पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तपास

तपास

                        ( १ ) 

   ट्रिंग . .ट्रिंग ..वीस जुलैच्या मध्यरात्री अचानक खंडाळा पुलिस स्टेशनवर घंटी वाजली.एवढ्या रात्री कोण शिंच फोन करतयं तोंडातल्या तोंडात शिवी देत इंस्पेक्टर गावडे यांनी पेंगत असलेल्या हवालदारला फोन उचलण्यास सांगितलं.हवालदारने फोन उचलला.फोन ऐकता ऐकता तो लगेच ओरडला,

" सर.. सर...खून झालायं "

इनस्पेक्टर गावडे त्याच्यावर खेकसले,

 " अरे ओरडतो काय कुठे झाला आहे कुणाचा झाला आहे हे तर विचार मुर्ख कुठला."

हो सर विचारतो सगळं.त्याने सर्व माहिती विचारून इनस्पेक्टर गावडे यांना माहिती दिली.

"सर निलेश इनामदार यांचा त्यांच्या बंगल्यावर खून झाला आहे.बंगल्यावरूनच कुणा पुरूषाचा आवाज आहे.ताबडतोब येण्यास सांगितलं आहे." खरतरं त्या दिवशी तीन चार अपघाताच्या ठिकाणी जाऊन गावडे अगदी कंटाळले होते आता मध्यरात्री हा फोन.पण जायला तर हवच. निलेश इनामदार खंडाळ्याचे एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत असामी होते.त्यांनी ताबडतोब पुणं जिल्हा पोलिस स्टेशनला फोन करून कळवले.आणि ते चौकशीसाठी हाताखालच्या तीन चार लोकांना घेऊन बाहेर पडले.इनस्पेक्टर गावडे हे पोलिस खात्यातील एक प्रामाणिक आणि बुद्धिमान अधिकारी होते.आतापर्यंत खूनाच्या अनेक केसेसचा त्यांनी यशस्वीपणे निकाल लावला होता.त्यांनी जीप बंगल्याच्या बाहेर थांबवली.

       जीपचा आवाज ऐकून एक पस्तीशीचा तरूण बाहेर आला.

" सर मीच आपल्याला फोन केला होता.इथे 

 बंगल्याच्या मालकाचा खून झाला आहे."

 इनस्पेक्टर गावडे यांच्या चेह-यावर आठ्या पसरल्या.त्यांनी त्याला आपादमस्तक न्याहाळले.सुंदर रुबाबदार तरूण घाईघाईने सर्व सांगत होता. गावड्यांनी त्याला करड्या 

आवाजात विचारले ,

" आपण कोण ?आपला या लोकांशी काय संबंध ?आपण केव्हा आला.?"

राजेशने त्यांना सांगितले,

" सर माझा या लोकांशी काही संबंध नाही. मी राजेश पुण्याहून मुंबईला गाडीने जात असताना माझी गाडी अंधारात एका डोंगराला धडकली आणि बंद पडली .मी मदतीसाठी या बंगल्यात अर्ध्या तासापूर्वी आलो.पहातो तर काय इथे खून झाला आहे आणि घरातील सर्व भेदरलेल्या अवस्थेत उभे होते.मी माणुसकी या नात्याने आपल्याला फोन केला.सर घराची सर्व अवस्था पहाता कुणीतरी चोरीच्या उद्देशाने घरात घुसलं असावं असं मला वाटतं "

आता मात्र गावडे चिडले,

पोलिस आम्ही आहोत का तुम्ही?तुम्हांला कुणी विचारलं आहे ?आणि कशावरून तो चोर तुम्ही नाही ? 

इनस्पेक्टरचं रूप पाहून राजेश घाबरला.तो चूप बसला.इनस्पेक्टर गावड्यांनी सर्व सूत्र हातात घेतले हाताखालच्या लोकांना वस्तुंवरचे ठसे घ्यायला सांगितले. आणि घरातील लोकांची चौकशी करायला सुरूवात केली.सर्वात पहिले

त्यांनी निलेशच्या पत्नीकडे आपला रूख वळवला.

" आपण कोण ?"

" मी निलेश इनामदार यांची पत्नी सौ नीला इनामदार."

" सर्वप्रथम आपण यांना मृतावस्थेत पाहिलं ?"

" हो पण.."नीला घाबरत म्हणाली.

"मी विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं द्या आणि खरं 

काय घडलं तेवढच सांगा."इनस्पेक्टर गावड्यांनी तिला ताकीद दिली.नीलाने निमुटपणे मान हलवली.

"आता मला सविस्तरपणे सर्व काही सांगा"

नीला नेमकं काय घडल ते सांगू लागली.

" सर ,नेहमीप्रमाणे माझे पती संध्याकाळपासून

दारू पिण्यासाठी दिवाणखान्यात बसले.एकदा ते बसले की रात्री उशीरापर्यंत प्यायचे

तिला मध्येच थांबवत गावडे म्हणाले,"ते राहू दे मला आज रात्री नेमकं काय झालं ते सांगा."

नीला पुढे सांगू लागली ," सर रात्री अकरा वाजता मी वर आले.रात्री झोपायच्या पहिले मी नेहमी आंघोळ करते.आजही मी बाथरूम मध्ये मी आंघोळ करत असताना मला खाली काही जोराने आवाज आले.पण मी विशेष लक्ष दिलं नाही. कारण दारू जास्त झाली की निलेशचा आरडाओरडा आणि शिवीगाळी सुरू व्हायची.कधीकधी तर ते रागाच्या भरात बंदुक पण चालवायचे.घरात कुणीच तिकडे लक्ष देत नसत.मी झोपायला गेले .रात्री अचानक माझं डोकं दुखायला लागलं .मी सासुबाईंना सांगितलं त्या म्हणाल्या मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते.असं म्हणून त्या खाली गेल्या.मी पण त्यांच्या मागोमाग स्वयंपाकघरात गोळी घेण्यासाठी गेले.नेहमीच्या ड्रॉवरमध्ये मी गोळी पाहिली पण मिळाली नाही. मग मी नीलेशच्या खोलीत औषध आहे का ते पहाण्यासाठी गेले . दिवाणखान्यात निलेशला मृतावस्थेत पाहून मी किंचाळले.तेवढ्यात सासुबाई तिथे आल्या आम्हा दोघींनाही धक्का बसला होता.आम्हा दोघींनाही काहीच सूचत नव्हतं.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली.आम्ही दोघीही भितीने गर्भगळीत झालो.दार ढकलून मि .राजेश आत आले त्यांची गाडी बंद पडली म्हणून ते मदत मागण्यासाठी आले होते.पुढील सर्व हकीकत राजेशने तुम्हाला सांगितली आहेच."

    " अच्छा तुम्ही हे खरं सांगत आहे असं मी मानतो .पण मला हे सांग निलेशच कुणाशी काही भांडण "

नीला काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .ती बोलण्याच्या अवस्थेत नाही असं वाटून गावड्यांनी आपला मोर्चा निलेशच्या सावत्र आईकडे म्हणजे वीणाताईंकडे वळवला.

"आपण निलेशच्या सावत्र आई ना ? आणि हा

 आपला मुलगा ना ?"

"हो "डोळे पुसत त्या म्हणाल्या .

" तुमचे आणि निलेशचे संबंध कसे होते?तुमच्या 

मुलाशी तो कसा वागायचा ?तुमच्या सुनेशी कसा वागायचा ?काही सांगू शकाल प्लीज ?"

वीणाताई- "काय सांगू इनस्पेक्टर तुम्हांला ?निलेश अत्यंत दुष्ट स्वभावाचा होता.माझ्यावर आणि माझ्या मुलावर त्याचा खूप राग होता.पाच वर्षांपूर्वी माझे पती गेल्यानंतर त्याने आम्हाला छळायला सुरुवात केली .आज माझ्या मुलाची जी अवस्था आहे त्याच्याचमुळे.एखाद्या आश्रितासारखं तो आम्हाला वागवायचा.पण सुनबाई घरात आल्यापासून ती आमचं खूप लक्ष

ठेवायची आम्हा मायलेकांना प्रेमानं वागवायची.पण निलेशला ते आवडायचं नाही.

तो तिचाही खूप छळ करायचा .त्याला शिकारीचा छंद होता .एकदा शिकार करून परतत असतांना त्याचा अपघात झाला.दोन्ही पाय गेले. तेव्हापासून तर तो आणखीनच चेकाळला.पाय गेल्यानंतर शिकारीला जाऊ

शकत नव्हता, मग दिवसा अंगणात बसून

पक्ष्यांना मारायचा.कधी रात्री बेरात्री पण कुणाची चाहूल लागली तर गोळ्या झाडायचा. आम्हा सर्वांना तर सवय झाली होती".बोलता बोलता त्या थांबल्या.ते पाहून इनस्पेक्टर गावडे म्हणाले

" एकूण तुम्ही सर्वच त्याच्यामुळे त्रासले होते.ठीक आहे मी लवकरच परत येईन."

असं बोलून ते जायला निघाले.इतक्या वेळ शांत बसलेल्या राजेशने गावड्यांना विचारले ,

"सर मी तर जाऊ शकतो ना ?मला माझी गाडी 

दुरुस्त करायची आहे. "

"हो तुम्ही आता जाऊ शकतात पण या केसचा निकाल लागेपर्यंत तुम्ही खंडाळा सोडून कुठे जाऊ शकत नाही .गरज पडली तर तुम्हाला पोलिसस्टेशनला चौकशीसाठी बोलावू".

जाताजाता अचानक इनस्पेक्टर गावडे थांबले आणि राजेशला म्हणाले,

"बाय द वे तुमची गाडी कुठे उभी आहे मी तुम्हाला तिथे सोडतो."

" हो चला ना साहेब माझी गाडी खाली उभी आहे कुणी गाडी दुरूस्त करणारा असेल तर तेही सांगा."असं बोलून राजेश इनस्पेक्टर गावड्यांबरोबर जायला निघाला. जाता जाता

नीलाकडे हलका कटाक्ष टाकला .आणि नजरेनच मी आहे असं आश्वासन दिलं.

इनस्पेक्टर गावडे मात्र स्वतःच्याच विचारात होते.खून झाला होता परंतु कुठेही ठसे मिळाले नव्हते.हे कसं शक्य होतं.कपाट पण उघडच होतं कुलुप तोडल्याचं दिसत नव्हतं त्याचप्रमाणें राजेशच्या म्हणण्यानुसार दार नुसतं ढकललेलंच होतं, म्हणजे कुणी सराईत मनुष्याचं काम होतं आणि त्याचबरोबर त्याला बंगल्याची खडा न् खडा माहिती असली पाहिजे. चोरी तर झाली होती.पांच लाख रू.कपाटातून गायब झाले होते.पण तिजोरीवर किंवा आसपास कुठलेही ठसे मिळाले नव्हते. विचार करून गावडे थकले होते.काही गोष्टी मात्र त्यांना मिळाल्या होत्या .

पण त्यावरून काही सिद्ध करू शकत नव्हते.गुंता वाढतच चालला होता.

                   ( ३ )

      २०जुलैच्या रात्रीच खंडाळ्याच्या क्लबमध्ये एक पार्टी चांगलीच रंगली होती डॉ.सुनील कुमार आपल्या मित्रमंडळींबरोबर हास्यविनोदात दंग होते.अत्यंत बुद्धिमान आणि यशस्वी डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती सर्वच ठिकाणी होती.हाडांचे स्पेशालिस्ट आणि सर्जन होते. आज त्यांच्यातर्फेच पार्टी होती.अचानक पावणे अकरा वाजता त्यांच्या नावाने फोन आला असं क्लबच्या मैनेजरने सांगितलं. खरतर पार्टी सुरू असताना जाण्याचं मन होत नव्हतं.पण डॉक्टर असल्याने दुर्लक्ष करून चालणार नव्हतं.

ते फोन घ्यायला रिसेप्शनला गेले.फोन ऐकताच ते तिथून ताबडतोब निघाले .पाऊण तासाने परत येऊन पार्टीत दंग झाले.रात्री उशीरापर्यंत जागल्याने सकाळी उठायला उशीरच झाला होता. नोकराने चहा आणि वर्तमानपत्र आणून दिलं.वाचता वाचता त्यांची नजर एका ठळक अक्षरातील बातमीकडे वळली.वाचून त्यांना त्यांना धक्का बसला.निलेश इनामदार चा खून झाल्याची बातमी वाचून ते अस्वस्थ झाले.निलेशला ते चांगले ओळखत होते.निलेशच्या अपघातानंतर त्यांचीच औषधं तो घेत होता.सुनील कुमारांच्या नजरेसमोर

निलेशची पत्नी उभी राहिली. ब-याच वेळा त्यांची तिच्याशी भेट होत असे.निलेशचे वागणे त्यांना खटकत असे.सुनील कुमार पण खूप रुबाबदार आणि चाळीशीच्या आतलेच होते.अद्याप त्यांचं लग्न झालं नव्हतं.नकळत का होईना नीला आणि सुनीलकुमार एकमेकांच्या प्रेमात पडले होते.आणि ही गोष्ट निलेशच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नव्हती.मुळातच शंकेखोर स्वभावामुळे तो नीलाचा जास्तीत जास्त छळ करत असे.सुनील कुमार अधुनमधून घरी येत असे तेव्हा तो दोघांवर पाळत ठेवत असे.पण आता तर त्यांना नीलाला आधार 

देण्यासाठी जाणं गरजेचं होतं.त्यानुसार ते बंगल्यावर पोचले.बंगल्यावर बरेच लोक होते .पोलिसांनी राजेशला पण बोलावून घेतलं होते.सुनीलकुमारांनी तिथे पोचताच काय झालं म्हणून इनस्पेक्टर गावडयांना विचारलं .इनस्पेक्टर गावडयांनीही त्यांना सर्व हकीकत सांगून खून रात्री अकरा वाजताच्या आसपास झाला असावा असं सांगीतलं.सुनीलकुमार गोंधळून नीलाकडे पहातात.ती काहीच बोलत नाही. परंतु 

इनस्पेक्टर गावड्यांच्या चाणाक्ष नजरेतून ती गोष्ट सुटली नव्हती. जुजबी चौकशी करून इनस्पेक्टर गावड्यांनी निलेशचा मृतदेह पुढील तपासणीकरता पाठवून दिला."लवकरच परत येईन "अस सांगून ते निघून गेल्यावर नीलाने सुनीलकुमार आणि राजेशची ओळख करून दिली .राजेश आणि सुनिलकुमार नीलाचा निरोप घेऊन निघून गेले.इनस्पेक्टर गावडे पण केसबद्दल काही पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात होते. काही पुरावे त्यांच्या हाती लवकरच लागतील असही त्यांना वाटत होतं. परंतु हाती काहीच पुरावे लागले नसल्याने ते बैचैन होते.तरी त्यांनी आपली माणसं कामाला लावली होती.राजेश,नीला आणि सुनीलकुमार या तिघांवरही त्यांनी साध्या वेषातील पोलिसांना पाळत ठेवायला सांगितलं होतं.त्याचप्रमाणे ठसेतज्ञांना पण कामाला लावलं होतं.त्या दिवशी जरी बंगल्यावर ठसे मिळाले नव्हते तरी निलेशकुमार ज्या टेबलवर पडले होते त्या ठिकाणी काही ठसे जरूर मिळाले होते.पण ते कुणाचे असावे हे लक्षात येत नव्हते .घरातील सर्वांचे ठसे घेतले होते पण कुणाचेच मिळाले नव्हते.एके दिवशी त्यांनी राजेशला पोलिसस्टेशनला चौकशीसाठी बोलावले होते.

गावडे -"मि राजेश त्यादिवशी आपण म्हणाले होते की बंगल्याच्या आवारात तुम्हांला कुणीतरी 

धडक मारून गेलं.नेमकं कोण होतं ते सांगू शकाल?

राजेश -" नाही मला अंधार असल्याने काही दिसलं नाही पण कोणीतरी जरूर होतं.

गावडे -"मि राजेश आपला काय अंदाज आहे कोण असावं ?"

राजेश -" मी आपल्याला त्या दिवशी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण... बंगल्यात इकडे तिकडे पसरलेल्या वस्तू आणि पैशांची चोरी हे सर्व काम एखाद्या चोराचेच 

असू शकते.इनामदार यांनी त्याला विरोध केला असावा म्हणून त्याने त्यांचा खून केला असावा.

कदाचित तोच मला धडक देऊन पळाला असावा.पण हा माझा फक्त अंदाज आहे सर.मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही."

गावडे-" मि.राजेश आपण म्हणता ते जरी बरोबर असलं तरी कुठेच ठसे मिळाले नाही. त्याचबरोबर कपाटाचे कुलुप तोडल्याचंही आढळलं नाही म्हणजे चोराला बंगल्याची खडान् खडा माहिती असली पाहिजे त्याशिवाय हे शक्य नाही. तुम्हाला काय वाटतं ?"

राजेशने काहीच उत्तर दिलं नाही पण त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली चलबिचल गावड्यांच्या

नजरेतून सुटली नाही..

गावडे-"मि.राजेश मध्यंतरी आपण नीला इनामदारांना घरी भेटायला गेला होता ना ?" 

राजेश -" सर मी माणुसकीच्या नात्याने त्यांना भेटायला गेलो होतो.त्या खूप घाबरल्या होत्या ना त्या दिवशी ."

गावडे -"आणखी कुणी आलं होतं का त्यांना

भेटायला त्या काही बोलल्या का तुमच्याशी?"

राजेश -"नाही त्या खूप अस्वस्थ वाटत होत्या. पण मी एकदा त्यांना भेटायला गेलो तेव्हां मला

डॉ सुनीलकुमार भेटले होते.खूप चांगले आहेत ते.

गावडे -"धन्यवाद मि.राजेश आपण मला सहकार्य करत आहात हे पाहून छान वाटलं.मला परत कधी आपली गरज लागली तर

मी आपल्याला परत बोलवून घेईन चालेल ना ?"

राजेश-"हो सर पण लवकरात लवकर जर काम झालं तर चांगलं राहिल .माझ्या घरचे पण टेंशन मध्ये आहेत. माझी कामं पण खोळंबली आहेत."

गावडे -"हो हो नक्कीच आपण जाऊ शकतात."

       मि राजेशच्या बोलण्यातून एक महत्त्वाची गोष्ट कळली होती की डॉ.सुनीलकुमारांचं निलेशच्या घरी जाणं.आता इनस्पेक्टर गावड्यांचे विचारचक्र वेगळ्या दिशेने फिरू लागलं.राजेश गेल्यावर त्यांनी ड्रायव्हरला जीप डॉ. सुनीलकुमारांच्या बंगल्यावर घ्यायला सांगितली.इनस्पेक्टर गावड्यांना बंगल्यावर आलेलं पाहून डॉ.सुनीलकुमारच्या कपाळावर आठी उमटली होती ती गावड्यांच्या चाणाक्ष नजरेनं हेरली होती.

गावडे- " मी इथे आलेलं आपल्याला आवडलेलं

दिसत नाही डॉक्टर सुनीलकुमार ?"

सुनीलकुमार ( चपापून )-"नाही नाही अगदी तसच काही नाही परंतु कुठल्याही सभ्य प्रतिष्ठित व्यक्तीला पोलिसांच घरी येणं आवडत 

असेल असं मला वाटत नाही. पण ठीक आहे आपण कसं काय येणं केलं ?"

गावडे -" मि निलेश इनामदारांच्या संदर्भातच काही माहिती जाणून घेण्यासाठी मी आलो होतो ."

सुनीलकुमार -" ओह !विचारा ना माझी काही हरकत नाही. पण त्या अगोदर काही चहा वगैरे .."

गावडे -"हो नक्कीच आवडेल."

  नोकराने चहा आणून दिला .खरतरं बोलण्याच्या निमित्ताने ते सुनीलकुमार यांच्या चेह-यावरचे भाव टीपत होते. तेवढ्यात डॉ सुनीलकुमार यांना कुणाचा तरी फोन आला .ते उठून आत गेलेले पाहून गावड्यांनी तत्परतेने त्यांच्या कपावरचे ठसे घेतले होते.

सुनीलकुमार -" सर तपास कसा सुरू आहे?खूनाचा काही सुराग हाती लागला का ?"

गावडे -"नाही अजून तरी नाही लागला पण लवकरच लागेल .काही पुरावे हाती आले आहे .

डॉक्टर, निलेश इनामदारांच्या औषधात वगैरे काही बदल केला होता का ?कारण मिसेस इनामदार आणि निलेशच्या आई म्हणत होत्या

की ते फार चिडचिड करायचे "

सुनीलकुमार -" अहो हा निलेशचा स्वभावच होता .तो अतिशय तापट आणि विक्षिप्त स्वभावाचा होता.अपघात झाल्यापासून तो माझाच पेशंट होता.मीच त्याच्यावर उपचार करायचो.मला तो मुळीच आवडत नव्हता.अहो इतक्या सुंदर पत्नीशी कुणी इतक्या नीचतेनं वागू शकतं का? तो पत्नीवर हातदेखील उचलायचा.घरातील सर्वांना त्याची भिती वाटायची.जवळ नेहमी बंदुक बाळगायचा.शिकारीचा छंद होता.त्या छंदापायीच त्याचा अपघात झाला आणि दोन्ही पाय गमावून बसला.व्हीलचेअरवर दिवसभर अंगणात नाहीतर व्हरांड्यात बसून आकाशात उडणा-या निष्पाप पक्ष्यांची शिकार करायचा.

मला तर मिसेस इनामदारांची दयाच येते."

सुनीलकुमार निलेशच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल असं बोलत होते जणू ते त्या घरातलेच होते.

इनस्पेक्टर गावडे -" आपल्याला बरीच माहिती आहे इनामदारांविषयी "

सुनीलकुमार -" हो माझं नेहमीच जाणंयेणं असायचं त्यांच्या घरी.सर्वजण मी गेलो की छान गप्पा मारायचे

गावडे-" आणि निलेश?" 

सुनीलकुमार -"त्याचं काय सूत तर सूत नाहीतर भूत.संशयी स्वभाव असल्याने घरात नोकरमाणसं टिकायची नाही. बायकोने फारसं कुणाशी बोललेलं आवडायचं नाही."

गावडे-" डॉक्टर वीस जुलैच्या रात्री आपण कुठे होता?"

सुनीलकुमार -" मी त्यादिवशी खंडाळा ऑफिसर्स क्लबमध्ये होतो.त्या दिवशी मी मित्रांना पार्टी दिली होती .खूप मजा केली आम्ही.रात्री साडेबारापर्यंत पार्टी सुरू होती.रात्री उशीरा झोपल्याने सकाळी उशीरापर्यंत झोपलो होतो.सकाळी चहा पितांना पेपर वाचायला घेतला तर निलेशकुमारच्या खूनाची बातमी वाचून मी हादरलोच.बापरे केवढा कठिण प्रसंग ओढवला त्या दोघींवर. पण खरं सांगू का सुटल्या बिचा-या त्या राक्षसाच्या तावडीतून."

गावडे -"आपल्याला काय वाटतं खून कुणी केला असावा ?मला तर मिसेस इनामदार आणि निलेशच्या आईंवर संशय येत आहे.म्हणजे बघा ना निलेशच्या मरणाचा त्या दोघींनाच फायदा होणार होता "

सुनीलकुमार -"अहो नाही हो त्या बिचा-या कशाला खून करतील आणि करायचा असता तर कधीच केला असता मला तरी असं नाही वाटतं."

गावडे -" हं तेही बरोबर आहे .चला तर मग मी आपला बराच वेळ घेतला.पण आपण जी माहिती दिली त्याचा मला निश्चितच उपयोग होईल .आता मी निघतो धन्यवाद!

    इनस्पेक्टर गावडे निघून गेल्यावर सुनीलकुमार विचारात पडतात .आपल्याला भेटण्यामागे गावड्यांचा काय हेतू असावा हे त्यांच्या लक्षात आलं नाही. इनस्पेक्टर गावडे मात्र आता सक्रीय झाले होते .त्यांनी ड्रायव्हरला डायरेक्ट खंडाळा ऑफिसर्स क्लबकडे जीप वळवण्यास सांगितली.इनस्पेक्टर गावड्यांना क्लबमध्ये आलेलं पाहून मि .प्रकाश जैन क्लबचे मैनेजर बुचकाळ्यात पडले.त्यांनी पुढे होऊन इनस्पेक्टर गावड्यांचे हसून स्वागत केले आणि त्यांना बसायला खुर्ची दिली.गावडयांनी बसल्याबसल्याच क्लबचं निरीक्षण केलं

गावडे-" नमस्कार मि. प्रकाश मी इनस्पेक्टर गावडे ."

मि.प्रकाश -"सर आपल्याला कोण ओळखत नाही. आपल नाव ऐकून आहे मी .कस काय येणं केलं साहेब ?"

गावडे-" मि. प्रकाश वीस जुलै च्या रात्री आपण कुठे होता ?"

मि.प्रकाश -"सर मी ड्युटीवरच होतो."

गावडे -"किती वाजेपर्यंत होता?"

मि प्रकाश -"सर रात्री एक पर्यंत होतो .त्या दिवशी डॉ.सुनीलकुमार यांनी त्यांच्या मित्रांसाठी क्लबमध्ये पार्टी ठेवली होती.पार्टी रात्री साडेबारापर्यंत सुरू होती.त्यानंतर मी घरी गेलो.."

गावडे -"मला एक मदत हवी आहे आपल्याकडून."

मि.प्रकाश -"का नाही सर?आपल्याला मदत करायला मला नक्की आवडेल सर."

गावडे-" मि प्रकाश आपण सांगू शकता त्या रात्री काय काय घडलं ,कुणी विशेष लोक किंवा कुणाचे फोन वगैरे आले होते का ?"

मि प्रकाश -"एक मिनीट सर मी पाहून सांगतो.सर त्यादिवशी सर्व प्रतिष्ठित लोक क्लबमध्ये आले होते आणि मागच्या हॉलमध्ये डॉ सुनीलकुमार यांची पार्टी सुरू होती."

गावडे-"मि प्रकाश डॉक्टर सुनीलकुमार पूर्णवेळ 

पार्टीतच होते ना ?"

मि प्रकाश -" हो सर ते जवळजवळ पूर्णवेळ पार्टीतच होते पण रात्री पावणेअकरा वाजता त्यांना कुणाचा तरी फोन आला होता.त्यानंतर ते अर्धापाऊण तास बाहेर गेले होते मग साडेअकराला परत आले."

गावडे-"फोनवर कोण बोलत होतं ?"

मि प्रकाश -"ते माहित नाही सर पण एका स्त्रीचा आवाज होता.खूप घाबरल्याचा आवाज होता आणि सुनीलकुमारांना ताबडतोब फोनवर बोलवा असही म्हणाली मी तिला सांगितलं की पार्टी सुरू आहे .पण तिने हट्टच धरला मग मी नाईलाजाने सुनीलकुमारांना बोलावलं.त्यांनी फोन ऐकला आणि ते बाहेर निघून गेले."

गावडे -"धन्यवाद मि प्रकाश आपली गरज लागली तर आम्ही परत येऊ."

          इनस्पेक्टर गावडे पुलिसस्टेशनवर आले.त्यांनी वीस जुलैच्या रात्री क्लबवर कुणाकुणाचे फोन आले होते त्याचप्रमाणे निलेशच्या बंगल्यावरून त्या दिवशी कुणाकुणाला फोन केले गेले याचे रेकॉर्ड टेलिफोन डिपार्टमेंट कडून मागून घेतले.आता निलेशच्या खूनाचा अस्पष्ट आराखडा त्यांनी बांधायला सुरूवात केली होती .लवकरच आपण गुन्हेगाराला ताब्यात घेऊ असही त्यांना वाटत असतांनाच एक विचीत्र घटना घडली.

       इनस्पेक्टर गावडे राउंड घेत असतांना एके दिवशी डोंगरावरच्या बगीच्यात त्यांना नीला आणि राजेश बोलताना आढळले.त्यांनी हळूच जीप आडबाजूला उभी केली आणि त्या दोघांना दिसणार नाही अशा बेताने झाडाच्या मागे उभे राहून त्यांच बोलणं ऐकू लागले.

नीला -" नमस्कार मि.राजेश खरं तर मी आज मुद्दामच आपल्याला भेटायला आले .कसे आहात ? माझ्या मुळे आपल्याला बराच त्रास होतो आहे ना ?त्या दिवशी जर आपण माझी मदत केली नसती तर मी नक्कीच या प्रकरणात अडकले असते.आपल्याला खूप खूप धन्यवाद .आपण मला सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग सुचवला .मी आपली खूप आभारी आहे."

राजेश -"अहो त्यात काय एवढं मला अजूनही असं वाटत आहे की तुम्ही खून करूच शकत नाही.म्हणून मी तुम्हाला मदत केली."

नीला -" पण खून तर मीच केला आहे ना "

राजेश -"मला एक सांगा , नव-याचा खून केल्याचा तुम्हाला पश्चात्ताप नाही होत?"

नीला -" मुळीच नाही .खरतर मी पहिलेच हे काम करायला हवं होतं. लग्न झाल्यापासून या मनुष्याने मला खूप छळलं एक दिवस सुखाचा संसार केला नाही.सारखा माझ्या चारित्र्यावर शंका घ्यायचा.गावातील श्रीमंत व्यक्ती म्हणून याला मान मरातब होता.माझ्या सौंदर्यावर भाळून निलेशने माझ्याशी लग्न केले होते. त्यात त्याचा अपघात झाल्यावर तर तो मला खूप त्रास द्यायला लागला होता.डॉ सुनीलकुमार त्याच्यावर उपचार करण्यासाठी घरी येत होते.घरातील सर्वांशी ते प्रेमाने वागायचे.त्यामूळे मी आनंदी रहायला लागले होते .निलेशच्या नजरेला सुनीलकुमार खुपायला लागले होते .कारण नसताना तो सतत त्यांचा अपमान करायचा.नकळत का होईना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो."

" आणि म्हणून तुम्ही तुमच्या नव-याचा खून केला." अचानक इनस्पेक्टर गावड्यांचा आवाज ऐकून राजेश आणि नीला चपापले होते.नीलाचा

चेहरा पांढरा फटक पडला .राजेशने तिला सावरण्यासाठी इनस्पेक्टर गावड्यांना फटकारले,"कशावरून नीलाने खून केला तुमच्याजवळ काही पुरावा आहे का?"

अजूनतरी पुरावा मिळाला नाही पण लवकरच 

मिळेल.सध्या आम्ही यांना संशयित म्हणून ताब्यात घेत आहोत आता ह्या केसचा कोर्टातच

 निकाल लागेल असं म्हणून इनस्पेक्टर गावड्यांनी नीलाला आपल्या ताब्यात घेतले.

नीलाने पण तिच्या बाजूने चांगला वकील उभा केला होता.आठ दिवसांनंतर केस लागली होती.

त्या दिवशी कोर्टात खूप गर्दी होती.निलेश कुणी सामान्य व्यक्ती नसून मोठा मनुष्य असल्याने त्याचा खून कुणी केला हे जाणून घेण्याची उत्सुकता गावात सर्वांनाच होती.त्या दिवशी सकाळीच वर्तमानपत्रात ठळक अक्षरात बातमी आली होती "निलेश इनामदारांच्या खूनाच्या आरोपाखाली त्यांच्या पत्नी सौ नीला इनामदारांना अटक आज खटला भरणार."

बातमी वाचून डॉक्टर सुनीलकुमारला धक्काच बसला.ते पण कोर्टात गेले होते.

      ठीक अकरा वाजता मुख्य न्यायाधीश कोर्टात आले होते आणि खटल्याची सुरूवात करण्यात आली.सरकारी वकील गायतोंडे ह्यांनी न्यायाधीशांसमोर सर्व माहिती दिली आणि नीला इनामदार ह्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी असंही सांगीतलं .नीलाच्या वकीलाने खूप विरोध केला आणि नीलाने खून केला नाही असंही सांगितलं परंतु काही पुरावे नीलाच्या विरोधात असल्याने नीलाची उलटतपासणी

करण्यासाठी सरकारी वकीलांनी तिला उलटसुलट प्रश्न विचारुन जाळ्यात खेचले होते

गायतोंडे वकीलांनी तिला विचारलं ,

" खून झाला तेव्हा तुम्ही कुठं होता?"

 नीला -" मी घरातच होते .तेव्हां मी आंघोळ करत होते.अचानक मला जोराजोराने बोलण्याचा आवाज आला .गोळीचा पण आवाज आला होता पण आमच्या कडे हा प्रकार नेहमीच घडायचा.दारू पिऊन निलेश नेहमी दंगा करायचा गोळ्या झाडायचा त्यामुळे मी दुर्लक्ष केलं आणि आंघोळ करून झोपायला गेले"

तिचं बोलणं मध्येच काटत सरकारी वकीलांनी तिला विचारलं,

" त्यावेळी किती वाजले होते,रोज इतक्या रात्री तुम्ही आंघोळ करता का?"

नीला एकदम गोंधळली ,"साधारण पणे साडेदहा

अकरा वाजले असतील"

सरकारी वकील -"साडेदहा का अकरा नीट आठवून सांगा कारण खून त्याच दरम्यान झाला आहे"

नीला -" मला नीटसं आठवत नाही कारण त्यावेळी माझं खूप डोकं दुखत होतं"नीला म्हणाली.

सरकारी वकील-"पण तुम्ही तर इनस्पेक्टर गावड्यांना सांगीतलं होतं आंघोळ करून झोपायला गेल्यानंतर थोड्यावेळाने तुमचं डोकं दुखायला लागलं" हो मी तेच सांगत आहे."नीला थोडी चिडून बोलली.

सरकारी वकील.न्याधीशांना उद्देशून-" महोदय हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा आरोपीच्या केलेल्या दोन्ही विधानात फरक आहे.

नीलाचे वकील- "महोदय याने काही फरक पडणार आहे असं मला वाटत नाही. सरकारी वकील माझ्या अशीलाला उगाच त्रास देत आहे." नीलाच्या वकीलांनी तिच्या बाजूने आपला मुद्दा मांडला.

सरकारी वकील -" महोदय नक्की फरक पडणार आहे. मी सांगतो त्यावेळी नक्की काय घडलं आहे ते.आरोपी आणि निलेश इनामदारांचं फारसं पटत नव्हतं त्या अगदी त्रासून गेल्या होत्या.त्यातून नव-यापासून काहीच सुख मिळत नव्हतं .त्या रात्री पण त्यांच जोरदार भांडण झालं होतं.भांडणाचं मुळ कारण म्हणजे आरोपीचे डॉक्टर सुनीलकुमारशी अनैतिक संबंध होते.ज्यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत.हे मी सिद्ध करू शकतो. त्यासाठी मी निलेशच्या सावत्र आईला साक्षीदार म्हणून बोलवावे."

" श्रीमती वीणा इनामदारांनी कोर्टात हजर व्हावे"

वीणा इनामदार साक्षीदाराच्या पिंज-यात हजर 

झाल्या.सरकारी वकीलांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

 सरकारी वकील-)"आपण निलेशच्या सावत्र आई ना ?"

" हो "

स. व .-"आपले आणि निलेशचे संबध कसे होते ?"

वीणा -)"फारसे चांगले नव्हते निलेश स्वभावाने खूप दुष्ट होता सरकारी वकील -"मला हे सांगा तुमच्या सुनेचे आणि निलेशचे संबंध कसे होते .त्यांचे आपापसात खूप वाद व्हायचे ही गोष्ट खरी आहे ना ?"

वीणा -" हो पण त्याला कारण नीलेशचा संशयी स्वभाव.तो नीलाला खूप त्रास द्यायचा."

सरकारी वकील " महोदय मला फक्त एवढच जाणून घ्यायचं होतं की आरोपीचं आणि मृत व्यक्तीचे संबध चांगले नव्हते आणि दोघांचं आपापसात बिलकूल पटत नव्हत हे वीणाताईंच्या बोलण्यावरून सिद्ध झालं आहे. महोदय आता डॉक्टर सुनीलकुमार ह्यांना साक्षीदार म्हणून बोलवावं "

"डॉ सुनीलकुमार ह्यांनी कोर्टात हजर व्हावे."

डॉ सुनीलकुमार साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिल्यावर सरकारी वकीलांनी त्यांना प्रश्न 

विचारण्यास सुरूवात केली.

" आपलं नाव "

सुनीलकुमार "मी डॉक्टर सुनीलकुमार हाडाचा डॉक्टर आणि सर्जन देखील आहे."

सरकारी वकील - "आपण निलेश इनामदारांना कधीपासून ओळखतात ?

सुनीलकुमार -" मी निलेश इनामदार यांना त्यांच्या अपघातापासून ओळखतो .एक वर्षापासून मीच त्यांच्यावर उपचार करत आहे.माझं त्यांच्याकडे अधुनमधून जाणंयेणं असतं."

सरकारी वकील "आपले आणि मिसेस नीला इनामदार दारांचे संबंध कसे आहेत?"सरकारी वकीलांनी खोचकपणे विचारलं

" म्हणजे मी समजलो नाही " सुनीलकुमार गोंधळले होते.

" महोदय या प्रश्नाचा या केसशी काही संबंध नाही "नीलाच्या वकीलांनी हरकत घेतली.

"संबंध आहे महोदय आणि मी हे सिद्ध करू शकतो" सरकारी वकील म्हणाले.

"हरकत फेटाळण्यात येते आपण प्रश्न विचारू शकता."न्यायाधीशांनी सांगितले.

सरकारी वकील "मि.सुनीलकुमार आपण तरूण आहात बुद्धिमान आहात दिसायला पण छान आहात .मग आतापर्यंत आपण लग्न का नाही केलं " 

सुनीलकुमार-" तशी आवश्यकता वाटली नाही .आणि योग्य जोडीदारही मिळाली नाही "

सरकारी वकील-" आवश्यकता वाटली नाही का दुस-या कुणाशी आपले अनैतिक संबंध आहे "असं बोलून सरकारी वकीलानी नीलाकडे सहेतुक नजर टाकली..

सुनीलकुमार रागाने-" महोदय ,हे माझ्या चारित्र्यावर शंका घेत आहेत आणि मी हे सहन करणार नाही. मी गावातील एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे.निलेश इनामदारांकडे मी उपचारासाठी जात होतो .माझ्यात आणि मिसेस इनामदारांमध्ये कामाव्यतिरिक्त काही बोलणं व्हायचं नाही."

सरकारी वकील " डॉक्टरसाहेब वीस जुलैच्या रात्री म्हणजे ज्या रात्री निलेश इनामदार यांचा खून झाला तेव्हा आपण कुठे होता?"

सुनीलकुमार - " त्या रात्री मी क्लबमध्ये होतो मित्रांसोबत पार्टी होती."

सरकारी वकील- " ती पार्टी आपणच ठेवली होती?"

सुनीलकुमार- " हो मीच ठेवली होती "

सरकारी वकील -" आपण पूर्ण वेळ पार्टीत होता?"

सुनीलकुमार-" हो"

सरकारी वकील -"सुनीलकुमार नीट आठवून सांगा आपण नक्की पूर्ण वेळ पार्टीत होता ?"

सुनीलकुमार -" हो "

सरकारी वकील -" महोदय ,सुनीलकुमार यांना रात्री अकरा वाजता कुणाचा तरी फोन आला

होता आणि ते अकरा ते साडेअकरा पर्यंत पार्टीत नव्हते.मि .सुनीलकुमार आपल्याला कुणाचा फोन आला होता ?"

सुनीलकुमार-" मला आठवत नाही "

सरकारी वकील -" आठवत नाही का सांगू इच्छित नाही. महोदय ,मी क्लब मैनेजर मि.प्रकाश यांना कोर्टात बोलावू इच्छितो."

मि प्रकाश साक्षीदारांच्या पिंज-यात आल्यावर सरकारी वकीलांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला.

सरकारी वकील- "आपलं नाव आणि आपण

कुठे काम करतात"

मि.प्रकाश-" महोदय मी प्रकाश जैन खंडाळा ऑफिसर्स क्लब चा मैनेजर आहे."

सरकारी वकील -"मि प्रकाश वीस जुलै च्या रात्री

आपण ड्युटीवर होता?"

मि.प्रकाश -"हो सर त्या रात्री मी ड्यूटीवर होतो.मि सुनीलकुमार यांनी त्यांच्या मित्रांसोबत पार्टी ठेवली होती ."

सरकारी वकील -पार्टी साधारण किती वाजेपर्यंत सुरू होती."

मि.प्रकाश-"साडेबारा वाजेपर्यंत"

सरकारी वकील -" मि.प्रकाश डॉ सुनीलकुमार पूर्णवेळ पार्टीत हजर होते ?

मि प्रकाश -"हो सर "

सरकारी वकील -" नीट आठवून सांगा कारण पोलिसांना आपण मि .सुनीलकुमार रात्री अकरा ते साडेअकरा च्या दरम्यान पार्टी सोडून बाहेर गेले होते असं सांगितलं मग ते काय खोटं आहे.'

मि प्रकाश थोडे गोंधळले.

मि.प्रकाश -" हो सर आठवलं.रात्री पावणे अकराच्या सुमारास सुनीलकुमारांसाठी फोन आला होता.

फोन एकून ते बाहेर गेले आणि साडेअकराला परत आले."

सरकारी वकील-"फोनवर कुणी स्त्री बोलत होती का पुरूष?

मि .प्रकाश -"सर फोनवर कुणा स्त्री चा आवाज होता .फोन ऐकल्यावर मि सुनीलकुमार टेंशनमध्येच बाहेर पडले होते."

सरकारी वकील -"महोदय हा मुद्दा नोट करावा.

सरकारी वकील -" ठीक आहे तुम्ही जाऊ शकता.महोदय मि सुनीलकुमारांना मी परत बोलावू इच्छितो"

मि सुनीलकुमार परत येतात.

सरकारी वकील-"मि सुनीलकुमार आपण पार्टी सोडून कुठे गेला होता आपल्याला कुणाचा फोन आला होता ?"

सुनीलकुमार -"मला एका पेशंटच्या घरून फोन.आला होता त्याची प्रकृती चांगली नव्हती म्हणून त्याच्या पत्नीचा फोन आला होता.म्हणून मी गेलो होतो आणि तपासून औषध देऊन परत आलो."

सरकारी वकील -"आपल्या पेशंटच नाव सांगू शकता ?"

सुनीलकुमार -" माझे खूप पेशंट आहेत कुणाकुणाची नावं सांगू?"सुनीलकुमारने उत्तर देण्याचं टाळलं होतं.

सरकारी वकील -" मी सांगतो त्या रात्री अकरा वाजता तुम्हाला नीला इनामदारांचा फोन आला होता फोन ऐकून तुम्ही लगेच निघाला.निलेशशी तुमचे भांडण झाले आणि तुम्ही त्याच्यावर गोळी झाडली .आणि तिथून परत क्लबमध्ये आला. साडेबारा वाजता पार्टी संपवून तुम्ही घरी गेला.माझ्या नजरेत मि सुनीलकुमार ह्यांनीच खून केला आहे."

नीला इनामदार -" महोदय हे खोटं आहे खून मी केला आहे.सुनीलकुमारांनी नाही. हवं तर आपण मि .राजेशला विचारू शकतात."

   अचानक नीलाने गुन्हा कबुल केल्याने कोर्टात

खळबळ उडाली.न्यायाधीशांनी कोर्टाची वेळ संपली असं सांगून चार दिवसानंतर मि राजेश यांना कोर्टात हजर करण्यास सांगितले.चार दिवसानंतर राजेशला कोर्टात हजर करण्यात आले.

सरकारी वकील -"मि.राजेश आपण नीला इनामदारांना कधीपासून ओळखतात."

राजेश - "सर मी तर त्यांना पहिल्यांदा वीस जुलैलाच भेटलो.माझी गाडी बंद पडली होती म्हणून मी मदत मागण्यासाठी बंगल्यावर गेलो होतो. "

सरकारी वकील -" तिथे तुम्ही काय पाहिलं "

राजेश -" सर मी बंगल्यात शिरलो तेव्हां बरीच रात्र झाली होती बंगल्याच्या बाहेर विशेष उजेड

नव्हता .मी दारावरची घंटी वाजवली.आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी दारावर टकटक केले .दार हलकं लोटलेल होतं त्यामुळे मी आत गेलो.दिवाणखान्यात मिसेस इनामदार आणि त्यांच्या सासुबाई भेदरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या आणि मि इनामदार मृतावस्थेत खुर्चीवर बसले होते.घरातील सामान इकडेतिकडे पसरलं होतं.कपाट उघडच होतं.मी काय झालं असं विचारताच दोघींनी मला जे घडलं ते सांगितलं .माणु्सकीच्या नात्याने मी पोलिसस्टेशनला फोन केला.बाकी इनस्पेक्टर गावड्यांनी सांगितले असेलच."

सरकारी वकील -"बस एवढच का आणखी काही या केसची माहिती देऊ शकता ?"

राजेश -" मला जे माहित आहे ते मी सांगितलं "

सरकारी वकील -"पण इनस्पेक्टर गावड्यांनी आम्हांला आणखी पण बरच काही सांगितलं आहे.मि.राजेश अजूनही खरं काय ते सांगा नाहीतर आरोपीला मदत करण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला पण अटक करू शकतो.महोदय ,मी इनस्पेक्टर गावडे यांना बोलावू इच्छितो."

 "इनस्पेक्टर गावडे यांना कोर्टात हजर करावं "

सरकारी वकील -"इनस्पेक्टर गावडे वीस जुलैच्या रात्री आपण ड्यूटीवर होता ना ?"

"हो सर"

सरकारी वकील-"मग त्या दिवशी जे काही घडलं ते सविस्तर सांगा."

इनस्पेक्टर गावड्यांनी जे घडलं ते सर्व सविस्तर सांगितलं .

सरकारी वकील-" त्यानंतर तुम्ही राजेशला आणि नीलाला बोलताना ऐकलं होतं ना?"

इनस्पेक्टर -"हो सर , मी नीला इनामदार आणि राजेश यांना बोलतांना ऐकलं होतं त्यादिवशी मिस्टर राजेश नीलाला विचारत होते.की त्यांना निलेशचा खून करण्याचा पश्चात्ताप होत नाही का म्हणून. त्यावर नीला त्यांना म्हणाली होती अजिबात नाही हे कृत्य मी फार पहिलेच करायला हवं होतं .त्यांनी निलेशचा खून केल्याचं कबूल केलं होतं.आणि राजेशने त्यांना या सर्व गुन्ह्यातून वाचवल्याबद्दल मदत केली म्हणून धन्यवाद पण दिले होते.हे मी माझ्या कानांनी ऐकलं होतं सर.मिसेस नीला यांनीच निलेश इनामदार यांचा खून केला आहे.त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि मि.राजेशला पण मला तर असही वाटतं या दोघांचाच हात आहे."

 आता मात्र राजेश चपापला होता.

सरकारी वकील -"महोदय मी राजेशला परत 

कोर्टात बोलावू इच्छितो."

सरकारी वकील -"मि. राजेश आता खरं काय ते सांगून टाका नाहीतर तुम्हाला पण अटक करावी लागेल."

राजेशने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन खरं काय घडलं होतं ते कोर्टात सांगीतलं आणि नीला इनामदारांच्या वयाकडे पाहून आणि त्यांच्या अवस्थेला पाहून त्यांनी खूनाच्या आरोपातून वाचवण्यासाठी मदत केली होतीआणि सर्व पुरावे नष्ट करण्यास मदत केली आणि चोरीचा बनाव रचला होता हेही सांगितले.खरतरं त्याच ख-या गुन्हेगार आहेत हे सांगितलं.कोर्टाची वेळ संपल्याने निकाल परत चार दिवसांवर ढकलण्यात आला.त्या चार दिवसात इनस्पेक्टर गावडे मात्र एका वेगळ्याच धांदलीत होते .केसचा निकाल लागणार पण एक वेगळाच पुरावा त्यांच्या हाती लागला होता.विचारांचे चक्र परत उलटे फिरायला लागले.त्यांना फक्त एवढच वाटत होतं की गुन्हा न करताच कुणी फाशीवर जायला नको

               चार दिवसांनी कोर्ट भरल्यावर न्यायाधीशांनी नीलाला आणि तिच्या वकीलांना काही सफाई द्यायची आहे का विचारलं.त्यांनी नकार दिला

न्यायाधीशंनी निकाल वाचायला सुरूवात केली,

"नीला इनामदार यांच्या विरोधात सर्व पुरावे सिद्ध झाले आहेत त्यामुळे निलेश इनामदार ह्यांच्या खूनाच्या आरोपाखाली नीला इनामदार ह्यांना फाशीची सजा देण्यात यावी "अस म्हणून ते केसपेपरवर शिक्कामोर्तब करणार तेवढ्यात इनस्पेक्टर गावडे वेगाने आत शिरले.

गावडे -"थांबा महोदय एका निष्पाप व्यक्तीला फासावर चढवण्याचं काम करू नका .खरा गुन्हेगार वेगळा आहे.मी काही पुरावे आपल्या समोर प्रस्तूत करणं इच्छितो."

  इनस्पेक्टर गावडयांनी एका पिशवीतून काही वस्तू काढल्या आणि सरकारी वकीलांना आणि न्यायाधीशांना दाखवल्या त्यात काही कागद पण होते.

       कोर्टाची कारवाई एक तासासाठी पुढे ढकलण्यात आली .मधल्या वेळात सरकारी वकीलांना गावडयांनी पुराव्यानिशी गुन्हेगार कुणी वेगळाच आहे हे पटवून दिलं असतं.एक तासानंतर कोर्टाची कारवाई सुरू होते.

सरकारी वकील -"महोदय ,मि.निलेश इनामदारांच्या खूनासंबंधी एक नवं तथ्य

उघडकीस आलं आहे .मी डॉक्टर सुनीलकुमार यांना बोलावू इच्छितो."

" डॉक्टर सुनीलकुमार यांना कोर्टात हजर करण्यात यावे."

सरकारी वकील -"मि सुनीलकुमार आपण आपण वीस जुलैच्या रात्री क्लबमध्येच होता ?"

सुनिलकुमार -"आपण परत परत तेच प्रश्न विचारून काय सिद्ध करणार आहात .मी वीस जुलैच्या रात्री क्लबमध्येच होतो.फक्त मध्ये थोडावेळ एका पेशंटला पहाण्यासाठी गेलो होतो ?"

सरकारी वकील -" आपण निलेश इनामदारांना भेटायला गेला होता ?"

सुनीलकुमार -"आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी

बांधील नाही."

सरकारी वकील रागाने-" आपल्याला उत्तर द्यावं लागेल.महोदय त्यांच्या उत्तराचा ह्या केसशी संबंध आहे.ते नीलेशला भेटायला गेले होते हे मी 

सिद्ध करू शकतो.क्लबच्या टेलिफोनवर मिसेस नीला इनामदारांच्या बंगल्यातून पावणेअकरा वाजता डॉक्टर सुनीलकुमार साठी फोन आला होता .फोन ऐकल्यावर सुनीलकुमार ताबडतोब बंगल्यावर गेले होते.तिथे त्यांचे निलेश इनामदार ह्यांच्याशी जोरदार भांडण झाले आणि त्यांनी निलेश इनामदारांचा त्यांच्याच बंदुकीने गोळी झाडून खून केला कुणाला संशय येऊ नये म्हणून निलेशला परत खुर्चीवर टेकून बसवलं.परंतु त्याचवेळी त्यांच्या गळ्यातील लॉकेट खुर्चीत अटकून टेबलाच्या खाली पडले.जे त्यांना दिसले नाही. ते हे लॉकेट "

सुनिलकुमार -"हे लॉकेट माझे नाही मला उगाच या केसमध्ये अडकवले जात आहे.माझ लॉकेट तर माझ्या गळ्यात आहे (गळ्यात लॉकेट..नाही असं जाणवताच ते गडबडले आणि) नाही ..नाही माझ्या घरी आहे."

सरकारी वकील -" महोदय या लॉकेटमध्ये मिसेस नीला इनामदार आणि सुनीलकुमार यांचा फोटो आहे .आणि त्यात नीला इनामदारांची डॉक्टरांच्या नावाने लिहीलेलं प्रेमपत्र. अजून काही पुरावा हवा आहे डॉ.

 इनामदार? महोदय एक आणखी ठोस पुरावा आहे निलेश गोळी लागताक्षणी पडले होते.त्यांना उचलताना त्यांच्या कपड्यावर डॉ सुनीलकुमार यांच्या हाताचे ठसे आणि त्यांच्या घरी जाऊन इनस्पेक्टर गावड्यांनी चहाच्या कपावरचे घेतलेले ठसे जुळले आहेत .आतातरी गुन्हा कबुल करा डॉक्टर इनामदार.इनस्पेक्टर गावड्यांनी सर्व पुरावे दाखल केले आहेत.तुमचं प्रेम आहे ना नीलावर मग तिने गुन्हा केला नसूनही तिला फासावर चढवण्याचं पाप का करत आहात ? "

सुनीलकुमार -"थांबा महोदय ,खून नीलाने नाही मी केला आहे.नीलाने माझ्यावरील प्रेमासाठी गुन्हा स्वतः केल्याची कबुली दिली आहे.महोदय माझं नीला इनामदारांवर खूप प्रेम आहे मि.निलेशकुमार अतिशय दुष्ट होते.ते नीलाला खूप त्रास द्यायचे.इतक्या सुंदर पत्नीशी कुणी असं वागावं याची मला चीड यायची.नकळत मी निलेशच्या अशा वागण्यामुळे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो.वीस जुलैच्या रात्री पावणेअकरा वाजता मला नीलाचा फोन आला होता.तिचे आणि निलेशचे माझ्यावरून जोरदार भांडण झाले होते त्यामुळे निलेशने तिला आणि मला मारायची धमकी दिली होती. ती कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली आणि तिने मला फोन करून सांगितले सध्या दोन चार दिवस तरी मी तिथे येऊ नये असंही सांगितलं होतं..परंतु मला नीलाची काळजी वाटली .तिचा फोन ऐकल्यावर मी निलेशला आता चांगलाच धडा शिकवायला हवा या विचाराने बंगल्यावर गेलो.मला पहाताच निलेशने शिव्या द्यायला सुरूवात केली .मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण त्याने ड्रॉवरमधून बंदुक काढली आणि मला मारायचा प्रयत्न केला.पण मी सावध होतो.मी झडप घालून त्याच्या हातातील बंदुक घेतली .आमच्या दोघांमध्ये बरीच झटापट झाली आणि निलेशला चुकून गोळी लागली. त्याचवेळी मला बंगल्याच्या बाहेर कुणाची चाहूल लागली .मी घाईघाईत तिथून बाहेर पळालो पळतांना कुणा व्यक्तीला धडकलो अंधार असल्याने त्याने मला आणि मी त्याला पाहू शकलो नाही. मला वाटलं बरच झालं आता याच व्यक्तीवर खूनाचा आरोप जाईल कारण नीला त्यावेळी तिथे नव्हती.पण झालं उलटच नीला जेव्हां खाली आली तेव्हा तिला मी खून केल्याचा संशय आला असावा त्यामुळे तिने स्वतः गुन्हा केल्याची कबुली दिली.हो ना नीला ?"

नीलाने मानेनेच होकार दिला आणि न्यायाधीशांना सुनीलकुमार यांनी हेतूपूर्वक गोळी चालवली नाही आणि त्यांचं वय 

लक्षात घेऊन कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी विनंती केली .

              ही कथा वाचून आपल्या सर्वांना काय

वाटतं मि.सुनीलकुमार यांना न्यायाधीशांनी काय शिक्षा दिली असेल ?

             सौ ऐश्वर्या डगांवकर. इंदूर

                मध्यप्रदेश.

                 मो .नं.9329736675.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू