पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पुन्हा एकदा

प्रेमकथा."""

           पुन्हा एकदा


"अनुरागाचे थेंब झेलती प्रीत लतेची पाने , तुझ्या नि माझ्या भेटी मधुनी फुलती धुंद तराने..... मंतरला  हा कुंज लाजरा. महिवरला सुम-भार हासरा....."

    हिरा गात होती, तिच्या  डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. तिच्या गोड आवाजाच्या तरंगलहरी घरभर पसरत होत्या. गाण्याचा रियाज संपवून तिने डोळे उघडले तेव्हा  छोटा मनू  एकटक तिच्याकडे बघत बसला होता. हिराने  त्याच्याकडे बघितलं तेव्हा तो उठून उभा राहिला.

    "गाणं म्हणताना कोणी रडतं का मम्मा,? तुला पप्पांची आठवण आली का?"

    तिच्या गालावरून ओघळणारे अश्रू त्यांने हाताने पुसून टाकले. तिने त्याचा गालगुच्चा घेत त्याला कडेवर उचलून घेतलं.

    "चला आता ब्रश करून घ्या , मग पोहे खायचे,

    "नंतर...?

    "चित्र काढायचं..."

   " नंतर....."

   " खाली झोपाळ्यावर खेळायला जायचं."

    "नंतर...."

    "पुरे झाले आता, पटापटा ब्रश करा, अंघोळ आटपा, मग आबांसोबत मंदिरात जाऊन या.."

   " बरं...."

    दोघेही खळाळून हसले. मनूची ही स्टाईल थेट अगदी अनयसारखी होती. जणू छोटा अनय बोलतो आहे असं वाटायचं. आबा आणि सुमाताई मायलेकाचा संवाद हॉलमध्ये बसून ऐकत होते. हिरा आणि मनन दुधाचा कप घेऊन हॉलमध्ये येताना दिसले. तेव्हा सुमाताईनी हळूच आपले डोळे टिपले.

    "आज आजी कडून दूध पिणार की आबांकडून? "

    "नाही आज मी एकटाच पिणार. मी मोठा होणार आता.."

   " असं वा! वा!...."

   म्हणतच आबा मनुच्या शेजारी येऊन बसले. दुधाचा कप एका हाताने सांभाळत मनूने त्यांना प्रश्न केला.

  "आबा  मग आज कुठे घेऊन जाणार फिरायला"?

  "आजपासून आजोबा चित्रकलेच्या क्लासला घेऊन जाणार. तिथे तुला एक दिदी चित्र काढायला शिकवणार."


" चला मग लवकर, लवकर जाऊ", म्हणत  कप तोंडाला लावून त्याने घटाघट दूध पिऊन टाकलं..


"आता आणि हा कुठला  चित्रकलेचा क्लास‌ शोधुन‌ काढला तुम्ही? सुमाताईनी वैतागतच विचारलं


" त्याशिवाय सुटी कशी संपेल त्याची ?माझाही त्याला ने आण करण्यात तेवढाच छान वेळ जाईल."


"आबा किती लांब आहे,कोण‌ शिकवणार ?"


"हिरा बाळ,अगं तो,.....अनयचा मित्र,सुजय... तूला मागे एकदा बोललो होतो बघ"


आबानी पुढचं बोललेल तिने काही ऐकलच नाही. सुजयच्या नावाचा उल्लेख ऐकूनच ती भूतकाळात जाऊन पोहचली.


       आर्टिलरी सेंटर मधल्या त्या  कॉर्टर्स मध्ये ती नुकतीच राहायला आली होती. बाबांची आत्ताच तर तिथे बदली झाली होती. सरकारी क्वार्टर्स मधला सगळ्यात सुंदर बंगला म्हणजे तिचं घर होतं. घरापासून चालत  जाण्या इतपतच तिचं कॉलेज होतं तिथेचं आवारात.

       खरंतर तिला कॉलेजातली काही माहिती नव्हती. कोणी मैत्रिणी नाहीत. बाबांच्या सतत होणाऱ्या बदलीमुळे एका गावाशी त्यांनी कधी बांधून  घेतले नव्हतं. प्रत्येक वेळी नवा गडी नवा राज्य. आता इथे तर सगळं नवीन होतं. शहर, क्वार्टर्स, कॉलेज आणि आज पहिलाच दिवस होता.

       हिरा वर्गातल्या एका रिकाम्या बेंचवर जाऊन बसली. हळूहळू वर्ग पूर्ण भरला. प्राध्यापकांचा आणि विद्यार्थ्यांचा परिचय झाला. सरांनी शिकवायला सुरुवात केली. तेवढ्यात धडपडत एक तरुण वर्गा बाहेर येऊन उभा राहिला. आणि जोराने ओरडला.

       "मे आय कमिंग सर,?

      " एस एस लेट कमर,"सर त्यांचा चष्मा सावरत बोलले.

      त्या तरुणाने सगळ्या  वर्गात नजर फिरवली. फक्त हिराच्या बेंचवर तेवढी जागा शिल्लक असल्याने तो तिच्या शेजारी येऊन बसला. मरून रंगाचा टी शर्ट, आकाशी रंगाची जीन्स. मध्यम शरीरयष्टी, मध्यम उंची, उजळ रंग, अत्याधुनिक केशभूषा, पाठीवर भली मोठी सॅक, असा त्याचा अवतार होता.

      जेव्हा वर्गात सरांनी नोट्स काढायला सांगितल्या. तेव्हा त्याची प्रचंड गडबड उडाली. त्यावरून तो गबाळा असला पाहिजे असा अंदाज हिराने लावला.

      वर्गातून निघता निघता सरानी

     " धिस इज युअर फिक्स पार्टनर फाॅर वन वीक"

असं वाक्य वर्गावर फेकल आणि ते निघून गेले."


" ओ...हो नो..नो..यार शिट्....    बसा इथेच आता" 


असं म्हणत असताना हिराने पहिल्यांच त्याच्याकडे बघितलं.दोघाचीही नजरानजर झाली. ते एकमेकात गुंतून गेले.त्याचे डोळे अत्यंत ‌तेजस्वी होते.त्यात भूरकट, निळसर झाक असल्याने ते आणखीनच बोलके वाटत होते. दोघांचीही नजर एकमेकांवरून हटायला तयारच नाही. त्यालाही हिराच्या पाणीदार, काळ्याशार डोळ्यात आपण बुडतो की काय असा भास व्हायला लागला. गोरा पान रंग, काळेभोर केस, किंचित उभट चेहरा, अगदी  सरळ, छोटस  नाक,तो बघतच बसला.

दुसऱ्या तासाची बेल वाजली तेव्हा दोघही भानावर आले. हिराला कसंतरीच वाटलं.त्याने आपल्या शेजारी बसावं लागेल म्हणून नो,नो म्हटलं, शिट् म्हटलं ,तरी आपण वेड्यासारखे त्यांच्याकडे बघत बसलो. त्यालाही स्वतःचाच राग आला. नो नो म्हणायच्या आधी शेजारी बघायला हवं होतं ना. सौंदर्याची पुतळी बसली आहे ते.

       उद्या त्यांच्याकडे ढुंकूनही बघायचं नाही असं हिराने  मनाशी ठरवून टाकलं.दुसऱ्या दिवशी ती निलिमा शेजारी जाऊन बसली.निलिमा तिच्या केसांकडे बघतच बोलून गेली.

  "व्वा!केस काय लांबसडक आहेत ग तुझे? मी नीलिमा"

   " थक्यू.. नीलिमा मी हिरा"

 " आधी कुठे होतीस कधी बघितल नाही.?"


 "आताच बदली  झाली माझ्या  बाबाची इकडे"

 त्या दिवसापासून तिची आणि निलिमा ची छान गट्टी जमली.

तसं कॉलेजात छान चालल होत . त्या दिवसानतंर आपल्याकड कुणीतरी सतत बघत असल्याचा हिरा ला भास होत होता . अचानक एके दिवशी पुन्हा सुजय, हिरा एकाच बेंचवर आले. त्याच्या वहीची पाने सांभाळता सांभाळता त्याने तिचीही वही बेंचवरून खाली पाडली उचलतांना दोघाची टक्कर झाली . आधी तिला खूप राग आला . त्याने कान पकडून स्वाॅरी म्हटलं. अजिबात हसायचं नसतानाही तिला खुदकन हसू फुटलंच.


"हसता येतं तर तुला,"


"मग काय तुमच्यासारखं शिट् शिट् म्हणण्यापेक्षा बरं आहे ?"


"ओह, म्हणून एवढ्या रागाने बघायचं का?ते मला नोट्स घ्यायला मुलं बरी पडतात ना! मुलींकडे कसं काय सहकार्य मागणार म्हणून म्हणालो होतो तस."

        तेवढ्यात निलिमाने सगळ्यांना वाढदिवसाच्या ट्रीट साठी  कॅटीनला बोलावले.सगळे टेबल फूल झालेले.ती अवघडून विचार करत  उभीच राहिली


"कॅटीन काका,इकडे अजून एक टेबल लावू का?"


सुजयने त्याच्या परवानगी ची वाट न बघता बाहेरचा टेबल कसातरी अॅडजेस्ट केला.

दोघे परत एका टेबलवर शेजारी शेजारी बसले. वाफाळणारी काॅफी,अंताक्षरीचा खेळ सुरू झाला.सुजयने उस्फुर्त पणे काही ओळी सादर केल्या.

"डोळ्यात सागराचा दिदार आज झाला

पहाताच तिला,कलिजा खलास झाला."

सगळ्यांची त्याची वाहवा करत पुढचा खेळ सुरू केला.

 अंताक्षरीला  रंग चढत चालला होता. शेवटी

दोघांनी 

"जानेमन जानेमन तेरे दो नयन ...."

हे युगलगीत म्हटलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.हिरा नाही नाही म्हणता हृदय हरवून बसली.

      दोघांनाही गाणं गाता येत हे सगळ्यांना समजलं.दिवस सरकत होते.प्रीतीच झाड वाढत होतं.काॅलेजच्या कट्टयावर दोघाच्या निरपेक्ष प्रेमाची चर्चा व्हायला लागली.काॅलेजची वर्ष भराभर संपत होती.

      त्या दिवशी सुजय आलाच नाही.तिच मन लागेना. काय झालं असेल? कुठे गेला असेल.विषषण मनाने ती घरी परतली.त्याच संध्याकाळी  त्याच्या‌ बाईकचा आवाज आला.हिराला वाटलं भास झाला  असेल.लगेचच दारावर टकटक झाली.तिच हृदय जोराने धडधडू लागलं. आईबाबा,आजी सगळे घरातच होते.मिलीटरीच्या कडक शिस्तीत तिचं बालपण गेलं होत.बाबा मिलिटरीत असले तरी सनातनी वळणाचे होते.

      आईने दार उघडलं. सुजय हसतमुखाने उभा होता.

      "हॅलो मॅम मी सुजय,लेप्टनन  दिग्विजय सरांना आमंत्रण द्यायला आलो आहे.आज मिलिटरी हाॅलला आमचा गायनाचा कार्यक्रम आहे.

      एक आकर्षक पत्रिका त्याने आईच्या हातात दिली.

"अरे आत ये बाहेरच उभा आहे."

बाबांनी त्याला बस असं म्हणण्याचीही तसदी घेतली नाही.

 "काय करतोस तू?"

"मिलिटरी काॅलेजात एमबीए"

"हू...."

असं म्हणतच बाबानी माझ्याकडे बघितलं

"आमच्या कन्येला ओळखत असालच"?

"येस सर,हिरा...?"

सुजयच्या आवाजात हर्ष त्याला लपवता आला नाही. बाबांच्या बोलण्यात खोच जाणवत होती.  ते त्याला पूर्ण बोलूही देत नव्हते.

  त्यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं.अंदाज येत नव्हता.पण आमच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण त्यांना लागली असावी.काॅलेजातल शिक्षण संपता सपता

   ती  नकळतच सुजयमध्ये अडकत गेली.त्याच्यासोबतीने सहली, फिरणे,काॅलेजचे प्राॅजेक्ट अन अजून बरंच काही.त्यांनी मर्यादा कधीच ओलांडली नाही.पण एकमेकांचा सहवास मात्र त्यांना हवाहवासा वाटायचा.

   त्या दिवशी त्याच्या कार्यक्रमाला हिरा निलिमासोबत  लवकरच जाणार होती. तिचे आईबाबा नंतर येतील असा तिचा अंदाज होता.पण तो‌ चुकला होता.बाबानी तिला‌ त्याच्या जवळ बसवून घेतलं.

   

  "हिरा तू कितपत अडकली आहेस त्या सुजयमध्ये,"

  अचानक केलेल्या प्रश्नामुळे हिरा भांबावली.

  "बाबा मी ते तुम्हाला सांगणारच होते...."तिचं वाक्य मधेच तोडत ते पुढे म्हणाले.

  "उद्या एउरफोर्स कमांडर अनय आणि त्याचे आईवडील येणार आहेत‌ आपल्याकडे तुला बघण्यासाठी...."


"बाबा....मी..म..मला सुजय आवडतो खूप...."


तिच्या डोळ्यातून अश्रू आओघळत होते.


"आई,तू सांग ना बाबांना"....


"हिरा अगं उद्या तु मुलगा तर बघून घे,मग ठरवू ना आपण,'

"सुजयच्या इव्हेंटच काय?मी शब्द दिलाय त्याला.."


"मी अनयच्या बाबाला,माझ्या मित्राला शब्द दिलाय त्याच काय?"

" बाबा,बाजारात जाताना  सुध्दा तुम्ही माझं मत विचारात घेतात ,कुठली भाजी खायची हे सुध्दा विचारतात आणि  माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तुम्ही एकट्याने घेतलात".

हा धक्का  तिला सहन होत नव्हता.सुजयशी भावी जोडीदार म्हणून तिने स्वप्न बघितली होती. बाबांवर ही तिचं नितांत प्रेम होतं.

त्यांनीही तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं.

हिरा रात्रभर अंथरणावर तळमळत होती. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. आणि आईच्या आवाजाने ती दचकून उठली.

"हिरा, अग उठ बाबा कसंतरीच करता आहेत"

बाबांच्या छातीतील तीव्र वेदना आणि  लक्षणांमुळे ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवावं लागलं.. या मिलिटरी हॉस्पिटल मध्ये अनयचे बाबा प्रमुख होते.

        " हिरा आणि वहिनी ऐका दिग्विजय चे ब्लॉकेजेस बरेच वाढलेले आहेत. आपल्याला बायपास सर्जरीचा निर्णय घ्यावा लागेल"


"अहो पण हे सगळं असं अचानक कसं काय"?


"आई आई तू काळजी नको करू डॉक्टर काका आहेत ना आपल्या सोबत"

"हो नक्कीच, मी सगळी व्यवस्था करतो तुम्ही फक्त शांत रहा ,धीर धरा."

  या सगळ्या दवाखान्याच्या धावपळीमध्ये अनयच्या पूर्ण कुटुंबाने हिरा आणि हिराच्या आईची भक्कम साथ दिली. अनय अतिशय रूबाबदार, कर्तव्यदक्ष तितकाच मिश्किल स्वभावाचा होता. कुठेही काही कमी नव्हतीच.  आता बाबांच्या मनाविरुद्ध हिराला काहीही करायची इच्छा राहिली नाही. त्यांच्या मनाविरुद्ध जाणं म्हणजे त्यांच्या जीवावर बेतणार. या भीतीने हिराने लग्नाला मूकपणे संमती दिली.बाबाच्या जीवनयज्ञासाठी तिच्या प्रेमाची आहुती देण्याचे तिने ठरवुन टाकलं.

         इकडे सुजय रोज तिच्या घरी चक्कर टाकत होता. पण कुणालाच काही माहिती नव्हते. तो फक्त हिराला मी सैन्य दलात भरतीसाठी प्रयत्न करणार आहे एवढेच सांगण्यासाठी भेटणार होता. हिराचे बाबा सैन्यातीलच मुलाशी तिचं लग्न करून देणार हे त्याला पक्क ठाऊक होतं. त्याच्या परीक्षांच्या तारखा जवळ आल्या आणि तो रवाना झाला.

           बाबांना अजून दोन महिने तरी हलवता येणार नव्हते. त्यामुळे त्यांनी तिथल्याच मिलिटरी कॉर्टर मध्ये राहण्याची व्यवस्था केली. या सगळ्या वातावरणात हिरा सुजयला विसरूही शकत नव्हती आणि आठवू शकत नव्हती.

           अनय आणि त्याचे आई-बाबा, बहिण सगळेच स्वभावाने चांगले होते.हिरा अनयच्या प्रेमात व्हावून निघत‌ होती.अनयला तिची चेष्टा करायची लहर आली की तो म्हणायचा.

           "मी खरंच आवडतो का तुला?नाही म्हणजे तुझे डोळे ना वेगळच सांगतात कधीकधी"

"चल काहीतरीच तुझं."

 असं म्हणतच ती तिथून निघून जायची.

            शहीद अनयची  वीर पत्नी म्हणून सत्काराला उत्तर देताना तिचा ऊर अभिमानाने भरून आला होता. ती त्याच्या आठवणींमध्ये चिंब भिजत असतानाच सासऱ्याच्या तोंडी एकदम सुजयच नाव ऐकून तिचा सगळा भूतकाळ झरकन डोळ्यासमोरून सरकला.

 

"मम्मा मम्मा, मी आलो, "


मनुच्या आवाजाने ती भानावर आली.


"हे बघा माझं चित्र....


एक छान  ड्रॉईंग मनू तिच्यासमोर नाचवत होता.


"हे कोणी शिकवलं?"

"

"दीदीने,


"अजून कोण कोण होतं तिथे?"


"खूप सारे मुलं म्हणजे चित्र काढायला आलेले, खूप मजा आली"

"येताना तिथल्या काकांनी आईस्क्रीम दिलं"


"कोणते काका"?


"व्हीलचेयरवर बसलेले काका,"


मनू अखंड बडबडत होता पण हिराच कशातच लक्ष नव्हतं. संध्याकाळी ती आईकडे गेली. तिच्या गळ्यात पडून तिने मनसोक्त रडून घेतलं.


"आई मला आयुष्याने कुठल्या वळणावर आणून उभं केलं.काही मला कळत नाही?

"हिरा बाळ, अग होईल सगळं नीट अजून थोडा धीर धर."

 कुठल्याही मोहात आता  अडकायचं नाही असा निश्चय तिने मनाशी केलेला होता. नियतीच्या मनात मात्र  काही वेगळंच होतं.

 अनय गेल्यापासून  सासरे तिला हिराच म्हणायचे. सुनबाई म्हणायचं त्यांनी सोडून दिलं होतं.


"हिरा आज आमच्या ज्येष्ठ मंडळींची एक मिटींग आहे. आज मनुच्या क्लासचं तेवढे बघशील तू. नाहीतर सुट्टी घ्या आजच्या दिवस"


"नाही, मी सुट्टी नाही घेणार मला दीदीला आणि काकाला भेटायचं."


हिराने काही सांगण्याआधीच मनूने रडक्या सुरात हट्ट धरला.

 मनूला घेऊन हिरा क्लास मध्ये पोहोचली. सुनय  क्लासेस चा वर्तुळाकृती बोर्ड लावलेला होता. कमानी पासून तर ऑफिस पर्यंत विविध फुले झाडे, फळझाडं छान पध्दतीने सजवलेली होती. वर्ग अतिशय सुंदर होते चित्र, आकार आणि रंगाने सजवलेले होते.मनूसारखी कितीतरी मुलं चित्र रंगवण्यात आणि काढण्यात रमून गेली होती. 

 "हे सुनय जरा वेगळं नाव  वाटत?"

 हिराने सहजच चौकशी केली.

 "सु म्हणजे सुजय सरांचा सु आणि नाही म्हणजे अनय सरांचा नय"

  सासरे जेव्हा काहीतरी सांगत होते तिने ऐकलंच नव्हतं त्यामुळे तिच्यासाठी हा धक्का होता.

   क्लास मधून निघताना  तिथली   मुख्य शिक्षिका  आली तिला बघून हिराच्या काळजात लख्ख झालं. ती अगदी सुजय सारखी दिसत होती. त्याची बहीण असावी कदाचित.

    आता इथून काढता पाय घ्यावा म्हणून तिने मनुची बॅग पटापट आवरली.

    "या मिसेस अनय तिच्या सहशिक्षिकेने हिराची ओळख करून दिली."

    "ओह, तुम्ही मिसेस अनय,!? तिच्या शब्दात प्रचंड कुतूहल आणि आश्चर्य होतं.

    "का , असं का म्हणालात?"

"अ....    नाही तसं काही नाही"

असं म्हणतच ती घाईघाईने तिथून निघून गेली. हिराला तिथून कधी एकदाची बाहेर पडते असं झालं होतं.


"चल मनू लवकर आवर सगळी मुलं निघून चालली."

"अरे मम्मा ,आपल्याला तर अजून काकांना भेटायचं आहे"

"कोण काका,  काही नको. मनू आपण घरी जाऊ लवकर,

"मनू,मनन, ऐक ना....


"मी दोनच मिनिटात आलो" 

म्हणतच मनू तिथल्या ऑफिस कडे पळतच गेला. तीही त्याच्या मागे धावली. ऑफिसच्या दर्शनी भागातच सुजय आणि अनयचा हातात हात गुफंलेला  एनलार्ज केलेला फोटो लावलेला होता. दोघेही अतिशय राजबिंडे दिसत होते. नियतीच्या विचित्र खेळात दोघेही हात तिच्या हातातून सुटले होते.

मनूने खुर्चीत बसलेल्या सुजयला टाळी दिली आणि सुजयने त्याचा गालगुच्चा घेऊन कॅडबरी त्याच्या हातात दिली. 

     प्रत्येक वेळी मनूला जवळ घेताना सुजयला  लेप्टनन अनयचा चेहरा आठवायचा. त्यांच्यातला शेवटचा संवाद कुरतडायचा.

त्यादिवशी कॅम्प मध्ये सन्नाटा होता. लेफ्टनंट अनयच्या टीम मध्ये सगळेच व्यक्त होत होते. 


मेहबूबा मेहबूबा, कल तुम कहा हम कहा... गाण्यावर डोलत होते. सुजयच्या अधुऱ्या प्रेमाच्या कहाणीवर सगळ्यांनीच सुस्कारे सोडले.अनय त्याला म्हणाला

"तुझं प्रेम खरं आहे ना,तुमारा मिलन होगा‌ होगा."

नकळत सुजयच्या पाकिटातून हिराच्या फोटो निखळला.अनयने तो स्वताच्या कपड्यांना पुसून साभार परत केला.

"आधी फोटो सांभाळायला शिका ज्युनियर".

             त्यानंतर युद्धाचं बिगूल वाजलं. आज सुजयचं जीवन म्हणजे अनयने  दिलेलं जीवदानच होतं. पण एका लेफ्टननने असं का करावे? हे कोड अजूनही सुजयला उलगडत नव्हतं. मला का वाचवलं सर? हा प्रश्न त्याला सतत सलत होता.

      छोटा मनू त्याला हाताला धरून हलवत होता. तेव्हा कुठे सुजय भानावर आला.


"काका माझी मम्मा आली आहे आज.. बघा ना"


हिरा ऑफिसच्या दाराजवळच थबकली होती. सुजयच्या टेबलवर निवृत्त लेफ्टनंट सुजय  अशी पाटी ठेवलेली होती. हिराला बघून तोही चमकला.

 

"काका,ही माझी मम्मा,....


 "म्हणजे तू... तुम्ही... हिरा... मिसेस अनय..."

 

दोघांनाही व्यक्त होता येत नव्हतं. हिराचे डोळे पाझरत होते. छोटा मनू त्या दोघांकडे आळीपाळीने बघत होता.

 "या पायानी घात केला नसता तर, लेफ्टनंट अनय आपल्यासोबत राहिले असते, किती दुर्दैव माझं.? एका वीर पत्नीच्या स्वागतासाठी मला धड उभही राहाता येत नाही".


 त्याने तिथुनच तिला सॅल्यूट केला.अनयच्या असंख्य आठवणी, सुजय समोर होता. तिच्या मनाचा बांध फुटला. दारातच गुडघ्यावर बसून ती ओक्साबोक्शी रडायला लागली. व्हीलचेअर सावरीत सुजय तिच्यापर्यंत पोहोचला. हिराच्या डोक्यावर हात ठेवून तो तिला शांत करत होता. छोटा मनू दोघांनाही बिलगून तिथेच उभा होता.सुजयच्या बहिणीने ही त्या दोघांना मिठी मारत म्हटले

"पुन्हा एकदा,हिरा तुझ्या आयुष्यात आली,मी‌ म्हटलं होतं ना तुला दादा. खऱ्या प्रेमात ताकद असते "

 

    संध्याकाळची केशरी किरण थेट त्यांच्यावर आशीर्वादाची फुले उधळत होती.

    



 

 



 

 



 



  



      

       









        


    

    

            

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू