पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दुहेरी हत्याकांड : रहस्यभेद

         दुहेरी हत्याकांड: रहस्यभेद

15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन!

     शहरात आज सगळीकडे आनंदाचे वातावरण होते.  पावसाची रिमझिम आज दिवसभर चालू होता.उगवलेला सूर्य मावळतीकडे गेला,परंतु येणाऱ्या रात्रीच्या गर्भात एक वेगळीच घटना लिहून ठेवली होती . अशीच भयंकर घटना शहरामध्ये घडली.

ती रात्र जीवघेणी ठरली,  तो काळ संकटकाळ ठरला.

रात्री अडीचच्या सुमारास नागपूरमधील प्रभात कॉलोनीत ' अथर्व  ' बंगल्यामध्ये अचानक  मोठ्याने कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला. आवाज महिलेचा होता. शेजारी राहणाऱ्या रहिवाशांची काही प्रमाणात झोप मोडली .आजूबाजूच्या बंगल्यात राहणारे रहिवाशीही अचानक जागे होऊन बाहेर आले,तोपर्यंत कुणाच्याही लक्षात हा प्रकार आलेला नव्हता .शेजारच्या पाच ते सहा घरामधील दिवे लागले व  काहीशा संभ्रम अवस्थेत शेजारी हळूहळू गोळा झाले.

मध्यरात्रीची ती वेळ!! रातकीड्यांचा आवाजासोबत शांततेला  अंधाराची व संशयाची साथ मिळाली आणि बघता बघता सर्व परिसर भीतीमय होऊन गेला.

सर्वांचा रोख श्रीधर टिपणीस यांच्या घराकडे होता,त्यांच्याच बंगल्यातून आवाज आला होता.
श्रीधर टिपणीस आणि देवयानी टिपणीस हे दोघेही निवृत्त अधिकारी या बंगल्यात राहत होते. श्रीधर हे निवृत्त पोलीस अधिकारी तर देवयानी ह्या निवृत्त आयएएस ऑफिसर.
त्यांना एकुलता एक मुलगा जयेश! तो सध्या सिंगापूरला असतो. तीन वर्षापासून तो तिकडे आयटीमध्ये काम करतो, वर्षातून एक दोन महिन्याच्या सुट्टीवर येणारा जयेश आपल्या आई-वडिलांचा तसा खूप लाडका मुलगा.

दोघा तिघांनी पुढाकार घेऊन बाहेरील गेट बाजूला केले व घरात प्रवेश केला. घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता. घरात जावे की न जावे या द्विधा मनस्थितीत असतानाच शेजारचे मानकर यांनी थोडा पुढाकार घेतला.
" देवयानी वहिनी, देवयानी वहिनी  " अशी हाक मारत घरातून काही प्रतिसाद मिळतोय का हे बघितले.
घरात सगळीकडे शांतता होती.
कुणाचा प्रतिसाद मिळत नाही हे बघून शेजारील लोकही संभ्रमात पडले. नेमके काय झाले असेल याबद्दल चर्चा बाहेर सुरू झाली.

असे असतानाच मानकर व त्यांच्या मित्राने मुख्य घरात दबक्या पावलांनी आत प्रवेश केला.
घरात सर्वत्र शांतता होती.
समोरच्या हॉलमध्ये सर्व काही व्यवस्थित आवरलेले होते,प्रत्येक वस्तू जागेवर होती. हॉलमध्ये छोटा रात्रीचा दिवा मात्र चालू होता.
घरामधील समोरील शोकेस मध्ये सर्व जुन्या वस्तू सजवून ठेवलेल्या होत्या.

"देवयानी वहिनी,देवयानी वहिनी " मानकरांनी पुन्हा एकदा आवाज दिला.
मानकर आणि टिपणीस हे दोन कुटुंब शेजारीच राहायला असल्याने नेहमीची असलेली ओळख व घरी जाण येणं कायमच होत असल्यामुळे मानकरांसाठी हे घर परकं नव्हतं, त्यामुळे सर्वात प्रथम त्यांनीच हक्काने घरात प्रवेश केला. मानकर त्यांच्या मित्रासह हॉल मधून बेडरूमकडे निघाले. तीन बेडरूमचा प्रशस्त असलेला त्यांचा बंगला चहू बाजूनी भिंतीवजा कंपाऊंडने सुरक्षित केलेला होता.चारही बाजूने सोडलेली प्रशस्त जागा आणि बंगल्याची एकंदरीत ठेवण तशी खूप सुंदर होती.

मानकरांनी बेडरूमच्या आत डोकावून बघितले. सुरुवातीला त्यांच्या तो प्रकार लक्षातच आला नाही  .त्यांनी बघितलेले दृश्य मात्र अतिशय भयानक होते.
रक्ताच्या थारोळ्यात बेडरूम मध्ये पडलेला मृतदेह बघून मानकरांना मोठा धक्का बसला. आत मध्ये  अंधुक दिवा चालू होता. बेडरूमच्या दाराशी गेल्यानंतर मानकरांना जे दिसलं ते  त्याहूनही भयानक होत,बेडरूम मध्ये एक नाही तर दोन मृतदेह  पडलेले होते. बेडवर श्रीधर टिपणीस यांचाही मृतदेह त्यांना पडलेला दिसला, परंतु त्यांना नक्की परिस्थितीचा अंदाज अजूनही आलेला नव्हता.भिंतीच्या बाजूला पाठ टेकून बसलेल्या देवयानी वहिनी मानकरांच्या नजरेस पडल्या. त्यांची आत  जाण्याची हिंमतच झाली नाही.
"वहिनी,वहिनी " त्यांच्या या हाकेला प्रतिसाद न देणाऱ्या देवयानी वहिनी ह्यापूर्वी अशा कधी वागल्या नव्हत्या.  हा काहीतरी वेगळा प्रकार असावा  हे मानकरांच्या लक्षात आले.

आता पोलिसांना बोलवल्याशिवाय  गत्यंतर नाही हे त्यांना समजलं. गेल्या पावली ते माघारी फिरले. आतील दृश्य पाहून मानकरांचे स्वास्थ्य बिघडले होते.
बाहेर येऊन त्यांनी काळाचौकी पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना सविस्तर माहिती दिली.

थोड्याच वेळात स्टेशनचे कर्तबगार अधिकारी गोडबोले  आणि भोसले  घटनास्थळी पोहोचले.

गोडबोले हे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांची काळाचौकी पोलीस स्टेशनला पाच वर्ष नोकरी झाली होती.
एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि अतिशय हुशार अशी त्यांची ख्याती होती.

गाडीतून उतरताच मानकरांनी गोडबोले यांना नमस्कार केला.
"तुम्ही मानकर का"?
"हो सर,मीच संदीप मानकर,मीच तुम्हाला फोन केला होता. मी इथे बाजूलाच राहतो ". मानकर.
"ओके, चला आपण सरळ आत जाऊ या, आणि कृपया कुणालाही आता आत घेऊ नका.
"भोसले, गाडीतून क्राईम सीन चा टेप घ्या, बंगल्याच्या चारही बाजूला लावून टाका." घरात प्रवेश करतच त्यांनी भोसलेंना सूचना दिली.

एव्हाना बंगल्याच्या बाहेर हळूहळू गर्दी जमली.लोक जमा होऊ लागले. एक पोलीस अधिकारी बाहेरच लोकांना थांबून धरत  होता.सगळ्यांना आत काय झालंय याची  उत्सुकता लागली होती. बाहेर जमलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू झाल्या.

घरामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करताच त्यांना झालेल्या भीषण हत्याकांडाची जाणीव झाली होती.
प्रशस्त अशा बेडरूममध्ये बेडवर पडलेला श्रीधर टिपणीस यांचा मृतदेह नजरेस पडला.
बाजूला एका 40 ते 45 वर्ष वयाच्या इसमाचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला होता.
पोलीस अधिकारी गोडबोले हे गुन्हे शाखेचे अतिशय नावाजलेले  अधिकारी होते.  याआधी वेगवेगळ्या आणि गुंतागुंतीच्या हत्यांचा उलगडा त्यांनी केलेला होता,याही प्रकरणांमध्ये त्यांच्यासमोर खूप मोठे आव्हान होते.
"भोसले, फोटोग्राफर आणि फिंगरप्रिंट तज्ञांना बोलावले का?". गोडबोले.
"हो सर,फोन केलाय ,सर्वजण येत आहेत ". भोसलेंनी माहिती दिली.
हे बघा, प्रत्येक बारीक-सारीक वस्तूंचे फोटो काढून घ्या. या रूम मधली एकही वस्तू आपल्या नजरेतून सुटता कामा नये आणि फिंगरप्रिंट सुद्धा सर्व महत्त्वाच्या जागेवरचे ताबडतोब घ्या.
एक नाही तर दोन खून झाले आहेत.
प्रकरण तसं खूप गंभीर आहे.
  गोडबोले साहेबांनी याबद्दल आपली चिंता व्यक्त केली.

"साहेब, ह्या देवयानी टिपणीस."
भिंतीच्या बाजूला बसलेल्या देवयानी टिपणीस यांची मानकरांनी
गोडबोलेशी ओळख करून दिली. त्यांचे मात्र कुणाकडेही लक्ष नव्हते. त्यांना इतका मोठा मानसिक धक्का बसला होता की,त्या एकटक एका वस्तूकडे पाहत होत्या. आल्यापासून त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. चेहऱ्यावर ना कोणते भाव,ना कोणती प्रतिक्रिया.
आपल्या पतीची झालेली निर्घृण हत्या बघून कोणत्या पत्नीला धक्का बसणार नाही?
मानकरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
" देवयानी वहिनी, माझ्याकडे बघता का? ".
त्यांची नजर मात्र एकटक होती. त्यांनी संपूर्ण संतुलन गमावलं होतं.
गोडबोले साहेबांनी आपला मोर्चा संपूर्ण रूम कडे वळवला, त्यांनी बारीक निरीक्षण करण्यास सुरुवात केली.

एव्हाना फोटोग्राफर आणि फिंगरप्रिंट तज्ञ हॉलमध्ये पोहोचले. त्यांनी गोडबोले यांच्या सांगण्यावरून आपले काम चालू केले.
श्रीधर टिपणीस यांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारची इजा प्रथमदर्शनी दिसून आली नाही. डॉक्टरांनी मात्र दोघांनाही मृत घोषित केले होते.
बाजूला पडलेल्या मृत इसमाच्या डोक्यातून  बंदुकीच्या दोन गोळ्या आरपार गेल्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मृतदेह.
पोलिसांना खरोखर चक्रावून टाकणारी ही घटना होती.

"मानकर,तुम्ही त्यांच्या मुलाला ही कल्पना दिली का?गोडबोले.
"नाही साहेब." मानकर.
"संपर्क करून ताबडतोब त्यांना हे कळवा म्हणजे ते लगेच सिंगापूरहून निघतील." गोडबोले.

गोडबोले मात्र प्रत्येक गोष्टीकडे अगदी संशयाच्या नजरेने बघत होते, कारण जोपर्यंत काही पुरावा सापडत नाही तोपर्यंत  या प्रकरणाला  योग्य दिशा मिळणार नाही हे त्यांना माहीत होते. सहाजिकच हे खुनाचं प्रकरण खूप वेगळं होतं. इतक्या सहजासहजी ते उलगडेल असं त्यांना वाटत नव्हतं.

मात्र याचवेळी पोलीस अधिकाऱ्यांची खरी कसोटी असते. गुन्हेगार कोणताही पुरावा ठेवत नाही तर गुन्हेगार पुरावा ' विसरत 'असतो आणि हाच ' विसरलेला पुरावा' पोलिसांच्या हाती लागला की
खूनाच रहस्य उलगडायला वेळ लागत नाही.
मात्र गुन्हेगाराने  खूप शांत डोक्याने हे कृत्य घडवून आणले होते. गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचणे हे एकमेव ध्येय श्री. गोडबोले यांच्यासमोर आजच्या घडीला तरी होते .
" घरामध्ये आणखी कोण कोण होतं?. गोडबोले.
"साहेब,घरामध्ये एकूण चार माणसे होती . टिपणीस कुटुंब आणि त्यांचे नोकर जोडपे.
स्वयंपाक घराच्या बाजूलाच त्यांची बाहेरून रूम आहे.
त्यांनाही या घटनेची माहिती घरात मोठा आवाज झाल्यावरच मिळाली."भोसलेनी थोडक्यात सांगितले.
"त्या देवयानी मॅडम आणि त्यांच्या घरातील नोकरांचा जबाब नोंदवून घ्या.
त्यांनी दिलेल्या माहितीचा  आपल्याला बऱ्यापैकी उपयोग होऊ शकतो.". गोडबोलेनी भोसले यांना सूचना दिली.

घरातील सगळ्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले.वेगवेगळ्या बाजूंनी घेतलेले फोटो आणि फिंगरप्रिंट वरून बऱ्यापैकी माहिती मिळणार हे गोडबोले यांना ठाऊक होत.
एव्हाना दुसरा दिवस उजाडला.

मानकरांनी टिपणीस यांच्या मुलाला फोनवर सगळ्या घटनेची सविस्तर माहिती दिली आणि जेवढं शक्य होईल तितक्या लवकर भारतात येण्यास सांगितले.

दुसरा दिवस :

सकाळचे सहा वाजले होते.
एका पोलिस अधिकाऱ्याला घराचा पहारा देण्यास ठेवून देवयानी टिपणीस यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्यांची अवस्था खूप भयानक होती.  भीतीने पूर्ण गाळण उडाली होती. विचित्र विस्कटलेले केस आणि चेहऱ्याची झालेली अवस्था बघून त्यांना हा धक्का सहन झालेला नव्हता हे नक्की. याच धक्क्यामुळे त्यांना मेंदूला मानसिक फटका बसला असावा असे वाटत होते. त्यांना या मानसिक धक्क्यातून बाहेर काढणे अशक्य वाटत होते.

"भोसले, हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचे आहे.
गुन्हेगाराने  पुरावा काही ठेवलेला नाही. आणि आपल्यापुढे तेच मोठे आव्हान आहे.". गोडबोले साहेब खुर्चीवर बसत म्हणाले.
दोघेही पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनला पोहोचले होते .
"साहेब,मला वाटतं ही हत्या पैशाच्या हव्यासापोटी झालेली नाही. कारण घरातील कोणतीही वस्तूची लूटपाट झालेली दिसत नाही,सर्व वस्तू जागेवर आहेत. गुन्हेगाराचा मुख्य उद्देश हा टिपणीस यांची हत्या असावी असं मला वाटते."
"भोसले,जर टिपणीसांची हत्या करायची होती तर त्या ठिकाणी आणखी एक मृतदेह पडलेला आहे तो कसा काय?"
आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.
सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे,
गुन्हेगाराने हत्या का केली?
गुन्हेगाराने कुणाकुणाची मदत घेतली?
गुन्हेगार हत्या करून पळून जाण्यात कसा यशस्वी झाला?
गुन्हेगारांला पळून जाण्यास कोणी मदत केली?
टिपणीसांबरोबर असलेले गुन्हेगाराचे वैर काय?
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पिस्तूलने  त्या अज्ञात इसमाची हत्या झाली आहे ती पिस्तूलच घटनास्थळावरून गायब आहे.
म्हणजेच याचाच अर्थ गुन्हेगाराने अतिशय शिताफीने हा कट रचला आहे आणि तो पुरावा नष्ट करण्यात यशस्वी झाला आहे.
"भोसले, नागराज आणि हेमंतला  बोलावून घ्या."
तुम्ही ,नागराज आणि हेमंत!
मला तुमच्या तिघांचीही मदत लागेल.
तुम्ही स्वतः त्या अज्ञात मयत इसमाची संपूर्ण माहिती काढा.तो कोण आहे? कोठे राहतो? त्याच नाव काय? त्याचा व्यवसाय काय? सर्व सर्व माहिती मला पाहिजे. त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नागराजला टिपणीस पती, पत्नीची संपूर्ण माहिती त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी, शासकीय सेवेतली त्यांची कारकीर्द आणि वास्तव्य, घरातील नोकरांचे मूळ राहण्याचे ठिकाण, त्यांचे असलेले टिपणीसांशी संबंध  सगळी माहिती काढायला सांगा.
आणि हेमंतला महिनाभरामध्ये त्यांच्याकडे आलेले संशयित लोक, फोन कॉलवर त्यांचे झालेले संभाषण आणि त्यांच्या घरी नेहमी होणाऱ्या लोकांचा वावर ही सगळी माहिती घ्या.
याच्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी  इनपुट मिळतील.

दिवस तिसरा...
तीनही पथक आपापल्या कामाला लागली होती.
ही सगळी माहिती गोळा करुपर्यंत एक ते दोन दिवस जाणार होते.हे  हत्या प्रकरण तसं खूप गुंतागुंतीचं होतं. नेमका असा सुगावा काही मिळत नव्हता. गोडबोले साहेबांना तपासाची सुरुवात कुठून करावी हेच कळेना.

घटनेच्या दरम्यानचे सर्व फोटो,  घरातील मृत व्यक्तीचे फोटो, टिपणीस यांच्या मृतदेहाचे फोटो आणि संपूर्ण घराचा व्हिडिओ गोडबोले अतिशय बारीक निरीक्षण करून पुन्हा पुन्हा बघत होते.
त्यांच्या बाजूलाच एक मोठा कोरा कागद आणि पेन ठेवला होता या संपूर्ण निरीक्षणातून त्या कोऱ्या कागदावर गुन्हेगाराचे चित्र प्रकट व्हायला सुरुवात होणार होती.
जवळपास शंभर,दोनशे फोटो मधून एक एक फोटो मोठ्या बारकाईने गोडबोले बघत होते,त्यांची प्रतीक्षा होती ती छोटासा सुगावा मिळण्यासाठी.
एकदा का तो मिळाला की मग खुन्यापर्यंत आपण पोहचतो हे त्यांना माहित होत.
पोलिसांची नजर ही अपारदर्शक भिंतीतूनही पलीकडे बघते असं म्हणतात.
घटनेतील पुरावे स्वतःहून पोलिसांना खुणावतात आणि आपण जिवंत आहोत हेच दाखवून देत असतात त्या जिवंत पुराव्यांना हेच पोलीस खरं महत्व प्राप्त करून देतात.

म्हणतात ना इच्छाशक्ती असली की दगडातूनही अंकुर फुटतो,
घरातील मृत व्यक्तीचा एक फोटो बघताना गोडबोले थोडस थांबले.
त्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्याची अवस्था खूप वाईट झालेली होती, संपूर्ण चेहऱ्यावर रक्ताचे डाग पडलेले, सताड उघडे डोळे पाहून फोटोत सुद्धा बघतांना खूप भीती वाटावी इतका भयानक चेहरा होता. याच फोटोमध्ये गोडबोले यांना पहिला सुराग मिळाला तो म्हणजे त्या मयत व्यक्तीच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी . तिच्या मध्ये सुंदर अक्षरासहित नाव होत.
" मार्कंडेय नमः  ".
गोडबोले यांना नागपूर आणि इतर परिसरातला इतिहास चांगला माहीत होता. संपूर्ण परिसराचे भौगोलिक ज्ञान असलेले गोडबोले साहेब यांना "मार्कंडेय नमः "हे नाव वाचताच त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले ते मार्कंडेय मंदिर,नागपूर पासून 170 किलोमीटर असलेल्या गडचिरोली शहराची प्रतिमा.
मार्कंडा देव हे भगवान शिवाचे लोकप्रिय स्थान आहे, केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील अनेक राज्यातून या ठिकाणी लोक येतात. भाविकांचे पवित्र स्थान असलेले हे ठिकाण.
गोडबोलेंनी आपल्या साथीदाराला मयत इसमाचे सर्व फोटो घेऊन गडचिरोलीला पाठवले. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला एकदा का हे फोटो गेले तर नक्की या व्यक्तीची ओळख पटेल आणि कुणीतरी समोर येईल याची त्यांना खात्री होती.
आणि गोडबोलेंचा अंदाज खरा ठरला. झाले ही अगदी तसेच,
एटापल्ली तालुक्यातून ही व्यक्ती असल्याची माहिती त्यांना मिळाली.
भोसले आणि त्यांचे साथीदार या व्यक्तीबद्दल आणखी माहिती गोळा करण्यासाठी एटापल्ली तालुक्याकडे रवाना झाले.

तिथे पोहोचल्यानंतर त्यांना ह्या व्यक्तीबद्दल आणखी धक्कादायक माहिती मिळाली. ही व्यक्ती अट्टल गुन्हेगार असून या व्यक्तीचा अनेक गुन्ह्यांशी संबंध होता.पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याच्या नावाच्या अनेक एफआयआर सुद्धा झालेल्या होत्या.
आणि त्याचं नाव होतं सुधीर..
गोडबोले यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पहिली कडी जोडली ती श्रीधर टिपणीस आणि सुधीर याची.
तपासाच्या दोरीच एक टोक हातामध्ये आलं होतं आता प्रतीक्षा होती दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची.

हि कडी जोडण्याचे आणखी एक मुख्य कारण होते ते म्हणजे श्रीधर टिपणीस यांची एटापल्ली मधील पोलीस दलातील नोकरी! श्रीधर टिपणीस हे सात वर्ष या ठिकाणी नोकरीला होते आणि त्यांच्याच अधिपत्याखाली ह्या व्यक्तीला अनेक वेळा धडा शिकवला गेला, त्याच्या काळ्या कृत्याला आळा घालण्यात आला.
कदाचित पूर्व  वैमन्यासातून त्याने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज गोडबोले यांनी लावला.

इकडे पोलीस कॉन्स्टेबल नागराज ने दिलेल्या माहितीनुसार टिपणीसांकडे नोकरीला असलेले दाम्पत्य हरी आणि शोभा हे सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील निघाले.
आणि याच  माहितीच्या आधारे गोडबोले यांनी दुसरी कडी जोडली. यांचा पहिला संशय घरात काम करणाऱ्या नोकरांवर गेला.
गोडबोलेंनी नागराजला हरी आणि शोभा यांची गडचिरोलीतील संपूर्ण माहिती घ्यायला सांगितली. त्याचबरोबर त्यांचे सुधीर बरोबर काही संबंध मिळतात का ही सुद्धा गुप्त माहिती आपल्या खबरींकडून काढायला सांगितली. यांचा संबंध लक्षात आला की खरा गुन्हेगार कोण याच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही हे आता गोडबोले यांना समजले होते.

दोन दिवसानंतर पोलिसांच्या हाती आणखी एक मोठा पुरावा लागला तो म्हणजे एका लग्नातील फोटो!!
ज्या फोटोमध्ये  घरातील नोकर हरी, शोभा आणि मयत व्यक्ती सुधीरचा एकत्रित फोटो मिळाला.
वास्तविक पाहता आपल्या दिलेल्या खुना नंतरच्या कबुलीजबाबात आपण घरातील मृत व्यक्तीला ओळखत नाही असा चुकीचा जबाब दोघां नोकरांनी नोंदवला होता.

"कुछ तो गडबड है, भोसले ". गोडबोलें भोसलेशी फोन वर बोलले.

"त्या दोघांना चांगला पोलीसी हिसका दाखवा भोसले,पोपटासारखे बोलायला लागतील ते.".गोडबोले.

दुसऱ्या दिवशी दोघांनाही पोलीस स्टेशनला बोलावून घेतले.
त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ते पुन्हा पुन्हा खोटं बोलत होते.
गोडबोलेनी जेव्हा सुधीर बरोबर चा फोटो त्यांच्या समोर ठेवला तेव्हा मात्र दोघेही गर्भगळीत झाले,आपण आता सत्य बोलल्याशिवाय पर्याय नाही हे त्या दोघांना समजले होते.

साहेब खरं सांगतो,पण खून आम्ही केला नाही आम्हाला याबाबत काहीही कल्पना नव्हती.
आठ दिवसापूर्वी सुधीरचा आम्हाला फोन आला. नागपूरला काहीतरी कामासाठी येतोय म्हणून. आमच्याशी तो अधून मधून संपर्क साधायचा.एकदा दोनदा आम्ही सोबत जेवणही केले. परंतु आम्हाला त्याचा आणि टिपणीस साहेबांच काय वैर होतं हे  अजूनही माहित नाही.
त्या रात्री साडेअकराच्या दरम्यान मी येईल असे त्यांनी आम्हाला सांगितले माझी तेवढी राहण्याची व्यवस्था करा असं तो म्हणाला.आमची रूम छोटी होती. टिपणीस साहेब आणि मॅडमचा आमच्यावर खूप विश्वास होता. एका रात्रीचा प्रश्न असल्यामुळे ते काही बोलणार नाही असे आम्हाला वाटले. साहेब आणि मॅडम यांना तर याबाबतची कल्पनाही नव्हती. रात्री साडेअकरा वाजता सुधीर आमच्याकडे आला तोपर्यंत साहेब आणि मॅडम झोपले होते. आमच्याकडे रात्री जेवण करून त्याची झोपण्याची  व्यवस्था आम्ही आतल्या बेडरूममध्ये केली, तोपर्यंत सगळे ठीक होते.

मॅडम आणि साहेब झोपताना बेडरूम लॉक करत नाहीत. रात्री बारा सव्वा बाराच्या दरम्यान मी सुधीरला बाजूच्या एका बेडरूम मध्ये झोपायची सोय करून दिली आणि मी माझ्या रूम कडे परत आलो. दोन अडीच तासांनी हा प्रकार होईल असे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते .

सुधीरचा घरातील प्रवेश  हा फक्त मला व माझ्या बायकोलाच माहीत होता.परंतु या प्रकरणानंतर देवयानी मॅडमला मोठा धक्का बसला आणि त्या बोलू शकत नव्हत्या आणि ज्या व्यक्तीला आम्ही ओळखत होतो ती व्यक्ती तर मृत पावली होती.
त्यामुळे कुणाकडेच आपल्याबद्दल काही पुरावा नाही असं समजून आम्ही त्या व्यक्तीला 'ओळखतच नाही' हे सांगायचं अस ठरवलं.

पोस्टमार्टम मध्ये श्रीधर टिपणीस यांचा मृत्यू हा श्वास रोखला गेल्यामुळे झाला होता याचाच अर्थ सुधीर व त्याच्या साथीदारांनी टिपणीस यांचा खून केला असावा व त्याच वेळी सुधीरचाही कोणीतरी खून केला असेल असा प्राथमिक अंदाज भोसले यांनी मांडला.
मग तो कोण होता ??????????

प्रकरण खूप गुंतागुंतीच होत चाललं होतं, गुन्हेगार हातामध्ये आला असं वाटत असतानाच तो परत हातातून निसटला होता.
घरातील दरवाजाच्या आतील कड्यावर सुधीर आणि हरि चे ठसे सापडले होते.
सुधीरने कोणालातरी सोबत आणले असावे आणि यांच्या घरातील झटापटीत सुधीरचा झालेला मृत्यू हा केवळ एक चुकलेला डाव असावा असं मत भोसले यांनी मांडलं.
"भोसले,म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय?
साहेब,आपण अजूनही मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचलेलो नाही. कारण आपल्याकडे तसे सबळ पुरावे नाहीत.पुराव्या अभावी आपण काहीही बोलू शकत नाही,फक्त आपण आपली थेअरी मांडू शकतो.
"अगदी बरोबर भोसले, या प्रकरणांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागणार आहे. जोपर्यंत आपल्या हातात सबळ पुरावा येत नाही तोपर्यंत  सर्व गुप्तपणे हा तपास  करावा लागणार आहे.

आणि हो, देवयानी मॅडमची तब्येत कशी आहे आता? तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली का?
नाही साहेब, त्यांना मानसोपचार तज्ञ करमरकर डॉक्टरांकडे ऍडमिट केलं आहे.त्यांनी अन्न पाणी सोडल आहे. कालपासून त्या सलाईन वर आहेत.
कालच त्यांचा मुलगा सिंगापूरहून पोहोचला हॉस्पिटलमध्ये. तो असतो त्यांच्यासोबत.त्याच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का आहे.

"साहेब , गुन्हेगाराच टार्गेट हे फक्त श्रीधर टिपणीस होते असं मला वाटतं कारण त्यांनी देवयानी टिपणीस यांना हात नाही लावला, किंवा त्यांचा देवयानी टिपणीस यांना सुद्धा मारण्याचा प्लॅन झाला असेल परंतु त्यांच्याकडून तो यशस्वी झाला नाही." भोसलेंनी आपले विचार व्यक्त केले.
"नाही भोसले, ह्या मागे अवैध प्रॉपर्टी किंवा जमिनीच्या स्थावर मालमत्तेबद्दल सुद्धा काही देवाण-घेवाण बाकी राहिलेली असू शकते किंवा काही पैशाची लेनदेन झाली असेल आणि ती काही कारणाने पूर्ण होऊ शकली नसेल कदाचित त्याचाही बदला असू शकतो." गोडबोले.

त्यांच्या मुलाच्या भेटीनंतर आपल्याला त्यांच्या स्थावर मालमत्तेविषयी सगळी माहिती मिळेल.

आठ दिवस उलटून गेले होते.

 "हत्या करणाऱ्याची हत्या "झाली होती, आणि तो शोध मात्र अजून लागत नव्हता.
श्रीधर टिपणीस यांची हत्या ही सुधीरने केली हे जवळपास निश्चित झाले होते. श्रीधर टिपणीस यांच्या बाजूला असलेल्या उशीवर  सुधीरच्या हाताचे ठसे मिळाले होते.
पण सुधीर चा मृत्यू कसा झाला हे रहस्य अजूनही कायम होते आणि त्याचाच उलगडा करणे महत्वाचे होते.

गोडबोले साहेबांना रात्री झोप लागत नव्हती,त्यांच्या डोक्यात सतत हाच विचार चालू असायचा की खरा गुन्हेगार कोण? आणि सुधीरची हत्या कोणी केली?आणि तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्यांना समाधान मिळणार नव्हते. रात्री अपरात्री उठून ते पुन्हा सर्व फोटो तपासून बघायचे.एखाद्या फोटोमध्ये आपल्याला काहीतरी सापडेल हा त्यांना आत्मविश्वास होता.

आज बरोबर आठ दिवस घटनेला झाले होते.

रात्री घरात जेवण  करून गोडबोले त्यांच्या पत्नी आणि मुली सोबत बसले असताना त्यांच्या मुलीला अचानक शोकेसचे उघडे असलेले ड्रॉवर डोक्याला लागले.
तेवढ्यात त्यांची पत्नी त्या मुलीवर ओरडली. " तुला किती वेळेस सांगितले आहे, की काम झाल्यानंतर ते ड्रॉवर बंद करत जा. " पुस्तक वाचण्यात गुंग असलेले गोडबोले यांना मात्र त्यांच्या पत्नीच्या ह्या वाक्याने विचार चक्र सुरू करायला मदत केली. ताबडतोब ते बेड वरून उठले आणि आपल्या स्टडी रूम मध्ये जाऊन पुन्हा सर्व एकेक फोटो  बघू लागले.या  वाक्यामुळे त्यांना एक पुरावा मिळाला होता.
आणि त्यांना बरोबर एक फोटो सापडला, पत्नीच्या त्यांच्या ह्या वाक्याने त्यांना  खूप मोठी मदत मिळाली होती . आता ह्या पुराव्यानुसार ते दुसऱ्या खुन्या पर्यंत पोहोचणार होते. पण गोडबोले  मात्र हे गुपित स्वतःपर्यंत ठेवणार होते कारण त्यांना आणखी पुरावे गोळा करायचे होते.

काळा घोडा पोलीस चौकी नागपूर:

जयेश सकाळीच पोलीस स्टेशनमध्ये आला .
"नमस्कार, गोडबोले साहेब ".
"ये ,बस जयेश." गोडबोले साहेबांनी त्याला बसायला सांगितलं.
साहेब अजूनही गुन्हेगाराचा शोध लागलेला नाही आणि माझ्या आईची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.ती इथल्या उपचारांना प्रतिसाद देत नाही.
"हे बघ जयेश,आमचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे आणि तुला माहीतच आहे की हे प्रकरण किती गुंतागुंतीचे आहे,आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. तुला आमच्याकडून काय मदत हवी आहे ते सांग." गोडबोले.
"साहेब,मी माझ्या आईला सिंगापूरला पुढील उपचारासाठी न्यावं म्हणतो." जयेश.
"हो, चालेल की, परंतु तुला त्याआधी या सर्व घटनेची तपासणी चालू आहे आणि चौकशीसाठी  आईला आणि तुला केव्हाही भारतात यावा लागेल हे शपथपत्र लिहून द्याव लागेल." गोडबोले.
"हो साहेब,आम्ही लिहून द्यायला तयार आहोत." जयेश.
तुम्ही ज्या दिवशी सिंगापूरला निघणार आहात त्याची माहिती आम्हाला पंधरा दिवस आधी मिळाली पाहिजे, म्हणजे तुमच्या तिकिटाची एक प्रत ,सिंगापूर मधील तुमचे वास्तव्याचे ठिकाण, तुझ्या नोकरीचा पत्ता  आणि तुमची इतर माहिती सर्व गोष्टी आम्हाला द्याव्या लागतील.
हो साहेब, नक्की मी सर्व कागदपत्रे तुमच्याकडे जमा करतो. मी येत्या दहा तारखेला निघतोय.
10 सप्टेंबर!!

गोडबोलेंशी  सकारात्मक चर्चा करून जयेश आपल्या घरी गेला.
गोडबोले साहेबांनी भोसलेंना आपल्या ऑफिसमध्ये बोलावले.
"या भोसले,बसा . कुठपर्यंत आलाय तपास.?".
"साहेब,प्रकरण खूप गुंतागुंतीच आहे. माझ तर डोकंच काम करत नाही आहे.एकमेकात खूप कड्या गुंतवण्याचा प्रयत्न करतोय पण ती साखळी काही जुळुन येत नाही."
साहेब,गुन्हेगार खूप शातिर आहे. तो कोणताही पुरावा सोडून गेलेला नाही.
"नाही भोसले,असं कधीच होत नसतं गुन्हेगार हा पुरावा सोडून जात असतो. फक्त आपल्याला त्या पुराव्यापर्यंत पोहोचता आल पाहिजे ".
"अगदी बरोबर आहे साहेब."
भोसलेनी मान हलवली.
"चला भोसले उद्या भेटूया आणि हो, उद्याच्या मीटिंगमध्ये अंकितालाही बोलवा.". गोडबोले.
"अंकिता? तिला कशासाठी."?
ते उद्या मीटिंगमध्ये सांगतो.
अंकिताला साहेबांनी का बोलावलं असेल? भोसले ना प्रश्न पडला.

सकाळचे अकरा वाजले होते. आज मीटिंगमध्ये जवळपास सर्वजण होते भोसले,नागराज आणि हेमंत पण आज एक नवीन व्यक्ती मीटिंगमध्ये हजर होती, ती म्हणजे अंकिता!!

अंकिता ही पोलीस कॉन्स्टेबल. पोलीस स्टेशनला रुजू होऊन तिला
साधारण एक वर्ष होत आलं होतं.
गोडबोले साहेब मीटिंग रूम मध्ये आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे कुतूहल होते. साहेबांच्या डोक्यामध्ये काय प्लॅन चाललाय हे कुणालाच कळत नव्हते.
"गुड मॉर्निंग. ".गोडबोले साहेबांनी आत प्रवेश करताच सर्वांना
गुडमॉर्निंग केले . पाचही जणांची मीटिंग सुरू झाली. प्रत्येकाने आपापल्या परीने केलेले प्रयत्न आणि ह्या प्रकरणाबद्दल संभाव्य शक्यता व्यक्त केल्या परंतु कुणीही टार्गेट पर्यंत पोहोचलं नव्हतं आता शेवटचा पर्याय गोडबोले साहेब काय सांगताय यावर सर्व  अवलंबून होत.
"भोसले, तुम्हाला काय वाटतं गुन्हेगार कुठे लपलाय ? " स्मित हास्य करत आणि भोसले कडे बघत गोडबोले साहेबांनी भोसले यांची फिरकी घेतली.
"साहेब, तेच तर आपण शोधायचा प्रयत्न करतोय.". सर्व जण हसले.

"भोसले, गुन्हेगार सिंगापूर मध्ये लपलाय........"

" काय? साहेब कशाला माझी चेष्टा करता?" भोसलेंनी  केविलवाणा चेहरा करत सगळ्यांकडे बघितले.

आता तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे करायचं,
ह्या मिशनसाठी मी अंकिता आणि हेमंत ची निवड केली आहे दोघेही तरुण आहेत आणि त्यांच्यावर कोणीही संशय घेऊ शकत नाही.
सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते साहेबांच्या डोक्यात काय प्लॅन चाललाय ऐकायला सर्वजण उतावीळ झाले होते परंतु ते मात्र अतिशय शांत डोक्याने एक एक पाऊल उचलत होते.
कुणाच्याही माहिती प्रमाणे अजून पर्यंत ह्या प्रकरणाचा उलगडा झाला नव्हता.
हे बघा जयेश आणि त्याची आई देवयानी टिपणीस हे येत्या दहा तारखेला सिंगापूरला चालले आहेत.

आपला इथला तपास संपलेला आहे, आपल्याला आता तपास करायचा आहे तो सिंगापूर मध्ये आणि म्हणून तुमची निवड केली आहे मला खात्री आहे ह्या पुढच्या प्रवासात आपल्याला नक्की गुन्हेगार सापडेल हे सर्व मिशन आपल्याला खूप गोपनीय  ठेवावे लागेल नाहीतर परदेशातील गुन्हेगार सावध होऊ शकतो.

अंकिता आणि हेमंत तुम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या जातील, तुम्ही नेहमीच आमच्या संपर्कात राहायचे.तुमच्या दोघांचीही राहण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे.
उरलेल्या काही खाजगी गोष्टी मी तुमच्या दोघांशी बोलेल तेही जाण्याच्या एक दिवस आधी.!!

गोडबोले साहेबांच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय हे अजूनही कुणाला समजले नव्हते, पण साहेब मात्र कोणत्याही प्रकरणाच्या मुळाशी जाताना  अगदी तयारीने जातात हे सर्वांना माहीत होते.

दिनांक 9 सप्टेंबर :
(प्रवासाच्या एक दिवस आधी )
गोडबोले साहेबांनी एक अतिशय गोपनीय बैठक अंकिता आणि हेमंत बरोबर घेतली.त्यांना पाहिजे त्या आवश्यक सूचना दिल्या, कोणत्या वेळेस काय करायचे याची संपूर्ण माहिती दिली, त्यावेळी लागणारी मदत आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची माहिती या संदर्भात सर्व माहिती दिली.अर्थात हे सर्व गोपनीय होते.

10 सप्टेंबर :
सकाळची सहाची वेळ!!!
नागपूर  आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची गर्दी सुरू झाली होती.
पहाटे पाच वाजताच अंकिता आणि हेमंत दोघेही एअरपोर्टवर हजर झाले.
त्यांचा प्रवास हा नागपूरहून मुंबई व मुंबईहून सिंगापूर असा होणार होता.
दोघेही अगदी प्रवासी वाटतील अशा वेशभूषेत त्यांनी एअरपोर्टच्या आत प्रवेश केला. ते दोघे पोलीस अधिकारी असतील याची किंचितही शंका कोणाला येणार नव्हती. वयाने अगदी तरुण असलेले हे दोघेजण चेक इन करून आत  गेले आणि मुंबईच्या फ्लाईटची वाट बघत गेट नंबर दोन वर थांबले .
सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांची त्यांची फ्लाईट होती. थोड्याच वेळात अंकिताची नजर समोरून येणाऱ्या दोन पॅसेंजर कडे गेली, अंकिताने हळूच नजरेने हेमंतला खुणावले.
इथूनच तपासाचा तिसरा टप्पा सुरू होणार होता.
ते दोघे इतर कोणी नसून देवयानी टिपणीस आणि त्यांचा मुलगा जयेश होते. वयाची साठी पार केलेल्या   देवयानी टिपणीस अंगावर गोल्डन कलरची शॉल पांघरून होत्या. त्यांची तब्येत मात्र खालावली होती. जयेशच्या चेहऱ्यावर मात्र कसलेही प्रकारची चिंता दिसत नव्हती.
त्यांच्यापासून वीस फुट अंतरावर  ते दोघेही येऊन बसले,
दोघांची नजर त्यांच्याकडे होती. या काळात त्यांना कोणी भेटते का? त्यांच्याशी कुणी फोनवर बोलतय का? त्यांना कोणी काही आणून देत आहे काय? सगळ्या गोष्टीची हे दोघे खात्री करणार होते. न जानो कोणत्याही एखाद्या घटनेतून त्यांना एखादा पुरावा मिळू शकतो. फ्लाईटला एक तास उरला असताना बोर्डिंग सुरू झाले.
सर्व प्रवासी हळूहळू फ्लाईट मध्ये जाण्यास निघाले.
अंकिता आणि हेमंतचा सीट नंबर होता

 A-25 आणि D- 25.
हे नंबर निवडण्याचे कारणही तसेच होते. गोडबोले साहेबांना जयेश आणि देवयानी टिपणीस यांनी बुक केलेल्या तिकीट नंबरची माहिती आधीच काढली होती  आणि त्यांचे नंबर होते B-25 आणि C-25.
अंकिता आणि हेमंत हे नागपूरपासून सिंगापूर पर्यंतचा प्रवास अगदी असाच करणार होते. गोडबोले साहेबांनी अतिशय तर्कबुद्धीने हा प्लॅन केला होता कारण त्यांना कळून चुकले होते की हा प्लॅन केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण भारतामध्ये काहीही हाती लागत नव्हते.
थोड्याच मिनिटांमध्ये जयेश आणि देवयानी टिपणीस या त्यांच्या जागा शोधत आपल्या सीट जवळ आल्या.
अंकिता आणि हेमंतने दोघांनी एकमेकाकडे बघितले आणि खात्री करून घेतली. त्यांनी आधीच ठरवले की फ्लाईट मध्ये बसल्यानंतर आपण एकमेकांची ओळख दाखवायची नाही.
पुढील दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सर्व पॅसेंजर आपापल्या जागेवर बसले.

थोड्याच वेळात  एअर होस्टेस ने फ्लाईट टेकऑफची घोषणा केली.
आणि पुढच्या अर्ध्या मिनिटांमध्ये फ्लाईट रनवेवर धावू लागली.
विमानाने गती पकडली होती, धावपट्टीवरून धावणाऱ्या सुसाट विमानाने क्षणार्धात  उत्तुंग आकाशात झेप घेतली. पुढील वीस पंचवीस मिनिटांमध्ये एअर हॉस्टेस ने पुन्हा  सूचना करून सांगितले,की विमान मुंबईच्या दिशेने निघालेले आहे आपण सिट बेल्ट काढू शकता.
हेमंत आणि अंकिता ची दोघांकडे नजर होती. अंकिताच्या बाजूला देवयानी टिपणीस बसलेल्या होत्या तर हेमंत च्या बाजूला जयेश !!
पंधरा-वीस मिनिटांचा कालावधी गेला आणि एअर होस्टेस सकाळचा नाश्ता घेऊन आली.
एका एका पॅसेंजरला नाश्ता देत त्या प्रत्येकाला काय हवं ते विचारत होत्या.
सर्वप्रथम बाजूला बसलेल्या हेमंतला एअर होस्टेस ने विचारल ", सर तुम्हाला नाश्त्यासाठी काय हवं आहे.?
"वन सँडविच अँड टी प्लीज ". हेमंतने आपली ऑर्डर दिली. हेमंतला सँडविच आणि टी सर्व्ह केल्यानंतर एअर होस्टेस ने जयेश ला पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"जस्ट बिस्किट अँड टी. प्लिज."
जयेश ला एअर होस्टेसने चहा आणि बिस्कीट सर्व्ह केले.
जयेश आपल्या आईला काय मागवावे या विचारात होता.
तेवढ्यात एअर होस्टेस ने देवयानी टिपणीस यांना प्रश्न विचारला.
"मॅडम ,तुम्ही नाश्ता मध्ये काय घ्याल?
आणि देवयानी टिपणीस यांनी उत्तर दिले,
"आय वूड लाईक टू टेक सँडविच अँड टी.".....!!!!!!!!!!!!.
हे उत्तर ऐकून जयेश आपल्या आईकडे बघतच राहिला. आई तू बोलू शकतेस?
.
.
.
.

माझा तर विश्वासच बसत नाही.
"तुला कोणी सांगितलं की,मला बोलता येत नाही ते?. हळूच गालातल्या गालात हसत देवयानी टिपणीस जयेश कडे बघत म्हणाल्या.

बाजूला बसलेल्या अंकिता आणि हेमंतने या सर्व गोष्टी हेरला होत्या.
अंकिताला सांगितल्या प्रमाणे अंकिताने देवयानी टिपणीस सीटवर बसल्यापासून व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केले होते. तर हेमंतने  आपल्या पाकिटातील ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवले होते.
देवयानी टिपणीस  बोलू शकतात हा मोठा पुरावा या तपासात मिळाला होता.
देवयानी टिपणीस आणि जयेश यांच्यातील चाललेल्या संभाषणाचा प्रत्येक  शब्द न शब्द रेकॉर्ड होत होता. अंकिता आणि हेमंत हे काम अगदी चोखपणे करत होते. कुणाच्याही कानाला याची खबर नव्हती.

गोडबोले यांनी रचलेला सापळा आणि त्या सापळ्याच्या गळाला लागलेले मासे आता तडफडणार होते. कुणाच्याही डोक्यात इतकी भन्नाट कल्पना आली नव्हती. यांची प्रत्येक हालचाल ही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत होती. शब्द न शब्द ऑडिओ रेकॉर्डमध्ये बंद होत होता. थोड्याच वेळात पायलटने विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत आहे याची घोषणा केली. एक ते दीड तास कसा गेला कुणालाच कळले नाही. विमान मुंबईच्या विमानतळावर उतरले होते. सर्व प्रवाशांची उतरल्यानंतर आपल्या पुढील प्रवासासाठी घाई चालली चालली असतांना जयेश आणि देवयानी टिपणीस आंतरराष्ट्रीय विमानाच्या दिशेकडे निघाले , त्यांच्या पाठोपाठ  हेमंत आणि अंकिताही होते .
तेवढ्यात त्यांच्यासमोर आलेल्या मुंबई विमानतळावरील पोलीस अधिकाऱ्याने त्यांना बाजूला घेतले. "आपण देवयानी टिपणीस का?" पोलीस  अधिकाऱ्याने देवयानी टिपणीस यांना प्रश्न विचारला.

त्यांनी फक्त होकारार्थी मान हरवली.

"देवयानी टिपणीस,तुम्हाला अटक झालेली आहे. तुम्हाला चौकशीसाठी आमच्याबरोबर यावे लागेल."
"काय अटक?आणि कशासाठी? आईने काय गुन्हा केलाय?". जयेश.

तुमच्या आईने काय गुन्हा केलाय याची सर्व माहिती तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मिळेल.
"साहेब, माझी आई आजारी आहे. तिने काही गुन्हा केला नाही. तुम्ही आम्हाला उगाच त्रास देऊ नका. आम्ही आईच्या पुढील तपासणीसाठी सिंगापूरला चाललो आहोत आणि आमच्याकडे तशी पोलिसांची परवानगी पण आहे." जयेश विनंती करू लागला.

"हे बघा, आमच्या हाती काही संशयास्पद पुरावे लागले आहेत आणि त्याच पुराव्यांच्या आधारे देवयानी टिपणीस यांना अटक करण्याची ऑर्डर आम्हाला नागपूरहून मिळाली आहे.कृपया आम्हाला सहकार्य करा आणि आमच्याबरोबर चला.". पोलीस अधिकारी.
त्या दोघांना आता पोलिसांच्या सूचनेचा आदर केल्याशिवाय पर्याय नव्हता. दोघेही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गुन्हे शाखेच्या विभागात दाखल झाले.
आत जाताच पोलीस अधिकाऱ्याने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले,
"हे बघा, देवयानी टिपणीस आणि जयेश तुम्हाला आज परत नागपूरला जावे लागेल. तुम्ही पुढील प्रवास करू शकत नाही.आम्हाला तशी ऑर्डर आलेली आहे.तुमची पुन्हा नागपूरला जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे."

संध्याकाळ पाच पर्यंत देवयानी टिपणीस आणि जयेश पुन्हा नागपूरला पोहोचले.
दोघांनाही काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. गोडबोले आणि भोसले त्यांची वाटच बघत होते.
देवयानी टिपणीस आणि जयेश यांचे चेहरे पडलेले होते आपण गुन्हेगार नाही आहोत हेच त्यांना आता सिद्ध करायचे होते.

"साहेब ,देवयानी टिपणीस आणि जयेश चौकशी रूम मध्ये आलेले आहेत तुम्ही येता का? गोडबोलेना पोलिसांनी  सांगितले.

दोघेही चौकशी रूम मध्ये बसले होते.
अंधाऱ्या खोलीमध्ये टेबल वर फक्त दोन मोठे दिवे चालू होते बाजूला सगळीकडे अंधार होता. खोलीचा दरवाजा उघडून गोडबोले साहेब आत मध्ये आले.
त्यांच्या पाठोपाठ भोसले, नागराज हेमंत आणि अंकिता  ही आले.
आता चौकशी सरळ सरळ होणार होती.
त्या दोघांच्या समोर हे पाच जण बसले .
प्रत्येकाच्या प्रश्नाला त्यांना आता उत्तर द्यायचे होती.

"देवयानी टिपणीस, तुम्हाला या हत्याकांडाची सगळी माहिती असताना सुद्धा तुम्ही ती आमच्यापासून का लपवली"?गोडबोलेनी सरळ त्यांना प्रश्न केला.
त्यांच्या  चेहऱ्यावर घाम फुटला होता. बोलताना तत फफ व्हायला लागली.
आम्हाला तुम्ही मूर्ख समजला होता की काय? साहेब चिडले होते.
"साहेब,ह्या प्रकरणांमध्ये माझा काहीही हात नाही. मी फक्त एक व्हिक्टिम आहे.". देवयानी.
"देवयानी मॅडम, तुम्हाला काय वाटलं तुम्हीच हुशार आहात की काय? तुमच्या बद्दलचे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत.
तुमच्याबद्दलचा संशय तर तेव्हाच आला होता जेव्हा घरातील पिस्तूल गायब झाले.
परंतु तुम्ही केलेल्या अभिनयाची दाद द्यावी लागेल." गोडबोले स्पष्ट बोलत होते.
"आपल्याला स्वतःला या घटनेचा खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे आणि या घटनेतून आपली वाचा गेली आहे हे नाटक तुम्ही खूप छान केलं. पण तुम्ही आमच्या नजरेतून सुटू शकत नव्हत्या.". गोडबोलेनी त्यांचा पर्दाफाश केला.

"डॉक्टर करमरकरांकडे जेव्हा तुमचे रिपोर्ट चेक केले त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले होते की यांच्या कोणत्याही शारीरिक हालचालींवर किंवा कोणत्याही अवयवावर परिणाम झालेला नाही. यांची स्वर यंत्रणा व्यवस्थित काम करते. याचाच अर्थ स्पष्ट होता की तुम्ही या घटनेचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःला मानसिक रुग्ण म्हणून घोषित केले होते,जेणेकरून खुनाचा तपास आपल्यापर्यंत न येता तो भरकटत दुसरीकडे जाईल आणि म्हणूनच आम्ही हा सापळा रचला, शिवाय
तुमच्या नावावर असलेलं पिस्तूलच लायसन आणि पिस्तूलच्या बॉक्समधून गायब झालेले पिस्तूल यांनी आमचा तुमच्यावरील संशय वाढला." गोडबोलेनी सविस्तर माहिती सांगितली.
तुम्ही नेहमी पिस्तूल आपल्या शेजारी झोपताना बाजूच्या ड्रॉवरमध्ये ठेवत होता की नाही?
आम्हाला ही सर्व माहिती तुमच्या नोकराने दिली आहे.
घटनेच्या वेळी तुम्ही ज्या बाजूने झोपता त्या बाजूचा ड्रॉवर हा घटनेच्या वेळी उघडा होता ज्याच्यावर तुमच्या बोटाची ठसे मिळाली आहेत. आणि त्याच ड्रॉवरमध्ये तुम्ही नेहमी पिस्तूल ठेवत होता.
तुम्ही पिस्तूल तर काढलं,पण ड्रोव्हर बंद करायला विसरलात. ( मनात गोडबोले आपल्या पत्नीचे धन्यवाद मानत होते. )
सुधीरच्या हत्येचे खरे खुनी तुम्ही आहात?....कबूल करा.....
तुम्ही या दोघांना ओळखता?हेमंत आणि अंकिता कडे बोट करून गोडबोले यांनी त्यांना प्रश्न विचारला.
नागपूर मुंबई प्रवासात दोघेजण तुमच्याबरोबर प्रवास करत होती. तुमची आणि जयेश झालेली सर्व बातचीत आमच्याकडे आहे.
आता मात्र देवयानी टिपणीस रडायला लागल्या. खरे काय आहे हे सांगितल्या शिवाय पर्याय नव्हता.
आणि त्यांनी सत्य सांगायला सुरुवात केली.....................

श्रीधर टिपणीस माझे पती आणि आमच्यात कित्येक वर्षापासून वाद चालू होते. त्यातच आमच्या असलेल्या संपत्तीचा आणि काही जमिनीचा वाद विकोपाला गेला होता. सुधीर बरोबर श्रीधर यांचे बरेच व्यवहार झाले होते.
आमच्यातील या सततच्या वादामुळे बहुतेक प्रॉपर्टी श्रीधर टिपणीस हे सेवाभावी संस्थांना जमा करणार म्हणून सांगायचे,माझा मात्र यास विरोध होता. माझ्या पतीच्या प्रॉपर्टी मध्ये सुधीर ही सहभागी होता. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांचा काटा काढण्यासाठी सुधीर चा वापर करायचा ठरवले व त्याच  वेळी सुधीरचा घातही करायचा असा प्लॅन आखला. म्हणजे दोघांच्या मृत्यूनंतर सर्व प्रॉपर्टी माझी होणार होती. ही सर्व प्रॉपर्टी विकून मी कायमस्वरूपी सिंगापूरला स्थायिक होणार होते. त्यामुळे मीच हळूहळू सुधीरशी संपर्क वाढवला आणि त्याला माझ्या मिस्टरांच्या खुनाची सुपारी दिली. काही पैशांच्या मोबदल्यात तो ही गोष्ट करायला तयार झाला कारण त्याला श्रीधर टिपणीस यांच्यावर पूर्वीपासून राग होताच. वेळोवेळी त्याला तुरुंगाची हवा खायला लावणारे श्रीधर टिपणीसांना धडा शिकवायचा होता त्यामुळे मीच काट्याने काटा काढायचे ठरवले.

खरंतर त्या रात्री मीच सुधीरला घरी बोलावले होते.हरी आणि शोभा शी संपर्क करायला सांगितला. मी आणि सुधीर आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत हे कोणालाही माहीत नव्हते.
आणि त्या रात्री ठरल्याप्रमाणे दोन सव्वा दोन च्या सुमारास  सुधीरने आमच्या बेडरूममध्ये प्रवेश केला त्यावेळी मी जागीच होते,माझे मिस्टर गाड झोपेत असताना सुधीरने उशीने त्यांचे तोंड दाबले.सुधीर यामध्ये गुंतलेला असताना मी ड्रोव्हर मधून हातामध्ये पिस्तूल घेऊन ठेवले होते ते कुणाला दिसणार नाही म्हणून त्यावर एक ओढणी टाकली होती.
थोड्या वेळात टिपणीस यांची हालचाल बंद झाली जसा सुधीर बाजूला आला मी त्याच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या, तसा तो धाडकन खाली पडला तेव्हाच मी मोठ्याने ओरडले पण लगेच स्वतःला सावरून,मी घरातील दिवा बंद केला व भिंतीला टेकून बसले.
माझ्याजवळ वेळ नव्हता. मी ते पिस्तूल तसेच माळ्यावरती पाठीमागे फेकून दिले आणि दिवा बंद करून भिंतीपाशी येऊन बसून राहिले.

"देवयानी टिपणीस,तुम्ही दुसऱ्यासाठी रचलेला सापळ्यात तुम्ही स्वतःच अडकलात.
आपल्या वाईट कर्माची फळ आपल्याला भोगावीच लागतात त्यातून कोणाचीही सुटका होत नाही.फक्त प्रश्न असतो ती वेळ येण्याचा,ती योग्य वेळ आली की कोणताही काळ तुम्हाला वाचवू शकत नाही.
  गोडबोलेंनी  ह्या हत्याकांडाचा तपास लावला होता. या भीषण दुहेरी हत्याकांडाचे अतिशय पद्धतशीरपणे सर्व रहस्य उलगडून ते मुख्य आरोपी पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते.
"भोसले,  देवयानी टिपणीस यांना अटक करा."
भोसले यांना सूचना देऊन गोडबोलेंनी  आपली कॅप डोक्यात घातली आणि चौकशी रूम मधून बाहेर पडले.


( ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेतील पात्र, नावे, घटनास्थळ सर्व काल्पनिक आहे याचा कोणत्याही सत्य घटनेची संबंध नाही )


©®लेखक : प्रकाश फासाटे.
मोरोक्को.नॉर्थ आफ्रिका.
212661913052.



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू