पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एकाकी वृद्धत्व

एकाकी वृध्दत्व..!


          वयाची पन्नाशी ओलांडली की माणसाला त्याच्याही नकळत दिसू लागणारी वृध्दत्वाची वाट खुणावू लागते . आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी कधी लवकर तर कधी उशिराने या वाटेवरून प्रत्येकाला मार्गस्थ व्हावेच लागते. ओसरत जाणारे तारुण्य, पिकलेले केस,अधू झालेली दृष्टी,तोंडात येणारी कवळी, थकलेले शरीर, या साऱ्या वृद्धत्वाच्या खुणा भेडसावू लागतात मनास..! 

परंतु आजकाल या साऱ्या गोष्टींबरोबरच आणखी एक गोष्ट बहुतेक जणांना भेडसावते ती म्हणजे उतार वयातील एकाकी पणाची..

        व्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच मिळालेले आर्थिक स्वावलंबित्व त्यातून अधिकच प्रबळ झालेली स्व ची जाणिव, अतिशय संकुचित अन् स्व केंद्रित झालेल्या जाणिवा व जीवन.., थिजलेल्या संवेदना यामुळे घरातील वृद्धांची उपयोगिता संपताच होणारी अडचण अन्  त्यांच्या झोळीत टाकलेले एकाकीपण सारे काही हृदय द्रावक असे आहे. मन सुन्न करून टाकणारे आहे. आज अनेकांच्या पदरी हेच एकाकी पण येत आहे. जनरेशन गॅप मुळे येणारी वैचारिक मत भिन्नता

ही वैचारिक उंची वाढवून दूर केली जाऊ शकते. पण उंचवणाऱ्या आर्थिक स्तरापुढे वाचारिक उंची खुजी ठरते. वृध्द आई बापाची जबाबदारी अलगद झटकली जाते. आज कित्येक घरात एकाकी पणाचा शाप मिळालेले अनेक वृध्द माणसे बघितली की मन हेलवते. 

  बिचारे प्रेमाच्या ओलाव्या अभावी सुकत चाललेल्या रोपट्यासारखे मलूल  होऊन बसलेले असतात. डोळ्याच्या पापण्या आड मिटली गेलेली  स्वप्ने  प्रयासाने रोखून धरल्या आसवासोबत थिजून गेलेली असतात जागच्या जागी.. सर्वांवर भार झालेल्या आपल्या जीवनाचे ओझे कसेबसे पेलवून धरत , बळेच कोणत्यातरी गोष्टीत आपला जीव रमावण्याचा निरर्थक प्रयत्न करत,न उलगडणारे कोडे बनलेल्या आपल्या जीवनाचा हिशेब करत, आपल्या माणसांची, त्यांच्या प्रेमाची लागून राहिलेली आस लपवत ,नामस्मरणाचा आधार घेत वृध्टवाचा शाप भोगत असतात बिचारे..!! 


       अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही असे म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतले पाहिजे. बऱ्याचदा आर्थिक स्वावलंबित्व , निसर्ग कृपेने उतार वयातही टिकून राहिलेली चांगली तब्येत या सर्व गोष्टीच्या जोरावर  अनेक घरातील वृद्ध व्यक्तीमध्ये अहंभाव जोपासला जातो अन् ते घरात स्वत:चाच  हेका चालवत सामोपचार टाळतात. त्यामुळेही एकाकी पण त्यांच्या वाटेला येते. कारण कोणतेही असो पण वृद्धांच्या वाटेला येणारा एकाकी पणा असह्य करणारा आहे. 

         पूर्वीच्या काळी सूना नातवंडे यांच्यात रमताना वृद्धत्व सुसह्य व्हायचे.मतभेद तेव्हाही असायचे पण ते लगेच मिटले जाऊन संसार रेषा दुभांगण्या आधीच सांधली जायची.त्यामुळे घर टिकून रहायचे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे वाट्याला येणाऱ्या ,आलेल्या एकटे पणाच्या शापापेक्षा मृत्यू बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे.जोडी दाराच्या मृत्यू नंतर तर हा एकाकी पणा  खरोखरच जीवघेणा ठरतो.  मानसिक आरोग्य बिघडते.   माणसां अभावी ओस पडलेली अनेक घरे जीव नसलेल्या संगाड्यासारखी भासतात.अगदी चैतन्य हीन..अन् हेच घर बांधण्यासाठी या घरातील वृद्धांनी अनेक कष्ट सोस लेले असतात. अनेक स्वप्न बघितलेली असतात. या परिस्थितीला कारणीभूत कोणीही असो पण मनात विवेक अन् संवेदना जागवत ठेवून कोणीतरी एकाने पडती बाजू घेत माणसे जपली पाहिजेत. तीच खरी संपत्ती आहे.एकाकी पणाचा शाप लाभलेल्या वृद्धांच्या पदरी सूना, मुले,नातवंडं यांचे प्रेम दिले तर ते भरून पावतील. त्यांच्या मनाने दिलेल्या आशीर्वादाने आपल्या पुढ्यात उभे असणारे आपले म्हातारं पण देखील सुसह्य होईल . एकटे पणाच्या शापातून मुक्त होईल...!


✍???? सौ. दीप्ती समीर कुलकर्णी...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू