पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सारे आले धावून...

यादोंकी बरसात (१८)
सौ.सरोजिनी बागडे

.....सारे आले धावून,
आनंदात निघाले न्हाऊन...

मे-जून महिना म्हणजे पावसाळी वातावरण...कधी हलकासा तर कधी धोधो पडणारा पाऊस.. पहिल्या पावसात धरणीमाता न्हाऊन निघते, मातीचा एक उत्तेजीत आणि उल्हसित करणारा वास येतो...

आमची दीड दिवसाची खंडाळा ट्रीप काहीशी अशीच झाली. मैत्रीचा सुगंध घेऊन आली.
कलेचे ढग जमा झाले...आणि एकेकाची कला बरसू लागली... प्रत्येकाचा रंग वेगळा, ढंग वेगळा, वयाचा वर्ग वेगळा... साठ,पासठ, सत्तर, ऐंशी, तर कुणी त्याही पलीकडचे...

लेखक,कवी,नकलाकार, साहित्यिक, आणि त्या सोबत कार्यक्रम आखण्याचा , नियोजन करण्याचा, उत्साह असलेले ..

सर्व ज्येष्ठ नागरिक होते.... त्यामुळे पथ्य पाणी असले तरी खातांना काही पदार्थांचे
"temptation" होत होते....
खाऊ की नको अशा द्विधा मनःस्थितीत घाबरत घाबरत खात होते...
मैत्रिणी एकमेकींना सांगत होतो अग खा ग आजच्या दिवस.. काहीनाही होणार...आणि हळूच एकेक पदार्थ खात गेलो..जाऊदे आजच्या दिवस खाऊन घेते म्हणत उगीच आपला स्वतःला दिलासा देत होतो...

आणि मला सहज एक कल्पना सुचली...की आमची ही कुजबुज ऐकून....

पदार्थाना बोलता आले असते तर ते काय म्हणाले असते..

साठीतल्या काठीने थरथरत तिचे काय मत मांडले असते...

आजारांनी काय आधार दिला असता..

आणि औषधांनी काय तंबी दिली असती.

चला तर ऐकुया त्यांचेही स्वतःचे स्वतः बद्दलचे मत...

साठीची हातातली काठी म्हणाली..."अरे किती दिवस मला धरून ठेवले आहे...एक दिवस तरी सोड ना मला...मला पण कधीतरी निवांत कोपऱ्यात उभी राहून सर्वांना बघावेसे वाटते...आज तुला तुझे मित्र/मैत्रिणी आहेत ना!..एक दिवस मी सोबत नसले म्हणून काय झाले...त्यांच्या सोबतीने तू चालूच काय, नाचूही शकतेस ना !!.. तरुणपणात मी कधी आठवली नाही ग तुम्हाला!! ...
आठवली ते फक्त मैत्रिणी/मित्रां सोबत चिंचा बोर पाडताना/ झाडांना झोडपताना...
आज आहेतकी तुझे मित्र मैत्रिणी आधार द्यायला...मग धरकी त्यांचा हात...आणि मलाही मोकळा श्वास घेऊ दे...मला दुकानातून विकत घेतल्या पासून तू माझ्या मदती शिवाय एक पाऊल टाकायला तयार नाही... जणू काही गुलाम झालोत आपण एकमेकींच्या..तू झोपलीस की तेवढा वेळ मला आराम मिळतो...सारखं तुझ्या मुठीत राहून मला गुदमरायला होत ग!!..हो पण मला सोडून नाचताना एक भान ठेव हं ! घरी गेल्यावर ऑर्थोपेडिक डॉक्टरची गरज लागणार नाही याची...

बीपी ची गोळी म्हणाली... आता आज एक दिवस मला विसर...आणि मित्र परिवारात काय खायचे ते खा...तू टेन्शन घेऊ नकोस...लोणचं, पापड, खारट, तेलकट खाल्ले तरी मी काय वाढणार नाही.
आणि तुम्ही पण खाल्ल्या मिठाला जागायला शिका जरा.....
तू मला आठवणीने रोज खातेस...त्याला मी जागते...वाढत नाही ...तुला त्रास देत नाही...तसेच तुम्हीपण कुणाला त्रास देऊ नका.

शुगर म्हणाली.."काय ते गोड खायला घाबरता हो तुम्ही.. एवढा गोड आंब्याचा रस...पण एकेक चमचा खाताय...कशाला आनंद घालवताय रसाचा...ओरपा की चांगला....मी इतकीही काही कडू स्वभावाची नाही बरं... तुम्ही एखाद दिवस खाण्याची मर्यादा सोडली म्हणून मी लगेच माझा पारा वर चढवेल आणि तुम्हाला डॉक्टरांची पायरी चढायची वेळ आणेल...


"अरे दोस्तोमे कभी कभी सब छोड देनेका...मस्तीमे रहनेका.. कुच्छ नही होता... आप कितना भी खाओ... मैं कंट्रोलमेही रहूंगी.. ये आजके दिनका वादा है मेरा..मैं मर्यादा छोडके आपको नही सताऊंगी....लेकीन याद रहे मैं एक दिन की परमिशन देती हू!.
ऐसेही खाते रहोगे तो मैं मेरी गॅरंटी नही दे सकती. पहलेही बोल देती हु....मतलब अपनी तबीयतकी औकातमे खानेका"...

अरे तुम्ही मनुष्य प्राणी गोडगोड बोलून मित्राचा सुद्धा गळा कापायला मागे पुढे बघत नाहीत..
त्याच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करत नाही..आणि मी मात्र
फक्त गोड लागायचं. जिभेचे
चोचले पुरवायचे... तुमच्या प्रकृतीवर परिणाम नाही करायचा..
हा कोणता न्याय?.. स्वतःचा स्वतःच्या जिभेवर ताबा नाही, मन काबूत ठेवत नाही, स्वतःचं टेंशन वाढवून घेता, व्यायाम नको, हालचाल नको.. असच चालू राहील तर मी नाही थांबणार हं !..मग मी पण वाढत जाण्याचा माझा पिंड सोडणार नाही....स्वतः पातळी सोडून खाणार..आणि मी मात्र पातळी सोडायची नाही, ही कसली तुमची अपेक्षा..

तुम्ही " साखरेचं खाणार त्याला देव देणार" ही म्हण लक्षात ठेवता... पण.. " अति खाणार त्याला देवच नेणार " हे नाही आठवत तुम्हाला..

१००% मार्क मिळाले तर सगळ्यांना पेढे वाटत सुटतात. पार्ट्या करतात...पण मी १५०/२०० टक्के मिळवले तर मग माझ्यावर बहिष्कार टाकणार...
तेव्हा पण आनंदाने नाचा की..
आणि ओरडुन सांगा माझ्या रक्तात २०० लेव्हल साखर मिळाली म्हणून..
मुलांना मार्क मिळण्यात तुमचा हात असतो, तसेच मला जास्त लेव्हलवर नेऊन ठेवण्यात तुमचाच हात असतो..मग माझे percentage सांगायला का लाज वाटते...

दात म्हणाले..अरे मला किती बदनाम करणार?...माझी निगा ठेवली असती तर आज तुला चिक्की कुडुम कुडुम खाता आली असती....चिक्कीला मग जोर चढला...मला खाऊन तर बघ...मी फक्त कडकं नाहीये...तुम्ही जसे वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात ना, कडक मऊ, मृदू
तसे आमच्यात कडक, मऊ, चिक्की आहेत...त्याचा स्वाद घ्या.. तरुणपणात सुपारी, चिंचोके, आक्रोड खात होतेच ना तुम्ही... आज थोडी कडक काय लागली मी तर लगेच नको म्हणतात... जवानीत खोटं खोटं हसून दात दाखवतात...मग कवळी बसल्यावर हसायला का लाजतात?.....
काजू कतली कितीही मऊ असली ना, तरी तिला माझी सर नाही हं.. चिक्की ती चिक्की...
जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही
जाहो, लोणावळा म्हंटले की फक्त मी आणि मीच आठवते...

इडली म्हणाली "अहो मी पण आहे की तुमच्या दिमतीला...
चावता येत नसले तरी गिळता येतंय ना? मग ? काय प्रोब्लेम आहे?...मेदू वडा दिसलाकी मला विसरतात, नाहीतर त्याच्या सोबत खातात...आधीच मी मऊ, नरम, त्यात सांबार गरम...म्हणजे उलट
माझा तर काहीच त्रास नाही"...

दह्यातील काकडी, टोमॅटो, कांदा, त्यांना टाळण्याचा प्रश्नच येत नाही...त्यामुळे ते गप्पच होते..

दहीवडे म्हणाले आता मी तेलकट, आंबट म्हणून माझ्या कडे दुर्लक्ष करू नका.. आम्ही थंड दह्यात आकंठ बुडालेले असतो... त्याची चव तर घ्या.. मी आधी तेलात होरपळलो.. मग पाण्यातून काढून आचाऱ्याने हाताने माझा कुरकुरीतपणा जाई पर्यंत दाबले, नरम केले.. तरी मी स्वतः ला गोड आंबट दह्यात झोकून दिले...कुणा साठी? तुमच्यासाठीच ना?

भेंडीची भाजी..lady finger म्हणाली, जरा माझ्याकडे पण बघा..तिच्या समाधानासाठी सर्वांनी बोटे (फिंगर) चाटून पुसून चवदार भाजी खाल्ली...

उपमा या पदार्थाला कशाची उपमा द्यावी...त्याला ना कशाची उपमा देता येत, ना कशाशी तुलना
करता येत...हा एवढे मात्र म्हणता येईल की मूळ घटक रवा असतो...
तिखट, मीठ, मिरची घातली की उपमा नाहीतर सांजा तयार होतो..त्याला शेव टाकून सजवतात..
आणि तुपात खरपूस भाजून, दूध साखर घातली की गोड शिरा...त्याला काजू, बदाम, चारोळी, वगैरे घालून सजवतात..
दोन्ही तेवढेच आवडीने, चवीचवीने खाल्ले जातात...

ताक आणि आसट खिचडीची तर लज्जत न्यारी...दात असो की तोंडाचे बोळके झालेले असो सर्वजण चवीने खाणार...

साग्रसंगीत भोजन झाल्यावर
खिचडी कडे दुर्लक्ष करणे म्हणजे बेइमानी केल्या सारखे आहे... आजारपणात तीच तर बिचारी आपल्या पोटाची खळगी भरायला धाऊन येते...

काही खावेसे वाटत नाही तेव्हा ताकच तर तहान भागवते...

ताकाची पण तक्रार चालू होती.. माणसाला स्वतःला दूध फुंकून पिता येत नाही, आणि नाव माझे बदनाम करतात..काय तर, म्हणे दुधाने तोंड भाजले की ताक फुंकून प्यावे...चुकी तुमची...आणि मला का उगीच मध्ये घेता? तुमच्या म्हणी पूर्ण होण्यासाठी माझा का उपयोग करता? ....मी कधी जीभ भाजण्या इतकं गरम असते का?
मोठेपणा दाखवायला माझे ताकाचे
मूळ स्वरूप बदलून तुम्ही लोक मठ्ठा बनवतात..जाऊदे..कितीही खर बोललं तरी मी शेवटी आंबटच.. ताकाला जाताना भांड लपवणारी ही माणसाची जात !..

चहा कॉफीला तक्रार करायची, मोठेपणा सांगायची बहुतेक गरज वाटली नसावी...
त्यांना पक्क माहीत आहे, सर्वांना आपली तलप असते म्हणून...
डोकं तापलेले असेल तर ते थंड करायची गरज माणसाला असते.
पण प्यायला चहा मात्र गरमच लागतो....
ग्रीन,ब्लॅक, कोरी, दुधाची, स्ट्राँग,माईल्ड कोणतेही रूप असुदे, तल्लफ आली की आपल्या शिवाय राहवत नाही यांना..

कोल्ड कॉफी हे चोचले आहेत.. हाय फाय संस्कृतीचे...

कलिंगड आपले जागेवर बसून होते....त्याला खात्री होतीच, की हे लोक जातायेत कुठे??...बाहेर मरणाचे ऊन...आत उकाडा... आपला लाल लाल पाणीदार कलर बघून तोंडाला पाणी सुटणार, आणि स्वतःच आपल्याकडे येणार...

सगळ्या पदार्थांचा मान ठेवल्यावर बटाटा आणि खेकडा कांदा भजी काय आम्हाला माफ करणार होते?...पाऊस आणि भजी यांची अलिखित मैत्री आहे..
त्यांचे तर ठरलेलेच असते...मी आलो की तुझी वर्णी लागणारच म्हणून...ते ताटलीत पडून आमची गंमत बघत होते. आम्ही किती वेळ स्वतःवर संयम ठेवू शकतो त्याची मजा बघत होते..शेवटी नाही म्हणता म्हणता एकदोन बटाटा भजी, आणि कांदा भजी उचलली..
भजी खुश!...आम्ही पण खुश!.

वांग्याची भाजी आणि भाकरी
चुपचाप होते...
वांग मात्र मनातल्या मनात म्हणत होत माणसाला वांग खाल्ले की अंगाला खाज येते, घश्यात खवखवते ..
पण स्वतःला "कुरापती काढायची खाज" असते ते मात्र माणूस सोईस्कररित्या विसरतो...

वांग खाल्ले तरच भाकरीची आठवण येणार होती...त्यामुळे ती बिचारी टोपलीत पडून होती...वांग घेतलं की मी आहेच सोबतीला...
मला वेगळं काही बोलायची गरज नाही..

मसाले भाताला अभिमान होता की मी नाही म्हणजे, ताटाला शोभा नाही...कुठलाही कार्यक्रम असुदे, बारस असो, बाराव असो नाहीतर लग्न असो...आपली शान काही कमी होणार नाही हे नक्की..

बोटभर ऊंचीची पोषक वेलची केळी, धावून आली भुकेच्या वेळी...त्यामुळे ट्रॅफिक जॅम मध्ये लांबलेला प्रवास सुखकर झाला...

एवढे सगळे खाल्ले पण गाडीत खाल्लेली चकली आम्हाला वाकुल्या दाखवत होती... ताटभर जेवलात पण गाडीत एकेक चकली हातात घेऊन खाल्ल्या शिवाय तुमची ट्रीप पूर्ण झाली नाही ना?
दिवाळी दसरा काय, आता तर परदेशी ट्रीप मध्ये पण आम्हाला घेऊन जातात लोक...

पौष्टिक लाडू डब्यातून बाहेर घरंगळत पडू पाहत होते...अरे एवढे चटर फटर खाता, त्याने काय होणार?...या वयात अशा लांबलांबच्या ट्रीप करायला, माझ्या शिवाय ताकद येणार का तुम्हाला?

बिचारे शंकरपाळे...आपला नंबर कधी लागतो याची वाट पाहत शेवटी परत बॅगेत जाऊन बसले....
बिस्किटे चहा बरोबर खाल्ली गेली,
पण शंकरपाळी नंतर कुणाच्या पोटात केव्हा गेली काय माहित...

त्यातल्या त्यात बेसन लाडूने हुश्श केले...चला पूर्ण नाही पण आपला एकेक घास तर सत्कारणी लागला...केकने पण थोडक्यात समाधान मानले...

आवळा सुपारीचे कौतुक ते काय करावे..
छोट्याशा प्लास्टिकच्या पिशवीत गप्प बसून गंमत बघत होती .. खा खा अजून खा...सर्वांना पहिला मान देत कितीही खा...पण ते सर्व पचवायला शेवटी
माझ्याकडेच यावे लागेल...

सारांश काय तर प्रत्येकाची जागा, आणि किंमत ही वेगवेगळी असते...जो तो आपल्या जागी मूल्यवान असतो...वस्तू असो पदार्थ असो, नाहीतर माणूस...

आमची ही ट्रीप खूप आनंदात पार पडली...निरनिराळ्या ठिकाणाहून आलेले, काहीजण पूर्वी कधीही भेटलेले नसले तरी खूप जुने मित्रमैत्रिणी असल्या सारखे वागत होते...वाटत होते...

परत असेच गेट टुगेदर करायचे ठरवून सगळे परतीच्या प्रवासाला लागले ...

कायम लक्षात राहणारा, "पावसा आधीचा" पण "मैत्रीचा पाऊस" पाडून गेलेला असा हा
"स्नेहमिलन सोहळा"...

सौ.सरोजिनी बागडे.
डोंबिवली.
दि..०३.०६.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू