पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमासाठी वाटेल ते

ही प्रेमकथा आहे  ऐंशीच्या दशकामधली.  "श्रीनिवास"   नावाचे दोन तरुण.एक "श्रीनिवास राजधर" एक "श्रीनिवास राजपुरोहित" आणि  प्रेमाच्या  त्रिकोणाची तिसरी बाजू , कथेची नायिका रागिणी ओक. प्रेमासाठी वाट्टेल ते * ही  हलकी फुलकी  विनोदी प्रेमकथा.

******************

 

"वश्या! लोकसंख्या वाढली अन् बेरोजगारांचा सुळसुळाट झाला . वशिला असला तर नोकरी मिळेल, नाहीतर ....हा घे चहा फक्कड आहे ! "

         दोन हातात दोन चहाचे कप घेऊन आलेल्या गोवर्धन  एक कप आपला मित्र श्रीनिवासला देत म्हणाला. "आजही काही खरं दिसत नाही !"                                    मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची गर्दी बघून श्री म्हणाला.

 

         "  मी आहे ना वश्या, कशाला काळजी करतो आज आपला नंबर पक्का म्हणजे पक्का !"     

 

   " काय जादूची छडीबिडी मिळाली की काय ?

 

 " तसंच समज, सर्वांसाठी चहा मागवला आहे मी !"गोलुच्या चेहऱ्यावर खेळकर हसू होतं.   

 

‌   ‌गोलुने चहावाल्याला आवाज दिला आणि हॉलमध्ये बाकावर बसलेल्या उमेदवारांकडे वळून म्हणाला,                                         "  मित्रांनो वाट बघून  कंटाळला असाल ना, माझ्याकडून सर्वांना हा चहा."

       बाकावर रांगेत  तीन-चार मुलीही बसलेल्या होत्या.  त्यातील एका तरुणीने चहा घेण्यास नकार दिला.

गोलू तिच्याजवळ गेला, म्हणाला,

 

 "मॅडम इंटरव्यूला जायचंय चहा घ्या जरा  फ्रेश वाटेल !"

    

"मला चहा आवडतं नाही."

 

     थोड्या वेळाने लाईन मध्ये बसलेल्या उमेदवारांची संख्या कमी झालेली  होती.  फक्त पाच ते सहाच  तरूण बसून होते. तरुणींमध्येही फक्त एकच तरुणी बाकावर दिसत होती.

"त्या तरूणीच्या समोरच्या रांगेतच काळी रंगाची फुलपॅन्ट त्यावर फुल बाह्याचा निळसर शर्ट, गळ्यात टाय,हातात घड्याळ घालुन असलेला एक आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा तरूण काहीतरी वाचत बसला होता. त्या तरूणीने उगाचच आपल्या साडीचा पदर नीट केला, कपाळावरची  कुरळ्या केसांची बट हाताने मागे सारली. चेहऱ्यावर प्रसन्नता आणली. 'शंभर जणीत उठून दिसते माझी राणी' असं मावशी नेहमीच म्हणते.' ती मनात म्हणाली.थोड्यावेळाने दोन उमेदवार उठून गेले.

            तिला धरून आता फक्त चार उमेदवारच हॉलमध्ये बाकी होते. चपराशी हातात लिस्ट घेऊन आला आणि त्याने नावाचा पुकारा करायला सुरुवात केली. पण  बरेच जण गैरहजर होते . 

 

          "श्रीनिवास राजपुरोहित"! .

 

     "यस ,आय एम" म्हणत  "तो"  स्मार्ट तरूण उभा राहिला.

                 गोलूने खाली मान घालून बसलेल्या "श्रीनिवासला"ला कोपराने ढोसलं,

 

 "वश्या  सेम तुझ्या  नावाशी मिळत  जुळत नाव , पण पर्सनॅलिटी बघ त्याची, वरच्या पोस्टसाठी आलेला दिसतोय,बेट्यानं चहा पचवला ! "

"गोलु आज पासून मला तू वशाच्या ऐवजी "श्री" म्हणायच ."

 

"  तु श्रीनिवास राजधर आणि  तो "श्रीनिवास राजपुरोहित"  दोघांनाही नोकरी लागली तर गंमतच येणार बघ ऑफिसमध्ये"!              

   ‌                                                      "अगदी व्यक्तिमत्त्वाला शोभेलसं नाव आहे श्रीनिवास राजपुरोहित.'  उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या श्रीनिवास राजपुरोहितकडे बघून त्या तरुणीच्या मनात एक गोड शिरशीरी  उठली. ‌ती स्वतःशीच लाजली.

        पुढची बाकी नावेही गैरहजर होती.’ 

           "श्रीनिवास राजधर"! चपराशाने आवाज देताच,

 "हो हो मी" म्हणत श्री उठला. 

 

   " पुन्हा श्रीनिवास ?  त्या तरूणीने श्री कडे एक नजर टाकली.

अत्यंत साधा पेहराव, अगदी सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व असलेल्या 'या ' श्रीनिवासचा तिच्यावर काही प्रभाव पडला नाही. 

                " रागिनी ओक "आपल्या नावाचा पुकारा एकताच  ती तरूणी उठून उभी राहिली. तीने आपली साडी नीटनेटकी केली आणि पदर खांद्यावर घेत केबिन कडे निघाली.                       

            आणि काही दिवसांनी  श्रीनिवास राजपुरोहित, रागिनी ओक आणि श्रीनिवास राजधर यांच्या हातात  "लक्ष्मीकांत अँड फर्म" या ऑफिसचे नियुक्तीपत्र पडले.   टायपिस्टची जागा स्मार्ट रागिनीने पटकावली. अकाउंटची जबाबदारी श्रीनिवास राजधरकडे आली, आणि गोलू ने ऑफिसमध्ये ऑफिसबॉय म्हणून  वर्णी लावली आणि "श्रीनिवास राजपुरोहित" तो कुठे होता?"

                 पहिल्या दिवशी आपल्या 'अकाउंट' हे पद सांभाळत श्रीने  खुर्चीवर बसल्या बसल्या  आजुबाजूला नजर फिरवली. ऑफिसमध्ये जुना स्टॉप गप्पांत गुंग होता.

 

           "मिस रागिनी" आपल्याला सर बोलवताहेत. 

नवीन रूजु झालेल्या गोवर्धन उर्फ गोलुने  निरोप आणला.

 

"हो येते" म्हणत रागिनी खुर्चीवरून पटकन उठली. खांद्यावर पदर घेऊन बॉसच्या केबिनच्या दारावर टकटक केले .

 

 "या मिस रागिनी!" 

 

  आणि समोर  बॉसच्या जागी श्रीनिवास राजपुरोहितला बघून तिच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रित भाव उमटले.

 

  "  रागिनी! छान नाव आहे तुमचं!" 

 

         " थँक्यू सर "!

 ‌

"बसा!" समोरच्या खुर्चीकडे निर्देशक करीत त्याने म्हटलं.                                        "आज ऑफिसचा आपल्या दोघांचाही पहिला दिवस. पण रिलॅक्स, कामाचं काही  टेन्शन घेऊ नका"!

       श्रीनिवास राजपुरोहितने टेबलवरची घंटी वाजविल्या बरोबर केबिन बाहेर उभा असलेला गोवर्धन केबिन मध्ये पोहोचला.                                                 " दोन चहा पाठव!".

         "रागिनी मॅडम चहा घेत नाही"! गोलू उत्तरला. " साहेब कॉफी आणु दोन?"

 

 "हो पण लवकर "                               बॉसने हुकुम सोडला.

ऑफिस मध्ये सगळा जूना स्टाफ होता.

त्यामुळे गोवर्धनने रागिनीशी ओळख वाढवली  आणि मग कधी टिफिनच्या निमित्ताने तर कधी चहाच्या निमित्ताने श्री व तिला एकत्र आणायला सुरुवात केली. तिघांचीही छान मैत्री झाली. त्या दिवशी श्री व गोलु कापड दुकानाच्या पायऱ्या चढताना  त्याचं लक्ष समोर गेलं, आणि  ते दोघेही खालीच थांबले.

    रागिणी  दोन रंगाच्या साड्यांचे पदर खांद्यावर  घेत साडीच्या दुकानाच्या दारात उभी होती. दोन पैकी कुठली साडी  छान दिसते आपल्या अंगावर या द्विधा मनस्थितीत असतानाच  रागिनीच लक्ष समोर गेलं.        श्री ने उजव्या खांद्यावरच्या गोल्डन साडी कडे इशारा करून 'खूप छान' असा बोटांनी इशारा केला. ती आत जाताच  ते दोघेही माघारी वळले  .

रागिनीने साडीपॅक ‌करायला‌ लावली.

दुसऱ्या दिवशी रागिनी तीच साडी नेसून ऑफिसला आली. श्री मनात खूष झाला.

          "श्री, तुझं ऐकले रे रागिनीने,  पण बॉसही जरा जास्तच खुश दिसतो  रागिनीवर .तीन महिन्यातच इन्क्रिमेंट!".

         " जाऊ दे रे आपल्याला काय कामापुरतं पगार मिळतो ना  !" 

 

    ‌ " अल्प समाधानी आहेस श्री तु!"

 

    गोलूच लक्ष सारखं रागिणीकडे असायचं , त्याला कळून चुकलं  बॉस रागिनीला काही काम नसतानाही उगीच केबिनमध्ये बोलवतो .

                "    मला रागिनी सारखी वहिनी मिळाली तर ?" गोलू श्री च्या कानात पुटपुटला..

 

             "बघ ना मग प्रयत्न करून कुणासाठी बघतोयस ते !" श्रीने फाईलमधलं डोकं वर् न करताच म्हटलं.

 

                 "तुझ्यासाठी…. पण तुला वेळ मिळेल तर त्या दृष्टीने तिच्याकडे बघायला !"

 

" तुला माहित आहे ना माझ्यावर किती जबाबदारी आहे, बाबांच आजारपण,विवेकच शिक्षण, अलकाच लग्न….!"

 

"मग काय तु कुवॉंराच राहणार आहेस की काय ,अरे तिच्याशी लग्न झाल तर डबल इन्कम येईल तुझ्या घरी!"

 

 "माझी जबाबदारी मला कोणावर ढकलायची नाही !"श्रीने त्याला सौम्य आवाजात फटकारले.

 

  आज रागिनी जरा खुशीतच घरी आली. "मावशी आज मला इन्क्रिमेंट मिळालं, पगार वाढला माझा"                                       .

        "राणी अगं नोकरी लागली आता तरी लग्नाचं मनावर घे"

 

" मावशी अगं माझ्या मनासारखा मुलगा मिळाला की  चढेन मी बोहल्यावर!"                           बोलता बोलता रागिनीच्या डोळ्यासमोर श्रीनिवास राजपूतरोहितची प्रतीमा येताच ती लाजली.  'किती अदबीने वागतो आपल्याशी ,कामात चूक झाली तरी  हसत मुखाने शांतपणे समजावून सांगतो.' पण त्याच्यापर्यंत माझ्या मनातल्या  भावना कशा पोहचणार?'. 

 

 ‌‌ तिने गोलू ची मदत घ्यायचं ठरलं .

 " गोवर्धन माझं एक काम करशील?".

 "बोला रागिनी मॅडम  तयार आहे मी!" ‌‌. 

 "माझं एक खाजगी काम आहे". 

'ओ'! गोलुने तोंडाचा चंबू करत आश्चर्य व्यक्त केलं.

                रागिनीने धडधडत्या अंतकरणाने पर्समधून एक चिठ्ठी काढली. त्याच्या हातात देत म्हणाली ,

" हे पत्र ऑफिस सुटल्यावर  श्रीनिवास राज….

तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच "गोवर्धन" म्हणून कुणीतरी आवाज दिला आणि चिठ्ठी खिशात ठेवत,गोलु आवाजाच्या दिशेने  पळाला. त्याच्या कानावर फक्त गोवर्धन राज.. एवढेच ऐकु आलं होतं

दाराबाहेर जाऊन त्याने चिठ्ठी वाचली.

 मनाशीच खुश होत " पोरगी पटली रे पटली" म्हणत श्रीकडे आला. त्याच्या कानात फुसफुसत म्हणाला,

 ‌ " श्री, अरे  रागिनीने तुझ्यासाठी चिठ्ठी दिलीयं ,बागेत बोलवलयं भेटायला सायंकाळी ऑफिस सुटल्यावर ,शेवटी काम जमलं म्हणायचं !'

 

श्री ही मनात खूप झाला पण वरकरणी तसं न दाखवत म्हणाला "मला कशाला देईल चिठ्ठी अजूनही आहेत  आपल्या ऑफिसमध्ये स्मार्ट लोक!"

       " श्री, तुझ्या मनात आहे ना ती,जरा धीटपणा दाखवं माघार घेऊ नकोस !" 

 

    ऑफिस सुटल्यावर सायंकाळी श्री गोलू सोबत बागेत पोहोचला. रागिनी  बाकावर बसून सारखी घड्याळाकडे लक्ष ठेवून होती  कुणाची तरी अधीरतेने वाट बघत .

  गोलुने श्रीला बाजूला थांबवले आणि तो एकटाच तिच्यासमोर उभा जाऊन उभा राहिला.                          " आला नाही अजून श्रीनिवास?" ‌.

 

      "नाही ना केव्हाची वाट बघतेय मी!"

 गोलुने श्रीला तिथे येण्याचा इशारा केला.रागीणि त्याच्याकडे बघून फक्त हसली.  

"  गोलु तु श्रीनिवास सरांना  चिट्ठी  दिली होतीस नं ? "         ‌                                 बॉस व श्री दोघांच्याही 'श्रीनिवास' नावामुळे झालेला घोटाळा गोलूच्या व श्रीच्या लक्षात आला.                                                              "हो ,हो दिली होती ना, पण वाचली की नाही कुणास ठाउक!"   गोलु  चेहऱ्यावरचा गोंधळ लपवत म्हणाला.

 

" येतो आम्ही" म्हणत ते दोघे बागेतल्या एका कोपऱ्यातल्या बाकावर जाऊन बसले.                                         ' श्री ,म्हणजे ती चिठ्ठी?"

 

"गोल्या याच्यापुढे मला अशा गोष्टीत अडकवायच नाही सांगून ठेवतो!"

      "अरे यार एवढ्या लवकर हार मानलीस तू? तुझं प्रेम आहे ना रागिणीवर?"

"असं एकतर्फी प्रेम असून काय उपयोग आहे गोलु " श्री भावनावश होत म्हणाला. त्याच हृदय आतुन तुटलं होतं. 

                                          ‌   

 श्रीनिवासची राजपुरोहितची  वाट पाहून रागिनी कंटाळली आणि घरी परत आली.                                        "काय ग काय झालं एवढी नाराज काय कुणाची भेट नाही झाली का? "

 

 ‌  मावशीच्या प्रश्नाने  रागिनी दचकली. ‌

          " हे बघ राणी तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी  तूच  आहेस या जगात, मला सांगितलं तर काहीतरी मार्ग काढू "!

                रागिनीने मावशीचा हात धरला…

 

          "मावशी आमचे बॉस श्रीनिवास . दिसायला एकदम हँडसम. आवडतात मला !"

 

"आणि त्यांना? मावशीने विचारले.

 

"आवडत असावी, निदान वाटते तरी तसं"!

 

    "मग घोडं कुठे पेंड खातं ?" 

      ‌         " ते जरी माझ्याशी आपुलकीने बोलत असले तरी त्यांच्या मनात काय चालू आहे हे कळायला मार्ग नव्हता म्हणून मी त्यांना बागेत भेटायला बोलावले होते पण भेट झाली नाही .  

                                        ‌‌ ‌       

     श्रीनिवास राजपुरोहितही काही मागे नव्हता . त्यांनी रागिणीवर डोरे टाकयला सुरुवात केलीच होती. एक दिवस श्रीनिवास राजपुरोहित स्कूटर घेऊन रागिणीला भेटायला आला.येतांना मावशीसाठी साडी आणली रागीणीला घेऊन सिनेमाला गेला. श्रीनिवासचा भपकेबाजपणा, त्याचं स्टायलिश राहाणं रागिणीला भुरळ घालत होतं.

 

  "रागिनी श्रीनिवास राजपुरोहित तुझ्यासाठी योग्य आहे.परिस्थीतीने चांगला आहे अगदी सुखात ठेवील तो! मी भेटून येते त्याच्या घरी".

 

   त्या दिवशी श्रीला ऑफिसमध्ये गैरहजर पाहून रागीणिने गोलूला विचारले, "काय रे श्री का नाही आला?".

        ‌ "त्याच्या बाबांना बरं नाही. जायचं का  त्याच्या घरी ?" गोलू ने खडा टाकून पाहिला!

 

" जाऊया "! आणि सायंकाळी ऑफिस सुटल्यावर रागिनी आणि गोलु श्रीच्या घरी पोहोचले.

साधं दोन खोल्यांच घर होतं श्रीच.आई, आजारी असणारे बाबा, कॉलेजमध्ये शिकणारी बहीण अलका आणि  भाऊ विवेक. रागिणीला बघून श्री ला व त्याच्या घरच्यांना खूप आनंद झाला.   

रागिनीने आपल्या मधुर बोलण्याने आणि सालस वागण्याने श्रीच्या घरच्यांच्या मनात घर केलं.

  "श्री, अरे रागिणीचा वाढदिवस आहे इतक्यात!   ‌.                                       "अच्छा"! गोलू च्या सांगण्याने श्रीच्या चेहऱ्यावर खुशी  झळकली.वाढदिवसाच्या  सायंकाळी ऑफिस मधून घरी जाताना श्रीने एक छानसा  पुष्पगुच्छ खरेदी केला आणि  तो रागिणीच्या घरी पोहचला.

   "श्री तु? ". 

                "हो,आज तुझा वाढदिवस, लक्षात आहे माझ्या"

      श्रीने हातातला निशिगंधाचा पुष्पगुच्छ तिला दिला.  "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"

            रागिनीने पुष्पगुच्छ स्वीकारला. निशीगंधांच्या फुलांचा सुवास दरवळत होता. तिने तो पुष्पगुच्छ नाकाजवळ नेला. डोळे बंद करून एक दिर्घ श्वास घेतला.तिचा चेहरा पूलकित झाला आणि त्या सुवासाने तिच मन मोहरून गेलं. 

 

  " रागिणी, अग कोणाशी बोलतेस?   श्रीनिवास बरोबर आज बाहेर जाणार होतीस ना?"

"अगं मावशी हा 'श्री' आमच्या ऑफिसला असतो!"

 

"हो का? रागिनीच लग्न जमलयं, श्रीनिवास राजपुरोहितांशी !"

आणि श्रीवर बॉम्बच पडला.

"अभिनंदन" त्याने उसनं हसू चेहऱ्यावर आणत  म्हटलं आणि 

  निरोप घेतला .

 

"किती साधा वाटतो गं हा,मनाने अगदी निर्मळ"! 

"हं! असा हुंकार भरत रागिनीने पायात चपला सरकवल्या.        "मावशी येते"

  खुशीतच टॅक्सी पकडून रागिनी श्रीनिवास येणार त्या हॉटेलला पोहोचली.

 

" अगं किती उशीर राणी! केव्हा पासून वाट बघतोय मी! दोन कप कॉफी पिऊन झाली माझी. मावशीने सांगितलं आज तुझा वाढदिवस आहे.  पण तू इतकी साधी साडी नेसून का आलीस? आता आमच्या स्टेटसला शोभेल असं वागायला हवं तु! आईने बघितलं तर काय म्हणेल ती! चल मी तुला नवीन साडी घेऊन देतो!"

  'आपल्या येण्यानेच श्रीनिवासला खूप आनंद होणार तो काहीतरी गिफ्ट देणार आपल्याला' अशा विचारात असतानाच श्रीनिवासच बोलणं ऐकून  रागिनी हिरमुसली.

 घरी येऊन बघते तर मावशीचा पाय प्लास्टरमध्ये.

        "मावशी अगं काय झालं?"

"  तुझा वाढदिवस म्हणून काहीतरी भेटवस्तू आणायला  मार्केटला चालले होते आणि त्या मेल्या स्कूटरवाल्याने मला धक्का दिला. श्री गर्दी बघून आला मला ओळखल आणि   दवाखान्यात घेऊन गेला म्हणून बर  झा ल "

        दुसऱ्या दिवसापासून अलका, मावशीसाठी काही ना काही खायला घेऊन येऊ लागली. दिवसभर तिच्याजवळ राहायची. येताना श्री, रागिनी सोबत येऊन मावशीच्या तब्येतीची चौकशी करायचा.

    "मावशी ,अहो  रागिणीच लग्न जवळ येत चाललं काही काम असेल तर सांगा !"

 "श्री, अरे पत्रिका छापायचीय देवाजवळ ठेवायला हवी.                                मावशीने श्रीला मजकूर  व लग्नाच ठिकाण सांगितले.                                          लग्न नागपूरला न ठेवता आंध्र प्रदेश मधल्या एका गावातल्या मंदिरात  ठेवल्याच श्रीला आश्चर्य वाटलं.

 

"श्री अरे  सगळी तयारी श्रीनिवासच  करणार आहे. त्याच्या आत्याची इच्छा आहे की श्रीनिवासच लग्न तिकडे व्हावं, आम्ही मावशालेकी फक्त सोबत जाणार.."

श्री ने गोलुला सांगितल्यावर त्यालाही आश्चर्य वाटलं.

"श्री, मला वाटते हा श्रीनिवास राजपुरोहित वाटतो‌ तसा सरळ  नाहीये बघायला पाहिजे, शेवटी रागीणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे  !"

           गोलुने श्रीनिवासची  माहिती काढायला सुरुवात केली आणि त्याला कळलं श्रीनिवासची कोणी शलाका नावाची गर्लफ्रेंड आहे.तो लगेच शलाकाला जाऊन भेटला..

"मी गोवर्धन, श्रीनिवास साहेबांच्या ऑफिस मध्ये काम करतो.श्रीनिवास साहेब लग्न करताहेत रागिनीशी !" ‌.

 

 त्याच बोलणं एकताच शलाका रागाने लाल झाली, " कसं शक्य आहे परवाच तर भेटलो आम्ही!"       गोवर्धनने तिला सगळी हकीकत सांगितली.                              "म्हणजे प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसऱ्या मुलीशी, बघतेच कसा करतो श्रीनिवास माझ्याशिवाय दुसऱ्या मुलीशी लग्न, मी माझ्या भावांना सांगते..!"

    गोवर्धनच  काम झालं होतं..

लग्नाची तारीख जवळ आली. श्रीनिवास व त्याच्या आईसोबत रागिणीने लग्नाची खरेदी केली. पण मावशीचा पाय फॅक्चर झाला तरी श्रीनिवास किंवा त्याची आई मावशीला भेटायला आली नाही ही गोष्ट रागिणीला खटकत होती. पुढे कसं होईल मावशीचं ?'

ती श्रीनिवास राजपुरोहितच वागणं आणि  श्रीचा साधेपणा, मदत करण्याची प्रवृत्ती, त्याच्या घरच्यांचा प्रेमळ स्वभाव आठवू लागली.नकळत रागिणीच मन दोघांमध्ये तुलना करू लागलं. तिच्या मनामध्ये श्री सोबत घालविलेल्या सगळ्या आठवणी पिंगा धरू लागल्या. साध्या साध्या गोष्टीतून तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणारा श्री, प्रत्येक वेळी मदतीला धावून येणारा श्री! त्याने  वाढदिवसाला दिलेल्या  निशिगंधाचा  मंद सुगंध तिच्या मनात दरवळला.

   ‌‌          "श्री चा विचार करतेस राणी? मलाही श्री आवडतो,पण श्री वर जवाबदारी आहे. तुमच्या राजा राणीच्या संसाराला तिथे जागा नाही. सतत तुला त्या घरासाठी झटावं लागेल. परवा फॅक्चर निघालं की जाउ त्याच्या घरी  !"

       "श्री ची आई, अहो लग्न  आंध्रमध्ये करायच ठरवलयं नवऱ्या मुलाने, मी आणि रागिणी दोघीच जणी जाणार, तेव्हा आताच आशीर्वाद द्या रागिणीला , उद्या निघु आम्ही  !"

   श्री च्या घरच्यांचा निरोप घेऊनत्या दोघी आपल्या घरी पोहोचल्या. दारात त्यांची वाट बघत शलाका उभी होती.

    " काय रे  श्री आज जेवन का जात नाहीये तुला ?तुझं  प्रेमबिम तर नाही  रागिणीवर , अस्वस्थ दिसतोय?

            " काहीतरीच काय, आई तिला तिच्या मनासारखा मुलगा मिळालाय सुखात राहील ती!"                         

 

"श्री अरे पैसा म्हणजे सगळ काही नसतं. मला तुझ्या डोळ्यात तिच्याविषयी काही वेगळेच भाव दिसताहेत!

 

"  आता ती दुसऱ्याची झालीय!"श्रीने थंड स्वरात म्हटलं.

 

"अजुन व्हायचीच ! मला गोलुने सर्व सांगितलयं ! प्रेम‌ करतोस‌ न तिच्यावर मग हातावर हात देऊन बसुन काय राहीलाहेस! प्रेमवीरासारख  प्रेमासाठी वाटेल ते करायची तयारीठेव  ,जा थांबव तिला आणि लक्षात ठेव रागिणीला माझी सून म्हणून घरी  घेऊन आल्याशिवाय  घरात पाऊल टाकायचं नाही."

    रात्रीच‌ श्री रागिणीच्या घरी पोहोचला. तिच्या घराला कुलूप. शेजाऱ्यांनी सांगितलं कुणाच्यातरी गाडीत बसून गेल्या त्या दोघी.तो लगेच तो रेल्वे स्टेशनवर आला. आंध्रकडे जाणारी गाडी नुकतीच गेली होती. रिक्षा करून तो गडबडीने एसटी स्टँड वर पोहोचला.  आंध्र मधल्या त्या गावापर्यंत पोहोचायला एकही गाडी नव्हती. तुटक तुटक प्रवास करावा लागणार होता.नागपुर पांढरकवडा गाडी दिसताच तो गडबडीने बस मध्ये चढला. बसमध्ये खूप गर्दी होती. पांढरकवड्यापर्यंत जायला रात्री तीन वाजले.  कशीबशी रात्र काढुन तो पहाटेच्या पहिल्या गाडीत बसला .बस फास्ट चालली होती आणि अचानकपणे पंक्चर होऊन ती  कलंडली, सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले. श्री कसाबसा त्या गर्दीतून वाट काढत बसच्या बाहेर आला.श्रीचा जीव वर खाली होऊ लागला . अकरा वाजताचा मुहूर्त आहे त्याआधी आपण त्या लग्न ठिकाणापर्यंत पोहोचायला हवं नाहीतर अनर्थ होऊन जाईल. रस्त्याने जाणाऱ्या एका फोर व्हीलरला  त्याने हात केला. श्री त्याच्यात बसला आणि गाडी पुढे निघाली पण त्या गाडीत काही बदमाश पोरं होती. ती पोर श्री कडे बघून काहीतरी बोलत होती. 

त्यांची  तेलगु भाषा श्रीला कळत नव्हती. पण श्रीला एवढे कळले की ते पैशाची मागणी करत आहेत. त्याने खिसा चाचपला पण हाय अरे देवा खिशात पैशाच पाकीटच नव्हतं. त्यांनी श्रीच्या बोटातली सोन्याची अंगठी काढून त्याला कारमधून रस्त्याच्या कडेला ढकलून दिले.श्रीच्या घशाला कोरड पडली. जवळच माडाचे झाड होते. त्यावर बसलेल्या माकडाला श्रीने दगड दाखवताच त्याच्या हातातून माड खाली पडला.श्रीने माड खाऊन तहान भागवली. दुसरं वाहन येण्याची वाट बघता बघता जवळजवळ एक तास निघून गेला तेव्हा कुठे  एक सिक्ससीटर गाडी येतांना दिसली. गाडी  प्रवाशाने गच्च भरुन होती. श्री कसाबसा गाडीच्या दरवाजाला धरून उभा राहिला आणि  श्रीचा प्रवास सुरू झाला. आत बसलेल्या प्रवाशांचे आपसातच काही कारणावरून भांडण सुरू झाले. भांडण इतके विकोपाला गेले की त्या सिक्ससीटरवाल्याला गाडी थांबवावी लागली. प्रवाशांचे भांडण काही मिटत नव्हते आणि ते गाडीलाही पुढे जाऊ देत नव्हते. चौकशी अंती श्रीला कळले इच्छित ठिकाणी पोहोचायला फक्त एक तासाचा रस्ता होता.त्याने एका स्कूटरवाल्याला लिफ्ट मागितली.  स्कूटरवर बसून तो निघाला पण हाय रे देवा त्याचं दुर्दैव. स्कूटर मधलं पेट्रोल संपलं. श्रीला घाई असल्याने कुठल्याही वाहनाने त्याला लग्न असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचायचं होतं .त्याच्या नशिबाने समोरून एक टांगा येताना दिसला. टांग्यात बसून श्री निघाला. श्री ने आपली व्यथा टांगेवाल्याला सांगितली. टांगा सुसाट निघाला, मुहूर्ताची वेळ होत आली होती. कसेही करून वेळेत मंदिरापर्यंत पोहोचायचं होतं. श्रीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून टांगेवाल्याने घोड्याला चाबकाने हाणायला सुरुवात केली.घोडा वेगात पळायला लागला पण थोड्याच वेळात टांग्याचे   चाक निसटले.  श्री व टांगेवाला दोघेही खाली आपटले. टांगेवाल्याने नुकसान भरपाई मागीतली. श्री कडे पैसे नव्हते. "माझे पैसे दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही" टांगेवाला श्रीला म्हणाला.                                                                                  श्री हताश झाला होता पण त्याच्या डोळ्यासमोर आई आली आणि तिचे आणि बोल आठवले. "प्रेमासाठी वाट्टेल ते"!                                                           टांगेवाल्याची  आपल्याकडे पाठ आहे बघुन श्रीने घोड्याचा लगाम पकडून टाच मारली आणि तो घोड्याला घेऊन पळू लागला. टांगेवाल्याचे लक्ष जाताच त्याने  घोड्याकडे बघून शिट्टी मारली. त्याबरोबर घोडा माघारी वळून टांगेवाल्याजवळ आला.                                  

 श्री ने गयावया करत हात जोडले.

   घोड्यावर बसून टांगेवाला आणि श्री मंदिरापर्यंत जाऊन पोहोचले. आतून मंगलाष्टकाचा आवाज येत होता. पण त्या मंदिराला पायऱ्याच नव्हत्या आणि वर चढायला शिडी पण नव्हती.                                                                          'सगळं संपलं 'म्हणून  निराश झालेला श्री गुढग्यात डोकं खुपसून खाली बसला. टांगेवाल्याने आपला घोडा बाजूला उभा केला. तितक्यात कुठून तरी दोन-तीन गुंड आले आणि त्यांनी श्रीला बेदम मारायला सुरुवात केली. टांगेवाला घोडा तिथेच ठेवून पळून गेला.श्री निपचित पडला. थोड्यावेळाने मंदिराला शिडी लावण्यात आली. श्रीनिवास राजपुरोहित डोक्यावरून पदर घेतलेल्या नवरीसह खाली उतरला.  श्री धडपडीने उठला. नवरीचा हात पकडला तिला घोड्यावर बसवून तोही चढला आणि घोड्याला टाच दिली. घोडा पळू लागला.त्यामागुन श्रीनिवास,गुंड व बाकीचे धावत निघाले. इथे श्रीच्या नशीबाने साथ सोडली. समोर नदी आडवी येताच घोड्याने खिंकाळून आपली असमर्थता प्रकट केली .मागोमाग धावत आलेल्या गुंडांनी पुन्हा श्रींला खाली ओढून मारायला सुरवात केली.                                                 श्रीनिवास राजपुरोहित नवरीचा हात पकडून श्री कडे विजयी नजर टाकत कार मध्ये बसला. त्यांच्यासोबत रागीणीची मावशीही होती.कार दिसेनाशी झाली.

टांगेवाला श्री चा हात धरून उठवायला गेला, श्री जोरात विव्हळला त्याचा एक हात फॅक्चर झाला होता. टांगेवाल्याला त्याची दया आली.फॅक्चर झालेला हात गळ्यात अडकवून थकल्या भागल्या शरीराने श्री कसाबसा घरी पोहोचला. 

 त्याला पहाताच आईने विचारले , हे काय तु एकटाच ? रागिनी कुठे आहे? 

         ‌श्रीत उभे राहण्याचे ही त्राण नव्हते. तो बाहेरच पायरीवर बसला.   घरी निघाल्यापासून ते लग्नापर्यत व गुंडांनी मार खाण्यापर्यंतची सगळी हकीगत त्याने आईला सांगितली.

 

 " तुझ्यात एवढाही दम नाही आपल्या बायकोला परत आणण्याचा? चल घरात! .            आई दरडावले.   

     "तुझ्या पेक्षा माझी सुन बरी!" आईच्या  वाक्याने श्री चमकला. रागिनी ओठ मुडपून हसत होती.                                                                                       "मग, मग मावशीसोबत 'ती' नवरी मुलगी कोण होती डोक्यावरून पदर घेऊन तोंड झाकलेली?

  " श्री शलाकाने  श्रीनिवास  विषयी सर्व सांगताच मावशी व  शलाकाच्या भावांनी प्लान तयार केला. मावशी माझ्या ऐवजी शलाकाला घेऊन तिथे पोहोचली.मावशीने शलाकाला डोक्यावरचा पदर काढून दिला नाही. मावशी सोबत मीच आहे या भ्रमात  श्रीनिवास होता."   रागिणीने हसत हसत सांगितले.

 

" अगं पण मग त्या गुंडानी मला का मारलं?

                                                   "श्री शलाका आणि तिचे भाऊ नक्कीच लग्नात विघ्न आणणार  हे श्रीनिवासला माहीत होत!"

 

 "पण काही म्हणा श्रीच्या प्रेम कहाणीचा "हॅपी एन्ड झाला" गोलू पेढ्याचा बॉक्स हातात घेऊन येत म्हणाला…

 

"गोल्या लेका माझा बेस्ट फ्रेंड असून तु या सगळ्यात सामील होतास!"

 

" वश्या प्रेम तू केलंस, रागिनी बरोबर संसार तुला करायचा आहे, मग "प्रेमासाठी वाटेल ते"  करून दाखवण्याची जबाबदारी तुझीच !"

 

 

 

***********************************

 

 

 

 

  

 

 

 

 

 

 

 

           

 

 

 

            

  

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू