पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

क्षमा

.....क्षमा.....

सौ.सरोजिनी बागडे...

क्षमा मागायला सांगितले तर कुणाची मागणार?

खरे तर ही यादी न संपणारी आहे...कशी, का, आणि कोणत्या कारणासाठी क्षमा मागायला हवी ते शोधायला गेलो तर जाणते अजाणतेपणी आपण सर्वानाच दुखावलेले असते...जे कळत नाही म्हणून त्या बद्दल क्षमा मागायचे सुचत नाही....आणि चूक कळते तिथे भला मोठ्ठा " Ego" आडवा येतो ते वेगळेच...

कधी नातेवाईक तर कधी मित्र..यांची खूप आठवण आली, प्रेमाचा उमाळा आला म्हणून एकत्र जमलो तरी हळूच चिमटा (शब्दिक) घ्यायला, आणि कोपरखळी ( ही पण शब्दिकच) मारायची संधी सोडत नाही....
एकाला चांगले म्हणताना दुसऱ्याकडे तिरक्या नजरेने बघितले जाते ( आठवून बघा )... लग्नात मानापमान चे काय थोतांड चालते, त्याने पुढे किती नाती तुटतात. ती चूक कोणत्या सदरात मोडते?
" मला तसे म्हणायचे नव्हते "
हे म्हणणे कधी खरेही असते.. तर कधी सोईस्करपणे बोलून त्यावर पांघरून घातले जाते...( ते स्वतः च घेतो आपण आपल्या तोंडावर)

मुलं चुकली म्हणून शाळेत शिक्षा केली तर शिक्षकांना जाब विचारायला, त्यांची तक्रार करायला आई वडील मागेपुढे पाहत नाही..चूकी केलेल्या मुलाला शिक्षकांची माफी माग असे सांगायचे सोडून, मुलासमोर शिक्षकाला धारेवर धरणाऱ्या बापाची पोर माफी मागायला शिकणार?

ऑफिस मध्ये फाईल्सच्या थप्पी लावून खूप काम असल्याचा आव आणत काम टाळतो..पण पगार आणि ओव्हरटाईम मात्र भरभरून घेतो...या कृत्यांची माफी नसते मागायची, तर त्या गोष्टींची आपल्याला लाज वाटायला हवी..

निसर्गाबद्दल तर बोलायलाच नको...त्याची तर पुरती वाsssट लावलीय आपण...ग्लोबल वॉर्मिग च्या नावाखाली वाढलेले प्रदूषण चक्क जागतिक समस्या बनवून टाकलीय...त्यात प्राणी पक्षांच्या प्रजाती नष्ट झाल्या..
जंगलात अचानक आग लागणे, जलचर प्राण्यांची संख्या कमी होणे हे आपण ओढवून घेतलेले संकट आहे.

पुढच्या पिढीसाठी आपण
काय वाढून ठेवलंय !... ते कृत्य तर माफी मागण्या लायकीचे सुद्धा नाही...अजून वर तोंड करून या पिढीने पुढाकार घ्यायला हवा...
झाडे लावायला हवी...पाणी वाचवायला हवे असे पोकळ उपदेश देत सुटतो...तीच बसल्या जागी पाण्याचा ग्लास मिळाला नाही म्हणून तनफन करणारी माणसं खरंच मनापासून माफी मागतील?

आजकालच्या मुलींना वट पौर्णिमा माहीत नाही, पूजा करणे माहीत नाही, असे म्हणताना आपण वड पिंपळाची झाडे तरी ठेवली आहेत का? मुळासकट उपटून टाकली ना .. माफी कुणाची मागणार?.... वडाची,सावित्रीची,
सत्यवानाची की यमाची...
क्षमायाचना स्वतःची करा, आपल्या पिढीने सगळ्यांचीच वाट लावली. पूर्णपणे नाही पण खारीचा वाटा तर आपलाही आहे त्यात...

आपला प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून शॉर्ट कट रस्ता बनवताना डोंगर पोखरून मोठमोठाले बोगदे तयार करताना किती झाडी तोडावी लागली....काश्मीरला जाताना एकदा हे अनुभवून बघा...पुढे असे ना होवो की "काश्मीर की कली" च काय "काटे" सुद्धा बघायला नाही मिळणार..माफी चित्रातल्या हिरव्यागार झाडांची मागावी लागेल....

मॉल मध्ये चौपट किमतीने वस्तू घेणारे, हातात साठ सत्तर हजाराचा मोबाईल घेऊन फिरणारे आपण मिरची, कोथिंबीर, कांदे टोमॅटो घेताना घासाघीस करतो...
शेतकऱ्याच्या आत्महत्येस आपणही काही अंशी जबाबदार आहोत ना? सुती कपडा स्वस्त पाहिजे पण कपाशीला मात्र जास्त किंमत द्यायची नसते...ही चूक लक्षात येते आपल्या? मग ! शेतकऱ्याची सुद्धा माफी मागावी हे सुद्धा सुचत नाही...

आपल्या करमणुकीसाठी ऊंचच ऊंच मोबाईल टॉवर, टीव्ही टॉवर उभारले, चिमण्या कावळे मरायला लागले..याचे भान ठेवले आपण? त्या पक्षांची माफी कशी मागणार?

कुत्री मांजर पाळणे ही फॅशन आहे की गरज ? त्यांना निसर्गाने जसे जगण्यासाठी जन्म दिला तसे त्यांना आपण मुक्त पणे जगू देतो? त्यांची क्षमा कशी मागणार? पाळलेल्या मांजरीला उंदीर वगैरे हे तिचे जे नैसर्गिक खाद्य आहे ते देतो का आपण ? तिलापण फक्त दूध आणि थोडे फार आपलेच जेवण देतो ना?

की आपण ताजे चिकन मटण, फिश फ्राय खातो तसे "उंदीर करी, उंदीर फ्राय" देतो ? त्यांची क्षमा कशी मागणार? आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी कोंबडी, बकरे कापतो, हे माफी लायक आहे? छान मिठू मिठू बोलणाऱ्या पोपटाला पिंजऱ्यात कैद करतो.. मग गोड बोलणारा ( खरेतर नाटकी) माणूस मात्र मोकाट सुटलेला असतो.. त्याला पिंजऱ्यात कोंडून ठेवतो का ?

अथांग पाण्यात जन्माला आलेले मासे फिशटँक मध्ये खुश असतील?...त्यांना बंदिस्त करण्याचा अधिकार माणसाला कुणी दिला? हे क्षमा योग्य आहे?

बैलांच्या, ऊंटांच्या शर्यती लावल्या जातात, घोड्यांवर पैसे लावून जुगार खेळले जातात, त्यांची काय दमछाक होत असेल समजू शकतो आपण?

आणि ज्या स्वतःच्या चुका आपण मान्य करायला तयारच नसतो..." मी ही चूक केलेलीच नाही, आणि मी कधीच चुकत नाही" ...या अहंगंडाखाली केलेल्या चुका? त्याचे काय ?

सर्विस करताना ती गरज म्हणून करतो हे खरे आहे, पण दोघांनी कमावण्यासाठी घराबाहेर पडणे ह्याची प्रत्येक घरातल्यांना गरज असतेच का? ( खरेतर हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाहीये ) की स्वकमाईची चटक लागते sofisticated भाषेत सांगायचे तर pocket money साठी मुलांना रडवत ठेवून, घरातल्या वृध्द व्यक्तींना मुलांना सांभाळायला सांगून घराबाहेर पडणे खरंच गरजेचे आहे का हे कधी विचार करतो का? ( अशी काही उदाहरणे मी अगदी जवळून बघितली आहेत )

मी तर म्हणेन की आधी आपल्या मुलांची माफी मागायला हवी...ज्यांना हवे तसे निरागस बालपण उपभोगायला मिळाले नाही त्यांची...अकाली त्यांना समजूतदार बनावे लागले...
मला माझ्या मुलाची एक गोष्ट कायम आठवते. दुसरी तिसरीत असेन तेव्हा तो....त्याची एक छोटी मागणी होती...शाळेतून घरी आल्यावर आईने आपल्यासाठी दार उघडावे. त्याची ही इच्छा मी त्याला हवी तेव्हा पुरी करू शकले नाही.. आता मी त्याची घरी यायची वाट बघते...रात्री जाग आली की msg आला का बघते, तेव्हा मला ही गोष्ट सतत आठवत रहाते.. बोचत राहते...त्याची कशी माफी मागू मी? आईने नोकरी करणं गरजेचं होत हे मुलांना समजे पर्यंत ती मोठी झाली होती... आता पोरच माझे आईबाबा झालेत... मला धीर देतात...जोडीदार तर एकमेकांना गृहितच धरतात...

चुकीची माफी मागायची म्हटली तर अगदी किडा मुंगी पासून ते वाघ सिंह पर्यंत सर्वांची मागावी लागेल....मुंगी, ढेकूण, कोक्रोच, पाली , साप मारणे , प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, हत्ती, झेब्रा सारखे प्राणी पिंजऱ्यात ठेवणे ही चूकच आहे ना!! ( माझ्या मते तरी आहेच ) आपल्या करमणुकी साठी एवढा जंगलाचा राजा सिंह, पण सर्कस मध्ये चाबकाचे फटके खातो.. त्याची माफी कशी मागणार ? सत्ता आणि खुर्चीसाठी हपापलेली मनुष्य जात वनराजाचे जंगलच्या जंगल तोडून टॉवर उभारून खिसे भरतात, त्याची माफी कुणाला मागणार?

आणि हो खरंच मनापासून क्षमा मागायची झाली तर देवाची मागेन. त्याने जन्म दिला ते काहीतरी हेतूने, माझ्या हातून काहीतरी चांगले घडावे या हेतूने...ते खरंच प्रामाणिकपणे मी केले आहे का? त्यात काय चुका केल्या हे देवाला चांगले ठाऊक असणार तोच मला माफ करणार आहे...

"देवा मी ज्या चुका केल्या त्याची मी क्षमा मागते मला माफ कर"

तरीही आपल्या हातून चूक होणार हे नक्की...कारण आपणच म्हणतो ना .." माणसाच्या हातूनच चूका होतात" ..."चूक करतो तोच माणूस" ...

किती सुंदर पळवाट शोधली ना माणसाने !! जसे काही माणूस असल्याचे हेच एकमेव लक्षण आहे....वारे वा माणसा !!!

शिवाय "प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असतो" म्हंटल्यावर तर विषयच संपला. ....

आणि क्षमा मागितली किंवा नाही मागितली तरी आई वडील तर सर्व चुका पोटात घालून माफ करतातच. . ( फक्त आंधळे प्रेमापोटी कुणीही मुलांना माफ करू नये हे नक्की )

सौ.सरोजिनी बागडे..
दि...१२.०६.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू