पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमांकुर

*प्रेमांकुर**



"अग श्रेया आवर ना  पटकन ..नाहीतर लग्न लागून जायचे जोशी काकूंच्या मुलीचे. अन् नीट तयार हो."  मुळातच साधे राहायला आवडणाऱ्या श्रेयाचे विचारही साधे आणि इतरांपेक्षा जरा वेगळे होते. स्वतःचे प्रदर्शन मांडणे तिला बिलकुल पसंत नव्हते. त्यामुळे आई कितीही ओरडली तरी तिने साधेच आवरले. तसेही देवाने तिला इतके भरभरून सौंदर्य दिले होते की तिला वेगळा शृंगार करण्याची गरजच नव्हती.


          लग्नात अनेक ओळखीची माणसे ,नातेवाईक आले होते .सर्वांशी जुजबी बोलून श्रेया एका बाजूला खुर्चीत बसली होती .तेवढ्यात शेजारी  येऊन बसलेल्या बाईंनी तिच्याकडे निरखून पहात तिला विचारले," श्रेया ना  तू ? " " हो"  "मला वाटलेच.बर,मला ओळखले की नाही ?  मी देशपांडे काकू. तुम्ही आधी ज्या  वाड्यात राहत होते ना तिथे आम्ही तुमच्या शेजारी रहात होतो."  श्रेया  आठवण्याचा प्रयत्न करत असतानाच  तिची आई तिथे आली." अरे देशपांडे वहिनी तुम्ही कधी आलात? फार वर्षांनी भेट झाली तुमची .काय चालले आहे तुमचे? वाडा सोडल्यापासून भेटच नाही आपली. ते दिवस अगदीच वेगळे होते पण.वाड्यातील आपली घरे लहान असली तरी मनं मात्र सगळ्यांची मोठी होती.किती एकोप्याने, प्रेमाने राहायचो आपण.  हिला ओळखले की नाही?  ही श्रेया. नुकतेच इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. आता एमबीए करणार आहे."  " अहो यांची बदली पुण्याला झाली होती ना त्यामुळे तिकडेच होतो इतके वर्ष..आता परत इथे नाशिकला आलो आहोत दोन महिने झाले.नवीन घर देखील बांधले आम्ही नुकतेच. तुमच्याशी भेटण्याची खूप इच्छा होती.पण तुमचा नवीन घराचा पत्ता आणि मोबाईल नंबर दोन्ही नव्हते माझ्याकडे.त्यामुळे जमले नाही. श्रेया काय, लहानपणापासून हुशारच आहे . हिच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठा असणाऱ्या आमच्या राहुलचा होमवर्क हीच करून द्यायची .आणि तो देखील हिच्याकडे वही पुस्तक देऊन खुशाल खेळायला निघून जायचा ."  "आता काय करतोय तो ?"   "त्याचेही इंजिनिअरिंग पूर्ण झाले आहे. सध्या एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहेत साहेब." " वा! वा ! छान . घरी या ना एकदा. हा माझा फोन नंबर आणि घराचा पत्ता."  त्या दोघींच्यात होणारी फोन नंबर आणि घराच्या पत्त्यांची होणारी देवाण-घेवाण श्रेया हसून पाहत होती . त्याचबरोबर इतके दिवस विस्मृतीत गेलेल्या स्मृती नव्याने जाग्या होत होत्या . दहा-बारा वर्षांपूर्वी आपण राहत असलेला तो वाडा, तेथील मैत्रिणींसोबत केलेल्या गमती जमती ,आणि हो ...राहुल सोबत केलेला धिंगाणा ,खेळलेला भातुकलीचा खेळ , लुटूपुटूच्या लावलेल्या लग्नात अंतरपाटाच्या एका बाजूस असणारे आपण आणि दुसऱ्या बाजूस असणारा राहुल , गळ्यातील वरमाला आणि आईची नेसलेली साडी सांभाळत साऱ्यांचे घेतलेले आशीर्वाद... सारे सारे तिच्या चक्षु पटलावर क्षणार्धात तरळून गेले. इतके दिवस मनमृत्तिकेत न अंकुरलेल्या प्रेम बिजाला नकळत हलकेच एक छोटासा अंकुर फुटला... 


          वेणीचे पेड एकमेकात गुंफून कॉलेजला निघण्याच्या तयारीत असतानाच फोनच्या रिंगणे श्रेयाची वाट अडवली.घाईघाईतच तिने फोन उचलला," हॅलो श्रेया का?"  "हो बोलती आहे. आपण कोण?" " अग देशपांडे काकू बोलतीये. आमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीचे आमंत्रण द्यायला फोन केला. वीस तारखेला म्हणजे परवा आहे .सर्वांनी यायचं नक्की ..तू पण ये बघ .राहुलशी भेट होईल तुझी. त्या दिवशी तू भेटल्याचे सांगितले तर म्हणाला, बापरे श्रेया मॅडमचे अभ्यास न केल्यामुळे मी खाल्लेले फटके अजूनही आठवत आहेत मला. ये ग मग नक्की .." काकूंनी फोन ठेवला . श्रेया कॉलेजला निघाली मन मात्र भूतकाळातच घुटमुळत होते .खरंच राहुलचा अभ्यास अनेकदा आपण करून द्यायचो, पण कधी कधी चिडून चांगले धपाटेही घालायचो पाठीत.. आणि तोही निमूटपणे खाऊन घ्यायचा . श्रेयाच्या चेहऱ्यावर हसू फुलले . कसा दिसत असेल आता राहूल,? आपल्या मनात जशी त्याला भेटण्याची ओढ निर्माण झाली आहे, त्याला पाहण्याची उत्सुकता लागली आहे,  त्याच्या  जुन्या आठवणीत मन हिंदकळते आहे. तशीच त्याची अवस्था असेल का? अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिका तिच्या मनात तयार होत होती.. 


         त्या दिवशी देशपांडे काकूंकडे जाताना उगाच तिचे हृदय धडधडत होते . त्यांनी घर खूपच छान बांधले होते .मोठा बंगलाच होता तो साऱ्या सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेला. देशपांडे काकूंनी श्रेयाच्या आई वडिलांना सारे घर दाखवले. थोड्याफार गप्पा झाल्या, जेवणही झाली. निघायची वेळ झाली पण राहुल अजूनही भेटला नव्हता. तिची नजर भिरभिरत त्याला शोधत होती. देशपांडे काकूंना राहुल बद्दल विचारावे असे तिच्या मनात येत होते .तोच तिच्या  आईनेच विचारले ," राहुल कुठे दिसत नाही "?  "तो का?  त्याच्या कंपनीतील काही माणसे आणि कॉलेजमधील मित्र मैत्रिणी आले आहेत ना त्यांच्याशी वर टेरेसवर गप्पा मारत बसला आहे. मी निरोप दिला केव्हाचा त्याला तुम्ही आलात म्हणून .येतो म्हणालाय. येईलच तो . बसा ना थोडा वेळ तुम्ही. निघायची काय घाई आहे?" " हो, बसतो आम्ही थोड्यावेळ. तुम्ही इतर पाहुण्यांकडे बघा."  असं म्हणत श्रेयाची आई सोफ्यावर बसली. पण श्रेयाला मात्र उगाच फार राग आला राहुलचा . कोण समजतो हा स्वतःला? इतका मित्र-मैत्रिणीत दंग झालाय..! लवकर यायला तयार नाही . इथे आपण एवढे अधीर झालो आहोत त्याला भेटण्यास आणि त्याला मात्र त्याचे काहीच नाही. आता समोर आला ना तरी बोलणार नाही मी त्याच्याशी . श्रेया जरा घुश्यातच आई शेजारी बसली . "सॉरी हं काका ,काकू असं म्हणत राहुल श्रेयाच्या आई-वडिलांच्या पाया पडला. तिरकस नजरेने हे सारे पाहत असणाऱ्या श्रेयाने मात्र तोंडासमोर धरलेल्या मोबाईल मध्ये गुंग असल्याचे भासवत त्याच्याकडे लक्ष  नाही असे दाखवले . "नमस्ते श्रेया मॅडम! ओळखले का तुमच्या विद्यार्थ्याला ?" असे म्हणत  तिच्यासमोर हात जोडून उभे असलेल्या राहुल कडे श्रेयाने बघितले आणि ती बघतच राहिली .उंचापुरा, रुबाबदार ,देखणा,गोरापान...!चेहऱ्याला साजेशी मिशी व किंचित वाढलेली दाढी गोऱ्यापान वर्णावर अधिकच शोभून दिसत होती. मिश्किल हास्यासह चेहऱ्यावर असणारा उत्साह त्याच्या देखणेपणात अधिकच भर घालत होता. स्वप्नातील राजकुमारापेक्षाही अधिक सरस होता राहुल. श्रेयाच्या नाकावर आलेला राग क्षणार्धात कुठल्या कुठे पळाला. त्याचे ते राजबिंडे रूप तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली चढवत गेले.  श्रेया त्याचे ते राजबिंडे रूप डोळ्यात साठवून घेत होती .


         झटपट आवरून "आई येते ग ".. असे म्हणत दरवाजातून बाहेर पडणारी स्त्रिया कोणावर तरी जोरात धडकलीच. स्वतःला कसेबसे सावरत तिने पाहिले तर चक्क तो राहुल होता .क्षणभर तिचा विश्वासच बसेना डोळ्यांवर . "श्रेया हळू.. एवढे घाईघाईत कुठे निघालीयेस?"  काहीसे बावरून बाजूला होत ती म्हणाली " अं..नाही.. म्हणजे.. कॉलेजला जायला जरा उशीर होत होता ..ये ना ,आत ये..".  "अरे राहुल तू कसा काय आलास?" " काकू काल तुमची पर्स विसरली होती ती द्यायला आलोय .आज कंपनीला सुट्टी होती म्हणून आईने सकाळीच पाठवले मला .नाहीतर इतर दिवशी मी आईच्या हाती लागतच नाही ." "श्रेया, पाणी दे न त्याला तोवर मी चहा टाकते .का पोहेच करू खायला?  लहानपणी माझ्या हातचे पोहे फार आवडायचे तुला." " नको काकू राहू द्या. पोहे खायला येईन कधीतरी .आज जरा घाई आहे. चहा मी घेत नाही .फक्त पाणीच द्या मला",  असे म्हणत राहुल ने ग्लास मधले थोडे पाणी पिले आणि "येतो काकू" असे म्हणत निघायला लागला .काहीसे थांबून तो म्हणाला, "श्रेया तुला सोडायचे आहे का कॉलेजला ? माझ्यामुळे तुला उशीर झाला ना" " नाही मी जाईन गाडीवर" असे म्हणत श्रेयाने पर्स खांद्यावर लटकवली.  राहुल जाताच ती कॉलेजला निघाली . राहुलशी झालेली टककर.. त्याचा तो ओझरता ,कणखर ,पुरुषी स्पर्श.. तिच्या सर्वांगावर मोरपीस फिरवून जात होता . कॉलेजमध्ये तिचे लक्ष लागत नव्हते. आपल्याच निराळ्या स्वप्नील दुनियेत ती हरवली होती. आईच्या आलेल्या फोंनमुळे ती भानावर आली. "हं..बोल आई"  असं तिने  म्हणताच तिकडून का,रडक्या स्वरात आई म्हणाली," श्रेया लवकर सिटी केअर हॉस्पिटल मध्ये ये. बाबांना हार्ट अटॅक आला आहे .त्यांना ऍडमिट केले आहे." श्रेयाच्या तोंडून शब्दच फुटेना. धास्तावलेल्या मनाने तिने हॉस्पिटल गाठले .बेडवर नाका तोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेत बाबांना पाहून तिला रडू कोसळले. दोघी मायलेकींनी एकमेकींच्या गळ्यात पडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. इतक्यात हातात औषधांच्या बाटल्या घेऊन राहुल तिथे आला." काकू हे औषध आहेत डॉक्टरांनी सांगितलेली. उद्या अँजिओग्राफी करतो म्हणाले ते. जर ब्लॉकेजेस निघाले नाही तर एक दोन दिवसात डिस्चार्ज देतील नाहीतर ऑपरेशन करावे लागेल .पण तुम्ही काळजी करू नका शक्यतो ब्लॉकेजेस निघणारच नाही .अटॅक माइल्ड होता". असे म्हणत राहुलने सगळे औषध व्यवस्थित टेबलवर ठेवली .  "राहुल तू अगदी देवासारखा धावून आलास बघ. नेमकी आमच्या शेजारचे काका गावाला गेले आहेत .आमचे सगळे नातेवाईकही गावीच असतात .अशा वेळेस यांच्या ऑफिस मधून फोन आल्यावर मला काही सुधरलेच नाही.त्यामुळे तुला फोन केला." " अहो त्यात काय काकू एवढ? आपल्या माणसांसाठी नाहीतर कोणासाठी करायचं ?तुम्ही काय परके आहात काय ?" राहुलचे वाक्य श्रेयाला सुखावून गेले . आपल्या माणसांसाठी म्हणत असताना त्याने आपल्याकडे टाकलेला कटाक्ष तिच्या स्वप्नांना आशेचे पंख लावत गेला .


           "आई मी घरी जाऊन तुमच्या दोघांचा डबा बनवून आणते "."अग बाबांना थोडीच काही खाता येणार आहे?  आपण दोघी इथूनच काही खाऊन घेऊ " "नाही आई , मला माहिती आहे तू सकाळची उपाशी असणार आहेस. कारण तू बाराच्या पुढेच जेवण करतेस .वाटल्यास गरम गरम खिचडी करून आणते ." "काकू, आई म्हटली होती ना डबा घेऊन येते म्हणून ." " नाही रे राहुल ,मीच नको म्हटले. त्याही आजारी होत्या म्हणे दोन तीन दिवसांपासून . उगाच कशाला दगदग ?"  "बर श्रेया चल मग, मी सोडतो तुला. बाहेर अंधार पडला आहे. यायला उशीर होईल तुला .घर बरेच लांब आहे इथून तुमचे .काकू मी श्रेया सोबत जाऊन येतो. आई-बाबा येथीलच इतक्यात."  राहुलच्या गाडीवर श्रेयाची स्थिती अगदीच अवघडल्यासारखी झाली .कसे बसावे? काय बोलावे?  सगळाच गोंधळ उडाला . त्याला बहुदा तिची मानसिक अवस्था समजली असावी. बाबांच्या तब्येतीचा विषय काढून तोच सुरू ठेवत त्याने तिला घरी आणले .


           घरी येताच श्रेयाने भरकन कुकर घासून घेतले .कांदा चिरून लसूण सोलला. तांदूळ घेतले .मुगाची डाळ घेण्यासाठी डबा उघडला तर त्यात अगदीच थोडी डाळ होती. तुरीच्या डाळीने आईला अँसिडीटी 

होते म्हणून ती डाळ आई खात नसे. मुगाच्या डाळीचा मोठा डबा तर वर माळ्यावर होता. एरवी तो काढून द्यायचे काम बाबांचे असे. काय करावे? खुर्चीवर नेमकी राहुल बसलेला होता .दुसरी खुर्ची होती पण तिचा पाय जरा हलायचा त्यामुळे ती बाजूलाच उभी करून ठेवली होती. तिच्यावर उभे राहून उगाच पडलो तर काम वाढून जायचे. काय करावे? तिला कळेच ना . "काय ग श्रेया? खिचडी कशी बनवतात ते लक्षात येत नाहीये की काय?" " नाही ,ते मुगाच्या डाळीचा मोठा डबा माळ्यावर आहे. खुर्चीवर तू बसला आहेस ना मग ती काढायची कशी या विचारात होते." "अग मग मला सांगायचे ना तसे. लहानपणी भातुकलीच्या खेळात तुझ्या हाताखाली अनेक कामे केली आहेत मी ". असे म्हणत राहूल ने माळ्यावरील डबा काढून ओट्यावर ठेवला. श्रेयाच्या रोमारोमात एक गोड शिरशीरी आली. तिच्याही नकळत राहुल सोबतच्या संसाराचे चित्र तिचे मन रेखाटू लागले. 


        दुसऱ्या दिवशी बाबांचे रिपोर्टस नॉर्मल आले तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि साऱ्यांच्या जीवनाची गाडी पूर्ववत सुरु झाली. जे ते आपापल्या उद्योगात व्यस्त. मध्ये महिनाभर राहुलशी, त्याच्या घरच्यांशी श्रेयाचे भेटणे बोलणे झाले नव्हते .तसे काही निमित्त ,कारणही नव्हते .तरी देखील राहुलची छबी श्रेयाच्या मनातून पुसट झालेली नव्हती .रोज त्याच्यात वेगवेगळे रंग भरले जात होते. त्या दिवशी सकाळीच आई म्हणाली," श्रेया.. संध्याकाळी जरा लवकर ये ग. देशपांडे काकूंनी हळदी कुंकाला बोलावले आहे चैत्रगौरीच्या .तुलाही घेऊन ये म्हणाल्या आहेत. राहुलशी भेटीचा आलेला हा योग श्रेयाला सुखावूनच गेला. संध्याकाळी तिने घातलेल्या लाल रंगाचा ड्रेस तिच्या गौरवर्णावर अधिकच खुलून दिसत होता .डोळ्यातील हलकेसे काजळ, ओठावरील लाल लिपस्टिक, लांब सडक वेणीवरील धुंद करीत जाणारा मोगऱ्याचा गजरा.. या हलक्याशा मेकअप मध्येही श्रेया अगदी सुंदर दिसत होती . देशपांडे काकूची तब्येत अजूनही जरा नरमच होती त्यामुळे हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना श्रेयाच पन्हे,डाळ देत होती. तिच्यामुळे आपले बरेच काम हलके झाले आहे हे पाहून देशपांडे काकूंना बरे वाटले .. श्रेयाची नजर राहुल ला शोधत होती . हा नेहमीच वेळेवर घरी नसतो .अगदी वाट पाहायला लावतो. ती मनाशीच बोलत त्याला शोधत होती." काय शोधते आहेस श्रेया?"  "अं.. काही नाही .." मागून हळूच आलेल्या राहुल समोर श्रेया गोंधळली. "मला वाटलं मला शोधत आहेस की काय ?  तसे तर काही नाही ना?"  "नाही ..नाही.. तुला कशाला शोधू मी?" " हा.. एवढे कुठे आमचे नशीब थोर?  बाकी या लाल रंगाच्या ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसतेस तू". श्रेया लाजून तिथून पळाली. घरी गेल्यावरही कित्येक दिवस तो प्रसंग तसाच तिच्या डोळ्यासमोर तरळत होता. 


       आज कॉलेजमधून निघण्यास जरा उशीरच झाला होता श्रेयाला. सिग्नलवर तीची गाडी थांबली तोच शेजारीच किंचित अंतरावर राहुलची गाडी येऊन थांबली. पण त्याच्या सोबत कोणी दुसरीच मुलगी होती. मॉडर्न कपडे आणि मेकअप केलेली ती मुलगी राहुलला बरीच खेटून बसली होती. श्रेयाला  ते पाहून जरा रागच आला . तिने राहुल कडे पाहून न पाहिल्यासारखे केले . "हाय श्रेया !आज उशीर झाला वाटतं " असे राहुलने विचारताच तिने अनिश्चेने हो म्हणत भरकन गाडी पुढे काढली. तिच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. तिच्या  मनाने रंगवलेले सुखी संसाराचे चित्र मिटून गेल्याचे तिला जाणवले.  दुसऱ्या दिवशी देशपांडे काकू घरी आल्या तेव्हा श्रेया घरीच होती .कालपासून तिचे ठणकत असलेले डोके थांबायचे नावच घेत नव्हते ."काय म्हणते श्रेया आज घरी कशी काय?" " काही नाही जरा तब्येत ठीक नव्हती" . "तुमची तब्येत काय म्हणते? " श्रेयाच्या आईने पाण्याचा ग्लास देशपांडे काकूंच्या हातात देत विचारले. "आज तब्येत बरी आहे. कामही फारसे नव्हते त्यामुळे म्हटले चला जाऊन येऊ तुमच्याकडे. नवीन घरात शेजारी पाजाऱ्यांशी अजून म्हणावी तितकी ओळख झालेली नाहीये. तसेही आपले जसे घरच्यासारखे संबंध होते तसे होणे शक्य नाही आता. राहुल सोडतो म्हणाला होता मला ,पण ऐन वेळेस त्याची कंपनीत काम करणारी टीना तिचा फोन आला आणि तो घाईघाईने गेला मग आले मी रिक्षा करून ." कालची त्याच्या गाडीवर बसलेली  बहुदा टीना च  असावी. श्रेयाच्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले.

"बाकी काय म्हणताय? सुनबाई चे योग कधी आहेत? संशोधन मोहीम कुठपर्यंत आली?" " आपल्या हातात आहे का ते ? तो जमाना गेला आता. मुले स्वतःच ठरवतात त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न .तुम्हाला म्हणून सांगते मला तर वाटते ती टीना आहे ना, ती आवडते बहुदा राहुलला. बरेचदा येते राहूल सोबत घरी. दिसायला चांगली आहे .स्वभावानेही बरी आहे . मात्र तिचे राहणीमान काही आवडत नाही आम्हा दोघांना. पण आपले काय? राहुलला आवडली बस झाले. आम्ही वाट पाहत आहोत राहुल विषय काढेल तिच्याबद्दल म्हणून.  तो पठ्ठ्या काही विषय काढत नाहीये . शेवटी आम्ही ठरवले आहे दिवाळीपूर्वीच काय तो सोक्षमोक्ष लावायचा आणि दिवाळीत लग्नाचा बार उडवून द्यायचा. हे ऐकून श्रेयाच्या डोळ्यातून नकळत पाणी यायला लागले. पोहे करण्यासाठी चिरत असलेल्या कांद्याचा आधार घेत तिने मनसोक्त वाहू दिले अश्रूंना.. 


             रात्री तिला झोपच येत नव्हती डोक्यात विचारद्वंद्व चालू होते. आपणच मूर्ख.. एकतर्फी प्रेम करत बसलो राहुल वर बालपणीच्या भातुकलीच्या खेळाच्या आधारावर..! त्याच्या मनात कोणी दुसरेच आहे हे माहीतच नव्हते आपल्याला .त्याच्यावर रागावण्याचा प्रश्नच नाहीये त्याने कुठे प्रेमाचे कबुली दिली होती आपल्याला? पण मग त्याच्या नजरेतील ते भाव.. एक दोन वेळेस आपली काढलेली लाडिक खोडी.. ती आपुलकी.. हे सगळे काय होते ? का तो सहज सहकार्य भावनेने सगळे करत होता आणि आपणच त्याला प्रेम समजत होतो?   छे.. काहीच कळत नाहीये. आता मात्र दूर व्हायचे या सगळ्यांपासून .आई-बाबा आपल्या लग्नाचं बघतच आहेत. त्यांच्या आवडीच्या एखाद्या मुलाशी लग्न करून संसार थाटायचा .पंख छाटले गेल्याने जमिनीवर कोसळून रक्त बंबाळ झालेल्या स्वप्नांना मोठ्या प्रयासाने दूर लोटत श्रेया झोपी गेली. 


           अहो ऐकल का..आपण श्रेया चा फोटो पाठवला होता ना त्या कुलकर्णी कडे.त्यांना फोटो आवडल्याचे कळवले आहे त्यांनी.पाहायचा कार्यक्रम लवकरच करू म्हणताहेत. हे बघा हा मुलगा चांगला वाटतोय मला .नोकरी ,घरदार सारे चांगले आहे.पत्रिका ही बऱ्यापैकी जमते आहे . विशेष म्हणजे श्रेयाने हो म्हटले आहे .आपल्या सगळ्या अटीत तो अगदी पूर्ण बसतोय .मग करायचे का पुढे बोलणे ? "त्यांना आपली श्रेया पसंत आहे . तिला पसंत असेल तर आपली काही हरकत नाही मी उद्याच फोन करतो त्यांना "  "आहे का घरी वहिनी ?" " अरे देशपांडे वहिनी या या.. ये राहुल बैस ..आज बरेच दिवसांनी ." "अहो आज चतुर्थी होती. राहुल कंपनीतून लवकर घरी आला. म्हटलं चला गणपतीचे दर्शन तरी जाऊन येऊ म्हणून येथे आले होते. गणपती मंदिरातून पाय नकळत इकडे वळले . " " वा वा बरं झालं .आता एक चांगली बातमी आहे . ऐका ..असं म्हणत श्रेयाच्या आईने श्रेयासाठी चे नवीन स्थळ, त्याबद्दल असलेले   सगळ्यांचे सकारात्मक मत आणि लवकरच येऊ घातलेला लग्नाचा योग याबद्दल सांगितले. हे ऐकून देशपांडे काकूंना खूपच आनंद झाला." चला तुमच्या जावयाच्या पायगुणाने आमच्या सुनेचाही योग लवकर यावा म्हणजे बरे होईल" असं म्हणत देशपांडे काकूंनी गणपतीचा प्रसाद साऱ्यांना दिला. श्रेया त्या प्रसादाकडे कितीतरी वेळ पहातच होती. गणपतीने आजवर मला सर्व काही न मागता भरभरून दिले आहे .काही मागायची वेळच आली नाही.  मग यावेळेसच कसे काय तो विसरला ? की देवाचेही लक्ष नाही आपल्याकडे? तिचे डोळे भरून आले. "श्रेया" .. "काय आई"?   या दोघांना आता इथूनच उपास सोडून जायच म्हणते आहे मी. देशपांडे काकांनाही फोन करून बोलावले आहे इकडे. पण भाज्या आणाव्या लागतील. राहुल म्हणाला की आम्ही दोघे जाऊन घेऊन येतो भाज्या. तेव्हा तू जाऊन जरा भाज्या आणि नैवेद्याला पेढा घेऊन ये राहुल सोबत जाऊन." खरे म्हणजे श्रेयाला आता त्याच्या गाडीवर बसण्याची इच्छाच नव्हती. पण नेमकी तिची गाडी पंक्चर होती आणि सर्वांसमोर नाही म्हणणे तितकेसे योग्य वाटले नसते त्यामुळे काहीशा नाराजीने पिशवी हातात घेऊन ती निघाली. गाडीवर कोणीच कोणाशी बोलले नाही. राहुलने गणपतीच्या मंदिरासमोर गाडी थांबवली ."तुम्ही दर्शन करूनच आलात ना "? असे श्रेयाने म्हणताच राहुल म्हणाला "हो, पण आता जोडीने दर्शन घ्यायची इच्छा आहे". "काय"?  "चल तिथे बाकावर बसू थोड्यावेळ " श्रेया निमूटपणे त्याच्या मागे गेली . बाकावर बसताच राहूल म्हणाला ," श्रेया प्लीज.. तू हे लग्न करू नकोस. माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर .श्रेया आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली ." मला माहितीये तुझ्याही मनात माझ्याबद्दल त्याच भावना आहेत ज्या माझ्या मनात तुझ्याबद्दल आहेत .लहानपणीच्या भातुकलीच्या खेळापासून माझ्या मनात तूच आहेस माझ्या जीवन साथीच्या रूपात " "मग तू हे आधी का नाही सांगितलेस आणि ती टीना..? काकू म्हणत होत्या तुझ्या मनात ती आहे म्हणून"  "तसे काहीही नाहीये.ती माझी चांगली मैत्रीण आहे.थोड्याच दिवसात तिचेही लग्न होणार आहे. मला माहितीये माझ्या मनातील भाव मी लवकर तुला सांगायला पाहिजे होते.  पण माझ्या प्रेमात तुझी होणारी व्याकुलता ,घालमेल मला आवडत होती. मला तूआवडतेस .तुझे साधे राहणीमान, हळवा मृदू स्वभाव , घरातील कामाचा उरक आणि सगळ्यांबद्दल मनात असलेला आदर ,काळजी . सारे सारेच आवडते. अजून थोडे दिवस तुला माझ्या प्रेमात व्याकुळ होऊ देणे मला आवडले असते पण आता तुझ्या लग्नाची गोष्ट निघाली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला . वाटले ही वेळ निघून गेली तर कदाचित तुला गमवावे लागेल कायमचे त्यामुळे मनाचा निर्धार केला आणि भाजी घ्यायच्या निमित्ताने घेऊन आलो तुला मंदिरात .म्हटले गणपती बाप्पाच्या साक्षीनेच लग्नाची मागणी घालावी तुला .पुढे त्यांचेच आशीर्वाद लागणार आहेत पाठीशी .आपला संसार सुखाचा व्हायला."  श्रेयाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. नकळत ती राहुलच्या मिठीत शिरत म्हणाली "लग्नानंतर असा त्रास दिलेला चालणार नाही हां मला " कान पकडून सॉरी म्हणत राहुल हसायला लागला. गणपती बाप्पांच्या आशीर्वाद घेऊन दोघेही घरी आले ."अरे हे काय ? भाजी आणायला गेला होतात ना मग रिकामी पिशवी घेऊन परत का आला आहात ? स्वयंपाकाला लागायचे आहे ना मला." श्रेयाच्या आईनी असे म्हणताच राहुल म्हणाला ," काकू आज घरी नको बाहेरच जाऊया जेवायला. तुम्हा सगळ्यांना आम्हाला गोड बातमी द्यायची आहे." " आज काय गोड बातमी ऐकण्याचा दिवस आहे की काय? काय बातमी आहे ?" "आई-बाबा, काका काकू मी आणि श्रेयाने एकमेकांशी लग्न करायचे ठरवले आहे " "काय ?? सगळ्यांच्या तोंडून आश्चर्य मिश्रित आनंदाचे भाव उमटले. "अरे मग आम्हाला हे आधी का नाही सांगितले दोघांनी?" " आम्ही आमच्या मनातील भावना आजच व्यक्त केल्या एकमेकांसमोर कदाचित या दिवसाचा मुहूर्त आमच्या नशिबात असेल" " अरे वा !वा ! फारच छान निर्णय घेतलात. माझ्या मनात तर ही अनेक दिवसांची इच्छा होती. पण मला वाटले तुझी आवड वेगळी असेल. असो.. या सुनबाई.." असे म्हणत देशपांडे वहिनींनी श्रेयाला मिठी मारली. मग राहुल व श्रेया सगळ्यांच्या पाया पडले. आता साखरपुडा उरकून घेऊ आणि दिवाळीत बार उडवून देऊ लग्नाचा ...असे म्हणत सारे आनंदाने बाहेर जेवणास जायला निघाली. देव्हाऱ्यात लावलेल्या निरांजण्याच्या मंद प्रकाशात तेजाने उजळून निघालेला गणपती बाप्पांचा चेहराही आज जणू हर्षाने  उजळला होता...!!


✍???? सौ. दीप्ती समीर कुलकर्णी...

      छत्रपती संभाजी नगर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू