पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

छावा

पुस्तक आढावा
पुस्तकाचे नाव- छावा
लेखक-दिवंगत शिवाजी सावंत
प्रकाशन- कॉन्टिनेन्टल प्रकाशन, विजयानगर, पुणे
आवृत्ती - 15 वी
प्रकाशन क्रमांक - 830
एकूण पाने -858
किंमत- 500 रु.

मी शक्यतो अकल्पनात्मक (Non-Fiction), प्रेरणात्मक (Motivational),चरित्रात्मक (Biography), आत्मचरित्रात्मक (Autobiography) आणि व्यक्तिमत्व विकास  ( Personality Development) यावर आधारीत पुस्तके वाचतो. माझ्या अपघाताच्या काळात शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझ्या वडिलांचे मित्र श्री माणिकराव कार्ले गुरुजी आमच्या घरी चौकशीसाठी येत असत, मग मी त्यांना माझ्या कांही कविता ऐकवत असे, कारण ते देखील काव्यप्रेमी तसेच वाचन प्रेमी आहेत. चर्चा करत असताना त्यांनी म्हटले- "तुम्ही कोणती कादंबरी वाचली आहे काय?" मी म्हणालो- "मला शक्यतो कादंबरी वाचन आवडत नाही." ते म्हणाले, "माझ्याकडे एक ऐतिहासिक कादंबरी आहे 'छावा',अवश्य वाचा." विशेष म्हणजे छत्रपती शंभूराजांच्या जयंतीदिनी मला ती वाचण्यास मिळाली. या पेक्षा  अहोभाग्य काय असू शकतं? दिवंगत शिवाजी सावंत यांच्याविषयी पूर्वी खूप कांही ऐकलं होतं, म्हणलं मग प्रत्यक्षात त्यांच्या लिखाणाचा आस्वाद घ्यावा.
                     राॅन्डा बर्न यांच्या  Law of attraction  (आकर्षणाच्या नियमानुसार) आपण केलेली उत्कट इच्छा ब्रह्मांड पूर्ण करतं. तसाच प्रकार माझ्या बाबतीत झाला.एका साहित्यिकानं म्हटलंय की, तुम्हाला जर वाचनाची आवड नाही तर तुमच्यापर्यंत वाचनायोग्य पुस्तक पोहचलं नाही. शिवाजी सावंत यांचं 'मृत्युंजय' ही कर्णावर आधारीत कादंबरी खूपच छान आहे, असं ऐकलं आहे. सुरुवातीचे 10-15 पानं वाचली आणि नंतर काही कारणास्त्व ती वाचता नाही आली, परंतु त्या कादंबरीवर आधारीत मृत्युंजय' हे नाटक मी M.Sc.ला  असताना
छत्रपती संभाजीनगरात पाहिल्याचं आठवतं. असो!
         दिवंगत शिवाजी सावंत हे मराठी साहित्यात एक मोठं नाव आहे. एखादी ऐतिहासिक कादंबरी जिच्या  पंधरा आवृत्त्या निघतात म्हणजे उगाच नव्हे. वाचकांचं त्यांच्या लिखाणावर असलेलं उदंड प्रेम यातून दिसतं. ऐतिहासिक कादंबरी लिहिणे म्हणजे सोम्या गोम्याचं काम नव्हे, कारण ही छावा लिहिताना दिवंगत शिवाजी सावंत यांना जवळपास मराठी 76 आणि इंग्रजी 13 संदर्भग्रंथ वाचावी लागली. किती मोठी सहनशीलता असेल या माणसांत ? खरंच! मग कुठं माणसं मोठी होतात. आमच्यासारख्या नवोदित लेखकांना ही एक प्रेरणाच आहे.
                धर्मवीर, स्वराज्यरक्षक शंभू महाराज यांवर काय लिहावं? हे दिवंगत सावंतानी या संदर्भग्रंथातून हेरलं आणि आपल्या एक वेगळ्या लेखनशैलीचा वापर करून 'छावा' लिहिली. ती वाचत असताना रटाळ, कंटाळवाने कधीच वाटत नाही उलट आपल्या डोळ्यासमोरच सर्व घडतंय असा आभास होतो. दिवंगत शिवाजी सावंत म्हणतात, "जिथं इतिहास मुका होतो तिथं तारतम्यानं त्याला सादवावं लागतं." "हे खूपच कठीण काम त्यांनी पद्धतशीरपणे आपल्या या कादंबरीत हाताळलं. उपमा अलंकाराचा वापर करून मराठी भाषेला त्यांनी समृद्ध केलं. मराठी, हिंदी आणि संस्कृतचा पाहिजे तिथं वापर करून कादंबरीला जीवंतपणा आणला. छत्रपती शंभू राजांच्या जीवनातील एक- एक प्रसंग हळुवारपणे उघडत आपल्यासमोर आणला. त्यांनी लिहिलेला प्रत्येक प्रसंगातील संवाद आपल्या हृदयाला भिडतो. धर्मवीर शंभू महाराज यांच्यासाठी कुणीतरी लिहिलेला एक हिंदी शेर मला आठवला - "मौत डरी थी    देखकर उसे ए
खुद मौत का दावा था,
धरती को नाज था उसपर
ऐसा शेर शिवा का छावा था।"
अवश्य एकदा वाचाच- दिवंगत शिवाजी सावंतानी लिहिलेला हा 'छावा'.
©®-विश्वेश्वर कबाडे (नवोदित कवी,लेखक),अणदूर
ता.तुळजापूर
जि.धाराशिव भ्रमणध्वनी-9326807480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू