पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रमास्त्र

"रमास्त्र" प्रकाशनपूर्वी अनमोल प्रतिक्रिया....

दुर्दैवी, दुर्लक्षित, अनु्ल्लेखित ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर कादंबरी लिहिणे ही सामान्य गोष्ट नसते. तुकड्या तुकड्यांनी सापडणारे उल्लेख, दंतकथा जोडून एक सलग पट तयार करणे हे फार मोठे आव्हान असते. 
माझे मित्र साहित्यिक संजय येरणे यांना अशी आव्हाने स्वीकारण्याची सवय आहे. किंबहुना हा त्यांचा छंद आहे. तुकाराम महाराजांचे टाळकरी आणि सहकारी संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनावरील ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ ही कादंबरी असो किंवा संताजींची पत्नी यमुना हिच्या जीवनाचा वेध घेणारी ‘यमुना’ ही कादंबरी असो अशा कादंबऱ्या लिहिण्यात ते यशस्वी झाले आहेत.
    त्या विस्तृत कादंबऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसणारी ‘रमास्त्र’ ही ताई तेलीण उर्फ रमाबाई या वीरांगनेच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. 
   संजय येरणे हे तसे सिद्धहस्त लेखक आहेत. दोन डझनाहूनही अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. मात्र त्यांच्या प्रतिभेचा कस पाहाणाऱ्या वरील तीन ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबऱ्या आहेत. महाराष्ट्राला आणि मराठी मुलखाला अपरिचित असणारी ही तीन रत्ने त्यांनी प्रकाशात आणली आहेत.
   इतिहासाने फारशी दखल न घेतलेल्या या वीरांगनेवर कादंबरी लिहिणे ही सामान्य गोष्ट नव्हे. अत्यल्प साधनांच्या आधारे संजय येरणे यांनी या व्यक्तिमत्त्वाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत. दिव्यदृष्टीची दूरदर्शिका वापरून या चमकणाऱ्या चांदण्या पाहाव्या लागतात. अनेक ठिकाणी कल्पिताचा आधार घेऊन सांधेजोड करावी लागते. कादंबरीकाराला काही अंशी हे स्वातंत्र्य असले तरीही इतिहासाचा विपर्यास होणार नाही याचे भान ठेवूनच हे स्वातंत्र्य उपभोगता येते.
    येरणे यांनी हे भान जपले आहे ही गोष्ट कादंबरी वाचताना जाणवत राहते. अनेक काल्पनिक पात्रे, अनेक घटनाप्रसंग कथानक पुढे नेण्यासाठी आणि त्यात जीवंतपणा ओतण्यासाठी कादंबरीकाराला रंगवावेच लागतात आणि यासाठी केवळ प्रतिभा असून भागत नाही, तर परकाया प्रवेशाचे तंत्रही कादंबरीकाराजवळ असावे लागते आणि ते तंत्र येरणेजवळ आहे हे ठामपणे जाणवत राहते.
   इतिहास हा नेहमी जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो. रामरावण युद्ध रावण जिंकला असता तर रावणायण लिहीले गेले असते. असले नसलेले अनेक गुण रावणाला चिकटवले गेले असते. याच न्यायाने शुद्रांचा, दलितांचा, स्त्रियांचा, पराभूतांचा इतिहास लिहिण्याचे श्रम कोणीच घेत नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तिमत्त्वांवर लिहिण्याचे धाडस फारसे कोणी करत नाही. ज्यांचा उल्लेख चार दोन ओळींमध्ये संदर्भा पुरेसा येतो अशा तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर येरणे यांनी कादंबऱ्या लिहायचे धाडस केले आणि त्यात यशस्वीही झाले यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. अज्ञात गोष्टीबद्दल ज्ञान मिळविण्याची उत्सुकता हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे येरणेंसारखेच वेगळ्या वाटेचे त्यांच्या जातकुळीचे वाचक या कादंबऱ्यांकडे आकृष्ट होतील याचा मला विश्वास आहे. येरणेच्या या साधनेला शुभेच्छा देऊन निरोप घेतो.
 
अरुण ग. इंगवले.
(आबुट घेऱ्यातील सूर्य 
या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे 
कवी इतिहासाचे जाणकार भाष्यकार,)
चिपळूण, जि. रत्नागिरी.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू