पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बे दुणे चार

■■बे दूणे चार■■


दारावरची बेल वाजली अन् दार उघडताच समोर शरीराने स्थूल, रंगाने सावळी,समोर आलेल्या दातामुळे कायम हसमुख भासणाऱ्या ,चाळीशी पार केलेल्या आपल्या साळीला बघून माधवच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी उमटली. तिच्या हातातली भली मोठी सुटकेस आणि सामाना कडे निर्देश करत, तोंडावर उसनं हसू आणून तो म्हणाला,यावेळेस कायम मुक्कामी काय आमची लाडकी साळी?
खांद्यावर पर्स, अंगात घातलेला फ्रॉक पॅटर्नचा सलवार सूट घेतलेल्या कालिंदीने संपूर्ण दार व्यापलेल होतं. हातात धरलेल्या सुटकेसने तिने माधवला बाजूला सारले,हातातलं सामान ठेवून ती सोफ्यावर भसकन बसली.
"जीजू जरा पंख्याच बटन ऑन करा हो फारच उकडतयं ! अगदी कंटाळा आला होता बघा गावी राहुन. वसुताई ऑफिसला गेली असणार आणि मिली कॉलेजला ,तुम्ही यावेळी घरीच भेटणार याची खात्री होती मला!"

"कालिंदी अगं काही चहा कॉफी करत असशील तर मलाही टाक !"माधवने म्हटलं

"आता अकरा वाजता कोण चहा पितं जीजू, ताई स्वयंपाक करून गेलीच असेल मी डायरेक्ट जेवणार! तुम्हाला वाढायचं का?" बेसिनवर हात धुवून कालिंदी स्वयंपाक घरात गेली सुद्धा. "हे काय वांग्याची भाजी, ताईला दुसरं काही येत नाही वाटते!"

" तु आलीयसं ना ताईला रजा दे स्वयंपाकघरातून! बरं कालिंदी तू रहा दिवसभर आरामात ,मी माझा टिफिन घेऊन निघतोय !" ‌
म्हणून माधवने पायात चप्पल सरकवली.कालिंदीने जेवण करून मस्त पैकी ताणून द्यायचा विचार केला . बेडवर पडल्या पडल्या तीच लक्ष भिंतीवरच्या फोटो फ्रेम कडे गेल. 'राजा, राणी अन राजकन्या छान सुखाचा संसार आहे ताईचा. आपला राजकुमार कुठे लपुन बसलाय कोण जाणे! '
लॅचकी ने दार उघडल्याच्या आवाजाने तिला जाग आली.अन् ती बेडवरून उठायच्या आतच तिच्या गळ्यात दोन हात पडले.
"मावशी, मावशी, माझी कालू मावशी किती दिवसानंतर आलीस ग? किती मिस करत होते मी तुला!"
देवाने रूपाच्या बाबतीत कलिंदीवर अन्याय केला असला तरीही मन मात्र अतिशय कोमल दिलं होतं ,अत्यंत प्रेमळ होती कालिंदी.आपल्या लाडक्या बहीण लेकीच्या प्रेमाने कालिंदीचे डोळे भरून आले. तिनेही मिलिला घट्ट मिठी मारली.
"थकून आली असशील मिली ?"

" मावशी काही खायला केलसं?"
कालिंदी लगेच स्वयंपाकघरात पळाली. तिने बटाटेवड्याची प्लेट आणून मिली समोर धरली.
" मला माहितीच होतं तुला भूक लागली असणार "
"बटाटेवडे ? मावशी तळलेले पदार्थ मी खात नाही. हेल्थ च्या बाबतीत फार अवेअरनेस ठेवते मी!" ‌ "मिली मी तुझ्याएव्हढी सुंदर असते ना तर एव्हाना माझ्या कडेवर दोन-चार कच्ची बच्ची असती बघं!."
पंचवीस वर्षाच्या गौरवर्णाच्या सुंदर,सुडोल शरीरयष्टी लाभलेल्या‌ आपल्या बहिण लेकीकडे कौतुकाने बघत कालिंदी म्हणाली..
"मावशी आत्ता कुठे तु चाळीशी पार केलीय, आज काल सुंदर मुलीही चाळीस वर्षापर्यंत लग्न नाही करत"
" जराही खाण्यापिण्यावर कंट्रोल नाही, दिवसभर चरत राहायचं म्हशीसारखं… नुसता बेशीस्तपणा मग शरीर बेडौल होणार नाही तर काय?"
" अगं ताई ये मी बटाटेवडे करून ठेवलेत तुझ्यासाठी ".
" तूच खा ते बटाटेवडे, एवढ्या गरमीच कुणी बटाटेवडे खातं काय गं कालिंदी?".

आपल्या ताईच्या बोलल्याने जराही नाराज न होता दुसऱ्या क्षणी हसून कालिंदी म्हणाली,
" मिली तुला माहिती आहे आम्हा दोघी बहिणीला लहाणपणी सगळेजण नावाने हाक न मारता गोरी और काली म्हणायचे "
"खरचं गं आई तु एवढी सुंदर आणि ही मावशी… कसं काय ग दोघींमध्ये एवढा फरक?"
" "अगं हिच्या वेळेस म्हणे माझ्या आईला चिकन माती खायचे डोहाळे लागले होते आणि काळा चहाही ढोसायची ती…म्हणून गोरी आणि काली असा फरक आहे आमच्यात !"
" एक आई असं काही नसतं !" मिलीने आईला टोकले.
" नुसतं सकाळपासून खाण्यासाठी तोंड चालू ठेवायचं .आपण कसं दिसतो, कसं वागतो याचं भान नाही. कसतरी शाळेत शिक्षण घेतलं कॉलेजला गेली तर मुलं चिडवायचे हिला 'काली काली 'म्हणून आणि बाईसाहेब घरी परत आल्या. शिक्षणच घेतल नाही तर नोकरी काय मिळणार! जगात कितीतरी सावळ्या मुली असतात त्या काय शिक्षण घेत नाही की नोकरी करत नाही?आई-बाबांचा कधी विचार केला हिने, त्यांच्या मनाला किती दुःख आहे, सतत हिची काळजी करत असतात. कितीतरी स्थळ शोधली पण शिक्षण कमी आणि रंग कसा. कुणाकडून होकार येत नाही. वसुधाने आपल्या मनातली सगळी तळमळ बोलून दाखवली.
कलिंदीला हे सगळं बोलणं ऐकायची सवय असल्याने ती निगरगट्टपणाने सगळं ऐकत होती.

"काली मावशी आईच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ !" ‌
दुसऱ्या दिवशी सकाळी मिली स्पोर्ट शूज आणि जॉगिंगसाठी हाफ पॅन्ट आणि टी-शर्ट घालून तयार झाली .पोनी बांधता बांधता म्हणाली,
मावशी चलतेस का जॉगर्स पार्कमध्ये?".
" नको ग बाई मी येऊन काय करणार तिकडे!"
मिली जाताच कालिंदी गच्चीवर गेली. 'वॉव काय बॉडी आहे !' बाजुच्या गच्चीवरच्या राणाला बघून कालिंदी हरखली..
तिने सकाळी नाश्तासाठी केलेले कटलेट एका छानशा बाऊलमध्ये ठेवले आणि ती शेजारच्या घरी निघाली.

"ताई मी कालिंदी! तुमच्या बाजूच्या घरी गोखले राहतातना ती माझी बहीण वसुधा. ओळख करून घ्यायला आलेय"
गप्पांच्या ओघात कालिंदीला समजलं त्यांना एक मुलगा हेमंत आणि सध्या त्या बाईचा भाऊ राणा इथे राहातोय, जिम ट्रेनर आहे!
आणि मग तिचा नित्यक्रमच झाला गच्चीवर चकरा मारण्याचा. "मिली चल तुला गंमत दाखवते!" तिने मिलीला गच्चीवर आणलं, बघते तर एक तेवीस चोवीस वर्षाचा तरुण एक्सरसाइज करत होता.
" मिली‌ सारखा काय ग मोबाईल हातात असतो तुझ्या ! " ‌‌ मावशीने तिच्या कानातला हेडफोन काढला. जरा "आजूबाजूलाही नजर फिरवकी! बघ कीती हँडसम मुलगा आहे!"
मिलीने बघितलं. आणि ती दबक्या आवाजात ओरडली.
"मावशीssssss तुझं वय काय आणि त्याचं वय काय !तो तेवीस ,चोवीसचा कॉलेज तरुण आणि तू चाळीशीची! काहीतरी लॉजिक लावशील की नाही ?
"गधडे अगं माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी म्हणते मी!" ' मामा त मामा भाचाही हँडसम आहे!'
"अगं अशी कितीतरी मुलं मागे लागलेली असतात माझ्या, मी नसते भाव देत कुणाला!"

" मिली, अग बघं मागे "तो" आलाय !"
कालिंदी लाजून तोंडावर दोन्ही हात झाकत म्हणाली
"अच्छा म्हणजे याच्यासाठी तू गच्चीवर येत असतेस तर…"
"मिली आवडला मला तो!"
दुसऱ्या दिवशी सकाळी मिली जॉगिंग साठी तयार झाली. "मावशी यायचंय तुला माझ्यासोबत, अगं ते मामा भाचे येत असतात तिथे!" ‌‌ कालिंदीने एक चक्कर मारली.
"मिली मी थकले गं, बसते इथे बाकावर!"
अचानक समोरून राणा आणि हेमंतची जोडी जॉगिंग करत येताना दिसली. कालिंदीचा चेहरा हर्षोल्हासाने फुलून आला. पण राणा आणि हेमंत तिच्याकडे न बघताच गप्पा करत निघून गेले. कालिंदी हिरमुसली.
सायंकाळी कालिंदी आणि मिली गच्चीवर पोहोचल्या.
" मिली तो बघ तिकडे उभा आहे, सकाळी मी त्याच्यासमोर गेली तर बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे!
"मावशी तो जिम ट्रेनर आहे असं म्हणालीस नं ! तुझी फिगर बघून डोळे मिटले असेल त्याने! "
मिली गमतीने म्हणाली‌. "मग काय करायला हवं मिली? माझा जीव अटकला आहे त्याच्यात, काय वाटेल ते करेन मी त्याच्यासाठी ?
" मी सांगते तसं करावे लागेल तुला!

"अगं सोळा सोमवाराचं व्रत सुद्धा करेन मी त्याच्यासाठी! "
"ये हुई ना बात! व्रतच करावं लागणार आहे ".

"म्हणजे खरंच उपवास करावा लागणार ? पण माझ्याने उपाशी राहणं होत नाही ग मिली".

"म्हणजे सकाळपासून बकरी सारख तुझंच चरण बंद!"
"अगं उपाशी राहिले तर मरून जाईन गं मिली!"

"ठीक आहे मग पुढच्या जन्मासाठी त्याला मागून घे"
सायंकाळी कालिंदीने ताट भरून जेवण वाढून घेतलं. "अहं अहं मावशी आता तळलेलं, भात, बटाटा हे सगळं बंद करावं लागेल तुला!" ‌‌
"आजच्या दिवस खाऊ दे ना!".
"नाही आतापासूनच सुरुवात करायची. मावशी मला फॉलो करशील तर समोरचा बॉडी बिल्डरच काय सगळे तरुण तरूणी तुझे फॅन होतील बघं! "
"आता सुंदरी बनविणार आहे की काय हिला ?अगं एखादा बिजवर मुलगा मिळाला ,पोटी दोन लेकरं असेल तरी ह्या ध्यानाच लग्न लावून देईन हीच त्याच्याशी"!

"आई, अग तु सख्खी बहीण आहेस की वैरीण गं काली मावशीची ?स्वतःच्या बहिणी बद्दल असा विचार करते?"

"म्हणा बाई काय म्हणायचं ते मला, माझ्यावर तर काही फरक नाही पडणार!"
"अगं ही आमची काळुबाई ना, ती म्हण नाही का बेशरमाच्या…... मी आजच वधुवर सुचक मंडळात नाव नोंदवते हिचं…"
" हा बाकी योग्य निर्णय घेतला तु वसुधा!
" तुला तरी कधी काळजी वाटली का तिची माधव? "

"आता माझ्यावर कशाला ऊलटतेस?"

" तर काय करू! तू दिसायला सुंदर म्हणून तुझ्यावर प्रेम केलं मी, आणि तु बसला किराणा दुकान टाकीन ! किती छान छान मुलं आली होती मला आय. एस ऑफिसर वगैरे.. वातावरण तंग झाले बघून कालिंदीने मिलीचा हात धरला. "चल आपण गच्चीवर जाऊ ,भांडू दे या नवरा बायकोला. "मावशी उद्या तुझ्यासाठी जिम शोधु."

" मिली "तो" आहे ना त्या जिमला जाईन मी!
" आणखी बरचं काही कराव लागणार आहे तुला मावशी. डेंटिस्टची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. पार्लरच्या चकरा माराव्या लागणार." " सगळं सगळं करेन त्याच्यासाठी!
आणि कालिंदीने निश्चय केला आपल्याला जर राणाला मिळवायचं आहे तर मिलिने सांगितलेल ऐकावंच लागेल. तिने राणा शिकवायला जात असलेला फिटनेस सेंटर जॉईन केला. रोज मेडिटेशन करायला लागली. स्वतःवर लक्षात केंद्रित केलं.खाण्यावर ताबा ठेवला.
एक दिवस कालिंदी आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत होती..
" मावशी अगं पूर्वीचे कपडे तुला ढिले व्हायला लागलेत, चेहराही बऱ्यापैकी फेअर दिसत आहे !"
"मिली दिल्ली अभी बहुत दूर है! अगं तो अजून माझ्याकडे बघत सुद्धा नाही."
मावशी काहीतरी आयडिया करावी लागेल तुझ्या मनातलं त्याच्याकडे पोहोचवायला, चल आपण गच्चीवर जाऊया!"

"मिली हे बघ मी काय आणलयं"

" हे काय, कागदाचं विमान ?"

"अहं प्रेम पत्र "!

"हे बघ असं फेकतात "म्हणून मावशीने हातातलं विमान बाजुच्या गच्चीत फेकलं. नेमका त्याच वेळी हेमंत गच्चीत आला आणि ते कागदाच विमान त्याच्यापुढ्यात जाऊन पडलं.

"मावशी अगं मामा ऐवजी भाच्याच्या हातात प्रेम संदेश गेला ना ! "

"मिली मामाच काय भाचाही हँडसम आहे!"

आणि कालिंदी च्या बोलण्याने मिली अक्षरशः लाजली.
हेमंतने ते कागदाच विमान उचललं.त्याच्या हातातलं कागदी विमान बघून राणा ने विचारलं

"काय आहे रे हेमंत? "
"मामा तुझ्यासाठी आलयं समोरच्या गच्चीतून, हृदयातून बाण गेल्याच दाखवलयं चिठ्ठीत. कुठल्या जमान्यात वावरतात पोरी कोण जाणे! प्रेम संदेश देण्याचा हा काय तरीका आहे !"
ते विमान राणामामाच्या हातात देत हेमंत तिथून निघून गेला. राणामामाने बघतलं समोर मिली कानाला हेडफोन लावून झुंबा करत होती. राणामामा खूष झाला. त्याने स्वतःकडे एक नजर टाकली, 'म्हणजे अजूनही मी फार्मात आहे तर समोरची विस वर्षाची मुलगी आपल्याला प्रेम पत्र पाठवते म्हणजे काय!' आणि तो आत गेला कागदावर एका हृदयात चित्र काढलं आणि दोन बाण हृदयातुन गेलेले दाखवले. काहीतरी मेसेज लिहिला आणि कागदाचा बोळा करून दिला फेकून मिलीच्या गच्चीत ….
कालिंदी खुष झाली. कालिंदीने धडधडत्या हृदयाने बोळा उचलला. आत इंग्रजीमध्ये काहीतरी लिहिलं होतं .कालिंदीला अर्थ कळेना इंग्रजीत काय लिहिलं त्याचा.

"मिली बघ ना इंग्रजीत काहीतरी लिहिलं आहे!"

‌. "मावशी त्या बॉडी बिल्डरने तुला प्रेम संदेश दिला आहे, अगं तुलाही इंग्रजीत उत्तर द्यायला हवं! मी लिहून देते इंग्रजीत प्रेमपत्र तुला!" ‌. म्हणून मिलीने दोन चार वाक्य इंग्रजीतले लिहिले आणि मावशीच्या हातात कागद दिला. बेस्ट ऑफ लक काली मावशी!
आणि मग इंग्रजीत आलेल्या प्रेमपत्राच उत्तर इंग्रजीतच दिल्या जाऊ लागलं.
कालिंदी अधून मधून बाजूच्या घरी जाऊन आढावा घेऊन यायची. "मिली तुला कळलं हेमंत परदेशी चालला आहे पुढचं शिक्षण घ्यायला. अग तिकडे जाण्या अगोदर तुझं प्रेम व्यक्त करून टाक त्याच्याकडे एकदा का तिकडे गेला की तुझ्या हाती येणार नाही." ‌ मिलीच्या मनात हेमंत बद्दल प्रेम निर्माण झालं होतच. 'खरंच हेमंत शिकण्यासाठी परदेशात गेला तर आपण आपले प्रेम व्यक्त करू शकणार नाही'
तिने हेमंतला मेल केला पण त्याचे उत्तर आले नाही.
कालिंदीचा आणि राणाचा खेळ सुरू झाला. राणाला वाटायचं आपण फेकलेलं प्रेमपत्र मिली उचलते. कालिंदीला वाटायचं राणा आपल्यावर मरतो. हेमंतला काही घेणं देणं नव्हतं कारण त्याला एम.एस करायला परदेशात जायचं होतं..

"कालिंदी वाटलं नव्हतं तू इतकी सुंदर दिसायला लागशील .कशी होतीस ग तू आणि आता किती सुंदर दिसतेस.आता पोरांची लाईन लागेल बघ तुझ्याकडे आता दोघींसाठी एकाच वेळी मुलं बघायला सुरुवात करावी लागेल "
" ताई आमच आम्ही बघून घेऊ हं तू केलंस ना लव मॅरेज आम्हालाही चान्स दे की!"
" म्हणजे ,तुमचं तुम्ही ठरवलं की काय? ‌. "अगदी तसंच नाही पण प्रयत्न चालू आहे"! म्हणताना कालिंदीच्या गालावर लाली उमटली.
आणि तो दिवस उजाडला हेमंतची आई वसुधाच्या घरी आली. "वसुधा हेमंत परदेशी चाललाय त्या निमित्य एक छोटीशी पार्टी ठेवली आहे, तुम्ही सगळेजण नक्की या एक आनंदाची बातमी अनाउन्स करायची आहे सायंकाळी."
कालिंदी व मिली खूप खुष झाल्या. संध्याकाळी दोघीही छानसं नटून तयार झाल्या. दोघींनाही एकमेकींच्या मनातलं गुपित माहीत होतं.
पार्टीत गेल्यानंतर कालिंदी राणाच्या जवळपास घुटमळू लागली. पण राणाच लक्ष मिलीकडे होतं आणि हेमंतकडे बघुन मिलीच हृदय धडधडत होत.
हेमंतला या सगळ्यांचा मागमुसही नव्हता.
पार्टी संपत असतानाच हेमंतच्या आईने अनाउन्स केलं. "एक आनंदाची बातमी आहे आमच्या राणासाठी आम्ही मिलीचा हात मागतोय!"

आणि कालिंदीच्या हातातली जेवणाची प्लेट खाली पडली. मिलीही आवासून बघत राहिली.
'हे काय घडलं?' वसुधा आणि माधवच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव ऊमटले 'आम्हाला कसं माहित नाही?'
वसुधा समोर होऊन म्हणाली, "पण आम्हाला यातलं काहीच माहिती नाही.
तुमच्या भावाचं वय काय माझ्या लेकीचं वय काय दुपटीचा फरक आहे दोघांमध्ये"

" तुझीच मुलगी राणाला प्रेमपत्र पाठवते, इंग्रजीत असतात, वाचलेत मी"

मिली नकारार्थी मान हलवत होती.
" आई कालिंदीमावशीचे प्रेम पत्र होते ते राणा मामाला!"

"मिली म्हणजे ते प्रेमपत्र ह्या काळुबाईचे होते, हिला कसं वाटलं की मी हिच्यावर प्रेम करेन! या अशा मुलीवर जिला मी माझ्या जिम मध्ये असुन बघत सुद्धा ‌नाही.हीने स्वतःला बघितलं का आरशात कधी?"
आणि झालेला अपमान सहन होऊन कालिंदी तिथून धावतच घरी परत आली.

घरी येऊन कालिंदीच्या मनाचा बांध फुटला. " ताई तुमच्या राहणीमानाचं, सगळ्या गोष्टीच मला आकर्षण वाटायचं. गावी इथपर्यंतच आयुष्य गेलं.आपण काळं आहो, शिकलेलो नाही म्हणून आपलं लग्न जमत नाही याचही मला काही वाटत नव्हत. पण इथे आल्यावर राणाकडे बघितलं आणि ,आणि अगदी पहिल्याच भेटीत मला त्याच्याबद्दल ओढ वाटली. आणि त्याचं प्रेम मिळवण्याकरता मी वाटेल ते करायला तयार झाली. आज..आज असे वाटते की आधीची कालिंदीच बरी होती आपल्याच विश्वात रमणारी !"

" पण मावशी तुझं आयुष्य बदलविण्याच सगळं श्रेय राणामामाला जाते.त्याच्यामुळे जगण्याची नवी दिशा मिळाली तुला, तु आभार मानायला हवेत त्याचे"

"आता आयुष्यात कधी भेटणार नाही मी त्याला!

"का ग?"

"अगं जळत होता तो माझ्यावर. आता जिम मध्ये सगळे तरुण-तरुणी 'मॅडम मॅडम' माझ्या मागेमागे लागत असतात. त्याने जिम मालकाकडे कंप्लेंट केली माझी आणि याला उत्तर मिळाले 'तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही सोडून जाऊ शकता' कशी जिरली बघ त्याची! पण थँक्स मिली, माझ्यासारख्या मुलीचा तु आत्मविश्वास परत मिळवून दिलास. जगण्याचा नवा मंत्र दिलास. माझ्यासारख्या मुलींना मी सांगेन इतरांपेक्षा आपण कुठेतरी कमी आहे हा न्यून गंड बाळगण्यापेक्षा तुम्ही स्वतःत सकारात्मक बदल घडवा, आत्मनिर्भर बना आणि आत्मविश्वासाने जगायला शिका."

"कालिंदी तू जिवनाविषयी कधीपासून इतकी सिरीयस झालीस? माझी पुर्वीची खेळकर ,हसरी साळी परत हवी मला."

"थँक्स जिजु तुम्ही सर्व आहात माझ्या पाठीशी म्हणून मला जगण्याला बळ मिळालं. ताई मला आता यायला जरा उशीर होत जाईल बॅचेस वाढल्यात जिम मधल्या."
त्या दिवशी सायंकाळी कालिंदी जरा उशिराच घरी परतत होती. रिक्षातून उतरताना तिला काही गुंड लाठ्या घेऊन येताना दिसले…
राणा पायीच येत होता आणि अचानक त्या गुंडांनी राणावर हल्ला चढवला. तिने राणाकडे धाव घेतली. चार-पाच गुंडा समोर एकटा राणा कमी पडत होता. कलिंदीने गुंडाच्या हातातली काठी हिसकावून त्याला खाली पाडलं.
दोघांनी मिळून त्या गुंडांचा समाचार घेतला.
पण मार लागल्यामुळे राणाला चालता येत नव्हतं. कालिंदीने त्याच्या खांद्याला धरून त्याला आधार दिला आणि त्याच्या घराच्या फाटकापर्यंत पोहोचवुन दिले. राणाला धन्यवाद म्हणण्याचा अवधीही न देता ,कालिंदी तडक माघारी फिरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राणा व त्याची ताई वसुधाकडे पोहोचले.

"कालिंदी अगं कालिंदी!"
"काय ग आता कशाला आलात तुम्ही?कालिंदीचा इतका अपमान करून तुम्हाला….."

" कालिंदीचे धन्यवाद व्यक्त करायला आला आहे राणा! काल कालिंदीने राणाचे प्राण वाचवले. कुठे आहे ती".
" ती पहाटेच गेली आहे फिटनेस सेंटरला, आता इन्चार्ज झालीय ती!"

" तिला सांगा धन्यवाद व्यक्त करायला राणा आला होता!" वसुधाने त्यांना घरात बोलवायचे टाळले .
"मिली अगं काल काही घडलं का? कालींदी काही बोलली नाही आपल्याशी!".

" नाही गं, नाहीतर राणासारखा माणूस कालिंदीची माफी मागायला घरापर्यंत?"

सायंकाळी कालिंदी परत येताच मिलीने तिला सांगितले "मावशी अगं राणा मामा आला होता तुझे आभार मानायचेत म्हणे! कशासाठी गं? "

" मला विषय नको त्याचा, आय हेट हीम!" तिच्या स्वरातुन राणाबद्दलचा राग जाणवत होता.
" मिली ,ताई ,जीजु मी बेंगलोरला चालली आहे, तिथल्या फिटनेस सेंटरची मध्ये जॉईन होतेय मी."
आणि दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने कालिंदी बेंगलोरला रवाना झाली.

"मिली अगं वर्षभरात काय काय घडुन गेलं बघ!"

"राणा कसला विचार करतोयस तू? कालिंदीचा ? तिला इतकं तोडून बोलायला नको होत त्या दिवशी!"

" ताई, समोरासमोर प्रेम व्यक्त करायलाआम्ही एकदाही भेटलो नाही. फक्त प्रेम पत्रातल्या मजकुरावरती विश्वास ठेवून होतो मी. मला वाटायचं मिली मला पत्र लिहितेयं आणि मी तिच्या प्रेमात गुंतत गेलो.
"वीस वर्षांपूर्वीचा राणा आठवतो मला. कॉलेजमध्ये असताना तुला आवडत असलेल्या मुलीने फक्त थोडा जाडा असल्या कारणाने तुला नकार दिला होता आणि तु एक्झरसाइजवर भर दिला. इतकी वर्ष स्वतःला मेन्टेन ठेवलं. त्या एका मुलीच्या नकारामुळे लग्नाचा विचार सुद्धा केला नाहीस!"

" हो, पण मिली माझ्या जीवनात आली आणि मग पुन्हा मिलीने मला स्वप्न बघायला शिकवलं ताई !" "राणा विचार कर, ती वीस वर्षाची युवती तुझ्यात आणि तिच्या वयात दुपटीने फरक आहे, ती किंवा तिचे आई बाबा कसा स्वीकार करेल तुला?" ‌

"ते आता समजतयं मला, पण त्यावेळी मी प्रेमात आंधळा झालो होतो ताई!".
"राणा मला वाटते तू बेंगलोरला जाऊन कालिंदीची माफी मागावीस. राणा खरंतर कालिंदीच तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे. सगळा अपमान विसरून त्यादिवशी तुझा जीव वाचवला तिने, तुझ्यासाठी तिने स्वतःला बदलविलं !"

"ताई कळतंय ग सगळं, पण मला नाही वाटत कालिंदी मला माफ करेल!" ‌‌
" चुकतोयस तू राणा, अरे स्त्रीचं ह्रदय खूप विशाल असतं. तिने ज्याच्यावर प्रेम केलं ते ती कधी विसरू शकत नाही, त्याच्यावर कधीच रागवू पण शकत नाही. तिच्यासमोर जाऊन बघ,मोठ्या मनाने माफ करेल तुला."

" नाही ताई आता ती पूर्वीची कालिंदी नाही राहिली, मला वाटते वेळच त्याच्यावर औषध आहे काही दिवस जाऊ दे, थोडा राग निवळु दे तिच्या मनातला. तिचा अपमान सहजासहजी विसरणार नाही ती!"

"मावशी ,मावशी अगं तिथे काय जाऊन बसलीस तू बेंगलोरला! येथे असायला हवी होतीस.अगं हेमंतचा मेल आलाय मला! किती खुष आहे मी तु ईथे असतीस तर गळ्यात पडले असते मी".

" काय म्हणतोय हेमंत ?"कालिंदी ने शांत स्वरात विचारले.
"त्याचा अभ्यासक्रम संपूर्ण झालाय, तो येतोय भारतात ,आल्यावर भेटू म्हणाला .

" तुझं प्रेम तुला मिळेल माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला दोघांना!"

"मावशी येना गं इकडे परत, तुला खूप मिस करते मी!"
"येईल कीगं तुझ्या लग्नात!
आज गोखल्यांच घर रोषणाईने सजल होतं. त्यांची लाडकी मिली आणि हेमंत दोघं विवाह बंधनात अडकणार होते.
"ए आई मावशी बघ ना अजून आली नाही. कितीदा फोन केले तिला उचलत पण नाहीये ती!"

"हो ना मी लावला तर स्विच ऑफ येतोय काही अघटीत तर घडलं नसेल ना? ही पोरगी फोन नाही उचलत आहे काय झालं असेल ? अहो जरा एअरपोर्टला चौकशी करा ना, फ्लाईट वेळेवर पोहोचत आहे का म्हणून!"
" वसुधा फ्लाईट पोहचली केव्हाच ,मग ही का नाही पोचली अजून?"
आणि सगळे काळजीत पडले. मुहुर्ताची वेळ होत आली पण कालींदाचा पत्ता नव्हता.
" अहो राणाला बघितलं का तुम्ही? आता मुलाचा मामा म्हणून लागणार नाही का तो?

"नाहीतर इथेच तर होता सकाळपासून! वरात काढायची वेळ झाली आहे मुहुर्तावर लग्न लागायला हवं!"
तेवढ्यात एक सजवलेली कार लग्न मंडपाच्या दारात उभी राहिली आणि आतून हातात हात घालून एक जोडपं उतरलं.

"मावशी तू? आम्ही किती काळजीत होतो तुझ्यासाठी "
" तुला काय वाटलं मावशीच्या आधी तुझं लग्न होणार आणि मामाच्या आधी भाच्याच?
"अगं पण हे सरप्राईज आहे आमच्यासाठी!"

"होय, यावेळेस हेमंत आमच्या प्रेमदूत बनुन आला "
"म्हणजे हेमंत तुला हे सगळं माहित होतं आधीपासूनच?

अरे चला चला मुहूर्ताची वेळ होत आली आहे आता दोन नाही " बे दुणे चार" बोहल्यावर चढणार!
शुभमंगल सावधान!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू