अचानक, सर्व काही बदलले!

        तिच्या एकाच गर्जनेने कोपर्‍यातून येणारे हास्य थांबले होते. चूक करून समिधाशी पंगा घ्यायची हिंमत कोणातही नव्हती ; गुंड टोळीला ते चांगलेच माहीत होते. त्या दिवसापासून शंभू दादाने मला टोमणे मारले नाहीत, कोणतेही पाचकळ विनोद केले नाहीत. कॉलेजमध्ये मी अचानक थोडा फेमस झालो. ही बातमी काॅलेजमध्ये वणव्यासारखी पसरली होती. मुलं मला “गुलाब-बाॅय ” किंवा “व्ही-डे बाॅय” म्हणून ओळखू लागली, पण संपूर्ण प्रकरण माझ्या पथ्यावरच पडले! समिधाच्या शब्दांनी आणि तिच्या प्रेरणेने मला एक प्रकारची अनाकलनीय हिंमत दिली आणि हळूहळू माझ्या व्यक्तिमत्त्वात बदल झाला. मी माझ्या वर्गमित्रांशी अधिक बोलू लागलो. तेही चांगला प्रतिसाद देऊ लागले . सर्वजण माझ्याशी मैत्रीपूर्ण वागू लागले. मला लवकरच काही चांगले मित्र मिळाले . त्यांपैकी एक होती समिधा!

        समिधा सबनीस माझ्या आयुष्यात परीस बनून आली. मैत्रीण म्हणून तिचा स्वभाव अत्यंत गोड, विनम्र आणि मदत करणारा होता. ती माझ्याशी अनेकदा अभ्यासक्रम आणि परीक्षांबद्दल बोलायची. जेव्हा मी तिला माझ्या कमजोर विषयांबद्दल सांगितले तेव्हा तिने आपणहून मला काही विषयांत मदत केली. तिने तिच्या नोट्स माझ्यासोबत शेअर केल्या , मला काही शंका असल्यास फोन करण्यासाठी स्वतःचा नंबर दिला. कॉलेजमधले आमचे शेवटचे वर्ष होते, पण मला अनेकदा वाटायचे, ‘या हुशार मुलीशी माझी आधीच मैत्री झाली असती, तर माझे मार्क्स अजून वाढले असते.' खरोखरच

       आम्ही एकत्र घालवलेल्या काही महिन्यांत तिने मला खूप मदत केली. त्यामुळे माझे मनोबल आणि आत्मविश्वास वाढला. मी फायनल परीक्षेची चांगली तयारी केली होती. तिने मला धीटपणे बोलण्यास, स्वतःची बाजू मांडण्यास,

       आणि माझ्या लाजाळूपणाच्या भिंती उध्वस्त करण्यास प्रोत्साहित केले. तिने माझ्या व्यक्तिमत्त्वाला उत्कृष्ट बनवले आणि मला तथाकथित ‘रोल नंबर २३’ वरून ‘इंजिनियर सुरेश कुलकर्णी 'बनवले, एका नामांकित कंपनीचा उच्च पदाधिकारी! तिला अनेक धन्यवाद!

       आज दहा वर्षांनंतर, मी इथे आहे, त्याच वर्गात, त्याच खिडकीच्या चौकटीसमोर, आमच्या नावांनी कोरलेल्या हृदयासह; जिथे हे सर्व सुरू झाले तेच ठिकाण! तेव्हापासून ही खिडकी कितीतरी वेळा साफ केली असेल, पण त्यातून ‘सुरेश समिधा’ अक्षरे कोणीही पुसून टाकू शकले नाही; ना कधीकाळी माझी वर्गमैत्रीण असलेल्या ह्या अद्भुत स्त्रीवरचे माझे खरे प्रेम! मी माझ्या बोटांनी खिडकीवर कोरलेल्या हृदयाला स्पर्श केला आणि मनातच हसलो.

        तेव्हाच मला माझ्या डाव्या खांद्यावर झालेला स्पर्श जाणवला. मला मागे वळून पाहण्याची गरज नव्हती; तो कोणाचा हात होता, हे मला माहीत होतं. मी माझ्या गाढ झोपेतही तो मऊ, कोमल तळहात ओळखू शकतो. तिने तिच्या बोटामध्ये एक सुंदर लग्नाची अंगठी घातली होती. “तू इथे काय करतो आहेस? प्रत्येकजण मला विचारतोय की तू कुठे आहेस?” ती म्हणाली. मी तिचा हात धरला आणि हळूच तिला माझ्या जवळ ओढले. "हे आठवतंय का?" मी तिला खिडकीवर कोरलेले 'हृदय' दाखवत विचारले.

        ती माझी पत्नी होती….. समिधा सबनीस-कुलकर्णी!

        "अरे बापरे ! इतक्या दिवसांनंतरही अजून इथेच आहे!”, ती उद्गारली.

        “तू माझ्याशी बोलल्याचा तो पहिलाच दिवस होता. तो माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस! मी तो कधीही विसरणार नाही!”, मी तिचे हात हातात घेऊन म्हणालो.

        “अस्सं ! म्हणजे तो दिवस खास आहे वाटतं? ज्या दिवशी आपलं लग्न झालं, तो दिवस नाही?आपल्या हनिमूनचे अविस्मरणीय दिवस आणि इतर अनेक खास दिवस आपण आता एकत्र घालवत आहोत! त्यांचं काय? “, समिधाने मस्करी केली आणि तिच्या नर्मविनोदी स्वभावानुसार मला चिडवले.

        मी उत्तर दिले, “नक्कीच, समा, तुझ्याबरोबरचा माझा प्रत्येक क्षण खास आहे. तू माझं आयुष्य खूप खास बनवलं आहेस!”, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, त्यात बदल केल्याबद्दल, आज मी जे काही आहे , ते मला घडवल्याबद्दल; माझे प्रेम स्वीकारल्याबद्दल, माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल, माझ्याशी लग्न केल्याबद्दल, एक खूप गोड पत्नी आणि कर्तव्यदक्ष सून असल्याबद्दल, आणि हो, माझ्या लाडक्या परीची प्रेमळ आई असल्याबद्दल, तुला परत परत धन्यवाद! लोक नेहमी यशस्वी पुरुषांबद्दल म्हणतात की त्यांच्या मागे एक स्त्री असते, पण समा, तू त्यांपैकी नाहीस. तू स्वतः एक यशस्वी स्त्री आहेस , तूच ती स्त्री आहेस जी स्वत: इतकी यशस्वी असताना तिच्या पतीला यशस्वी करू शकते! तूच आपला संसार, आपलं कुटुंब आणि आपली करिअर, सर्वच जपलं आहेस! मी किती भाग्यवान आहे यावर माझा विश्वास बसत नाही. आजच्या पार्टीत मी आपल्या जीवन प्रवासाची आठवण काढत होतो ! दोन अनोळखी व्यक्तींपासून मैत्री पर्यंत आणि प्रियकर-प्रेयसी पासून आता एक यशस्वी विवाहित जोडप्यापर्यंत ... आपण कसे भेटलो, कसे बोललो, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तू माझ्यावर कशी चिडलीस, आणि लवकरच माझ्याशी मैत्री केलीस !

       आजही मला तो दिवस आठवतोय, जेव्हा तुझ्या पपांच्या हार्ट सर्जरीच्या वेळी मी प्रथमच तुझ्या चेह-यावर चिंतेचे सावट पाहिले आणि तुला धीर देण्यासाठी मी तुझ्या खांद्यावर दबकतच हात ठेवला होता. माझ्या नजरेतून तुला काय जाणवले माहिती नाही, पण पुढच्या आयुष्यात तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवलास ; अहं, माझा हात पपांच्या संमतीने कायमचा हातात घेतलास! त्यानंतर आजपर्यंत आपल्या भूतकाळात आनंदाचे हजारो क्षण आलेत आणि भविष्यात आणखी बरेच क्षण येणार आहेत!”

       तिथेच उभे राहून आम्ही दोघेही काही काळ ह्या रम्य प्रवासाच्या अप्रतिम आठवणी जागवल्या.

       “चल, आता आपण जाऊन शंभू दादा आणि टोळीला सांगूया की आम्ही दोघे गेल्या पाच वर्षांपासून लग्न करून सुखाचा संसार करत आहोत", मी म्हणालो.

        समिधा जोरात हसली, ”नक्कीच, त्याला सांगून त्याची चकित झालेली प्रतिक्रिया पाहूया. खरंतर , आपल्या एकत्र येण्याचे सर्व श्रेय त्याला दिले पाहिजे. शेवटी, तोच आपल्या प्रेमकथेचा कर्ताकरविता आहे.” तिने माझा हात धरला आणि आम्ही एकत्र आमच्या मित्रांसोबत आनंद घेण्यासाठी आणि आमचे प्रेम साजरे करण्यासाठी पार्टी हॉलमध्ये परतलो.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू