पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बदला

पावसाळ्याचे दिवस होते. रोज संध्याकाळी पाऊस न चुकता हजेर लावत होता. सावनी कॉलेजमधून यायच्या वेळेला हमखास पाऊस यायचा आणि ती पूर्ण भिजून घरी यायची. 


अशीच एक दिवस संध्याकाळी पावसात चिंब भिजून सावनी घरी आली तर घराला कुलूप होते. तिला आश्चर्य वाटले. 


"अवनी कुठे आहे?" तिने शेजारच्या काकूंना विचारले. 

"ती आतच असेल ना, माझे लक्ष नव्हते अगं, पाऊस तिरका येत होता म्हणून मी दार लावून घेतले होते आणि मी आतच होते." 


"नाही हो काकू, घराला कुलुप आहे म्हणूनच तर विचारले ना मी. ती तर दुपारीच येते शाळेतून." 


"ती शेजारच्या तिच्या मैत्रिणीच्या घरी अभ्यासाला गेली असेल कदाचित" असा मनांत विचार करत सावनी तिकडे गेली पण ती तिथेही नव्हती. आता मात्र सावनीच्या पोटात धस्स झाले.


तिने लगेच आईबाबांना फोन करून कळवले. ते दोघेही ऑफिसमध्ये सांगून लवकर घरी परतले. तिघेजण मिळून अवनीचा शोध घेऊ लागले. शाळेतून ती वेळेवर घरी गेल्याचे समजले. पण तिला घरी आलेले कोणीच पाहिले नव्हते. 


शाळा ते घर, घर ते शाळा अशा चकरा मारून रस्त्यात सगळ्यांना तीनतीनदा विचारून झाले होते पण तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. तिच्या सगळ्या मैत्रिणींच्याकडे चौकशी करून झाली होती. जसा-जसा वेळ जात होता, तसे-तसे ते तिघेही जास्तच काळजीत पडत होते. त्यांना काय करावे काहीच सुचत नव्हते. आजकाल इतके वाईट दिवस आले आहेत की चांगले काही मनांतच येत नव्हते. "मन चिंती ते वैरी ना चिंती" म्हणतात तसे काहीसे झाले होते. ते वाईट साईट विचार तिघांनाही शांत बसू देत नव्हते. 


शेवटी हार मानून आईबाबा अवनी हरवल्याची तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि अवनीचा फोटो व इतर तपशील नोंद करून घेतला. काही समजले तर कळवू असे सांगून त्यांनी तिघांना घरी जायला सांगितले. तिघेही जड अंतःकरणाने घरी परत आले. सावनीला उगाचच वेडी आशा वाटत होती की आपण पोलीस स्टेशनमधून घरी जाईपर्यंत अवनी कदाचित घरी आलेली असेल. पण असे काही झाले नाही.

 

रात्रभर तिघेही अवनीच्या घरी येण्याची वाट पहात बसले होते. बाहेर धो-धो पाऊस पडत होता. आत तिघांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. ही भयानक पावसाळी रात्र ते कधीच विसरू शकणार नव्हते. अवनी कुठे असेल, काय करत असेल, तिला कुणी त्रास देत असेल तर? विचार करून डोके भणभणायला लागले होते त्यांचे. वाट पाहून थकून, शेवटी कधीतरी मध्यरात्री बसल्या जागेवरच त्यांना डोळा लागला असावा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ते पोलीस स्टेशनला जायला तयार झाले.


"सावनी तू हवंतर घरीच रहा, मी आणि बाबा जाऊन बघून येतो."

"नाही आई, मी पण येणार आहे पोलीस स्टेशनला." 

तिच्या हट्टापुढे आईबाबांचे काही चालले नाही. तिचा अवनीवर खूप जीव होता आणि हे आईबाबांनाही माहीत होते. सकाळीच ते तिघे पोलीस स्टेशनला गेले.


त्यांना बाहेरच थोड्यावेळ वाट बघायला लागली. मग इंस्पेक्टरने त्यांना आत बोलावले. 

"हे पहा आमचा तपास सुरू आहे, काही माहिती मिळाली तर आम्ही लगेच तुम्हाला सांगू." 

हे ठरलेले उत्तर देऊन त्यांनी समोरच्या फाईलमध्ये डोके घातले. 


"तपास करताय म्हणजे नक्की काय करताय विचारू शकते का मी?" सावनीने हिम्मत करून प्रश्न विचारला. तसं इंस्पेक्टर जरा चरकून तिच्याकडे पहायला लागले. 


"आम्ही आमचं काम करतोय नीट, तुम्हाला त्याचे डिटेल्स नाही देता येणार आणि समजणारही नाहीत तुम्हाला. बरं तुम्ही सांगा तुमचा कोणावर संशय वगैरे आहे का?" 


ह्या प्रश्नासरशी तिघेही जण भूतकाळात हरवून गेले.....

 

काही महिन्यांपूर्वी शाळेतून परत येतांना, आडरस्त्यावर काही टारगट मुलं अवनीला एकटीला पाहून छेडायला लागली होती. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आणि झपाझप पावले टाकीत ती घरी पोहोचली. तिने ही गोष्ट लगेचच सावनीला सांगितली. सावनीनेही तिला दूर्लक्ष करण्याचाच सल्ला दिला खरा पण अवनीला होणारा त्रास तिला पाहवत नव्हता. एके दिवशी मुद्दाम ती कॉलेज मधून लवकर निघाली आणि अवनीला तिने शाळेत गाठले. दोघी मिळून घरी येत असताना ती चारी मुले तिने पाहिली. विचित्र चाळे आणि काहीबाही कमेंट्स करत होती. 


"आज ताईला सोबत बोलावलेस का? घाबरली वाटतं आम्हाला, हा हा.. " असे हसून ते एकमेकांना टाळ्या देत होते. 


हे ऐकून सावनीला राहवले नाही, "लाज वाटत नाही का तुम्हाला, घरी आई, बहीण नाही वाटतं तुमच्या. का त्रास देताय तिला उगाच, काय घोडं मारलं आहे तिने तुमचं." 


"ताईसाहेब... रागावू नका, त्रास नाही देत आम्ही तिला, प्रेमाने बोलतो उलट पण ती काही बोलतच नाही आमच्याशी." 


"ती का बोलेल तुमच्याशी, ओळखत पण नाही ती तुम्हाला. बऱ्या बोलाने हे सगळं थांबवा नाहीतर..."


"नाहीतर... काय करशील तू?" त्या मुलांमधला म्होरक्या आता चांगलाच चवताळला होता सावनीवर.


"नाहीतर.. नाहीतर मी पोलिसांकडे तक्रार करेन." 


"धमकी देतेस?"


"नाही, ही पोकळ धमकी नाही मी खरंच जाईन पोलिसांत मग तुझे नांव खराब होईल आणि तुझ्या घरच्यांनाही समजेल, तुम्ही रोज इथे काय पराक्रम करता ते."


सावनीचे हे बोलणे ऐकून ती मुले जरा बिचकली. त्यांना त्यांची चूक समजली असावी, प्रकरण वाढले तर अंगाशी येईल हा विचार करून ती मुले शांतपणे तिथून निघून गेली. 


ह्यानंतर काही दिवस मात्र ती मुले तिथे दिसली नाही. अवनीला आपल्या बहिणीचा खूप अभिमान वाटला. आता तिलाही जरा धीर आला, त्या मुलांची भीती कमी झाली. ती आता बिनधास्त त्या रस्त्याने शाळेला जाऊ-येऊ लागली. 


तशी सावनी लहानपणापासूनच एकदम टॉम-बॉय आणि बोल्ड होती तर अवनी जरा नाजूक आणि लाजरी, बुजरी होती. सावनी अवनीपेक्षा  अभ्यासात उजवी होती तर अवनी तिच्यापेक्षा सौंदर्यात उजवी होती. दोघी बहिणी वेगवेगळ्या होत्या पण त्यांच्यातील बॉण्ड खूप घट्ट होता. 


दोघा सख्ख्या बहिणींमध्ये खूप अतूट प्रेमाचे नाते होते. दोघी एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. दोघी नेहमी एकत्रच राहायच्या. सगळं एकमेकींशी शेअर करायच्या. त्यांना कधी कुणा दुसऱ्या मैत्रिणीची गरज अशी वाटलीच नाही. दोघींना मोजक्याच मैत्रिणी होत्या.


अवनीला काहीही हवे असेल, दुखत-खुपत असेल तर ती आईबाबांना सांगायच्या ऐवजी तिच्या ताईला म्हणजेच सावनीला सांगायची. सावनी काहीही करून तिचा प्रॉब्लेम सोडवायची. दोघी मिळून शाळेला जायच्या, यायच्या दिवसभर एकत्र राहायच्या. अभ्यास, जेवणखाण, खेळणं टीव्ही पाहणं सगळं काही मिळूनच करायच्या. त्यांचे आईबाबा दोघेही नोकरी करणारे होते. शहरात राहायचं, मुलींना शिकवायचं तर दोघांना पैसे कमावणे गरजेचे होते. सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंब होतं त्यांचं. दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरांत ते चौघे राहायचे. दोन्हीकडचे आजी-आजोबा गावी रहात होते. सगळं छान चाललं होतं. सगळेजण खुश होते. पण त्या छोट्याश्या, सुखी कुटुंबाला कोणाची दृष्ट लागली होती माहीत नाही. 


नुकतीच अवनी सातवीतुन आठवीत गेली होती आणि सावनी खूप चांगले मार्क्स मिळवून दहावी पास झाली होती. तिला अकरावीला ज्युनिअर कॉलेजला ऍडमिशन मिळाली होती. त्यामुळे ह्यावर्षी पासून अवनीला एकटीलाच शाळेत जावे-यावे लागत होते. आधी अवनी घरी यायची मग सावनी आणि मग आईबाबा घरी यायचे. अवनी दुपारी साधारण 2-21/2 ला घरी यायची. घराची किल्ली बाहेरच्या भिंतीतल्या छोट्याश्या कोनाड्यात ठेवलेली असायची ती घेऊन रोज अवनी दार उघडून बसायची. फ्रेश होऊन जेवण करायची मग थोड्यावेळाने ती अभ्यासाला बसायची तोवर सावनी यायची. सावनी तिला अभ्यासात मदत करायची. मग आई घरी यायची. आई घरी आल्याबरोबर घरकामाला लागायची.  आई सांगेल ती मदत सावनी आईला करायची. बाबा घरी आले की फ्रेश होऊन, ते दोघी लेकींशी गप्पा मारायचे. चौघेजण मिळून रात्रीचे जेवण एकत्रच करायचे. सावनी थोडावेळ रात्री अभ्यास करायची मग सगळेजण थकून, झोपून जायचे. असेच दिवस चालले होते. दोघी बहिणींनी आईबाबांना टेन्शन नको म्हणून रस्त्यात घडलेला तो प्रसंग संगीतलेलाच नव्हता. आधी ह्या प्रसंगामुळे अवनी घाबरून गेली होती खरी पण सावनीच्या बोल्डनेसमुळे तिलाही आता धारिष्ट्य आले होते. 


साधारण पंधरा-वीस दिवसांनी पुन्हा एक दिवस त्या चौघातील जो म्होरक्या होता त्या मुलाने एकट्यानेच अवनीला रस्त्यात गाठले आणि तिची छेड काढायला लागला. अवनीदेखील चवताळून त्याला काहीबाही बोलली. पण त्याचे विचित्र रूप, हावभाव पाहून तिला शंका आली आणि तिने वेळीच तेथून पळ काढला. आज जे घडले त्यामुळे मात्र ती मनातून पुरती घाबरून गेली होती. 


तिने सावनीला सगळी हकीकत सांगितली. आता सावनीलाही जरा टेन्शन आले होते. जेवतांना रात्री दोघींनी आईबाबांना विश्वासात घेऊन पहिल्यापासून जे घडले ते सर्व सांगितले. आधी का नाही सांगितले म्हणून आईबाबांनी दोघींना रागावले. 


"सावनी, तू एव्हढी मोठी झालीस का? आम्हाला सांगायची गरज नाही वाटली तुला?" 


"आई, माझं चुकलं, मला वाटलं की जरा रागावून बोललं की गप्प बसतात असली टारगट पोरं. पण ... हे जरा अपेक्षेपेक्षा वेगळंच घडतंय... म्हणूनच मी आज तुम्हाला सांगितलं."


आईबाबांनी ह्यावर खूप विचार केला आणि शेवटी पोलिसांत तक्रार नोंदवायचे ठरवले. पोलिसांनी त्याला पकडून नेले आणि समज देऊन सोडून दिले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अजून त्याने कोणताच गुन्हा प्रत्यक्षपणे केलेला नव्हता त्यामुळे त्याला जेलमध्ये ठेवता येणे शक्य नव्हते. 


त्यादिवशी रात्रभर आईबाबा, सावनी व अवनी विचार करीत राहिले. काही दिवस सावनीने कॉलेजला जाताना अवनीला सोडून मग जावे असे ठरले आणि लवकर येऊन तिला शाळेतून घेऊनही यावे. असे किती दिवस जमणार होते तिला, माहीत नाही. पण निदान काही दिवस तरी अवनीला सपोर्ट म्हणून सोबत जायला सावनी तयार झाली होती. 


काही दिवस सगळ्यांचे खूप टेन्शनमध्ये गेले होते. पण प्रत्येक भावनेच्या उद्रेकावर काळ हेच औषध असते. अतीव दुःख, वेदना असो की राग, भीती, दडपण असो काही दिवसांनंतर त्याची तीव्रता कमी होत जाते व आपण पहिल्यासारखे जीवन जगू लागतो. अवनीच्या बाबतीत पण हेच घडले होते, आता ती नॉर्मल झाली होती. त्यांना वाटले आता तो परत तिच्या वाटेला जाणार नाही. 


पोलिसांत गेल्याने त्याचे आयुष्य देखील उलथे-पालथे झाले होते. त्याचे मित्रही त्याला दुरावले होते. त्याच्या घरचे, गल्लीतले लोकं त्याला गुंड-मवाली समजायला लागले होते. ती इमेज पुसून टाकण्यासाठी तोही आता कॉलेज, अभ्यास ह्यात स्वतःला बिझी ठेऊ लागला होता.  


आता पहिल्याप्रमाणे सगळे सुरळीत झाले होते. अवनी एकटीच शाळेला जाऊ-येऊ लागली. सावनीला सेकंड हॅन्ड लुना घेऊन तिची सायकल अवनीला द्यायचे आईबाबांनी ठरवले होते. ज्यायोगे तिचा वेळही वाचेल आणि चालत आडरस्त्याने यायचे ही टळेल. त्यासाठी पैशांची जमवाजमव व कुणा ओळखीच्याकडून लुना मिळते का हे आईबाबा पहात होते. पण त्याआधीच हा आजचा बिकट प्रसंग आला होता. 


त्यांनी आज पोलिसांना ही आधीची सगळी हकीगत सांगितली, हे इंस्पेक्टर नवीन जॉईन झाले होते त्यामुळे त्यांना ह्याची कल्पना नव्हती. त्यांनी जुनी कम्प्लेन्ट काढून द्यायला हवालदाराला सांगितले. 


इतक्यात एक हवालदार सांगत आला की कुणाकडून तरी माहिती मिळाली होती एका साधारण अवनीच्या वयाच्या मुलीचे प्रेत सापडले होते. ही माहिती समजताच इंस्पेक्टर लगेच तिकडे जायला निघाले. हे तिघेही सोबत जाण्यासाठी सज्ज झाले. 


सावनीचा कावरा बावरा चेहरा पाहून बाबा तिला म्हणाले,

"सावनी तू घरी जातीस का? आम्ही आधी जाऊन पाहून येतो." 

"नाही बाबा मला पण यायचंय." रडवेला चेहरा करत सावनीने सांगितले.


मग सगळेजण घटनास्थळी पोहोचले. अवनीच्या शाळेच्या त्याच आडरस्त्याच्या बाजूला एका पडक्या घराच्या पडक्या भिंती पलीकडे तो माहिती देणारा माणूस सगळ्यांना घेऊन गेला. तिथे जाऊन पाहिले तर....... अवनीचे अस्ताव्यस्त पडलेले शरीर तिथे होते...... तिच्या डोक्याला खूप मोठी जखम झालेली होती, त्यातून रक्ताचा वाहलेला पाट दिसत होता. पावसामुळे सगळीकडे चिखल होता, व त्यात तिचे कपडे अंग रात्रभर भिजलेले होते. ते सर्व पाहून तिघांनाही खूप मोठा धक्का बसला. 


आपल्या लहान बहिणीची ती अवस्था पाहून सावनीला दुःख अनावर झाले, ती जोरजोरात ओरडून रडायला लागली. आईपण तोंडाला पदर लावून रडत होती. बाबांची तर शुद्धच हरपली होती. हे दृश्य तिघांसाठी असहनीय होते. ते कायमचे त्यांच्या मनावर कोरले गेले होते. 


सावनीला आधीच घरी जा म्हणून बाबा सांगत असतांनाही ती हट्टाने तिथे आली होती खरी पण तिला ते दृश्य पाहवेना. तिच्या पोटात मळमळायला लागले. ती पाठ फिरवून, थोडी लांब जाऊन उभी राहिली. तिच्या मनांत आले, "हे पोलीस कसे काय नेहमी अशी दृश्यं पहात असतील कुणास ठाऊक?" 


पोलिसांच्या अंदाजानुसार शाळेच्या वाटेवर अवनीला बेशुद्ध करून कुणीतरी जवळच्या पडक्या घराच्या भिंतीआड तिला नेले होते. तिच्यावर बलात्कार केला असावा असा संशय प्रथमदर्शनी पोलिसांना येत होता. त्यांनतर तिच्या डोक्यात मोठा दगड घालून तिला जीवानिशी मारले गेले होते. हे सगळेच खूप भयंकर होते. पोलिसांनी पुढची सूत्रे पटापट हलवली. त्या जागेला सील केले गेले व कुठे हातापायांचे ठसे मिळतायत का ह्याचा शोध घेणे सुरू झाले. पोस्टमार्टम केल्यावरच सगळा उलगडा होणार होता. तोपर्यंत वाट बघावी लागणार होती.


तिघेजण हताश होऊन घरी जायला निघाले. आता अवनीच्या घरी परत येण्याची आशा पूर्णपणे संपली होती. परत कधीच तिचा चेहरा पाहता येणार नाही हा विचारच अस्वस्थ करणारा होता. पोस्टमार्टम होऊन प्रेत ताब्यात मिळाल्याशिवाय तिचा अंतिम संस्कारही होणार नव्हता. 


"तुमचा कुणावर संशय?" पोलिसांच्या ह्या मगाचच्या प्रश्नाने त्या तिघांना विचार करायला भाग पाडले होते, "त्या छेड काढणाऱ्या मुलाने, हे असे काही केले असेल की नाही माहीत नाही पण तीच एक शक्यता वाटते आहे." 


ह्या आधीही त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवलेली असल्याने पोलिसांनी लगेचच त्याला संशयित आरोपी म्हणून अटक केले आणि त्या अनुषंगाने पुढचे इन्व्हेस्टीगेशन सुरू झाले.


तो मात्र "मी काहीही केलेले नाही" असेच म्हणत होता. पोलिसांना गुन्हेगाराकडून सत्य वदवून घेणे कठीण नसते ते त्यांच्या पध्दतीने प्रयत्न करत होते. पण तो त्याच्या म्हणण्यावर ठाम होता.


पोलिसांचे पुढचे इन्व्हेस्टीगेशन होऊन फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे कोर्टात केस उभी राहिली. पण हा सम्पूर्ण काळ अवनीच्या घरच्यांच्यासाठी त्रासदायक होता. तसाच तो त्या मुलाच्या घरच्यांच्यासाठी पण कठीण परीक्षेचा काळ होता. 


"आधीच्या घडलेल्या प्रसंगाचा गैरफायदा घेऊन कुणीतरी दुसऱ्याने हे केले नसेल कशावरून?" हा त्या मुलाचा युक्तिवाद अगदीच तथ्यहीन वाटत नव्हता. कायदा फक्त साक्षी, पुरावे पाहतो, कुणाच्याही भावना नाही त्यामुळे अवनीच्या बाबतीत जे कुकर्म घडले त्याचे साक्षी, पुरावे गोळा करण्याचे चॅलेंजींग काम पोलिसांकडे होते.


ठोस पुराव्यांच्या अभावी पोलिसांना त्या मुलाला जामिनावर सोडावे लागले होते. हिंदी फिल्मच्या डायलॉग प्रमाणे, "100 अपराधी वाचले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये." ह्याच धर्तीवर त्याला जामीन मिळाला होता पण आता ह्या डायलॉगमध्ये एक मोठा आणि महत्वाचा बदल करायला हवा खरंतर, "जशी एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये तसेच एकही गुन्हेगार वाचला नाही पाहिजे" प्रत्येक गुन्हेगाराला जरका लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा झाली तरच गुन्हेगारांच्या मनांत पोलीस आणि कायदा व्यवस्था ह्याची भीती बसेल. नाहीतर असे गुन्हे आणि गुन्हेगार दिवसेंदिवस वाढतच जातील. 


कोर्टात केस चालू होती. तारखांवर तारखा पडत होत्या पण काहीच निर्णय लागत नव्हता. सावनी आणि तिचे आईबाबा अवनीला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करत होते. एक दिवस असेच कोर्टातून बाहेर पडतांना तो मुलगा सावनीच्या समोर आला, त्याच्या नजरेतील विजयी भाव पाहून सावनीला खूप चीड आली. "खूप हुशार आहेस म्हणे तू, मग शोध लाव ना आणि गुन्हेगाराला शिक्षा देऊन दाखव." त्याने सावनीला उघड-उघड चॅलेंज दिले. तिला ह्याचा एकच अर्थ लागत होता की त्यानेच हे सगळे घडवून आणले होते. पण कोर्टात ते सिद्ध करता येणे शक्य होत नव्हते. 


अनेक दिवस, महिने असेच उलटून जात होते. बघता-बघता वर्ष लोटले. कठीण प्रसंगी काळ असाच त्याच्या गतीने उलटून जातो पण तो काळ जगलेल्याची जाणीवच आपल्याला होत नसते खरतर.


रात्रीच्या वेळी बाहेर धो-धो पाऊस पडत होता. त्यादिवशी पण असाच पाऊस होता, सावनीला आठवले आणि तिच्या अंगावर सरसरून काटा आला. ती पावसाळी भयानक रात्र ती कधीच विसरू शकणार नव्हती. तिने आपल्या लहान बहिणीला त्रास देणाऱ्या नराधमाला धडा शिकवायचे मनाशी ठरवले. पण काय आणि कसे करावे हे तिला सुचत नव्हते. 


असे काहीतरी करावे की जेणेकरून तो स्वतः गुन्हा कबूल करेल आणी त्याला शिक्षा होईल. पण तो हा गुन्हा मान्य करण्याची चूक कधीच करणार नाही, हेही ती ओळखून होती. तिच्या डोक्यात विचारांचे चक्र गरागरा फिरत होते. काहीतरी करायचेच हे पक्के झाले होते तिच्या मनांत. आता अजून शांत बसणे तिच्यासाठी शक्यच नव्हते. 


तिने विचार केला जर कायदा त्याला शिक्षा करू शकत नसेल तर मीच त्याला शिक्षा करेन. जसे निर्दयतेने त्याने अवनीला ठार मारले अगदी तसेच मीही त्याला जीवानिशी मारून टाकेन. ज्यायोगे माझा बदला पूर्ण होईल. पण हे वाटते तितके सोपे नाही. एक चांगली मैत्रीण म्हणून सावनी माझ्याशी सगळे बोलायची. हा अघोरी विचार देखील तिने मला सांगितला. 


एक हुशार, स्मार्ट मुलगी न्यायव्यवस्थेपुढे हार मानून क्रिमिनल होण्याच्या मार्गावर चाललेली मला पाहवेना. "तू हे असे काहीतरी केलेस तर तुही पकडली जाशील आणि मग स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोर्टाच्या खेपा घालत बसशील. तुझे बारावीचे वर्ष आहे ह्या सगळ्यामुळे तुझे कायमचे आयुष्य उध्वस्त होईल. हा वेडेपणा करू नकोस. एका गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी तू गुन्हेगार होणार हे काही मला बरोबर वाटत नाही. त्यापेक्षा तू त्याला कोर्टाकडून शिक्षा होण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार कर." 

"तेच तर सुचत नाहीये ना मला. काय करू मी?" 

"आपण एक काम करूया अवनीच्या केस वर काम करणाऱ्या त्या लेडी इन्स्पेक्टर आहेत ना, छाया मॅडम, त्यांना जाऊन भेटूया आणि काय करता येईल हे विचारुया. ठीक आहे?" 

"ओके, चल तू येशील माझ्याबरोबर?" 

"हो, मी नेहमी तुझ्याबरोबर असेन काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल."

अवनी आता कधीच परत येणार नाहीये आणि सगळं पहिल्यासारखं ठीकही होणार नाहीये हे माहीत असूनही मी तिला धीर देण्यासाठी बोलून गेले. 


आम्ही दोघी छाया मॅडमना भेटलो. त्यांच्या सल्ल्याने पूर्ण प्लॅन ठरवला. त्या मुलाचा फोन नंबर घेऊन सावनीने त्याला त्याच आड रस्त्यावर भेटायला बोलावले. ह्यात खूप मोठी रिस्क होती पण ती घेतल्याशिवाय काहीच साध्य होणार नव्हते. 


भेटल्यावर तिने सरळ-सरळ त्याला प्रश्न विचारला, "का मारलेस तू माझ्या बहिणीला?" 


"कारण डोक्यात गेला होता तुम्ही दोघी माझ्या. तुम्ही पोलिसांकडे तक्रार केल्यावर मला घरी येऊन पकडून घेऊन गेले होते पोलीस. माझं नाव राजा आहे आणि आधी मी अगदी राजासारखाच रहात होतो. पण त्या दिवसापासून सगळ्यांच्या माझ्याकडे पाहण्याच्या नजरा बदलल्या होत्या. घरी माझ्या आई-बाबांनी तर मला चांगलेच धारेवर धरले होते. मला रोज त्यांचा खूप ओरडा खावा लागत होता."


"एकदा तर बोलता-बोलता माझे बाबा तुझे उदाहरण देत म्हणाले, "पहा ती मुलगी किती चांगल्या मार्कांनी दहावी पास झाली, घरची परिस्थिती बेताची आहे पण मेहनत घेतली तर यश मिळू शकते हे तिने दाखवून दिले आहे. तुला आम्ही कसलीही कमी पडू देत नाही पण तू मात्र अभ्यास सोडून हे असले धंदे करत फिरतोस. शिक जरा तिच्याकडून काही." 


"बस, हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. बाबांचे त्यादिवशीचे हे बोलणे माझ्या वर्मी बसले, मला तुम्हा दोघा बहिणींचा राग यायला लागला होता. मुलींना जास्त शिकवून, फ्रीडम द्यायलाच नाही पाहीजे मग त्या अशा सगळ्यांसाठी प्रॉब्लेम होऊन बसतात. मनातल्या मनात धगधगत ठेवलेली सल मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी सुडाने पेटून उठलो होतो. तुझं तुझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे ना म्हणूनच मी तिला टार्गेट करून तुला त्रास द्यायचं ठरवलं."


सावनीच्या लक्षात आले, कुठेतरी त्याचा "मेल इगो" दुखावला गेला होता आणि सूडाच्या भावनेने तो एक मोठा क्रिमिनल झाला होता.


"तुझ्यासाठी हे बोलणं, करणं इतकं सोपं आहे पण आमचं अख्खं आयुष्य बरबाद केलेस तू. आमच्या सगळयांचा जीव की प्राण होती अवनी, तिचा जीव घेऊन तुला काय मिळाले. उलट त्या प्रसंगातून शहाणपणा शिकून तू तुझे आयुष्य सुधारून एक चांगला माणूस व्हायला हवे होतेस."


"एकदा का बदनामीचा ठप्पा बसला ना डोक्यावर की कितीही चांगले वागले तरी समाजात मान मिळत नसतो. तुला नाही समजायचं" त्याच्या डोळ्यात आता विचित्र क्रूर भाव सावनीला दिसायला लागले.  


"हा..हा..हा" राक्षसी हसत त्याने शेवटी कबूल केले की त्यानेच अवनीला मारले होते. "खरंतर मला तिला मारायचे नव्हते, फक्त मजा मारून तुम्हा दोघींना धडा शिकवायचा होता. पण जर का मी तिला सोडून दिले असते तर तिने नक्कीच पोलिसांना सांगून मला रेपकेसमध्ये अरेस्ट करवले असते. म्हणून मी तिला ठार मारून टाकले. माझ्याविरुद्धची एकमेव साक्षीदार होती ती. आता मला गुन्हेगार सिद्ध करता येणं केवळ अशक्य आहे, तू लाव तुझं डोकं हवं तेव्हढं आणि बघ प्रयत्न करून कोर्टात माझा गुन्हा सिद्ध करण्याचा." 


हे ऐकून क्षणभर सावनीचं डोकं सुन्न झालं. त्यांनतर तिने विचार केला, त्याने सांगितलेले डिटेल्स हे पोलिसांनी दिलेल्या माहितीशी तंतोतंत जुळत होते. वर्षभर खूप आसवं गाळली होती तिने पण आता तिला बहिणीवर झालेल्या अत्याचारांचा बदला घ्यायचा होता. वर आभाळ भरून आले होते, पाहता-पाहता रात्रीसारखा अंधार पसरला होता सगळीकडे. सावनीच्या डोळ्यात अश्रूंच्या जागी आज फक्त अंगार होते.


ती काहीही न बोलता फक्त मागे वळली, तिथल्या त्या पडक्या घरात आधीपासूनच लपून बसलेली लेडी इन्स्पेक्टर मिस छाया बाहेर आली तिने चोरून त्या दोघांचा व्हिडीओ केला होता. 

"राजा, खरच तू खूप हुशारीने सगळं साधलं होतंस. तू मुद्दाम मोबाईल फोन घरीच ठेवला होतास शिवाय पावसामुळे देखील तुझा फायदाच झाला होता. परिस्थितीने तुलाच साथ दिली होती. पण सत्य आज ना उद्या बाहेर येतेच. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा आता झाल्याशिवाय राहणार नाही. चल माझ्याबरोबर." असे म्हणत त्या लेडी इन्व्हेस्टीगेशन ऑफिसरने त्याला बेड्या ठोकल्या.

 

"छाया मॅडम, केवळ तुमच्यामुळे हे शक्य झाले, थँक्स." असे म्हणत सावनीने साश्रुपूर्ण नयनाने त्यांना हात जोडले. 

"तुझ्या शिवाय मी हे करू शकलेच नसते, हे आपले टीम वर्क होते, गुड जॉब." असे म्हणत त्यांनी तिची पाठ थोपाटली. 


आता त्या राजाचा कबुली जबाब त्यांच्याकडे एक मोठा पुरावा म्हणून उपलब्ध झाला होता. त्याला गजाआड टाकणे आता फार कठीण काम राहिले नव्हते. अवनीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांची मदत करून सावनीने मोठी जबाबदारी पार पाडली होती. सावनीची हिम्मत, हुशारी ह्याचे सगळेजण कौतुक करू लागले. आईबाबा पण तिच्या धाडसाने भारावले. पण तिच्या हुषारीवर जळणाऱ्या एका घमंडी आणि वाया गेलेल्या मुलामुळे तिला तिच्या बहिणीला मात्र कायमचे गमवावे लागले होते. ह्या गोष्टीचे दुःख तिला नेहमी सलत राहणार होते. सावनीला फक्त एकाच गोष्टीचे समाधान वाटले की तिने अवनीला शेवटी न्याय मिळवून दिला होता. आता फक्त त्याचा कबुलनामा कोर्टात प्रस्तुत करून त्याला शिक्षा घोषित होणे बाकी होते. 


वर्षभराच्या नैराश्येनन्तर आज सगळ्यांच्या डोळ्यात आशेचा किरण चमकत होता. कायदा आणि न्यायव्यवस्था ह्यावरचा विश्वास ढळायला लागलेला असतांना सावनीचा त्यावर परत एकदा विश्वास दृढ झाला होता. गुन्हा केल्यावर गुन्हेगार सहज कायद्यातील पळवाटा शोधून, सर्वांना चकमा देत निर्दोष सुटू शकतो ही भयानक परिस्थिती सर्वत्र पाहून त्याचा पगडा तिच्या मनावर बसत चालला होता व आपणच त्या नराधमाला जीवानिशी मारून अवनीच्या खुनाचा बदला घेण्याचा विचार तिच्या मनांत येत होता. पण छाया मॅडमच्या बोलण्याने तिला हिम्मत मिळाली. त्यांच्या मदतीने तिने योग्य मार्गाने तिचा बदला आज घेतला होता. अवघड व प्रतिकूल परिस्थितीतही न्यायाला धरून कार्यवाही करत, गुन्हेगाराला शोधून, शिक्षा मिळवून देण्यासाठी सतत धडपडणाऱ्या सगळ्या पोलीस, तपास यंत्रणा, वकील व जज ह्यांना आज सावनीने मनापासून सलाम केला. 


मला सावनीची जवळची मैत्रीण म्हणून आज तिचा खूप अभिमान वाटत होता. कठीण काळातही समजदारीने वागून, योग्यमार्गाने व हिमतीने तिने परिस्थितीशी लढा दिला होता. असे असूनही अशी वेळ कोणावरही येऊ नये हीच माझी इच्छा आहे. 


© राधिका गोडबोले

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू