पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

समुद्र आणि गोष्टी



फेसाळलेल्या पाण्यातून अलगद पावले उचलून टाकावीत, पायाखालची वाळू अलगद निसटावी, वाळू सरकताना सहज समोर लक्ष जावं, आकाश विविध रंगांनी नटलेलं असावं, सूर्य आपली शिफ्ट संपवून निघायच्या मार्गात असलेला आणि आपण मात्र हात पसरून दीर्घ श्वास घेऊन कवेत घ्यावी ती सकारात्मकता! हे वर्णन सार्थ ठरवेल ती जागा म्हणजे समुद्र!!


सध्या सगलीकडचे समुद्र कसे लोकांनी, पर्यटकांनी गजबजलेले आहेत. लांबून पहावं तर किड्यामुंग्यांसारखी माणसं दिसतात. म्हाताऱ्या आजी आजोबांची मात्र पंचाईत झालीय. रोज जाणारा ग्रुप कसा मोकळेढाकळे पणाने हिंडतफिरत होता. आता जराशी अडचणच आली. तेवढ्यात आजोबा लोकांच्या ग्रुप च्या म्होरक्या चं वाक्य कानावर पडलं,"चालता येत नै हो नीट! कुठे ही तरुण पोरं वेडीवाकडी फोटो काढत असतात, काय ती त्यांची शूटिंगं सुरू असतात. तंगडीत तंगडी अडकते अगदी!"


"नई तर काय! काल या पोरांचा ग्रुप वाकडा वाकडा होत आला. फोटो काढत होते. रीळ कायसं म्हणत. करतोय असं. मेले रीळ करणार. विकत घ्या बाजारात जाऊन!" लगेच दुसऱ्या एका आजोबांनी री ओढली.


हशा पिकला.


"अरे रील रील असेल ते. आमचा नातू म्हणतो म्हणून माहिती हो!" म्होरक्याचं उत्तर.


"असेल असेल!"


समुद्रात अक्षरशः मनसोक्त डुंबणारी मुलं बाळं, एकूणच सगळे कुटुंबातले लोकं यांच्याकडे मी कुतूहलाने बघत होते. आपलं वय, ताण, जबाबदाऱ्या विसरून कसे मस्त मज्जा करत होते. एवढ्यात एका गृहस्थांनी लक्ष वेधून घेतलं. एकटेच पाण्यात चक्क फतकल मांडून बसलेले. अगदी स्तब्ध पणे चालत थोडं पुढे गेले. मग काय वाटलं कोण जाणे दोन चार मोठाल्या लाटा खाऊन आले मागे. जरा लाटांना घाबरलेच असावेत.मग येऊन जे बसले मंडी घालून. गणपतीच जणू! छे! इकडचं तिकडे व्हायला तयार नाही! फतकल मावशी अगदी! त्यांना जणू सांगायचं होतं मी हा आहे हा असा आहे लाटेला यायचं तर येऊदे, माझवरून जाऊदे. मी सुरक्षित ठिकाणी येऊन बसलेलो आहे! चेहऱ्यावर एकसारखं असलेलं त्यांचं स्मित कसल्यातरी दुःखाची जाणीव करून देत होतं. पाण्याच्या लाटेबरोबर ते एकसारखं येत जात होतं बहुधा! 


इकडे बायका पोरांचा ग्रुप चटया बिटया अंथरून भेळ करायला बसलेला होता. फरसाण नी पापड्यांचा खुराक सुरू करून भेळ करणाऱ्या बाईचं डोकं भंडावून सोडलेलं अगदी पोरांनी! "चल तुझे हात वाळूत पुरतो, झटका देऊन तू हात बाहेर काढून दाखव", हा भयानक खेळ आता लहान मुलांच्या अंगाशी यायला लागलेला.  वाळूत हात अडकलेल्या पोरीने जो तारसप्तक लावला की ते संथ पाण्यात बसलेले गृहस्थही वळून वळून बघायला लागले की झालं काय बा! भेळ करणारीने भेळ ढवळायचा हात काढून पळीसकट पोरांच्या मागे धूम ठोकली. आता वाळूच्या खेळाने वेगळंच वळण घेतलं. सुदैवाने लहानगीचा सूर खाली आला नी भेळेची वाट मोकळी झाली. भेळेचा चटकदार कार्यक्रम आणि समोर दिसणारा सूर्यास्त, फोटोग्राफर ला उत्तम फ्रेम मिळावी असं दृश्य दिसलं अगदी.


समुद्रात डुंबून आलेली माणसं ही खाऱ्या शेंगदाण्याप्रमाणेच! खारट! चाट वाल्यासमोर गर्दी करून उभी होती. चाट बनवणाऱ्याचे हात एखाद्या यंत्रागत सुरू होते. पर्यटक काकू पाणी पुरी बास म्हणायला तयार नाही! जणू पाणीपुरीची स्पर्धा सुरू होती.बराच वेळ रेंगाळलेले लोकं दुसऱ्या चाट वाल्याकडे निघाले शेवटी. एका चिमुरडीचे वडील मुलीला पाणी पुरी खाऊ घालत होते. चिमुरडी भराभर आ करे, बाबा म्हणाले शेवटी "आता कसा मोठा आ होतो  तोंडाचा? पोळी भाजी खाताना तोंड उघडत नई,नई?" तिने फक्त हसून दाद दिली! वर पुऱ्यांकडे हात दाखवत अजून द्या साठी इशारा केला! हुश्शार नव्हे?


सूर्य अस्ताला जात होता. मोठी माणसं पोरांना पाण्याबाहेर काढताना अगदी थकून गेलेली दिसत होती. पाच मिनिटं पाच मिनिटं करीत तास व्हायला आलेला आता. शेवटी गाडी चा हॉर्न वाजला तसे चपापले सगळे. निघाले वाटतं आपल्याला टाकून, असं वाटून आले बाहेर यायला लागले सगळे. पायाला चिकटलेली वाळू साफ करणे हा मोठा टास्क घेऊन लोकं निघाली! 


वाळूत उमटलेली पावलं, हार्टात लिहिलेली नावं, काठ्यांनी ओरखडे काढत काढलेली चित्र, शंख शिंपले एवढीच आता सोबत काय ती समुद्राची!.....उद्यापर्यंत! मग आहेच पुन्हा..नवी माणसं, नव्या कथा आणि साक्षीला समुद्र!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू