पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नवविधा भक्ती

नवविधा भक्ती

भारतीय सभ्यता आणि संस्कृती चा आढावा घेताना आढळून येते की भारत भूमी ही रत्न प्रगल्भा असून ती अवतारी संतांची खाण आहे. त्यात सद्गुरु स्वरूपात बहुमोलाची रत्न हीरे माणिक मौक्तिकांचेच बाहुल्य आहे. त्या सर्वांचे चरित्र लिहायचा प्रयत्न केला तर संपूर्ण भूमंडळा इतकाच काय तर संपूर्ण ब्रम्हांडा एवढा कागद आणि सप्तसिंधूची शाई पण अपूरी पडेल.

धरणी सो कागज करूं
लेखनी करूं बनराई ।
सात समंदर मसी करूं
गुरू गुण लिख न जाई ।।

या सर्व संतांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी उद्देश मात्र एकच जनकल्याण आणि ईश्वर भक्ती चा संदेश प्रसारित करणं. त्यांचे पंथ जरी वेगवेगळे असले,आराध्य वेगळे असले तरी ते सारे भक्ती पंथाचे वारकरी आहेत. सारे सद्गुरु त्यांच्या सद्शिष्यांना ईशभक्तीचा मार्ग दाखवून जनकल्याणार्थ झटण्या साठीच प्रवृत्त करतात. ईश्वर भक्ती चा उद्देश्य पण जन्ममृत्यूच्या अनवरत फे-यातून मुक्त होत ईश्वर चरणी अर्पण होणं हाच असतो.
महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेतील सर्व संतांनी आपल्या साहित्यिक यात्रेत अनेकानेक ग्रंथाचे लेखन केले आहे.छंद वृत अलंकारांनी सुसज्ज साहित्याचा खजिना आपल्या सुपुर्द केलाय. या परंपरेतील समर्थ रामदास रचित दासबोध ग्रंथात भक्तीच्या नऊ विधा आहेत. तात्पर्य काय तर येनकेन प्रकारेण मानवाने ईश्वर भक्ती करायला हवी. कारण भक्तिनेच मुक्ती चा मार्ग सुकर होतो. स्कंध पुराणात ही भक्ती पंथाचे चे नऊ मार्ग दाखविलेआहेत.
।। श्लोक ।।
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।(स्कंध ७\५\२३)

१ श्रवण भक्ती
- हरिकथा , पुराण आणि आध्यात्मिक निरुपण कर्ममार्ग उपासनामार्ग ज्ञानमार्ग विविध तीर्थ व्रतांचे महात्म्य ऐकायला हवं .कारण श्रवणाच्याच माध्यमातून पहिली ज्ञानप्राप्ती होते. श्रवण काळात सावचित्त असणे गरजेचे आहे.ही प्रक्रिया जीव जन्माला येण्यापूर्वी पासून सुरू होते. अभिमन्यूला चक्रव्यूहात प्रवेश करण्याचे ज्ञान गर्भावस्थेतच प्राप्त झाले होते. माता सावचित्त नसल्याने ती माहिती अर्धवट राहिली याचा दाखला महाभारतातील चक्रव्यूह भेदन प्रसंगात आढळतो. त्यामुळे ऐकताना सर्व काही व्यवस्थित ऐकावे त्यातून सार सार अंगीकारून फोलपटं सोडून द्यावी. जे काही श्रवण केलेय त्याचे मनन करावे त्यानेच नवीन अविष्कार होतात.

२ कीर्तन भक्ती
कीर्तन केल्याने महादोषांपासून मुक्ती मिळते कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होऊन ईश्वर प्राप्ती होते. कीर्तन केल्याने वाचा शुद्ध होते. कीर्तन करताना उगा उसना आव न आणता त्यात दंग व्हावे. कीर्तन शब्दात नर्तन दडलंय म्हणूनच कीर्तन करताना कथा, दृष्टांत आणि जनजागृतीचा रंग भरत तल्लीनतेने कीर्तन करावे. कीर्तन करताना वाणी सुरस अर्थात रसपूर्ण असावी .त्या दरम्यान परमार्थ साधत श्रोत्यांना सन्मार्ग दाखवणे हे कीर्तनकाराचे दायित्व आहे.पारतंत्र्य काळात कीर्तनकारांनी जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे. कीर्तन करताना टाळ मृदुंग संगीत तानमान वगैरे चा प्रयोग करत हरीकथा करावी. असं म्हणतात की ' कीर्तने संतोषे परमात्मा.'

३ स्मरण भक्ती -
नामस्मरण ' विष्णोः स्मरण 'भक्ती योगे अखंड नामस्मरण करत असावे. नामस्मरणाने समाधान मिळते. समर्थ म्हणतात सुखात असो वा दुःखात, उद्वेग वा चिंता सतत नामस्मरण करत असावे. नामस्मरणा विना मुळीच राहू नये. अगदी चालता बोलता व्यवसाय करतानाही नामस्मरण करत असावे. नामस्मरणाने संकटाचे निवारण होते. मनात श्रद्धा ठेवून नामस्मरण केल्याने ईश्वर प्राप्ती होते. या संदर्भात समर्थ वाल्मिकीं चे उदाहरण देतात. दत्तचित्त राहून नामस्मरण करावे. ध्रुव ,भक्त प्रल्हाद ,तुकाराम, सावतामाळी, जनाबाई, सर्वांचा उद्धार नामस्मरणानेच झाला. नामस्मरण म्हणजे फक्त माळ फिरवणे नाही तो नुसता देखावा आहे. स्थिर चित्त होऊन एकाग्रचित्ताने हरिस्मरण करावे.
माला तो कर में फिरे
जीभ फिरे मुख माही।
मनुवा तो चहुं दिस फिरे
यह कोई सुमिरन नाहीं।।

४ पादसेवन भक्ती -

काया वाचा मनोभावे सद्गुरुचे पाय सेवावे. सद्गुरु पदी अनन्य भावे नतमस्तक व्हावे. भवसागर तरण्यास्तव सद्गुरुची कृपा असावी.सद्गुरुच्या मार्गदर्शनानेच अज्ञानाच्या तमातून बाहेर पडत ज्ञान मार्गाचे दर्शन होते. इथे पादसेवनं चा फक्त शाब्दिक अर्थ न घेता सद्गुरुच्या पदचिन्हांचे अनुसरण करत त्यांनी दिलेला उपदेश किंवा शिक्षणाचा लाभ घेत त्याला आत्मसात करावे. ज्ञान प्राप्तीचा मार्ग क्षण दोन क्षणांत क्रमण करता येत नाही त्या साठी निरंतर संत संगती असावी लागते. सद्गुरु कृपेची नौकाच मानवाला भवलहरीच्या तरंगातून सुरक्षित मोक्ष तटावर पोहचवते . समर्पित भावाने सेवा केली तर लेखक ' अंबाजी ' चा
कल्याण स्वामी घडतो.

५ अर्चन भक्ती
समर्थांच्या मते अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त विधीने पूजन. विविध प्रकारची आसनं उपकरण वस्त्र अलंकार इत्यादी ने पूजन करून दान करावे. या बाबतीत कुठलीही सक्ती नाही. समर्थ म्हणतात जर हे सहज शक्य नसेल तर मनसा वाचा कर्मणेन मानसपूजा केली तरीही ती ईश्वर चरणी रुजू होते. मनात भगवंताचे स्मरण करून कल्पना करून सर्व समर्पित केले तरीही चालते. आडंबराची आवश्यकता नाही. मनात श्रद्धा ठेवून भक्ती भाव ठेवून कल्पनेत ही अर्चन भक्ती साध्य होते. भारतीय धर्म सभ्यता आणि संस्कृतीत मानस पूजेचे महत्व प्रतिपादिले आहेच.


६ वंदन भक्ती
वंदन भक्ती ची परंपरा अद्वैत अद्भुत आहे. माता पिता गुरू गोविंद साधू संतांना वंदन करावे. यांचे चरणी साष्टांग दंडवत घालावा. साष्टांग दंडवत अर्थात संपूर्ण समर्पण. प्रत्येक धर्मात वाकूनच नमस्कार अर्थात समर्पित होणे आवश्यक आहे. वाकून वंदन करताना शक्ती मिळते कारण वाकल्याने रक्त संचार व्यवस्थीत होऊन तना मनात उर्जा संचारित होते स्फूर्ती मिळते. वंदन भक्तित काहीच कष्ट होत नाही काही खर्च होत नाही किंवा उपकरण पूजन सामग्री पण लागत नाही. फक्त भक्ती भावाने वंदन केले की गुरु कृपेने गोविंदाची भेट होऊन मन शांति मिळते.

७ दास्य भक्ती
देवाजीच्या दारी दास्य भावाने असावे. कारण देवा पेक्षा श्रेष्ठ असे कुणीच नाही. दास्य भावाने सर्व साध्य होते. लघुतेनेच प्रभुता मिळते आणि प्रभुतेने जर तिथे गेलात तर प्रभू दूर जातो.
लघुता से प्रभुता मिले
प्रभुता से प्रभु दूरी ।
चिंटी लै शक्कर चली
हाथी के सर धूरी।।
म्हणूनच विनम्रता आवश्यक असते.
आराधक दास्य भावाने शरण गेला तर नारायणाचा रामदास घडतो. मारुती राया रामा पेक्षा सशक्त आणि बलाढ्य असूनही राम चरणी दास्य भावाने लीन होतो. अनाथ रामबोला बाबा नरहरीदासांच्या कृपेने तुलसीदास झाले. ते ही राम चरणी दास्य भक्तित लीन होते. तुलसीदास यात तू अर्थात राम ल म्हणजे लक्ष्मण आणि सी म्हणजे सीता. या तिघांचा दास तो तुलसीदास. रामचरित मानस आणि इतर रचना त्यांच्या दास्य भावाचं दर्शन घडवितात. संत जनाबाई स्वतःच्या लेखनात ही नामयाची दासी असाच उल्लेख करतात.

८ सख्य भक्ती
समर्थ म्हणतात की ईश्वर चरणी सख्य भाव ठेवून त्याला प्रेमाने आणि प्रीतिने बांधून घ्यावे. भक्तिभावाने भजन कीर्तन आणि निरुपण करावे. परमेश्वरास प्रेमळ भक्तांचे गायन फार आवडते. त्यांचा विसर त्याला कधीच पडत नाही. तो आपल्या प्रेमळ भक्तांच्या अडीअडचणीत मदतीला धावून येतो. जगात सख्य भक्तिची प्रीति ख्यात आहे. कृष्ण अर्जुन, कृष्ण द्रौपदी ,कृष्ण सुदामाची , चंद्र चकोर, मेघ चातक सख्य भक्तीचे दाखले मिळतात. कृष्ण म्हणूनच पार्थ सारथी होतो द्रौपदी ला लज्जा वस्त्र पुरवतो. भक्तांच्या प्रेमापोटी तो चिंतित असतो कुठल्याही परिस्थितीत तो आपल्या सख्यांना भक्तांना अंतर देत नाही.. म्हणूनच देवाशी सख्य करून मनातील सारे हितगुज देवाशीच करावे.

९ आत्मनिवेदन भक्ती
आत्मनिवेदन भक्ती नवविधा भक्तिचा मेरूमणी समजायला हरकत नाही. आत्मा निरंजन निर्गुण निराकार आहे. आत्मा तोच परमात्मा असे म्हणतात. म्हणून आत्मनिवेदन करावे. स्वतःला भक्त म्हणत विभक्त पणे भजावे. लक्षण असोन विलक्षण आणि ज्ञान असूनही अज्ञानीपणे समर्पित व्हावे. भक्त म्हणजे विभक्त नाही आणि विभक्त म्हणजे भक्त नाही कारण विचारा शिवाय काहीच नाही. असा विचार करून देव कोण तो स्वतःच ओळखून आत्मशोध आत्मचिंतन करत आत्म तत्वाचा आणि परमात्म्याचा शोध घ्यावा. हेच खरे आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदनाने चरित्र शुद्ध होऊन मी पणा तू पणा न उरता चरित्र पूर्णाकार होते. आत्मनिवेदनाने ज्ञानवंतास समाधान मिळते आणि तो जगदीश्वराच्या सानिध्याने ध्रुवत्व पावतो.
नवविधा भक्ती चा वरील श्लोकाचा क्रम विचारात घेतला तर हे लक्षात येईल की हा क्रम विज्ञानाच्या कसोटीवर बरोबर बसतो. ऐकण्या पासून सुरू झालेली भक्ती आत्मनिवेदना पर्यंत नेते. हा बौध्दिक परिपक्वतेचाच क्रम आहे. नवविधा भक्तिनेच सज्जनास सायुज्यमुक्ती मिळते जी सर्वोपरी आहे. सलोकता, समीपता आणि सरूपता या तीनही शाश्वत मुक्ती नाहीत कारण सकृत संपलं की या तिघी सरतात. म्हणूनच सद्गुरु आणि जगदीश्वराची भक्ती करावी. तेंव्हाच निर्गुण, निराकार, निश्चल आणि अद्वितीय अशी सायुज्यमुक्ती मिळते. परमेश्वर ही त्याची भक्ती करणा-या भक्तांच्या निकटच वसतो.

" नाहं वसामि वैकुंठे,योगिनां हृदये नच।
मद्भक्ता यत्र गायंति, तत्र तिष्ठामि नारद "।।

© सौ.राधिका इंगळे
देवास

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू