पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कर्जत.. एक सुखद सहल

प्लॅटफॉर्म क्रमांक चार पर आनेवाली लोकल देरी से चल रही है......ही announcement .
ऐकल्यावर, नेमके आपण प्रवासाला जातो त्याच वेळी कशा या गाड्या उशिराने येतात, म्हणून चडफडात झाला..

मात्र घोषणा केली त्यामानाने गाडीने जास्त अंत बघितला नाही..
थोड्याच वेळात आली..आणि
आमचा जीव पाण्याच्या भांड्यात (पाऊस असल्यामुळे) पडला.. नजर सारखी ठाण्याकडून येणाऱ्या खोपोली लोकलवर होती...हो कारण त्यात आमच्या चार मैत्रिणी यायच्या होत्या...आतापर्यंत तुम्हाला समजले असेलच की आज आम्ही काय धमाल करणार होतो ते!!!

विभा, सुरेखा, मीनाक्षी,
ठाण्याहून येणार होत्या... ( आरतीची तब्येत अचानक थोडी बिघडली, म्हणून तिने येणे कॅन्सल केले)
संगिता, मिनल, ज्योती आणि मी त्यांना डोंबिवलीला जॉईन होणार होतो...

हालत डुलत चालतका होईना पण कर्जत ट्रीप करायची हे दोन दिवसापूर्वी फोनाफोनी करून नक्की केले आणि निघालो...
कर्जत स्टेशन वरून टॅक्सीतून संगिताच्या दळवी वहिनीकडे गेलो...

सुंदरसे बैठी घर..समोर मोठी बाग...बागेत झोपाळा...
आजूबाजूला झाडीच झाडी.

तिथेच खाण्यापिण्याची सोय केली होती...गेल्या गेल्या नाश्त्यात गरमागरम पोहे, आणि वाफळलेली अद्रकवाली चाय समोर आली.. तेव्हाच दुपारच्या " टेस्टी टेस्टी " जेवणाचा अंदाज आला..

स्टेशनवर टॅक्सीत बसल्या पासून आमचे जे बोलणे सुरू झाले ते दळवींचे घर येई पर्यंत...

त्या आमच्या बोलण्यातून, खरे म्हणजे चिडवाचिडवितून कोण कुणाला किती सिनिअर/ज्युनिअर, यावरून ड्रायव्हरला आमच्या वयाचा अंदाज आला...त्यालाही मजा वाटत होती.. तेवढ्या दहा
मिनिटाच्या प्रवासात त्याने आम्ही वयाने साठ पासष्टीच्या असलो तरी किती उत्साही आणि फिट आहोत, म्हणून दोनतीन वेळा कौतुकाने बोलून दाखवले.(Touch wood) आणि मग स्वतःच इकडे जायचेका तिकडे जायचेका म्हणून विचारू लागला..

आमचा खरा प्रोग्रॅम फक्त घरात एकत्र बसून खायचे प्यायचे आणि गप्पा मारायच्या असा ठरलेला होता..पण गाडीवाल्याने तीन तीन ठिकाणे फिरवून आणली...

महडचे गणपती मंदिर, पळसदरीचे स्वामी समर्थ मठ, आणि दत्त मंदिर बघून आलो....
ड्रायव्हरने स्वतः पुढाकार घेऊन आमचे फोटो काढले . मनीध्यानी नसताना मंगळवारचे गणपतीचे दर्शन झाले...दुधात साखर म्हणायची...

retired झालो तरी मनाने tired नाही या आनंदात मस्त रिमझिम पावसात फिरलो..

पण पावसाळ्यातली ट्रीप म्हटली की फजिती ही व्हायलाच पाहिजे असा काही नियम असतो काहो ?

तर मग मनसोक्त फिरताना नेमके माझे सँडल का तुटावे बरं?

आमची गाडी मंदिरापासून लांब उभी केली होती....रस्त्यात एक दोघांना विचारले तर म्हणाले की आमच्या इथे ना चांभारच नाही.. मी म्हंटले का ? ..तुमच्या गावात काय कुणाची चप्पल तुटत
नाही का? तर हसून म्हणाला तुटते ना! पण दुरुस्त करायला खोपोलीला नाहीतर कर्जत स्टेशनवर जावे लागते...गावात चांभार मिळणार नाही.. म्हटलं मग त्यापेक्षा नवीनच चप्पल घेतलेली काय वाईट.. तुटलेले सँडल घालून लंगडत चालताना लोक मला हसले की नाही मला माहीत नाही...पण त्या माणसाने दिलेल्या उत्तराने मात्र मला खूप हसू आले...

खरं सांगू का? त्या तुटलेल्या सँडलमुळे मला पावसाळी सहलीचा खरा "feel" आला..

दुपारच्या जेवणाचा मेनू तर भूक चाळवणारा होता...भरली वांगी, वालाच बिरडं, तळलेला पापड, अळुवडी, लिंबाचे लोणचे, आमटी भात, आणि मस्त उकडीचे मोदक...शिवाय पावसाळी वातावरणात खावेसे वाटले तर नॉनव्हेज दर्दिंसाठी झणझणीत "चुलीवरचे चिकनही" केले होते.. आणि लुसलुशीत तांदळाची भाकरी...आहाहा !! क्षुधातृप्तीचा आनंद काय असतो तो हाच हे समजले. आम्हाला तर माहेरी आल्यासारखे वाटत होते...नाहीतर रोज मेलं आपणच करायचं, आणि आपणच खायचं.. ना आयत ताट समोर येत, ना कुणी आग्रह करत!...

खाऊन पोट भरलं...पण गप्पांच काय?...त्या तर कितीही केल्यातरी पोट भरतच नाही...
तेवढ्या दोनतीन तासात कोणत्या विषयावर आम्ही बोललो नाही ते विचारा!! ...बँक,( तो तर कायमच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यामुळेच तर आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत,
एसबीआयच्या एका छताखाली... "जिंदगिमे आजभी, जिंदगिके बादभी") काऊंटर, ट्रान्स्फर, संप, पेनडाऊन स्ट्राईक, युनियन लीडर, बंद पडलेल्या (की राजकीय खेळीतून बंद पाडलेल्या) गिरण्या/कंपन्या, बँकेत चालणारे पॉलिटिक्स, ते थेट भारतात सध्या चालू असलेले राजकारण...

रस्त्यात मोड आलेले वाल विकणारी बाई दिसताच सर्वांनी वाल घेतले...( एक दोघींनी लगेच रात्रीच्या जेवणात वालाचं बिरडं/ भाजी केली ..अस त्यांनी जेवणाच्या थाळीचा फोटो टाकला त्यावरून कळले) दळवी वहिनींच्या घरासमोरील बागेत फिरताना मला अनवाणी फिरावे लागले... म्हंटल जाऊदे तेवढेच हिरवळीवर accupuncture झाले, समजायचे.... अजून बऱ्याच ट्रीप करायच्या तर हातपाय धड राहायला हवें ना!! ..

निरनिराळी हिरवीगार, फणस आंब्याची झाडे, बांबूची झाडं, कढी पत्ता, शेवगा, आणि कधीही न बघितलेले सुरणाची छोटी मोठी झाड, नागवेलीची पान, विविध रंगांची फुले बघून ..मन प्रफुल्लित झाले.. कुणी बागेतील फणस, तर कुणी शेवग्याची पाने, घेतली ...( तेव्हड्यातल्या तेवढ्यात आपले PM रोज शेवग्याच्या पानांचा पराठा खातात, म्हणून तंदुरुस्त आहेत हा पण एक टॉपिक बोलून झाला. ही सुद्धा सर्वांनी युट्युबवर ऐकलेली, आणि वाचनात आलेली माहिती बरका!!..)

चार वाजता चहा घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. स्टेशनवर आधी सर्वात महत्वाचे म्हणजे सँडल दुरुस्तीचे काम केले.

आमच्या डोंबिवलीला लोकल मध्ये चढणे आणि उतरणे म्हणजे
"गड जिंकण्या इतकेच दिव्य काम" आहे.. त्यामुळे चपला, सँडल, पर्स याचे बेल्ट चांगल्या स्थितीत असणे गरजेचे असते... आमची गाडीतही डोंबिवली येई पर्यंत बडबड चालूच होती ..

ठाण्याच्या दिशेने गाडी सुरू होऊन स्पीड घेई पर्यंत आम्हा मैत्रिणींचे टाटा बायबाय चालू होते...विशेष म्हणजे सकाळी गाडीत चढताना आमच्यातील प्रत्येकीला एकदोन जणी अनोळखी होतो, हे गाडीत असलेल्या इतरांना सांगूनही खरे वाटले नसते ...गाडीत चढल्या चढल्या लगेच एकमेकींना जागा द्या, बॅग उचलून स्वतः च्या मांडीवर ठेवा चालू झाले.. संध्याकाळी परतताना मात्र कितीतरी वर्षांची घट्ट मैत्री असल्यासारखे दिसत होतो..
आमच्यात एक " कॉमन फ्रेंड " होती ती म्हणजे संगिता...तिनेच हा प्रोग्रॅम आखला होता...

"बाईपण भारी देवा" पिक्चर सारखी "मंगळागौर" नाही केली,

पण "मंगळवारी" पूर्ण दिवस मज्जा मात्र केली...

आता पुढची ट्रीप कुठे करायची ती ठिकाणे सुचवून झालीयेत. ..बघू किती जमते ते...

सौ. सरोजिनी बागडे.
दि..०४.०७.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू