पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पळस फुला रे! पळस फुला...

 

कथा

पळस फुला रे! पळस फुला

 

   ग्रीष्माच्या उन्हाची दाहकता प्रचंड जाणवत होती. वृक्ष निष्पर्णी झाल्याने या जंगल वाटेतून जाताना ओसाड वाटत होतं. सूरजचा हा प्रवास त्याच्या मनाला चटका लावून जाणारा असाच भासत होता.

   बस अगदी चाळीस किमीच्या मर्यादित वेगाने निर्जन रस्त्यावर धावत होती. वेगाने गाडी हाकलावे असा छान रस्ता नव्हताच, यामुळे सावध होऊन ड्रायव्हर गाडी चालवत होता. आपण केव्हा-केव्हा तिथे बागेत पोहोचतो ही हुरहुर त्याला लागलेली.

   गाडीच्या खिडकीतून एकटक तो बाहेर बघत राहिला. या ऋतूत ओसाड वनात पळस तेवढा फुललेला दिसून येत होता. त्याचे मन प्रिय भारतीच्या आठवणीत अंतरंगातून मधुर गीत गात होते.

    “चाहे सौ गर्दीशे हो, पर कोई गैर नही...

    हम दुनिया से लढ लेंगे, पर तेरे बगर नही..

    दिल से सुन पिया... ये दिल की दास्ता... जो लब्जों मे नहीं हो बया...!”

    सुरजला भारतीच्या आठवणी आठवू लागलेल्या.

    सुरजला भारतीची ओढ, भारती ने प्रेमाचा स्वीकार करतात त्याला हे आवडीचे गीत तिने ऐकवले होते. तेव्हापासून तो दररोज हे गीत मनातल्या मनात गायचा. तिच्या आठवणीत त्याला प्रसन्नता मिळायची. तेवढीच आता हुरहूर जाणवत होती.

   कॉलेजच्या दिवसात दोघेही एकत्र आल्याने त्यांचं प्रेम बहरलं होतं. भारती हुशार तेवढीच जिद्दी महत्त्वाकांशी होती. तिचं सुरेख सौंदर्य, कपाळावर लुडबुड करणारे कुरळे केस, तिची कपाळावरील बिंदी, हसरा मोहक चेहरा, मितभाषी बोलणं, अगदी साधं राहणीमान, तिला बघून वर्गातील कित्येक मुले तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करायचे.

   सुरवातीचे काही दिवस सुरज तिला कॉलेजात निरखत असायचा. इतराप्रमाणे त्याचेही मन भारतीकडे आकर्षित होऊ लागलेलं. मात्र त्यांने संयम राखला होता. वर्गात असूनही त्याला तिच्याशी कधी बोलायला संधी मिळत नव्हती की, तिच्या मैत्रिणीशीही त्याने कधीही संवाद साधला नव्हता. तसं तर सुरजचा स्वभावही लाजाळू, त्याला मुलीशी बोलण्याची तेवढी हिम्मत नव्हतीच. त्यापेक्षा त्याला भीतीच वाटायची.

   चार महिन्याने मात्र कॉलेजच्या प्रात्यक्षिकांमध्ये भारती त्याच्याशी बोलली होती. ती त्याचे अभ्यास, गुणकौशल्य, साधे राहणीमान बघून त्यावर मोहित झाली होती.

   एके दिवशी आरती पुढाकार घेत लायब्ररीत त्याला एकांतात भेटायला आली. सुरज पुस्तके बघण्यात रमलेला होता.

   “कुठलं पुस्तक वाचतो आहेस?”

   “हं..!” तो तिला एकाएकी बघून अडखळला होता. त्याला तिच्याशी कसे बोलावे हेही सुचेना.

   “काही नाही, ही ‘बयरी’ संजय येरणे यांची कादंबरी फार छान आहे. अगदी ग्रामीण स्त्रीचं संघर्षमय यथार्थ चित्रण चितारलंय यात. मित्रांनी सुचवलं वाचायला म्हणून मागवली.” तो कसाबसा म्हणाला.

   “तुला फार अवांतर वाचायला आवडतं. हो ना!”

   “होय! अगं मोकळ्या वेळात मी अभ्यासाव्यतिरिक्त यात मनोरंजन शोधत असतो.”

   “का? इतर बाबतीत का नाही शोधत मनोरंजन...” ती हसत म्हणाली.

   “कुठल्या इतर बाबीत.” त्याने अजाणतेपणी म्हटलं. ती फक्त हसली.

   “हं! मलाही आवडेल वाचायला. तुझं वाचून झाल्यावर मला देशील नक्की.”

   “का नाही? नक्की देणार बरे! येतो मी, भेटू...”

   सुरजने कादंबरी हातात घेत तिच्याकडे एक प्रेमनजरेने कटाक्ष टाकत लायब्ररीतून बाहेर पडला होता. ती एकटक त्याकडे बघतच राहिली.

   भारतीशी झालेला तो पहिलाच संवाद, ‘सुरज यापुढे कादंबरी देईल, आपल्याशी पुढे बोलेल काय?’ भारतीला हुरहूर वाटत राहिली. मात्र निमित्ताने त्याच्याच्याशी बोलायला मिळालं होतं. त्यानंतर चार दिवसांनीच सुरजने तिला कादंबरी वाचायला दिली. पुढे दोघेही एकमेकांशी संवाद साधू लागले आणि यातूनच पुढे दोन महिन्यातच दोघेही एकमेकांत गुंतले होते. प्रेमात रूपांतरण झालं होतं.

   कधी-कधी वेळ काढून एकमेकांना भेटणं, बोलणं सुरू होतं. कॉलेजातील दोन वर्ष यापैकी दीड वर्षे जणू सोबतचा सहवास लाभलेला. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हती.

   कॉलेज संपल्यावर भारती, सुरज स्वगावाला निघून जाणार होती. एकमेकांना भेटण्याची ओढ, हुरहुर त्यांना जाणवायची. मात्र आता एकमेकांना भेटणे शक्य नव्हतं. कधी, कुठे आणि कसं भेटायचं? हा सुद्धा एक प्रश्नच त्यांच्यासमोर उभा राहिलेला.

   “भारती तू मला आयुष्यभर साथ देशील काय?”

   “हो ना! मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. पण तुझं मन...”

   “हो गं! मलाही तुझ्याशी. पण...”

   “पण काय?”

   “तुझे आई-वडील आपल्या आंतरजातीय विवाहाला देतील मान्यता.”

   “नाही ना रे! तीच तर अडचण आहे. त्यांनी तर माझं लग्न उरकायचे ठरविले आहे. पण मीच नकार दिला त्यांना. म्हणाली की, नोकरी लागल्याशिवाय मी लग्नच करणार नाही. मी पोलीस होणारच...” ती हिरमुसत त्याला म्हणाली.

   “अगं तू पोलिसात जाशील पण माझं ते काय? पुढे काय करावे? कळेनासं झालंय. माझी परिस्थिती बेताची आहे. कदाचित पुढे काही जॉब करून कॉलेजात शिकत एखादी नोकरी मिळेल या आशेवर आहे मी. काय माहित स्वप्न पूर्ण होतात की नाही.” सुरज हिरमुसला होता.

   “अरे वेड्या, तुझे स्वप्न नक्की पूर्ण होणार आणि नाही झाले तरी मी पोलीस झाल्याबरोबर तुझ्याशीच पळून जाऊन लग्न करणार.” ती त्याला हसत म्हणाली.

   “खरंच! पण मला नोकरी नसेल तरी स्वीकारशील तू.”

   “हो रे माझ्या राजा! अरे, तुझ्यावर मी खूप अगोदर पासून प्रेम करते आहे. तू माझ्या अंतरंगात रुतून बसला आहेस. म्हणूनच तर मी तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करीत असायची.”

   “अगं मला नव्हतं ठाऊक. मलाही तू आवडायचीस, पण माझ्या परिस्थितीमुळे खरंतर मी तुझ्या दूर राहायचा. तुला ते आवडेल की नाही. मनात संकोच निर्माण व्हायचा.”

   “आता संपलाय ना तुझा संकोच कायमचा. बरं! पण पुढे काय? आपण कधी, केव्हा, कुठे भेटायचे.”

   “हो ना गं! कसं भेटायचं? मलाही प्रश्न पडतो आहे. तू तुझ्या गावी, दुसऱ्या गावात शिक्षणाला जाणार. मी माझ्या गावी, मी कुठे राहणार हेही मला ठाऊक नाही. मग एकमेकांना निरोप तरी कसा पोहोचवायचा? आपल्या दोघाकडेही मोबाईल पण नाही.”

   “हो ना रे! पुढे मोबाईल घ्यावंच लागेल.”

   “अगं पुढं घेऊ कसेतरी, पण आता कुठवर विरह सहन करायचा.” त्यालाही चिंतेने ग्रासलं होतं.   

   “एक युक्ती सुचलीय. आपण दर महिन्याच्या पहिल्या रविवारी याच बागेत इथेच भेटू या का? कुठेही असलो तरी इथे दुपारी बारा वाजता भेटायचं.”

   “अरे वा! छान, मस्त सुचलं तुला. पण कधी येणं झालं नाही तर...!”

   “अगं, नाही येणं झालं तरी दोघांमधून आपण एकतरी येऊच ना! मात्र आपली भेट होणार नाही एवढेच. आपण या झाडाच्या बुंध्याशी इथल्या खड्ड्यात एक पत्र लिहून पुरून ठेवायचं. त्यावर दिनांक, वेळ टाकायचं. पुढे जेव्हा कधी येणं झालं तेव्हा ती पत्र काढायची, वाचायची. नि पुन्हा एक पत्र लिहून ठेवायचं. ठरलं! त्यात आपला पत्ता आणि मनातलं सारंकाही....”

   सुरज-भारतीने आपलं प्रेम कायम टिकून राहावं म्हणून आखलेली योजना याप्रमाणे अंमलात आणायचं ठरवित दोघांनी कॉलेजच्या अखेरच्या दिवशी एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला होता.

   तो दिवस सुरजला जसाच्या तसा आठवत होता.

   सुरजची परिस्थिती बेताची असल्याने पुढे सीनियर कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी नागपूर गाठले होते. तिथेच एका कंपनीत जॉब करीत त्याचे शिक्षणही सुरू होते. आरतीही स्वगावाहून पुढे पोलीस अँकाडमीत ट्रेनिंग घ्यायला गेली. तिची वजन, उंची छान होती. तिला पोलीस व्हावं ही आवड, त्यामुळे ती चंद्रपूरला अँकाडमीत प्रवेश घेऊन राहू लागली. तिच्या डोळ्यासमोर पोलीस नोकरी मिळवण्याची ध्येय होते. 

   ठरल्याप्रमाणे चारसहा महिने दोघेही बागेत ठरलेल्या दिवशी भेटायला आलेली. मनसोक्त चर्चा करायची. दिवसही अपुरा पडायचा. मात्र पुढे भारतीने अँकाडमीत प्रवेश घेतल्याने तिला सुट्टी मिळणं कठीण झालं. ती येऊ शकणार नव्हती. मात्र सुरजला कंपनीत जॉब असल्याने त्यालाही दूरवरून येणे शक्य होणार नव्हते. पण ठरल्याप्रमाणे शक्य होईल तेव्हा येऊ असेच ठरले होते.

   सुरज बसमधून उतरत बागेकडे निघाला. ‘आज तरी भारती येईल काय?’ त्याला हुरहूर जाणवत होती. भारती इतर एखाद्या दिवशी कधीतरी येऊन इथे पत्र ठेवून गेली असेल या आशेवरच तो होता.

   सुरजला आता आपलं प्रेम अगदी या ग्रीष्म ऋतूत असे निष्पर्णी झाल्याचे जाणवत होते. तब्बल सोळा महिने उलटलेले. चारदोन महिने मध्यंतरीचे सोडले तर सुरज नित्याप्रमाणे नेहमीच इथे येत राहिला. मात्र भारती कधी पुढे इथे आलीच नाही. याची खंत त्याला वाटत होती.

   सुरजने बागेत झाडाखाली बघत बाजूची माती उखरुन बघितली. भारतीचे कुठलेही पत्र आजही नव्हते. इतर चिठ्ठ्या जशाच्या तशाच होत्या. त्याचं मन निराश झालेलं.

   त्याने परत एक पत्र लिहलं. आपल्या मनवेदना मांडून तिथे पुरत बराच वेळ तिथे वाट बघत राहिला. मनात अनेक विचार येत होते.

   “तब्बल सोळा महिने, भारतीची भेट नाही. विसरली असेल का ती आपल्याला? ती अँकाडमीत सरावामुळे बिझी असेल? कुठे तिला दुसऱ्याशी तर प्रेम नाही ना झालं असेल? तिच्या वडिलांनी तिचं लग्न तर केलं नसेल?” सूरजच्या मनात अनंत प्रश्न रेंगाळत होते.

   “मी वेड्यासारखा विचार करतोय. नाही आपली भारती अशी नाहीच. तीच तर आपल्यावर जीवापाड प्रेम करायची. मला विसरणे कसे शक्य आहे. पण तिने एकदातरी येऊन आपल्या मनभावना पत्रात लिहून ठेवत मोकळ्या मनाने बोलली असती तर! ही हुरहूर नसतीच.” सुरजचं मन स्वतःलाच समजावीत होतं.

 

 

 प्रिय                                 दि. २३/४/२०२२

       भारती,

   “भारती, मी तुझी अनेक महिन्यापासून किती किती वाट बघतोय. यापुढे मीही आता इथे येणार नाही. अगं, येऊन तरी काय करू? किती आणाभाका घेतल्या होत्या तू आणि मी. पण तूच अखेर कमी पडलीस. तुझी कारणे काहीही असोत. माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे आणि जीवन अखेरपर्यंत मी ते कायम हृदयात कोरून ठेवणार. कदाचित हे माझं शेवटच पत्र. जर का तू आलीस तर वाचशील. नाहीतर तुला लिहलेले पत्र या प्लास्टिकमध्ये सुरक्षित खड्ड्यात आजन्म पुरलेले असतील. एकदा तरी तुला बघावं, भेटावं, तुझी कारणे जाणावी असंच वाटतं आहे. कदाचित तुझ्या मनभावना बदलल्याही असतील. तुला जर कुणी माझ्यापेक्षा चांगला तरुणही मिळाला असेल. तरी मला राग नाही. तू फक्त सुखी, आनंदी, हसत राहावीस. तू तुझे स्वप्न पूर्ण करावेस, यशस्वी व्हावीस. एवढंच मनाला वाटतं आहे. अगं एक गोष्ट सांगू! आज त्या वाटेवरुन येताना ओसाड रानात फुलून आलेला पळस बघून तुझीच आठवण झाली. किती मनमोहकता... कसे सांगू... अगदी माझ्या ओसाड जीवनात जणू तुझ्यारूपाने फुललेला पळस. माझे मन म्हणते आहे, ‘तू येशील...’ या पळसागत माझ्या निष्पर्णी आयुष्याला फुलवशील. याशिवाय का का कुठली अपेक्षा? तुझ्यासाठी काल कवितेच्या काही ओळी लिहिल्यात, तुलाच समर्पित करतो आहे.”

 

“ओसाड रानी निष्पर्णी

ही रडते बहुदा

फुलतो पळस जीथे

मन झुरते बहुदा

 

ग्रीष्माचे चटके सोसत

वेदना भोगतो बहुदा

हसतो पळस तरीही

जीव जळतो बहुदा”

                       

तुझाच

सुरज

ह.मु.-

एम.आय.डी.सी. हिंगणा रोड, स्वातीनगर,

प्लॉट ११५, कटाणे हाऊस, दुसरा माळा, नागपूर. १४.

 

   त्याने तिथे पत्र पुरून ठेवले. तो निराश मनाने बसस्टॉपकडे उठून जाऊ लागला. आज त्याचं मन खूप हळवं झालं होतं.

   दर महिन्याच्या पहिल्या रविवारी तिची आठवण करीत, ‘जावं त्या बागेत भेटायला’ ही आतुरता असायची पण पुढे त्याने तिथे जाणे टाळलं होतं.

   तब्बल पुरते पुन्हा आठ महिने उलटले होते. सुरज बागेत तिला भेटायला गेलाच नव्हता.

   भारती जर का तिथे आली असती तर नक्कीच तिने या पत्त्यावर पत्र तरी पाठवलं असतं. भेटायला आली असती. मात्र तसं काहीएक घडलं नव्हतं. सुरजच्या मनात ती एक हुरहुर लागलेली. त्याला तिची आठवण दाटून आली होती

   सुरजचं कॉलेज करून जॉब करीत थोडं फार उत्पन्नही मिळवित जगणं सुरू होतं. सोबतच बँकिंगचे क्लास करून बँकेत पुढे नोकरीवर लागायचं असाही त्यांनी निर्धार केला होता. डोळ्यासमोर एकच ध्येय नोकरी मिळवण्याचं.

   पण भारती कुठे, कशी असेल, आपल्याला विसरली असेल काय ती? अनंत प्रश्नविचार त्याच्या मनात रेंगाळत होते.

   कॉलेजचे शिक्षण संपत आले होते. पुढे बँकिंग परीक्षा देऊन आपण यशस्वी होऊ असंच त्याला वाटायचं. भारतीच्या आठवणीही मनातून दूरवर जात होत्या. पूर्वीसारखी आता तिच्यात ओढही उरली नव्हती.

   सुरजला मिळालेला एम.आय.डी.सी.तील जॉब, त्याचा खर्च भागवायला पुरेसा होता. तो तिथे पुढे संगणकीय कामे सांभाळायचा. मध्यंतरी तिथेच त्याने संगणक ज्ञान मिळवून आपले कामाचे स्वरूप बदलविले होते. स्वतः करिता एक मोबाईल फोनही घेतला होता.

   भारतीचा मोबाईल असेल की नाही हे त्यालाही ठाऊक नव्हतं. काही मित्र-मैत्रिणीकडे चौकशी केली पण अँकाडमीमध्ये मोबाईल बंदी असल्याने मोबाईल नसेलच असे त्याला वाटले होते.   

   मधल्या एका महिन्यात पुन्हा तो बागेत जाऊन आला पण भारती कधी तिथे आलीच नव्हती. मात्र त्यांनी त्यावेळी फक्त दिनांक लिहून “तुझ्याच प्रतिक्षेत अजूनही...” एवढे लिहून तो निघून आला होता.

   मध्यंतरी त्याची ओळख सीमाशी झाली. नव्यानेच ती जॉबच्या ठिकाणी कामाला आलेली. भारतीपेक्षाही सुंदर, त्याला तिच्याकडे एकटक बघतच रहावेसे वाटे. तिच्या सौंदर्याने तो मोहित झाला होता. तिला बघून भारतीची आठवण व्हायची. मात्र भारतीने त्याला टाळले याची खंत त्याला जाणवायची. सुरजचं मन आता भारतीसारखंच बदलू लागलं होतं.

   कॉलेजचं शिक्षण संपलं होतं. चार महिने पुन्हा उलटले. सूरजने बँकिंगची परीक्षा दिली. त्याचा रिझल्ट आलेला. या महिन्यात त्याला जॉब मिळणार म्हणून सर्वोच्च आनंद झाला होता.

   त्याने कामाच्या ठिकाणी पेढे दिले. सीमालाही पेढा दिला तेव्हा तो सीमाकडे एकटक बघतच राहिला. त्याचं मन नोकरी मिळाल्याने आनंदीत झालं होतं. आपण आता स्वतःहून एकदा आरतीला तिच्या अँकाडमीत जाऊन भेटूया किंवा गावला जाऊन भेटू. तिला कारणे विचारू. असेही त्याच्या मनात होते.

   मोबाईलवर रिंगटोन वाजू लागली. नवीन नंबरने कॉल येत होता. सुरजने फोन उचलला.

   “हॅलो..”

   “सुरज मी भारती...” ती हिरमुसून रडतच म्हणाली.

   सुरजचं मन तिचा आवाज ऐकून सुन्न झालं होतं.

   “भारती... अगं किती वाट बघतो तुझी. कितीदा तुला भेटायला आलो पण...” त्याच्या डोळ्यात पाणी आलं.  

   “हो रे माझ्या राजा! तुझीच भारती आहे मी.” तिचेही डोळे पाणावलेले.

   “कुठे आहेस गं?”

   “तुझ्याच पत्त्यावर... फ्लॅट नंबर ११५. रूमसमोर झाडाखाली.”

   “खरंच! होय, माझ्या राजा.”

   “पण तू कुठे जॉबवर कामात आहेस का रे?”

   “अगं, मी इथे एम.आय.डी.सी. ला आहे. अगं, आजचं कळलेली आनंदाची बातमी सांगू काय तुला?”

   “हो रे! तुझ्या आनंदाची बातमी प्रत्यक्षात भेटून बोलून तर दे! अगोदर तू भेटायला येतोस की मी येऊ तिकडे.”

   “अगं थांब, मी अर्ध्या तासात पोहोचतो तिथे.”

   “ये... मी वाट बघतोय.”

   सुरज कामावरून सुट्टी मिळवत भारतीच्या ओढीने तो रुमकडे घाईत निघाला.

   भारती त्याच्या रूमसमोर झाडाच्या सावलीत बाकावर बसून वाट बघत होती.

   सुरज सायकलने धापा टाकत घाईघाईत पोहचला. ती त्याच्या आनंदी चेहऱ्याला निरखत होती. तो तिच्याकडे एकटक बघतच राहिला. पावले समोर हळूहळू पडणारी.

   सुरजचे प्रेमपूर्ण स्वागत करायला भारतीने आज पळसाची फांदी फुलासहित आणली होती. सुरज भारती जवळ येत तिच्या सौंदर्याकडे एकटक बघत राहिला. भारतीने हात मोकळे करीत त्याला कवेत येण्यास्तव नजरेनेच खुणावले होते. सुरज पाणावलेल्या डोळ्याने आलिंगन देत तिच्या कुशीत गेला.

   दोघेही कितीतरी दिवसाच्या विरहानंतर एकमेकांना भेटली होती. सुरज तिच्याशी काहीएक न बोलता तिला निरखत होता. भारतीच्या अंगावरील पोलीस वर्दी बघून त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागले होते.

   “मी तुझीच आहे रे राजा!” भारती आतुरतेने म्हणाली.

   भारतीने त्याचे संपूर्ण पत्र त्याच्यासमोर ठेवले होते.

   “अरे वेड्या, बँकेत सिलेक्शन झालं ना! तू पेढा नाही भरवणार तुझ्या राणीला.”

   सुरज तिच्याकडे विस्मयकारक नजरेने बघत राहिला.

   “तुला गं कस ठाऊक?”

   “वेड्या, मला सारं ठाऊक आहे.” ती स्मित हसत म्हणाली.

   “अरे वेड्या, तू नेहमी बागेत यायचास, माझ्यात तू इतका गुंतलास की मला वाटायचं तू तुझं ध्येय पूर्ण करणार की नाही. मी तुझ्यात गुंतत चालल्याने माझंही ध्येय पूर्ण होणार की नाही ही शंकाच यायची. तेव्हाच मी ठरवलं. तुला भेटायला बागेत जायचं नाही. तू मला विसरशील पण तू विसरत नव्हतास. पुढे मात्र तू हळूहळू विरह सहन करून माझ्या आठवणी दूर सारत आपल्या ध्येयाकडे वळलास. मला खूप आनंद झाला.”

   “ती सीमा, तिने मला सारंकाही सांगितलं. मी आपलं ध्येय पूर्ण करून या शहरात तीन महिन्यापासून इथल्या ठाण्यात नोकरी करते आहे. तरी पण तुला भेटायला आले नाही कारण माहित आहे? तू यशस्वी होऊन बँकेत लागशील, हे मला ठाऊक होते. कदाचित मी तुला भेटले असते तर तू माझ्यात गुंतून आपले ध्येय पूर्णत्वास नेऊ शकला नसतास. मी तुझ्या अपयशाला कारणीभूत ठरले असते. माझ्या मोहामुळे, प्रेमामुळे तुझं कॅरियरकडे दुर्लक्ष होऊ नये असंच वाटायचं राजा! हं, आता समजलं...”

   “म्हणजे माझ्यावर तुझं परिपूर्ण लक्ष होतं तर! पण ती सीमा...”

   “अरे, ती बघ. इकडे ये सीमा. ही माझी पाठची बहीण, तुझी जणू परीक्षाच बघत होती. तू दुसऱ्या कुठल्या स्त्रीवर मोहित तर नाही ना होणार हेच बघत होती.” ती हसत त्याला म्हणाली.

   “मी तुझ्यापासून बरंच काही लपवून ठेवलं. माफ कर मला. रिअली, लव यू सो मच सुरज.” ती आनंदाने त्याला म्हणाली. रहस्य उलघडल्याने तिघेही एकत्र येऊन खळखळून हसले.

   सुरज आपल्या डोक्याला खाजवत भारतीकडे एकटक बघत राहिला.

   भारतीने त्याला पळसाचं फुल प्रेमभेट म्हणून दिलं.

   “तुला आवडतो ना पळस!” तिच्या भेटीने सुरज भारावून गेला.

   भारतीने खिशातून सॅमसंगचा महागडा मोबाईल काढून त्याच्या खांद्याशी मानेवर हात ठेवत बाजूला सीमाला घेत सेल्फी घेतली.

   सुरजला सारंकाही नवलाचं वाटत होतं.

   “अच्छा तर! सरप्राईज प्रेमप्लॅन होता म्हणायचा...”

   “होय राजा. फक्त तुला मिळविण्यासाठी. तुझं कॅरियर घडविण्यासाठी.”

   “मग मला पण ‘बाय वन, गेट वन फ्री.’ म्हणून सीमा मिळाली समजायचं का?”

   सुरजने सेल्फी होताच तिची गंमत केली.

   भारती स्मीत हसत मधाळ डोळ्यांनी त्याकडे बघत राहिली.

   “देऊ का लठ्ठा तुला!”

   भारती हसतच त्याच्या मागे धावली. सुरज आपल्या खोलीकडे पळाला.

   दोघेही आत गेलेली. दार बंद झालं. विरहाचे निष्पर्ण दिवस आता पळसाच्या फुलाप्रमाणे फुलून आले होते आणि सीमा भारतीताईच्या प्रेमाची महती तिथेच झाडाखाली बसून अनुभवत निरखत राहिली...

 

कथाकार - संजय येरणे.

नागभीड, जिल्हा. चंद्रपूर. ९४०४१२१०९८

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू