पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वृत्तबध्द कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)

पुस्तक आढावा

पुस्तकाचे नाव- वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र) 

लेखक - विजय जोशी (विजो) प्रकाशन - अथर्व प्रकाशन, डोंबिवली

एकूण पाने - 104 

किंमत - 200 रुपये


  वसुनंदिनी फौंडेशन साहित्य सरिता मंच,जळगाव,शाखा सोलापूर यांच्या वाट्सअॅप ग्रुपवर सरांची जाहिरात पाहिली आणि मग सराना कॉन्टॅक्ट करून पुस्तक विकत घेतलं. रॉन्डा बर्न यांच्या Law of attraction (आकर्षणाच्या नियमानुसार)- 'आपण जर एखादी उत्कट इच्छा केली तर ती पूर्ण होते'. नेमके मला पण खूप दिवसापासून एखादं कवितेच्या तंत्र आणि मंत्र यावर आधारीत पुस्तक वाचावं अशी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली.       

        विल्यम वर्डस्वर्थ यांच्या म्हणण्यानुसार- काव्य म्हणजे

"the spontaneous overflow of powerful feelings." (शक्तिशाली भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार होय.) बहिणाबाई चौधरी म्हणायच्या, 

"अरे घरोटा घरो‌टा तयातून पडे पिठी, तसं तसं माझं गानं पोटातून येई ओठी" (म्हणजेच जात्यातून जितक्या सहजतेने पीठ यावं तितक्या सहजतेने माझं गाणं जन्म घेतं... आकार घेतं...) बहिणाबाई, संत कबीर हे अशिक्षीत होते, त्यांनी काव्य आपल्या मुलांकडून लिहून घेतलं. संत सुरदास आंधळे होते. एवढेच काय सध्याचे प्रसिद्ध रामायण गीतकार, संगीतकार रविंद्र जैन हे देखील आंधळे आहेत. खूप साहित्यिकांनी सांगून ठेवलंय "Literature arises from pains". (म्हणजेच वेदनेतून साहित्य निर्मिती होते.) माझ्या बाबतीत तर हे 100% लागू झालं, मी वेदनेतूनच कवी झालो. माझ्या अपातामुळे मला माझ्या पायावर 8 शस्त्रक्रिया केल्या गेल्या, एवढं करून देखील 5 वर्ष

संघर्ष करावा लागला. हा काळच मला बहुभाषिक कवी, लेखक केला. कायमस्वरूपी अपंगत्व आलं तरी साहित्यांनीच मला या पडत्या काळात आधार दिला, नाही तर मी देखील नैराश्येत जाऊन जीवन संपवलं असतं‌... असो!

            विजो सरांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कवीला कवितेच्या सर्व प्रकारात लिहायला आलं पाहिजे. मला पण वाटतं की, किमान प्रत्येक कवीनं तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. काव्य हे मुळात एक शास्त्र आहे. शास्त्र हे नियमांत बांधलेलं असतं. तशीच कविता सुध्दा छंद, वृत्त, अलंकार यात गुंफलेली असावी अशी अपेक्षा असते, मात्र तसे बंधन मुळीच नाही. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना"

 या उक्ती प्रमाणे प्रत्येक कवीची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. कवीच्या स्वभावानुसार कवितेचा स्वभाव ठरतो. एखादा प्रसंग कवीच्या काळजाला भिडतो आणि मग कवीच्या अंतर्मनातून कवितेच्या ओळी आपोआप निघतात. कवी हा संवेदनशील, भावनाशील आणि हाळवा असतो.

            कविता हा भाषेचा सर्वप्रथम आविष्कार आहे. त्यामुळेच गदिमाचं "गीत रामायण"  हे महाकाव्य आजही लोकप्रिय आहे. 

          या पुस्तकात विजो सरांनी वेगवेगळ्या वृत्तामध्ये कशी कविता लिहावी हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. मात्रा म्हणजे काय? त्या -हस्व आणि दीर्घ पाहून कशा लिहाव्यात हे सोदाहरण स्पष्ट केले आहे.यति म्हणजे काय ? यतिभंग कसा होतो? हे स्पष्ट केले आहे. कविता भावणे आणि कविता कळणे या दोन्हींमधील फरक स्पष्ट करताना सर म्हणतात,"भावने ही प्रक्रिया वरवर थोडीशी उथळ आणि जलद घडलेली प्रक्रिया असू शकते. तर कळणे ही प्रक्रिया सखोल वाचनातून, चिंतनातून अर्थबोध होणारी प्रक्रिया आहे." कवीनं नेहमी असमाधानी असलं पाहिजे असे सर सांगतात. कविता कशी सादर करावी ? याविषयी देखील सर टिप्स देतात. गझल हा अवघड काव्यप्रकार सरांनी सोदाहरण अतिशय सोप्या शब्दांत    स्पष्ट केला आहे.

             नवोदित कवींना इतरांचं साहित्य वाचण्याचा मौलिक सल्ला देखील देण्यास सर विसरले नाहीत. मला वाटतं येणाऱ्या आवृत्तीत सरांनी भारूडं, लावणी, गेय काव्य इ. कशी लिहावीत हे सोदाहरण स्पष्ट केलं तर पुस्तक आणखीनच रंजक होईल. प्रत्येक नवोदित कवीनं हे पुस्तक वाचलंच पाहिजे आणि आपल्या संग्रही ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. मग वाचाच एकदा- "वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र) हे विजो सरांचं पुस्तक.

©®-विश्वेश्वर कबाडे (नवोदित बहुभाषिक कवी,लेखक), अणदूर

ता.तुळजापूर

जि.धाराशिव

भ्रमणध्वनी-9326807480


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू