पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रविवार



आठवडा सात दिवसांचा. या सात दिवसांची शोभा वाढवणारा दिवस म्हणजे रविवार. रविवार वर सगळ्याचं प्रेम. लहानपणी शाळेला सुट्टी कधी तर रविवारी! मग रविवार आमच्या आवडीचा! कळायला लागल्यावर मग लक्षात आलं की प्रेम रविवार वर असलं तरी जीव शनिवारातच गुंतलेला असतो. शनिवार अधिक जवळचा वाटतो. एवढा जवळचा की शनिवारची संध्याकाळ संपूच नये असं वाटतं. का माहितेय? एकदा का शनिवार गेला की रविवार उजाडून कधी भुर्रकन संपतो हे कळतही नाही. शनिवार रविवारचं नातं हे रिकाम्या बरणीत सामावू पाहणाऱ्या वेफर्स प्रमाणे असतं. पिशवीतल्या वेफर्स ना बरणीत उतरायची घाई तर खूप असते पण एकदा बरणीत उतरले की कधी संपतात कळतही नाही तसंच अगदी शनिवार आणि रविवारचं. एरवी पहा, दिवस जाता जात नाही. रविवार मात्र सरत नाही तो गायबच होतो तेही कमी वेळात! 


रविवारी सुशेगाद उठावं. अगदी लवकरही नाही अगदी उशिराही नाही. वेळेचा सुवर्णमध्य काढावा. लवकर आणि उशिरा या व्यक्तीनिष्ठ संकल्पना असू शकतात. उठल्यावर स्वच्छ दात घासावेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात 1 मिनिट दात घासायला लागत असेल तर रविवारचं औचित्य साधून किमान दीड ते 2 मिनिटे याप्रमाणे गुणोत्तर ठेवावं. पुढे घराची दारे उघडून इकडे तिकडे हिंडून यावे. केरसुणी नामक शस्त्राला किमान रविवारी तरी हस्तस्पर्श करावा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आजूबाजूच्या परिसराचा भारही मोकळा होतो. पोटोबा ने स्वतःचं अस्तित्व दाखवलं की पोहे, मिसळ अशा उत्साहवर्धक नाश्त्याला पाचारण करावे. वरून फक्कड दुधाचा चहा घ्यावा. चहापात, आलं तिखटपणाच्या गरजेनुसार घालावं. नंतर इकडच्या तिकडच्या चार खबरी घ्याव्या. वेगवेगळे 'टाइम्स' वाचावे. मिळालेल्या बातम्यांचा पाठपुरावा करावा. सूर्य डोक्यावर आला की मग अंघोळीचा विचार मनात आणावा. हा शुद्ध विचार येऊन पुढे कृती घडेपर्यंत आंतरिक शक्तीद्वारे मनाला सतत सूचना कराव्या. साडेबाराच्या ठोक्याला किमान  न राहून अंघोळीचा मार्ग पत्करावा. या बाबतीत पुन्हा एकदा साग्रसंगीत अंघोळ की कावळा अंघोळ ही व्यक्तीनिष्ठ संकल्पना असते. देवाला शुचिर्भूत झालोय हे दाखवण्यासाठी का होईना हात जोडावे. 


अंघोळ करून आलेला थकवा घालवण्यासाठी एक तरतरीयुक्त पेय घ्यावे. दुपारच्या जेवणाचा आरंभ करावा. अंगणातून कढीपत्त्याची पान जेवणासाठी आणून द्यावी. फुल ना फुलाची पाकळी म्हणत जेवण बनवायला गृहिणीला मदत करावी. जेवणाचा आस्वाद घेत सुट्टीच्या वाराचा आनंद घ्यावा. शेवटी ताक पिऊन डोक्यातील आणि पोटातील गजबजलेल्या विचारांना शांत करावे. यानंतर स्वयंपाक घराकडे व इतर कामांकडे चोख पाठ फिरवून वामकुक्षी वर लक्ष केंद्रित करावे. 'दुपारी झोपण्याचे तोटे', 'दुपारी एवढे तास झोपाल तर मेंदू वर होईल हा परिणाम' यासारखे विषय मांडणारे विषय वाचत, ऐकत एक डुलकी काढावी. ग्लुकोंडी वा एनेरझाल वा इलेक्ट्रोल यानेही येणार नाही अशी अचानक आता आली आहे असे जाणवेल. यानंतर संध्याकाळी निसर्ग सानिध्य, समुद्र, धबधबे, मंदिरे अशा रम्य नेत्रसुखद गोष्टी अनुभवण्यासाठी घराबाहेर पडावे. घरातून बाहेर पडण्यासाठी मनाला वामकुक्षी नंतर लगेचच समजवायला सुरुवात करावी. धार्मिक ठिकाणी जावे की समुद्र च हवा, कुटुंबाबरोबर जावे की मित्रपरिवार या व्यक्तीनिष्ठ संकल्पना आहेत याची जाणीव ठेवावी. योग्य निर्णय घेऊन योग्य वेळेत, योग्य ठिकाणी जाऊन रविवार संध्याकाळ सार्थकी लावावी. घरी आल्यावर सायंप्रार्थना करून उद्या पुन्हा दिनक्रम सुरू करायचा आहे यासाठी मनाला उभारी द्यावी. हलका फुलका आहार घेऊन , इच्छित स्थळी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून झोपी जावे. 


सरलेल्या आठवड्यात घडून गेलेल्या वाईट, नकारात्मक वा त्रासदायक गोष्टींसाठी येणाऱ्या आठवड्याचा रस्ता बंद करून टाकावा. याने विचारांचे ट्राफिक जॅम होत नाही. नवीन विचारांना , घडामोडींना प्रशस्त जागा मिळते. रविवार या दिवसाचे  मुख्य कर्तव्य पार पडते. अशा पद्धतीने रविवारचा हा आधुनिक वसा सुफळ सम्पूर्ण पार पाडावा. रविवारच्या एका आरामदायी दिवसाच्या आठवणी घेऊन सोमवारचे मनःपूर्वक स्वागत करावे!


नवीन दिवस नवीन गोष्टी! रविवार जणू भसकन संपून गेल्याचं किंचित दुःख आणि येणाऱ्या आठवड्यातील शनिवार ची ओढ याने सोमवार नक्की चांगला जातो, यात शंका नाही! आपण फक्त वारांच्या वर्तुळात फिरतो. दर आठवड्याचे दिवस तेच. आपला दृष्टिकोन वेगळा!

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू