पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भक्तिमार्ग

ज्ञानमार्ग व भक्तीमार्ग अशा दोन पद्धतीने ईश्वरोपासना करता येते. या दोन्ही उपासना पद्धती एकमेकापासून कशा वेगळ्या आहेत ते पुढील प्रमाणे सांगता येईल. क्लेशोऽधिकतरस्तेषांअव्यक्तासक्तचेतसाम्।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ।।
गीता (१२.५)
याचा अर्थ अव्यक्ताच्या ठिकाणी चित्ताची (मनाची) एकाग्रता करू पाहणाऱ्यास फार कष्ट किंवा क्लेश होतात; कारण देह, इंद्रिये धारण करणाऱ्या मनुष्यासही अव्यक्त गती प्राप्त करून घेणे निसर्गतः कष्टप्रद असते; म्हणूनच बुद्धीने एकदा परब्रह्माचे व्यक्त सगुण देहधारी असे स्वरूप मान्य केल्यास त्या ठायी केवळ विचाराने मन स्थिर करणे सहज शक्य होते. आपोआपच श्रद्धेबरोबर श्रद्धेय स्थानाबाबत प्रेम उत्पन्न होते.
श्रद्धेय स्थान अव्यक्त व केवळ बुद्धिगम्य असेल तर अशा श्रद्धेय स्थानासाठी केलेल्या उपासनेस अव्यक्तोपासना, अध्यात्म विचार किंवा ज्ञानमार्ग असे म्हणता येईल आणि जर श्रद्धेय स्थान सगुण, व्यक्त स्वरूपी असेल, तर त्या श्रद्धेय स्थानासाठी केलेल्या उपासनेला भक्तिमार्ग असे म्हणता येईल. थोडक्यात साध्य एकच असले तरी ते गाठण्यासाठी अनुसरलेले मार्ग भिन्न आहेत. म्हणजे त्यातल्या एका सोपानाची अर्थात जिन्याची पायरी बुद्धी किंवा ज्ञान असेल; तर दुसऱ्या जिन्याची पायरी श्रद्धा म्हणजे प्रेम किंवा भक्ती असेल. या दोन्हीही मार्गास भगवद्गीतेत अध्यात्म म्हटले आहे. दोन्ही मार्ग आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत. कारण अनुभवात्मक ज्ञानावाचून मोक्ष नाही, हा सिद्धांत दोन्ही मार्गात मान्य केलेला आहे. ज्ञानमार्ग व भक्तीमार्ग यांचा साधन या नात्याने अधिकारपरत्वे भेद दाखवून दोहोंचाही अखेर निष्काम कर्माशी मेळ घालण्याचे काम भगवद्गीतेसारखे समबुद्धीने अन्य कोणत्याही धर्मग्रंथाने केलेले नाही; म्हणूनच भगवद्गीता सर्व धर्मग्रंथात श्रेष्ठ मानली जाते.
जो परमेश्वर सर्व शक्तीमान, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, असूनही आपल्याशी बोलेल, आपल्यावर प्रेम करील, आपल्याला सन्मार्गाला लावून सद्गती देईल, आपल्या सुखदुःखांचा ज्याला कळवळा येईल, जो आपले अपराध पोटात घालून आपल्याला क्षमा करील, जो आपले पित्याप्रमाणे रक्षण करील,
गतिर्भर्ता प्रभुः साक्षीनिवासः शरणं सुहृत्।
प्रभावः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्।।
( गीता ९.१८)
या गीता वचनाप्रमाणे जो माझी गती, माझा पोषण कर्ता, माझा धनी, माझा साक्षी, माझा निवारा, माझा सहारा, माझा विसावा, माझा आधार, माझा सखा, माझा कैवारी असेल; जो स्वतः उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही असेल, लेकरू म्हणून लडिवाळपणे मी ज्याचे आकलन करू शकेन असा सत्यसंकल्प, ऐश्वर्यसंपन्न, दयासागर, भक्तवत्सल, परमपवित्र, परम उदार, परमपूज्य, सकलगुणसंपन्न, करुणाकर असा परमात्मा कोणीही परमेश्वर म्हणून सहजपणे स्वीकारील. ज्याला वर नमूद केलेले सर्व गुण लागू होतात, तो प्रभु श्रीकृष्ण अर्जुनाला,
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।
(गीता १८.६६)
तुझे सर्व प्रकारचे धर्म सोडून मला शरण ये, मी तुझी सर्व पापांपासून सुटका करून तुझा उद्धार करीन; भिऊ नको. असा उपदेश करतो; तेव्हा प्रत्येकाला हा परमेश्वर आपलासा वाटतो. तो अर्जुनाशी नव्हे, तर आपल्याशी बोलतोय, अर्जुनाला नव्हे, तर आपल्यालाच उपदेश करतोय, असे वाटत राहाते. त्याच्या चरणी लीन व्हावे, त्याचा दास, त्याचा भक्त व्हावे, असे वाटत राहाते आणि सर्वांना प्रिय वाटणारा तो श्रीकृष्ण आपल्या भक्ताला त्या अज्ञात, अज्ञेय परब्रम्हाचे कोरडे न ज्ञान सांगता,
"ही सगळी माझी माया आहे, माझ्याहून निराळे असे काही नाही, मला शत्रू नि मित्र सारखेच आहेत; मी हे जग उत्पन्न केले आहे, मीच या ब्रह्माचे मूळ कारण आहे, मीच तो पुरुषोत्तम आहे;" असे आपल्या सगुण व्यक्त रूपास अनुलक्षून अर्जुनाला उपदेश करतो. आपण त्या समदृष्टी, परमपूज्य, प्रेमळ अशा पुरुषोत्तमापुढे उभे आहोत आणि तो भगवंत दयार्द्र नजरेने आपल्याकडे पाहत आहे, आपल्याला अभय देत आहे, अशी आपल्या मनात सहज भावना निर्माण होते; आपण त्याचा भक्त बनतो; त्याला भजतो, या उलट तोच प्रभु श्रीकृष्ण, अर्जुनाला म्हणतो,
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः।।"
(गीता ४.११)
"हे पार्था,जे मला ज्या मनोभावे शरण येतात, त्या भावास अनुरूप फळ मी त्यांना देतो. सर्वजण मी सांगितलेल्या मार्गाचे सर्वप्रकारे अनुसरण करतात "त्यांना मीही भजतो; म्हणजे प्रत्यक्ष उपास्यस्थानी असणारा श्रीकृष्ण स्वतः उपासक बनतो. भगवंतच भक्त बनल्यावर भक्त आणि भगवंत यातील अंतरच मिटून जाते. असा भगवंत मग भक्ताचा लाडका का नाही होणार? भगवंत प्रत्यक्ष दिसत नसूनही भक्त त्याला दगडाच्या, मातीच्या मूर्तीत बघत राहातो. दगडात, मातीत त्याला भगवंताचे रूप सापडते. त्यामुळेच कदाचित, मूर्तीची पूजा सुरू करण्यापूर्वी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असावी. भक्त आपणाला भावणाऱ्या कोणत्याही प्रतीकात परमेश्वराला पहात असतो. कोणी विष्णूला, कोणी शिवाला, कोणी गणपतीला, कोणी देवीला, कोणी सूर्यनारायणाला, कोणी रामाला तर कोणी कृष्णाला भगवंताच्या रूपात पाहतो. कोणी गुरुला, कोणी आई-वडिलांना, कोणी प्रियकराला, तर कोणी आपल्या मातृभूमीला भगवंताच्या रूपात पाहतो. चराचरात ईश्वर भरून राहिलेला आहे, या श्रद्धेमुळे सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हा गुण हिंदुंमध्ये आपोआपच रुजला आहे. बुद्धीचे जसे सात्विक, राजस, तामस असे गुणभेद असतात, तसे श्रद्धेचेही भेद असतात. सात्विक श्रद्धेचे लोक देवावर विश्वास ठेवतात; राजस श्रद्धेचे लोक यक्ष, राक्षसांवर विश्वास ठेवतात; तर तामसी श्रद्धेचे लोक भूत, पिशाच्च यावर विश्वास ठेवतात; असे भगवद्गीतेत म्हटले आहे. थोडक्यात माणसाची श्रद्धा बरी वाईट असणे हे माणसाच्या उपजत स्वभावावर अवलंबून असते.
कर्मे गौण म्हणून सोडून देऊन केवळ भक्तीत गढून जाणे हेही युक्त नसून आपणाला प्राप्त झालेली कर्मे ही केलीच पाहिजेत; म्हणजेच निर्मम बुद्धीने कर्मे केल्यास कर्मलोप न होता परमेश्वराची भक्ती घडते. त्याचे पाप- पुण्य न लागता सद्गती मिळते. असे भगवद्गीतेचे सांगणे आहे. गीतेतील भक्तिमार्ग हा कर्म प्रधान असून केवळ फुलांनी आणि वाचेनेच नव्हे तर निष्काम कर्माने देखील परमेश्वराचे पूजन होते, असे भगवंतांनी सांगितले आहे. देव हा भावाचा भुकेला आहे, तो सर्वांकडे समदृष्टीने पाहतो; सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण ये, मी तुझे सर्व पापांपासून रक्षण करीन भिऊ नको; असे सांगून अभय देतो. म्हणूनच निष्काम बुद्धीने कर्म करीत राहून ज्ञान मार्गाचा अव्हेर न करता श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन,अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा नवविध मार्गांपैकी कुठल्याही मार्गाने परमेश्वराची भक्ती करत कृष्णार्पण भावनेने त्याला शरण जाणे, हेच भक्तिमार्गाचे मर्म होय.
आज आषाढी एकादशी. आजचा दिवस हा विठ्ठल भक्तीचा परमोच्च दिवस. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होणार नाही ते आपली भक्ती यातील एखाद्या मार्गाने विठुरायाच्या चरणी अर्पण करतील.
आज मी पुढील भक्तीगीतातून भगवंतांच्या म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होत आहे.


*सर्जेराव कुइगडे*
दि. २९/०६/२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू