पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तीन तिगाडा काम बिगाडा

यादोंकी बरसात..(१७)
सौ.सरोजिनी बागडे

...तीन तिगाडा काम बिगाडा...

एके दिवशी सकाळी सकाळी मायाचा फोन आणि त्या पाठोपाठ रेखाचा msg आणि फोन...आता पुढच्या आठवड्यात भेटायचेच..
भेटू भेटू करत बरीच वर्ष झाली...
आता कुठलेही कारण आणि सबब नको...लगेच तिघींनी done म्हणून अंगठे दाखवले..
स्थळ पुणे ठरले...
मी आणि रेखा पुण्याला मायाच्या घरी गेलो ...दोन दिवस नुसती धमाल मस्ती, पथ्य पाणी खुंटीला टांगून येईल ते खात
सुटलो...तरी प्रकृतीने जराही कुरबुर केली नाही...

भरीस भर म्हणजे मायाचा
मुलगा स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालत होता...आणि मिस्टर? त्यांनी तर चहा बिस्कीट नाश्ताचा रतीबाच लावला होता ..
खाताखाता बोलणे अन् बोलता बोलता खाणे चालूच होते...
अक्षरशः एकेक सेकंद वसूल केला आम्ही...इतके पोटभर बोलून घेतले, चक्क तीस वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळाला.. रात्रीचे दोन अडीच कधी वाजले कळलेही नाही..
परत निघायची कुणाचीही इच्छा होत नव्हती...गाडीत बसल्यावर सुद्धा msg वर बोलणे चालूच होते....ही मजा आम्ही फक्त " तिघींनी " केली होती...

आता हे परत आठवताना मला सहज एक म्हण आठवली...
" तीन तिगाडा, काम बिगाडा "
आपण उगीच या तीन अंकाला बदनाम करून टाकलंय का? तीन जण एकत्र आले की काम होणारच नाही..." Two is company, three is crowd " ..दोघात तिसरा आल्याने असे काय बिघडते ?..

तुम्हाला आठवतंय आपल्या लहानपणी तिघे जण कुठे जाणार असलो की चौथी व्यक्ती म्हणून एक दगड हातात घ्यायचो..का? तर काम नको फिस्कटायला म्हणून....पण इथे दोन दिवस आम्ही तिघीच तर होतो.... आणि आम्ही हातात दगडही घेतला नव्हता.. तरीही रग्गड मजा केली की नाही !!

मी म्हणते, अहो, माणसाला तीन आकड्याचे एवढे वावडे का?

हळूहळू तीन हा अंकच बदनाम होत गेला...

बघायला गेलो तर सर्व शुभ गोष्टी या तीनच आहेत...

निसर्गाने आपले आयुष्य तीन कालचक्रातच विभागले आहे... बालपण, तरुणपण, म्हातारपण..

मानवी शरीराचे मुख्यभाग तीन...डोके/शिर, धड, आणि हातपाय..

माणसाच्या मूलभूत गरजाही तीनच.. अन्न, वस्त्र,आणि निवारा. रोटी, कपडा, और मकान..

आयुष्यभर माणूस धावतो ते सुख, शांति, आणि समाधान मिळण्यासाठी...

उत्तम जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तीन..
उत्तम मानसिक आरोग्य, उत्तम शारीरिक आरोग्य, आणि आर्थिक परिस्थिती...

जन्मानंतर तिसऱ्या महिन्या पासून बाळाला, तीन वेळा , डांग्या खोकला, घटसर्प आणि धनुर्वात ही
त्रिगुणी लस देतात..

कोरोनात आपण तीन डोस घेतल्याचे आठवते का?

आयुर्वेदातील एक उत्तम रसायन असलेले त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा, आणि बेहडा या तीन वनस्पतींपासून बनते..

डॉक्टर पेशंट बरा होण्यासाठी
औषधाचे दिवसातून तीन वेळा तीन डोसच देतात ना?

निसर्गाचे ऋतू तीन..
उन्हाळा , हिवाळा, पावसाळा..( आजकाल सर्व ऋतुंची मनमर्जी चालू आहे तो भाग वेगळा )

वेळ दाखवणाऱ्या घड्याळाला काटे किती? ..तीन

दिवसाच्या वेळा तीन.. मध्यान्ह, तिन्हीसांजा, कातरवेळ.
सकाळ, दुपार, रात्र..

दिवसाचे प्रहर हे आठ असतात पण प्रत्येक प्रहर हा तीन तासांचा एक असा असतो..

माणसात असलेलं गण तीन.
देवगण, मनुष्यगण,राक्षसगण..

सत्व, रज, तम हे माणसात
असलेले त्रिगुण..

लग्नपत्रिका जुळवतांना नाडीदोष बघतात त्यापण तीनच आहेत... आद्य नाडी,अंत्यनाडी, आणि मध्य नाडी...

जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पण माणूस तीन लोकात असतो... अधोलोक - (पाताळ), भूलोक - (मध्यलोक - पृथ्वी), उच्चलोक - (स्वर्गलोक)...

पृथ्वीचे भाग तीन..भू, जल, आकाश..

तप तीन, .. बभुतिका, दैविका, अध्यात्मिका...

महादेवाच्या कपाळावर, पिंडीवर विभुतीच्या तीन रेषा असतात...त्या शिवाच्या तिप्पट शक्ती दर्शवितात....इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, आणि क्रियाशक्ती...
महादेवाला बेल तीन पानांचेच वाहतात...

शंकराचे शस्त्र तीन टोकाचे, त्रिशूळ.. हे सत्व, रज, तम गुणाचे
चिन्ह मानले जाते..

शंकराला तिसरा डोळा होता.
( पण तो कधी उघडू नये, हीच सर्वांची ईच्छा असते)

एवढेच काय शंकर हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने केलेले हरतालिका व्रत सुद्धा भाद्रपद तृतीयेला असते... शुक्ल पक्षातील तिसरा दिवस...

गणपतीला दुर्वा वाहतात ती दुर्वा तीन पातीची असते...

दत्तमुख तीन..ब्रम्हा, विष्णू, महेश..

देवपूजेत एकवेळ फुले नसली तरी चालते, मात्र हळद कुंकू आणि अक्षता वाहतातच ..

ज्ञान, वैराग्य,आणि भक्तीचे प्रतीक असणाऱ्या गंगा, जमुना, सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम प्रयाग येथे आहे...

भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे...दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र,
आणि पूर्वेला बंगालचा उपसागर...

तीन बाजूने वेढलेला जमिनीचा तुकडा म्हणजे द्विपकल्प.

आकाश, धरती,पाताळ हे त्रिखंड आहेत..

एवढेच काय आपल्या देशाचे संरक्षण खाते तीन विभागातच
आहेत...लष्कर(भूदल), नौदल,
वायुदल...थलसेना, जलसेना, वायुसेना...

पूर्वीच्या काळी राजाची सेनाही
घोडदळ, हत्तीदळ, आणि पायदळ या तीन विभागात होती..

" भारत" या तीन अक्षरी देशाचा अभिमान असणारा "तिरंगा" तीन रंगातच आहे...

२३ मार्च हा शहीद दिवस म्हणून गणला जातो ते देशासाठी
बलिदान देणाऱ्या भगतसिंग,
राजगुरू, आणि सुखदेव या त्रयींसाठी...

भारतीय स्वतंत्रता संघर्षात स्वदेशी आंदोलनाचे समर्थक, वस्तू आयात करण्यावर बहिष्कार करणारे, लाल, बाल, आणि पाल म्हणजे लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक, आणि बिपिनचंद्र
पाल, हे तिघे कट्टर राष्ट्रवादी विचाराचे समर्थक आणि प्रतिक होते...

अहिंसावादी महात्मा गांधींचे
" बुरा मत सूनो, बुरा मत देखो, बुरा
मत बोलो" या सूत्राचे प्रतिक तीन माकडे होती...

गणित विषयाची पायाभूत संकल्पनाही काळ,काम, वेग या त्रिसूत्रीवर आधारित आहे..

परीक्षेत पहिल्या तीन मध्ये नंबर येणाऱ्यांना हुशार समजतात..
स्पर्धेत पहिल्या तिघांना बक्षीस देण्यात येते...

खेळण्यात संधी देतात ते पण तीन वेळा..

खेळला सुरुवातही एक, दोन, तीन आणि शिट्टी वाजवून होते...
तीन पायांची शर्यतीतली मजा कुणाकुणाला आठवते?..

एखाद्याची चूक सुद्धा आपण तीन वेळा माफ करतो...अरे एकदा झाले, दोनदा झाले, तीनदा झाले,
अजून किती वेळा समजून घ्यायचे असे आपण म्हणतो ना?

तीन दगडांच्या चुलीवर शिजवलेले अन्न रुचकर लागायचे
आणि पचायचे ना? हो हे मात्र नक्की की तीन भाकरी, तीन पोळ्या केल्या तर एक छोटी चानकी तरी करायचे, नाहीतर
एकीचा छोटा तुकडा तोडायचे जेणेकरून ते पूर्ण तीन होणार नाही..(त्याचे कारण श्रद्धा की अंधश्रद्धा माहीत नाही)

ज्या घरात आई वडील आणि एक मूल असते त्यांची काय रोज भांडणेच होतात का, एकही चांगलं काम होत नाही का ? की ते एक दगड घरात आणून ठेवतात...नाही ना?

देवानंदचा तीन देवीया, शम्मीचा तिसरी मंजिल, आमिरचा थ्री इडियट....यांनी किती धोधो बिझनेस केला होता...माधुरी चमकली ते तिच्या एक दोन तीन..
या गाण्यामुळे...

वंदनीय व्यक्तींना आपण नेहमी
मनापासून "त्रिवार अभिवादन" आणि " त्रिवार वंदन " करतो...

तुम्हालाही हे "तीन पुराण" आवडले असल्यास तीन वेळा लाईक करा...

सौ.सरोजिनी बागडे.
डोंबिवली..
दि...२०.०४.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू