पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ओंजळीतले सुख

ओंजळीतले सुख

 

रोज सकाळी फिरायला जायला आवडायचे खूप मला.  माझा नित्यक्रमच होता तो.सकाळी सकाळी मिळणारी शुध्द हवा आरोग्यास लाभदायक असते ह्याचा अनुभव  मी पण घेत होते.निसर्गाचं संगीत ऐकण्याची गोडी निर्माण झाली होती माझ्या मनामधे. फिरून झाल्यावर थोडावेळ बेंचवर बसायचे व घरी परत जायचे हा माझा नित्यक्रम होता.पण इतक्यात जरा गुडघे दुखायला लागले आणि माझं फिरायला जाणे जवळपास बंद झाले होते.आज जवळपास महिनाभराने मी बाहेर पडणार होते.कारण आज मला घरात बसायचा कंटाळा आला आणि मी अगदी हळूहळू  फिरायला  गेले . माझ्या स्वानंदाला मिठी मारून.आणि  एक खुप गोड  व सुखद अनुभव आला मला.हळूहळू फिरुन झाल्यावर सगळ्या झाडांशी मी  गप्पा मारल्या .त्यांची ख्यालीखुशाली विचारली . झाडही आनंदली मला बघून. आणि आनंदाने डोलायला लागली.त्यांना आंजारले,गोंजारले आणि येवून जरा बाकावर बसले.आणि बघते तर काय ,माझ्या शेजारच्याच बाकावर एक सत्तरीच्या आजी बसल्या होत्या.खुप गोड होत्या  दिसायला .मनात विचार आला ह्या आत्ता जर एवढ्या गोड दिसतात.तर तरुणपणी किती सुरेख दिसत असतील ना?विचारू का ह्यांना. सांगतील का ह्या काही. बोलतील ना माझ्याशी. मनाला मी समजावले व आजी बोलतीलच आपल्याशी  असे मनाशी ठरवले व आजीकडे वळले.

 

आणि मी आजी जवळ जावून बसले.आणी म्हंटले चला गप्पा मारुया आजींशी. तर आजीचं सारखं मोबाईल वर वेळ बघनं सुरु. त्यांची सारखी चलबिचल सुरू होती.मला अगदी राहवले नाही.शेवटी मी आजींना विचारलेच. आजी कुणी येणार आहे का भेटायला? तर मला बोलल्या हो गं, माझा बालमीत्र श्रीकांत, तो येणार आहे मला भेटायला...पण तुला सांगू का, त्याला नं वेळ पाळणं जमतच नाही बघ.आधिही  असाच करायचा.खूप वाट बघायला लावायचा मला. आता आजींच्या गोष्टीत मला रस वाटायला लागला. मनात उत्सुकता निर्माण झाली आणि मी आजीला म्हणाले.आजी सांगा ना तुमच्या तरूणपणातले किस्से.

 

तरूणपणातले किस्से सांगा

आग्रह मी आजीला केला

सांगताना आपली कहाणी

आजी भुतकाळात रमल्या

 

असे म्हणताच आजी अक्षरशः लाजल्या, आणि म्हणाल्या अगं मी आणि श्रीकांत बालपणापासून एकत्र वाढलो. शाळा पण एकच होती आमची. अगदी आमच्या शेजारी राहायचा.जरा उणाड होता पण माझं पटायचं त्याच्याशी.नंतर काॅलेज मधे गेलो. दिसायला खूप सुंदर होते मी , त्यामुळे  खुप मुलं मागे लागायची.मी तुझ्यावर प्रेम करतो हे वाक्य अनेकांच्या तोंडून ऐकले मी. मग अशावेळी श्रीकांत तयार असायचा माझ्या बाजूने सगळ्यांशी भांडायला.  आणि मला पण  हाच आवडायचा श्रीकांत.मला सिनियर होता. हळूहळू मी त्याच्यावर प्रेम करायला लागले आणि त्यांच्या प्रेमात गुरफटत गेले.मी खुप प्रेम करायचे त्याच्यावर. मी त्याला बोलून पण दाखवले.पण हा बेफिकीर . कधीही वेळेवर भेटायला यायचा नाही. माझ्या बाबांना तो अजिबात आवडायचा नाही.कारण हा  असाच होता उनाड आणि लेट लतीफ.कधी वेळेवर भेटायला यायचा नाही. मी तर बऱ्याच वेळेला वाट बघून कंटाळायचे व वाट बघून बघून परत निघून जायचे. पण स्वभावाने अगदी दिलदार.अडल्या नडल्याला मदत करणारा.सर्वांसाठी एका हाकेला धावून जाणारा हा श्रीकांत.पण त्यांच्या माझ्या बाबतीतल्या वागण्याने मला असे वाटायला लागले होते, की श्रीकांत माझ्यावर प्रेम करतो की नाही.माझ्या मनात चिंता वाढायला लागली.हा पुढेही आपल्याशी असाच बेफिकीरपणे वागला तर काय करायचे आपण.अशी मनाची अवस्था झालेली असतांना, अचानक माझ्या घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली.कारण आता माझी एम.एस.सी ची परीक्षा झाली होती.श्रीकांतलाही जवळच्या गावातील काॅलेजमधे लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली. मध्यंतरी श्रीकांतचे आई बाबा अचानक देवाघरी गेले व श्रीकांत एकटा पडला.माझे प्रेम तर होतेच त्याच्यावर पण त्याने सुध्दा  "मी तुझ्यावर प्रेम करतो"असे म्हणावे.पण हा पठ्ठ्या बोलायला तयार नव्हता त्यांचे डोळे त्याच्या माझ्यावरील प्रेमाची ग्वाही द्यायचे पण हो बोलत नाही तोवर घरी तरी कसे सांगायचे हा माझ्यासमोर यक्षप्रश्न होता..माझ्या प्रेमापुढेच मी हरले,हतबल झाले होते.हे श्रीकांतला कळत होते की नाही मला कळायला मार्ग नव्हता.

 

लग्न ठरणार माझे

मन माझे सांगत होते

पण कुणासाठी थांबायचे

हेही तर कळत नव्हते

 

 

बाबांनी माझे शिक्षण पूर्ण झाले म्हणून घरात माझ्या लग्नाची बोलनी सुरु झाली आणि मी  घाबरून  श्रीकांतला भेटायला बोलावले .नेहमी आम्ही जिथे भेटायचो त्या जागेवर. पण हा पठ्ठा मला भेटायला आलाचंं  नाही. मी वाट पाहून पाहून थकले व खूप खूप रडले.रडतच घरी पोहोचले. बहुतेक आपणच श्रीकांतच्या प्रेमाच्या लायकीचे नाही ,असे मला वाटले.मी घरात पोहोचताच आईला मी रडली आहे हे कळले असावे .तिने मला विचारले काय झाले.मी काही नाही म्हणून मान डोलावली व आपल्या रूममध्ये गेले. दुसऱ्या दिवशी बाबांनी माझ्यासाठी सरपोतदारांच स्थळ आणलेल.नाही म्हणायची बिशाद नव्हती बाबांसमोर. कारण शेखर खूप शिकलेला व सरकारी अधिकारी होता.स्वभावाने अतिशय चांगला होता.फक्त जरा मितभाषी होता.बाकी स्थळ एकदम चांगले असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.आणि त्यांचा होकार आला.आमच्या घरून तर होकार होताच.आणि  मी श्रीकांत ऐवजी शेखर ची झाले डोईवर अक्षदा पडल्या आणि मी जबाबदार झाले.  पहिल्याच रात्री मी माझ्या मनात काय होते हे शेखर ला सांगितले. शेखरने शांतपणे सगळे ऐकून घेतले  व मला म्हणाला तो तुझा भुतकाळ होता आणि मी तुझा वर्तमान.आणि तू वर्तमानात जगलीस तर आपण दोघेही सुखी होवू..आणि शेखरसोबत मी संसारात रमले हळूहळू शेखर मला कळत गेला.शेखर स्वभावाने छान,मला समजून घेणारा होता.त्यानंतर मी पण कधी श्रीकांत चे नाव काढले नाही.त्यालाही माझं लग्न ठरल्याचे कळले होते. आणि आमच्या संसारापासनं तो अलवार बाजूला झाला.कधी त्याच्यावर असलेल्या माझ्या प्रेमाची झळ त्याने माझ्या सुखी संसाराला लागू दिली नाही.

 

मीही दोन मुलांची आई झाले. मुलं ,त्यांची  शिक्षणं ह्यात मी समरसून गेले.मुलं मोठी झालीत. त्यांची लग्न झालीत.दोघेही अमेरिकेत आहेत.शेखर पण हार्ट अटॅक येवून केव्हाच वर गेलेत. मुलं आपल्या संसारात मग्न व मला अमेरिकेला जायचे नव्हते त्यामुळे  मी ह्या "मातोश्री" वृध्दाश्रमात आले . तिथेच नियतीने मला व श्रीकांत ला पुन्हा भेटवले. हा भेटला पुन्हा .पण जरा सुध्दा बदल न झालेला. अगदी पूर्वी सारखाच. त्याने माझ्यावर असलेल्या प्रेमापायी लग्नच केले नाही. एकटाच असल्यामुळे हा वृध्दाश्रमात दाखल झालेला. माझी अतिशय काळजी घेणारा सवंगडी मला परत लाभला होता .पण स्वभावाला औषध नसते असं म्हणतात ना  असं म्हणून आजी उठून चालायला लागल्या.तेवढ्यात एक स्मार्ट आजोबा लगबगीने येतांना दिसले. लाल टी शर्ट ,काळी पॅंट,डोळ्यावर गाॅगल.मी म्हंटले, आज्जी थांबा.तुमचा श्रीकांत आलेला दिसतोय.आजी गोड हसल्या,गोड लाजल्या व त्यांच्या श्रीकांत कडे वळल्या.आजोबा जसे जवळ आले तसा आजींनी त्यांना ओरडा काढला.आणि आजोबांनी उशीर झाल्याबद्दल कान धरून आजीची माफी मागीतली.व बोलले एकदा तुला गमावले गं ममता पण आता नाही गमवायचं.आता मला तुझी सोबत करायची.उर्वरीत आयुष्य तुझ्या संगतीत घालवायचं.असे म्हणून  आजीच्या खांद्याला धरून आजोबांनी त्यांना बेंचवर बसवले. व त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले.इश्श् म्हणून आजी लाजल्या . आजोबांनी पिशवीतून आणलेली मोगऱ्याची फुलं आजीच्या ओंजळीत घातली.आजी खूप खुश झाल्या व त्यांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहू लागले. व हे दृश्य मी डोळ्यांत साठवून घेतले.माझीही पापणकड ते दृष्य बघून ओलावली. तेवढ्यात आजी माझ्या जवळ आल्या व मला म्हणाल्या .ओंजळ कर समोर.मी ओंजळ समोर धरली.तर त्यांनी त्यांच्या ओंजळीतली काही फुलं माझ्या ओंजळीत टाकली.व म्हणाल्या हे माझ्या ओंजळीतल सुख थोड तुला.माझ्या डोळ्यात टचकन पाणी आल. मी त्या दोघांच्याही पाया पडले. दोघांनाही भरभरून आशिर्वाद दिला मला. व ती दोघे एकमेकांच्या हातात हात गुंफून चालायला लागली . आणि मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. ओंजळीतल सुख तसच कुरवाळत.

 

ओंजळीतले सुख

यावे असेच वाट्याला

आनंद मनाला होईल

धुमारे फुटतील प्रेमाला

 

 

सौ.अलका माईणकर

अकोला

९४०३११४६५८

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू