पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

साक्षीदार

पावसाळ्याचे दिवस होते. सकाळपासून पावसाची रिपरिप चालूच होती. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. हवामानाच्या अंदाजानुसार अजून चोवीस तास तरी पाऊस असाच पडणार होता. अशी विपरीत आणि प्रतिकूल परिस्थिती होती तरी पण गणेशला नागपूरला जाणे आवश्यक होते. तेथील कोर्टात त्याला काही महत्वाची कागदपत्रे दाखल करायचे होते. तो पेशाने एक वकील होता. म्हणूनच सायंकाळच्या वेळी आपल्या कारने काही दिवसांपूर्वी आपल्या एका मित्राकडून सेकंड हॅन्ड खरेदी केली होती, त्या गाडीने तो एवढ्या पावसात जाण्यासाठी निघाला. पाऊस चालूच असल्याने त्याला वेगात गाडी चालविणे अशक्य होते तरी तो आपल्या 60 ते 80 च्या गतीत नागपूर हायवेवर गाडी चालवत होता. झाडाची पाने पावसाच्या धारानी तृप्त झाली होती. एक ही पान हलत नव्हते आणि पाऊस बरसने सोडत नव्हते. दोन-तीन तास गाडी चालविल्यावर त्याला भूक लागल्याची जाणीव होऊ लागली. म्हणून तो एखादे हॉटेल किंवा ढाबा दिसते का ? हे पाहत पाहत तो गाडी चालवू लागला. थोड्या वेळाने त्याला एक ढाबा दिसला. त्याने लागलीच आपली गाडी त्या ढाब्यावर वळविली आणि गाडीच्या खाली उतरला. जरासे पाय मोकळे होतील आणि पोटाची ही सोय करावी म्हणून त्याने हॉटेलात प्रवेश घेतला. अजूनही पाऊस चालूच होता. त्या पावसात हॉटेल मधील खमंग भाज्या आणि तंदुरी रोटीचा वास परिसरात दरवळत होता. पोटाला कडकडून भूक लागल्याने तो वास अजून जास्त त्रास देत होता. हॉटेलात लोकांची खूप गर्दी होती. त्यामुळे त्याला थोडा वेळ वाट पाहावे लागले. थोड्या वेळाने त्याने वेटरजवळ आपली ऑर्डर दिली. वेटरने छान जेवण त्याच्या समोर आणून ठेवला आणि त्याने त्यावर यथेच्छ ताव मारला. पोटातली भूक शमल्यावर त्याला जरा हायसे वाटले. खरंच भूक लागल्यावर जेवण्यात जी मजा येते ना ! ती मजा भूक नसताना जेवण्यात कधीच मिळत नाही. भूक नसतांना पंचपक्वान्न जरी समोर ठेवलं तरी त्याचे तेवढं अप्रूप वाटत नाही. पण भूक लागल्यावर ठेचा भाकर किंवा पिठलं भाकर देखील या पंचपक्वान्नला मागे टाकते. बिसलरी मधील पाणी पिऊन हॉटेलचे बिल चुकते करून तो आपल्या गाडीत येऊन बसला. एवढ्या वेळात ती गाडी देखील थंड झाली होती. 

गाडीमधील टेपरेकॉर्डरवर महेंद्र कपूरचे गाणे लावून तो ड्रायव्हिंग करू लागला. रात्रीच्या वेळी त्याला सहसा किशोरकुमार आणि महंमद रफी यांच्या पेक्षा महेंद्र कपूर यांचे हवेच खूप आवडत असे. महेंद्र कपूर यांचा घोगऱ्या आवाजातील गाणे ऐकतांना देहभान विसरून जावे असे वाटते.  साधारणपणे रात्रीचे अकरा वाजून गेले असतील, त्याला नागपूरला जाण्याचा अजून चार-पाच तास लागणार होता. कसल्याही प्रकारची घाई गडबड न करता तो आपली गाडी चालवत होता. हायवे जरी असला तरी त्या रस्त्यावर जास्त गाड्या आज पळत नव्हत्या कारण पाऊस एकसारखा पडत होता. दहा-पंधरा मिनिटाला एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करून जात होती. जेवण केल्यावर दोन तास गाडी चालविली होती, जरा वेळ थांबावे असे त्याला वाटत असतांनाच एका वळणावर त्याची गाडी अचानक बंद झाली. त्याने चाबी फिरवून गाडी चालविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याची गाडी काही चालू होत नव्हती. गाडीला काय बरे झाले असेल असा विचार करत होता गाडीतच बसला. बाहेर निघायला संधी नव्हती कारण पाऊस अजून थांबला नव्हता, अधून मधून विजा चमकत होते. त्याला वाटले कदाचित गाडीचे इंजिन गरम झाले असेल त्यामुळे बंद पडली. थोडा वेळ वाट पाहू आणि पुन्हा चालू करून बघू म्हणून गाडीतच तो आपल्या सीटवर बसून राहिला.

बसल्या बसल्या त्याची नजर समोरच्या रस्त्यावर गेली. विजेच्या प्रकाशात ती लाल रंगाची गाडी त्याला दिसू लागली. त्याला वाटलं ती गाडी देखील माझ्यासारखी बंद झाली की अजून काही प्रॉब्लेम झालंय ? म्हणून तो जरा निरखून पाहू लागला. एक व्यक्ती गाडीला धक्का मारत होता. मात्र पुढचे दृश्य बघून त्याला धक्काच बसला कारण माणसाच्या त्या धक्क्याने गाडी रस्ता सोडून खाली जात होती. तो अजून उत्कंठेने पाहतच राहिला. थोड्या वेळात ती गाडी रस्त्याच्या खाली दोन-तीन पलटी खाली. धक्का मारलेला व्यक्ती देखील त्या गाडीसोबत खाली गेला. त्याला हे सारे नवल वाटले. पण स्वतः तो वकील असल्याने त्याच्या डोक्यात अनेक तर्कवितर्क येऊ लागले. त्याच्या डोक्यात अनेक जुन्या केसेस आठवण येऊ लागल्या. त्याची चिकित्सक बुद्धी त्याला गप्प बसू देत नव्हती. याच विचारात त्याने आपल्या गाडीची चावी परत एकदा फिरवली आणि काय आश्चर्य गाडी चालू झाली. आपला वेग हळू हळू करत तो त्या जागेवर जाऊन इकडेतिकडे पाहू लागला. गाडी रस्त्याच्या खाली दूरवर फेकल्या गेली आणि एक व्यक्ती रस्त्याच्या खाली कुठेतरी पडल्यासारखा त्याला विजेच्या प्रकाशात दृष्टीस पडले. काय करावे ? त्याला सुचेना. मध्यरात्र उलटली होती. फोन लावावे म्हटलं तर मोबाईलची रेंज देखील गायब झाली होती. जास्त वेळ तिथे थांबणे उचित नाही असे समजून तो आपल्या प्रवासासाठी पुढे निघाला. गाडी चालविताना त्याचे लक्ष नव्हते, त्याच्या डोक्यात राहून राहून तेच दृश्य दिसू लागले. त्याच्या गाडीची गती देखील कमी झाली. रस्त्यावर अनेक गाड्या जात होत्या आणि येत होत्या पण याचे अवधान मात्र त्याच बाबीवर खिळवून ठेवले होते. पहाटे चारच्या सुमारास तो नागपूरला पोहोचला. नागपूरला त्याने एका लॉजवर अगोदरच रूम बुक करून ठेवला होता. त्यामुळे त्याने आपली गाडी सरळ त्या लॉजवर नेली आणि आपल्या रूमवर आराम करण्यासाठी गेला. झोपण्याचा प्रयत्न करू लागला होता पण त्याला झोप काही येत नव्हती.

सकाळी उठून फ्रेश झाल्यावर फराळ-चहा घेऊन आपल्या कामासाठी निघाला. रस्त्यावर असे अनेक अपघात होत असतात. जाऊ द्या ! आपणाला काय त्याचे ? आज आपल्या कामावर लक्ष देणे आवश्यक आहे. सायंकाळ पर्यंत कामाचा निपटारा होणे आवश्यक आहे. म्हणून तो आपल्या कामात गुंग झाला. त्यादिवशी त्याचे काम झाले नाही म्हणून त्याला तेथेच थांबावे लागले. सायंकाळचे जेवण उरकून परत त्याच लॉजवर तो गेला. कामात असतांना त्याला कोणत्याच गोष्टीची आठवण आली नव्हती, रस्त्यावर झालेल्या त्या अपघाताची देखील. पण जरासे झोपावे म्हटले की, विचारांची तंद्री सुरू झाली आणि त्यात तो अपघात देखील अधूनमधून डोकावत होता. रात्रभर त्याने या कुशीवरून त्या कुशीवर होत होता पण डोळ्याला डोळा काही लागत नव्हता. मध्यरात्र उलटल्यावर डोळ्याला डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो फ्रेश झाला. फराळ-चहा करतांना त्याच्या हातात पेपर आला. पेपरवर ठळक बातमी होती की, वर्धा येथील एका शिक्षकाच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्याची पत्नी मेली आणि पती वाचला. त्याने ती बातमी पूर्ण वाचली. पुन्हा पुन्हा वाचली. शत प्रतिशत त्या पावसाळी रात्री बघितलेला अपघात हाच होता. पण बातमीमध्ये अपघाताचे कारण पतीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आणि गाडी रस्त्याच्या कडेला दूर जाऊन पडली. पत्नीला डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाली तर पती गाडीतून बाहेर पडल्याने सुदैवाने बचावला. ही बातमी वाचून त्याचे डोके सुन्न झाले. हा अपघात नसून काहीतरी घातपात नक्कीच आहे, असे त्याला वाटू लागले. चहा-फराळावर त्याचे अजिबात लक्ष नव्हते. यातील सत्य काय आहे ? याचा शोध लावण्याचे काम पोलिसांचे काम आहे. आपले काम आहे न्याय मिळवून देणे. आज आपले काम पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर शनिवार-रविवार येथेच थांबावे लागेल. म्हणून त्याने आपल्या कामावर लक्ष देऊन दुपापरपर्यंत काम संपवून लवकर निघण्याचा विचार केला. कारण परतीच्या प्रवासात ती जागा परत एकदा पहावी आणि काही शोध लागतो का ते पाहावं म्हणून तो दुपारी एकलाच आपली गाडी घेऊन निघाला. पावसाने जराशी विश्रांती घेतली होती. 

त्याच्या डोक्यात ती जागा घट्ट पकड घेतली होती. कधी एकदा जाऊन ती जागा पहावी असे त्याला झाले होते त्यामुळे गाडी जरा वेगात जात होती. दिवस मावळण्याच्या अगोदर तिथे जावे आणि त्या जागेला एकदा निरखून पाहावे असे त्याचे मन त्याला म्हणत होते. रात्री जेथे चार तास लागले होते तेथे दिवसा तो त्या जागेवर तीन तासात पोहोचला. आपली गाडी बाजूला पार्क केली आणि गाडीच्या बाहेर येऊन फिरत फिरत ती जागा परत एकदा पाहून घेतलं. गाडी त्या जागेवरून हलविण्यात आले होते. त्यामुळे त्याला गाडी पाहता आले नाही. जास्त वेळ तिथे थांबणे उचित नाही म्हणून तो आपल्या गाडीत आला आणि पुढच्या प्रवासासाठी निघाला. आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी महेंद्र कपूर यांचे गाणे चालूच होते. रात्री दहाच्या सुमारास आपल्या शहरात परत आला. काही दिवसानंतर तो ही घटना विसरला होता मात्र जेव्हा जेव्हा त्या रस्त्यावरून नागपूरला जात असे तेव्हा तेव्हा ती आठवण परत ताजी होऊन त्याच्या डोक्याला ताप देत होती. 

याच दरम्यान पाच सहा महिन्यांचा काळ उलटला. पुन्हा एकदा कामाच्या निमित्ताने तो नागपूरला जाण्यासाठी निघाला. आज पावसाळी वातावरण नव्हते. बाहेर थंडीचा गारवा सुटला होता. तो आपल्या धुंदीत गाडी चालवू लागला. अंधाऱ्या रात्रीत सुद्धा त्याने ती जागा ओळखली होती. तसा त्याच्या गाडीचा वेग मंदावला. परत आपले लक्ष महेंद्र कपूरच्या गाण्यावर ठेवून गाडी चालवित होता. ठरवलेल्या लॉजवर येऊन थांबला. सकाळी उठला आणि फ्रेश होऊन चहा फराळ घेऊन आपल्या कामासाठी कोर्टात गेला. ज्याच्याजवळ तो काम घेऊन गेला होता त्याच्या बाजूला दोन वृद्ध जोडपे बसले होते आणि ते आपले गाऱ्हाणे मांडत होते. तो बाजूला बसून ऐकत होता. त्यांचा विषय हळूहळू त्याच्या लक्षात आला. त्याच्या मनाने त्यावेळी ठरविले की, त्या वृद्ध जोडप्यांना बोलावे. ते बोलून बाहेर पडताना तो त्यांना म्हणाला, " मी बाहेर येईपर्यंत थांबा, मला तुमच्याशी जरा बोलायचे आहे." तो अनोळखी होता, तरी त्याने थांबा म्हटल्यामुळे ते बाहेर थांबले.  तो आपले काम संपवून बाहेर आला आणि त्या वृद्ध जोडप्यांना बाजूला घेऊन त्यांची सर्व कहाणी ऐकली. त्यांची व्यथा त्या अपघाताशी मेळ खात होती. वृद्ध जोडपे सांगत असलेली कहाणी आणि अपघात तोच आहे याची खात्री पटल्यावर त्याने त्या वृद्ध जोडप्यांना मदत करायचे ठरविले व त्यांना आपल्या लॉजवर घेऊन गेला. ते वृद्ध जोडपे म्हणजे अपघातात म्रुत्यु पावलेल्या त्या शिक्षकांची पत्नीचे आईवडील होते. तो एक शिक्षक होता म्हणून त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले. पण तो शिक्षक हा खूपच संशयी आणि हेकट स्वभावाचा होता. तो आपल्या बायकोवर नेहमी संशय घ्यायचा आणि तोंडात आलेले अपशब्द बोलून तिचा अपमान करायचा. ती दिसायला जरा सुंदर होती आणि मनमोकळ्या स्वभावाची होती. त्यामुळे प्रत्येकांना ती हसत हसत बोलत असे. त्याच्या मित्राला देखील ती अशीच हसत बोलायची. त्यावर तो संशय घ्यायचा. ती कोणाला फोनवर जरी बोलली तरी तो संशय घ्यायचा. याच संशयातून त्याने अपघाताचा कट रचवून घातपात केल्याचे त्यांनी सांगितले. ही केस घेण्यासाठी तो तयार झाला. पण त्यासाठी त्याला नागपुरात ही केस लढवावी लागणार होतं तसेच ती वृद्ध जोडपे या कामासाठी मोठी रक्कम देतील याची शाश्वती नव्हती. पण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू या म्हणून त्याने ही केस लढविण्याची तयारी दाखविली आणि त्या वृद्ध जोडप्यांना पोलीस स्टेशनला जाऊन घातपात झाल्याची तक्रार नोंद करण्याचे सांगितले. 

त्याने सांगितल्यानुसार त्या जोडप्यांनी तक्रार दाखल केली आणि काही दिवसांत ही केस नागपूरच्या कोर्टात बोर्डावर आली. तोपर्यंत त्याने त्या शिक्षकांची पूर्ण कुंडली काढली. कोर्टात साक्ष व उलट तपासणी सुरू झाली. हा घातपात नसून अपघात असल्याची कहाणी त्याने उत्तमरीत्या सांगितली. कोणताच पुरावा नसल्याने आपले काही वाकडे होत नाही. असा त्याचा समज होता. मात्र उलट तपासणी सुरू झाली आणि त्याने विचारलेल्या प्रश्नामुळे शिक्षक पतीला घाम फुटू लागला. त्याने शेवटचा प्रश्न विचारला, " गाडी चालविताना नेहमी सीट बेल्ट लावता का ?" त्याने होय असे उत्तर दिले. यावर त्याने थोडे हसू आणत म्हणाला, " चांगली गोष्ट आहे. गाडी चालविताना सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. तुम्ही एक सुजाण नागरिक आहात, त्यातल्या त्यात शिक्षकी पेशेत आहात, त्यामुळे या गोष्टीची आपणास चांगल्या प्रकारे जाण आहे. तर ज्यादिवशी अपघात झाला त्यादिवशी देखील आपण सीट बेल्ट लावली असेलच नाही का ?"  यावर त्याने लगेच होय असे उत्तर दिले. हाच मुद्दा धरून तो आपला वकिली पोंइंट टाकला, " जर तुम्ही सीट बेल्ट लावून गाडी चालवित होतात तर अपघात झाल्यावर गाडीच्या आत राहण्याऐवजी तुम्ही गाडीच्या बाहेर कसे फेकले गेलात ?" या प्रश्नावर तो पार गोंधळून गेला. गाडीची सीट बेल्ट त्या गाडीत शाबूत होती, त्याला काही झाले नव्हते, याचा अर्थ तो सीट बेल्ट लावलाच नव्हता. तो काहीच उत्तर देत नाही हे पाहून मग त्याने त्या रात्री त्याच्या डोळ्यासमोर घडलेला आणि त्याने पाहिलेला सर्व घटनाक्रम कोर्टासमोर मांडला. यावर शिक्षकाच्या वकिलाने यास पुरावा काय आहे ? असे म्हटल्यावर तो म्हणाला, " जज साहेब या घटनाक्रमाचा मी खुद्द एक साक्षीदार आहे. त्या रात्री मी नागपूरला येत होतो, रस्त्यात माझी गाडी बंद पडली. विजेच्या प्रकाशात एक व्यक्ती कारला धक्का मारत असल्याचे दिसत होते. धक्का मारल्यावर ती कार रस्त्यावर येण्याऐवजी रस्त्याच्या बाजूला जाऊ लागली आणि थोड्या वेळाने ती कार खाली पडली. थोड्या वेळाने माझी गाडी चालू झाली. जाता जाता चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात मला गाडी रस्त्याच्या खाली गेलेली दिसली. त्या दिवशी मी पाहिलेली घटना, जागा आणि वेळ एकसारखीच आहे......" त्याने ते सर्व घटनाक्रम परत एकदा सांगितले आणि त्या शिक्षकाला त्यावेळी थंडीचे दिवस असून देखील घाम फुटला होता. वारंवार प्रश्न विचारून सत्य बाहेर आणण्यास भाग पाडले. शेवटी त्याच्यासमोर सत्य स्वीकार केल्याशिवाय पर्यायच नव्हता म्हणून त्याने ती आपली चूक कबूल केली. कोर्टाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेऊन त्या नराधम शिक्षकाला कारावासाची शिक्षा दिली. तो निकाल ऐकून त्या वृद्ध जोडप्यांना समाधान वाटले तर गणेशला आपण एका महिलेला न्याय मिळवून दिल्याचा आनंद झाला. 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू