पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुरु पौर्णिमा

❀ गुरुपौर्णिमा ❀


।।श्री गुरुभ्यो नमः।।
*गुरु परमात्मा परेशु*

गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, जिच्याकडून मी काही न काही तरी शिकले, त्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार! ज्या ज्या माणसाकडून मला चांगले शिकायला मिळाले, त्या त्या प्रत्येक माणसातल्या परमेश्वररूपी गुरूला माझा सादर प्रणाम!! 
माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व गुरूंना मनापासून नमन!!!

।। श्री गुरुभ्यो नमः।।
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥
अर्थात ज्यांनी ह्या ज्ञानरुपी शलाकेने अज्ञानरुपी अंधाराने अंध झालेल्या लोकांचे डोळे उघडले त्या गुरूंना माझा नमस्कार. 

माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती, जिने मला काही ना काही तरी शिकवले, त्या प्रत्येक व्यक्तीला मी माझे गुरु मानते. आणि मी काही फक्त आध्यात्मिक बाबतीत म्हणत नाहीये, तर बाकी बऱ्याच आयुष्याच्या अंगांमध्ये प्रत्येक वळणावर मला भेटलेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारे मला गाईड केलेल्या प्रत्येक माणसाला मी गुरु मानते. मग तो किंवा ती व्यक्ती वयाने मोठे असो किंवा लहान, माझ्यासाठी प्रत्येक जण माझे गुरू आहेत; कारण त्यांच्या जाणतेपणी असो वा अजाणतेपणी, मी त्यांच्याकडून बरेच काही शिकले, परिपक्व झाले आणि समृद्ध झाले.

माझी आई ही माझी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात लाडकी गुरु माऊली!! त्या माऊलीने फक्त चालायला, बोलायला, वाचायला, लिहायला शिकवले असे नाही, तर अध्यात्म, भक्ती, पूजाअर्चा, लोकसेवा हेसुद्धा तिने आपल्या वागण्यातून शिकवले. तिने मला सर्वप्रथम अध्यात्माची गोडी लावली. देवाला आपले बाळ, आपला भाऊ, आपली आई, आपली वडील, आपला भाऊ असे समजून त्याची प्रेमाने पूजा करावी हे तिने मला शिकवले. असा परमेशवरच्या प्रति अगदी गाढ भक्तीरस क्वचितच असतो. तो माझ्या आईच्यापाशी होता. त्याचबरोबर स्वयंपाक, निगुतीने, काटकसरीने संसार कसा करावा, आहे त्यात कसे भागवावे, आल्या गेल्या काही पाहुण्यांचे कसे प्रेमाने स्वागत करावे, या आणि अशा अनेक संसारोपयोगी गोष्टीही तिने येता-जाता शिकवल्या. त्यात कुठेही अवडंबर नव्हते, कुठेही आपण ज्ञान देतोय, काही विशेष करतोय असा अजिबात आविर्भाव नसायचा. अगदी सहजगत्या, ओघवत्या शैलीमध्ये, अतिशय प्रेमाने ती खूप गोष्टी सांगायची आणि म्हणूनच त्या इतक्या खोलवर रुजल्या माझ्या मनात!सगळ्यात महत्वाची माझ्या आईची शिकवण म्हणजे आपली कितीही प्रगती झाली तरी आपले पाय नेहमी जमिनीवर असावेत. आपल्यात विनम्रता असावी ही तिची कायम शिकवण. माझ्या आयुष्यातल्या माझ्या पहिल्या गुरूला, माझ्या माऊलीला माझा साष्टांग दंडवत! 

त्याच प्रमाणे मला योग्य मार्ग दाखवणारे माझे वडील हे माझे दुसरे गुरु. विलक्षण बुद्धिमत्ता आणि अफाट ज्ञानसंपदा! कोणत्याही परिस्थितीत हार न मानता झगडा कसा द्यायचा आणि कितीही पडलो तरी उठून सावरून उभे कसे राहायचे हे त्यांनी कायम शिकवले. त्यांना माझे शतशः नमन! 

माझ्या आयुष्यातील तिसरा गुरु म्हणजे माझा भाऊ. कमालीचे शांत, परिपक्व आणि ज्ञानी व्यक्तिमत्त्व. सारासार विचार करून निर्णय घ्यायला त्याच्याकडून मी शिकले. दुसऱ्याचे म्हणणे कसे शांतपणे ऐकावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझा दादा. त्याने कायम एक मित्र बनून खूप आधार दिला आणि मार्गदर्शन केले. त्याला माझा साष्टांग नमस्कार!

माझ्या सर्व शाळेतील शिक्षकांना, आणि कॉलेज, युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापकांना, त्यांनी ज्ञान दिल्याबद्दल, माझ्या असंख्य प्रश्नांना उत्तरे दिल्याबद्दल आणि वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केल्याबद्दल सादर प्रणाम! 

माझ्या मुलाने मला केवळ आईच नाही बनवले, तर छोट्या छोट्या गोष्टींतून रोज काही न काही शिकवले आणि पुढेही मी त्याच्याकडून शिकत राहीन! ह्या माझ्या छोट्याशा गुरूला माझा प्रेमपूर्वक नमस्कार! 

माझ्या मोठ्या तसेच धाकट्या बहिणींना, ज्यांनी मला मायेचे पांघरूण घातले, माझे मन जपले, माझे कौतुक केले, ज्यांच्या सोबत मी असंख्य मेनू ठरवले आणि ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले, त्यां माझ्या बहिणींना माझा सादर प्रणाम!

माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना, ज्यांनी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या प्रकारे आधार दिला, मार्गदर्शन केले, सुख-दुःखात साथ दिली, त्या सगळ्यांना माझा सादर प्रणाम!

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो परमेश्वर, ज्याने माझ्या सद्गुरूंना आणि सद्ग्रहस्थांना माझ्या आयुष्यात पाठवले. त्याने सगळे महाकठीण प्रसंगातून बाहेर काढले आणि सगळे सहन करायची शक्तीही दिली! त्याने अनेक माणसांच्या रूपाने, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे, देवदूत पाठवले माझ्या आयुष्यात आणि असंख्य गुरू मला ज्याच्या कृपेने लाभले, त्या माझ्या परमेश्वराला कोटी कोटी साष्टांग दंडवत!

©️ तनुजा प्रधान, अमेरिका.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू