पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

खेळ कुणाला दैवाचा कळला..

*खेळ कुणाला दैवाचा कळला*..!!



               हिरवा शालू लेवून नटलेली ..वनराई तिच्याकडे आकर्षित होऊन तिला भेटण्यास खाली उतरत आलेले नभ.. हवेतील मंद गारवा .. चोहू बाजूने असलेल्या डोंगर माथ्याच्या मध्यभागी अंगठीतील हिऱ्याप्रमाणे वसलेले डायमंड रिसॉर्ट..!  जणू स्वर्गच धरेवर उतरला होता .भोवतालचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. सगळेजण भरभरून त्या वातावरणाचा आस्वाद घेत अर्थातच फोटो काढण्यात गर्क होते . पण जिच्यामुळे ही संधी साऱ्यांना मिळाली होती ती बर्थडे क्वीन श्रुतिका मात्र अजून कुठे दिसत नव्हती ."काही म्हणा पण श्रुतिका नशीबवानच आहे. " असे मी म्हणताच माझ्या मैत्रिणींनी अगदी एकमताने एकाच आवाजात त्याला दुजोरा दिला आणि माझ्या सगट  साऱ्याजणी जोरात हसायला लागल्या .जणू आम्ही पूर्वीच्याच म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वीच्या शाळकरी मुली होतो. आमचा पाच-सहा जणींचा हा ग्रुप शाळा कॉलेज आणि लग्नानंतरही तसाच अबाधित होता .त्यामुळे गप्पांना नेहमीप्रमाणेच अगदी उधाण आले होते." नशीबवानच आहे खरी श्रुतिका. बघ ना कॉलेजमध्ये असताना सगळ्यांच्या हृदयावरती राज्य करायची ती.तिच्याशी बोलायला सारेच उत्सुक असायचे." आभा असे म्हणताच निशा म्हणाली, "अशोकशी लव मॅरेज केल्यावर मोठा गोंधळ होईल तिच्या घरी कदाचित साऱ्यांशी संबंध तुटतील असे वाटले होते पण तिच्या घरच्यांनी तिला छान समजावून घेतले. अशोक,  तो तर जिवापाड जपतो तिला. किती प्रेम आहे तिच्यावर त्याचे .बघ ना, बायकोच्या वाढदिवसाची केवढी मोठी पार्टी देतोय तो. ते पण एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये ! आपल्यालाही अगदी न विसरता आमंत्रण दिले त्यांने आपण तिच्या खास मैत्रिणी म्हणून ..".  " आता स्नॅक्स खायचे का गप्पानीच पोट भरायचे?" असे मी म्हणताच सर्वजणी तिथून निघाल्या .


         अशोकने दोन दिवसांसाठी रिसॉर्ट बुक केले होते . वाढदिवस उद्याचा असला तरी आज रात्री बारा वाजता केक कापून तो साजरा करायचा होता. शिवाय उद्या परत वेगवेगळे कार्यक्रम वाढदिवसानिमित्त त्याने ठरवले होते .त्यामुळे सारे आमंत्रित आज दुपारनंतरच रिसॉर्टवर यायला सुरुवात झाली होती. रुचकर पदार्थांच्या आस्वादनंतर तृप्त झालेल्या मनास श्रुतिकाच्या आगमनाने अधिकच तृप्तता दिली. स्वर्गीय अप्सरा जणू भूलोकी अवतरली होती. तिने परिधान केलेला लाल रंगाचा ड्रेस तिच्या गौरवर्णावर अधिकच खुलून दिसत होता . वाऱ्याशी छेडखानी करीत डौलात  गालावर रुळणाऱ्या रुपेरी बटा, धनुष्याकृती भुवयांच्या कमानीतून निघणारे नजरेचे बाण आजही अनेकांना घायाळ करीत जात होते. लग्नाच्या दहा-बारा वर्षानंतरही हे अबाधित ठेवलेले शरीर शौष्ठव मोठ्या दिमाखात  मिरवत चेहऱ्यावर खास ठेवणीतले हास्य घेऊन श्रुतिका साऱ्यांचे हसून स्वागत करीत होती. आम्हा साऱ्या मैत्रिणींना पाहताच अगदी लहान मुलीसारखी धावत येऊन ती आमच्या गळ्यात पडली . "श्रुतिका, आताच एवढी सुंदर तयार होऊन आली आहेस रात्री बारा वाजता किती सुंदर दिसशील ? किती छान तयार होशील? याचा विचार न केलेलाच बरा. अशोक तर पुन्हा प्रेमात पडेल तुझ्या" असे मी म्हणताच मोठ्याने हसत श्रुतिकाने मला टाळी दिली आणि अचानक "हाय सॅम "असे म्हणत समोर उभे असलेल्या माणसाकडे मोर्चा वळवला. बराच वेळ दोघे बोलत होती .बहुदा एकमेकांची थट्टा मस्करी चालली असावी पण मला त्यांच्यातील सलगी जरा खटकलीच. नंतर श्रुतिकाकडून कळाले तो अशोकचा मित्र आणि बिझनेस पार्टनर समीर कौशिक आहे म्हणून..!


        श्रुतिकाची आई देखील आनंदी वाटत होती. श्रुतिकाने प्रेम विवाह तोही आंतरजातीय केला हे कळल्यावर तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच ते गेले .आम्ही सर्वजणी भेटायला गेलो तेव्हा काकू अगदीच खचून गेल्या होत्या .आता बऱ्याच सावरलेल्या वाटत होत्या .श्रुतिकाच्या मोठ्या बहिणीचे मीनलचे उशिरा का होईना लग्न झाले ,स्थळ देखील बरे मिळाले याचाही त्यांना आनंद असेल शिवाय जबाबदाऱ्या संपल्याने थोड्या निवांत झाल्या असतील ." अरे चला, रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसर पाहून येऊ.  उद्या सकाळी नाष्टा ,जेवण झाले की निघावं लागेल आपल्याला परतीच्या प्रवासाला. आताच वेळ आहे." असे म्हणत आभाने आम्हा सर्वांना जवळजवळ तिथून हाकललेच. आम्ही तयार होऊन निघालो .माझे सहज लक्ष गेले जिन्याखाली श्रुतिका आणि तिच्या बहिणीमध्ये काहीतरी वाद होत असावा बहुदा. त्यांचे हावभाव आणि हातवारे यावरून तरी असे वाटत होते. मी त्यांच्याकडे पाहतेय हे लक्षात येतात दोघी जरा चपापल्या आणि तिथून चालल्या गेल्या. 


      रिसॉर्टच्या भोवतालचा परिसर अगदी नयनरम्य होता .हिरवेगार डोंगर, त्यातून झुळझुळ वाहणारे झरे, मखमली गवतावर  सुंदर नक्षीकाम केलेल्या गालीच्या प्रमाणे भासणारी रंगीबेरंगी रान फुले, दाटून आलेले ढग. निसर्गाने सौंदर्याची अगदी मुक्त हस्ते लय लूटच केली होती. ती ओंजळीत भरून घेताना वेळेचे भान कोणालाच राहिले नाही .अंधारासोबत आकाशातून पडणारे पावसाचे टपोरे थेंब पाहताच आम्ही धावतच रिसॉर्ट गाठले. .प्रवेशद्वाराजवळच श्रुतिका आणि समीर कौशिक सकाळच्याच अंदाजात बोलत उभे होते .त्याच्याशी बोलतानाचे श्रुतिकाचे हावभाव, एकूणच अंदाज मला विचित्रच वाटत होता .तेवढ्यात आमच्या मागोमागच अशोक देखील तिथे आला.तो सुद्धा बहुदा काही कामानिमित्त बाहेर गेलेला असावा . त्याला पाहताच श्रुतिका थोडी बावरली खरी पण तसे चेहऱ्यावर न दाखवता ती हसत अशोकशी काहीतरी बोलायला लागली.  अशोकच्या चेहऱ्यावर मात्र तिच्या असल्या वागण्याबद्दलची जराही नाराजी दिसत नव्हती. आम्ही आपापल्या रूममध्ये आलो प्रवासाने जरा दमल्यासारखे झाले होते. रात्री वाढदिवसाची पार्टी उशिरापर्यंत चालेल त्यामुळे थोडा आराम करून मग आवरायला लागावे असे मला वाटले पण साऱ्या मैत्रिणी एकत्र जमल्यावर ते शक्य नव्हते ."चला ग, आपण बर्थडे गर्ल सोबत मस्त डान्स करूयात. आठवतात का जुने दिवस ? शाळेचे स्टेज कसे दणाणून सोडायचो आपण गॅदरिंग मध्ये ..! " आभा अगदी उत्साहात म्हणाली, "अगं हो, पण तेव्हा आपण शाळकरी मुली होतो. आता आपल्या मुली शाळकरी झाल्या आहेत. पस्तीशी पार केलीय सगळ्यांनी"  निशा तिचा हिरमोड करत म्हणाली. " वय हे शरीरावर नाही तर मनावर असते मिसेस निशा आणि मी तर स्वतःला अजूनही शाळकरी मुलगी समजते .चला ग.." असे म्हणत आभाने आम्हा साऱ्याजणींना टेरेसवर नेले. 


         श्रुतिका तर डान्स साठी कधी एका पायावर तयारच. मग काय? नुसता धिंगाणा ..नृत्यावर आम्ही आमचे पाय जमेल तसे थिरकवत होतो. निशा हळूच  माझ्या कानाशी येऊन म्हणाली," तो वेटर बघितलास का? तो ग त्याच्या गालावर मोठी मस आहे .बघ केव्हाचा उगाच ते सरबताचे ग्लास हातात घेऊन आपल्या भोवती फिरतोय. श्रुतिका वरून नजर हटत नाहीये त्याची .कृतिकाने तरी किती सोन्याचे दागिने घातलेत अगदी प्रदर्शन मांडल्यासारखे ..एक तर इतकी सुंदर त्यात एवढे दागिने घातलेत कोणाचीही नजर खिळणारच ना.." " जाऊ दे ना, ती आणि तिचा नवरा बघून घेईल .तू कंबर हलव जरा ." असे म्हणत मी माझ्या आवडत्या गाण्यावर ठेका धरला . "बस.. बस ..दमले मी आता. रात्री साठी देखील थोडी एनर्जी ठेवा. तेव्हा पण डान्स आणि गेम्स अरेंज केले आहेत अशोक ने ."असे म्हणत श्रुतिका खुर्चीवर बसली. आम्ही तिच्या भोवती बसलो .पुन्हा गप्पांना उधाण आले .तेवढ्यात एक वेटर तेथे येत म्हणाला," अशोक सरांनी जेवणाचे टेबल आत्ताच लावायला सांगितले आहेत .कारण रात्री बाराला केक कापल्यावर जेवण ठेवले तर खूप उशीर होईल .तेव्हा सर म्हणाले आधी जेवण आटोपून घ्या ." "ओके ,चला ग, जेवण करून घ्या मग निवांत आवरता येईल " असे म्हणत श्रुतिका तिच्या इतर पाहुण्यांना बोलवायला गेली. 


        जेवणाचा बेतही अगदी उत्तम होता. तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ ,दोन स्वीट्स आईस्क्रीम, चाट सारेच होते. श्रुतिकाच्या वाढदिवसाच्या साजरेपणात जणू कोणताच कसूर राहिला नको असे अशोकने ठरवले होते. खरंच श्रुतिका नशीबवानच होती. आपल्या सौंदर्याच्या जोरावर अशोक सारखा श्रीमंत, काळजी घेणारा ,सगळे लाड हट्ट पुरवणारा नवरा तिला मिळाला होता. सुखाने तिची ओंजळ ओसंडून वाहत होती . जेवता जेवताच माझी विचारांची तंद्री लागली." काय ग? जेवण चांगले नाही का झाले? इतकी हळूहळू विचार करत जेवत आहेस? श्रुतिका मागून येत म्हणाली. "नाही ग ,उलट खूप छान आहे जेवण. म्हणून तर त्याची चव तोंडात घोळवत जेवत आहे." असे म्हणत एक गुलाब जामुन मी तिच्या तोंडात टाकला .जेवण आटोपले तेव्हा दहा वाजून गेले होते." चला ग आवरा आता. छान तयार व्हा .मी पण आवरते. छान आवरा माझ्या मैत्रिणी वाटल्या पाहिजेत "असे म्हणत श्रुतीका तिच्या खोलीत गेली. आमंत्रित देखील बर्थडे पार्टीसाठी तयार होण्यास त्यांच्या रूम मध्ये गेले. आम्हीही सगळ्या आपापल्या रूममध्ये गेलो. बाहेर पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. कडाडणाऱ्या विजा, सु-सू करीत वाहणारा वारा, वाऱ्यासोबत होणारी पानांची सळसळ सारे जरा थोडे भयावहच वाटत होते मला . त्यात आजूबाजूला असणाऱ्या डोंगरामुळे वातावरण जरा जास्तच भयाण झाले होते. माझ्यासोबत रूममध्ये निशा होती म्हणून बरे. निशाने मोबाईलवर मस्त पावसाची गाणी लावली त्याने मूड जरा चांगला झाला .आम्ही आवरायला लागलो . साडेअकरा वाजता  साऱ्याजणी आवरून खाली हॉलमध्ये आलो .हॉल अतिशय सुंदर सजवला होता .श्रुतिकाचे लहानपणापासूनचे सारे फोटो तिथे लावले होते. स्क्रीनवर श्रुतिकाआणि अशोकच्या हॅप्पी मोमेंट  एकत्र करून बनवलेला व्हिडिओ लावला होता. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली ती रूम फुलांच्या सुगंधाने सुगंधित झाली होती .सारे जण तयार होऊन तिथे आले पण श्रुतिका मात्र अजूनही आली नव्हती. "श्रुतिका आधीपासूनच तयार व्हायला खूपच वेळ लावते पण तयार झाली की तिच्यासमोर स्वर्गातली अप्सराही फिकी पडेल "असे आभा आम्हाला म्हणत असतानाच अशोक आमच्या जवळ येत म्हणाला ," तुम्ही श्रुतिकाला बोलवून आणता का प्लीज . तिचा फोन लावतो आहे केव्हाचा ती उचलतच नाहीये".  "ठीक आहे" असे म्हणत आम्ही श्रुतिकाच्या रूम जवळ येत तिला आवाज दिला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही .निशाने दोन तीनदा दरवाजा वाजवला ."झोपली की काय ही आत जाऊन ?" निशा तिचा फोन लावत म्हणाली .फोनची रिंग बाहेर आम्हाला ऐकू येत होती पण श्रुतिका फोन उचलत नव्हती.साऱ्यांच्याच मनात शंकेची पाल चुकचूकली. एव्हाना सारे तेथे जमा झाले .श्रुतिकाला आवाज दिला पण तिने दरवाजा उघडला नाही शेवटी दरवाजा तोडायचा असे साऱ्यांचेच मत पडले .अशोकच्या दोन-तीन मित्रानी मिळून दरवाजा तोडला. सारे आत गेले आणि समोरील दृश्य पाहून जागीच खिळले. श्रुतिका जमिनीवर पडलेली होती रक्ताच्या थारोळ्यात .कोणीतरी चाकूने  तिचा खून केला होता.  श्रुतिका हे जग सोडून गेली होती तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच ..! घड्याळात बाराचे ठोके पडत होते आणि साऱ्यांच्या हृदयाचे ठोके बंद पडायची वेळ आली होती. बाहेर वीजांचा कडकडाट होत होता .मुसळधार पाऊस पडत होता .श्रुतिकाची आई, बहीण ,अशोक, आम्ही मैत्रिणी सारे जण दुखात बुडून गेलो.क्षणात होत्या चे नव्हते झाले होते . विश्वासच बसत नव्हता. श्रुतिका चा खून कोण करेल? आणि कशासाठी? प्रश्नांची अनेक आवर्तने माझ्या मनात निर्माण होत होती.तेवढ्यात पोलीस तेथे आले .आता पुढील गोष्टींचा तपास अर्थातच त्यांच्याच हातात होता. 


         इन्स्पेक्टर शिंदे पाहता क्षणीच अत्यंत कर्तव्यदक्ष वाटत होते .ते नक्कीच खुन्याला शोधून काढतील असा विश्वास वाटत होता .त्यांनी प्रत्येकाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली .प्राथमिक चौकशी नंतर त्यांनी सांगितल्याशिवाय कोणालाही येथून हलता येणार नाही अशां सूचना देत ते निघून गेले. एव्हाना दिवस उजाडला होता. सगळ्यांच्या झोपा तर केव्हाच उडाल्या होत्या .दैवाचा खेळ खरच किती विचित्र अनाकलनीय असतो .माणसाच्या हातात काहीच नसते .कळसुत्रीच्या बाहूली प्रमाणे दैवाचे फासे पडतील तसे त्याला वागावे लागते. श्रुतिकाच्या वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने सगळे एकत्र जमतो काय आणि तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्या जगाचा कायमचा निरोप घेऊन जाते काय ...सगळे सुन्न होऊन बसले होते. कोणी कोणाला धीर द्यावा हेच कळत नव्हते .जागरण आणि रडण्याने माझे डोळे व डोके जड पडले होते. मी गॅलरीत थोड्या थंड हवेत आले .मोकळी थंड हवा श्वासात भरून घेत असताना माझे खाली लक्ष गेले खालच्या हिरवळीवर एका कोपऱ्यात समीर कौशिक कोणाशी तरी बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडालेला होता .याने तर केला नसेल श्रुतिकाचा खून? माझ्या मनात सहज एक विचार डोकावून गेला .तो कोणाशी बोलतोय ? काय बोलतोय? हे ऐकण्यासाठी मीही माझा मोबाईल घेऊन खाली गेले. उगाच कोणाशी तरी बोलण्याचे नाटक करून त्याचा वेध मी घेऊ लागले पण तो बहुदा त्याच्या घरच्यांशी बोलत होता . कदाचित श्रुतीका मरण पावल्याने खरच दुःख होऊन त्याचा चेहरा पडला असावा या विचारात मी माझ्या खोलीत गेले. फ्रेश होऊन बाहेर आले तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे त्यांच्या टीम सह पुन्हा रिसॉर्टवर चौकशीसाठी आले होते. त्यांची संशयाची सुई बहुदा अशोक वर असावी किंवा पोलिसांच्या नजरेत तर सर्वच गुन्हेगार असतात पण इन्स्पेक्टर शिंदे अशोकची कसून चौकशी करत होते ."तुम्ही कधीपासून ओळखत होतात एकमेकांना ?".  "सर कॉलेजमध्ये असताना आमची भेट झाली भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पदवीनंतर आम्ही दोघांनी लग्न केले .खूप प्रेम होते आमचे एकमेकांवर ". " लग्नानंतर तुमच्यातील नाते कसे होते?  कारण लवमॅरेज बहुत जास्त टिकत नाही. टिकले तरी त्या जोडप्यांचे आपापसात पटत नसते .". " सर सगळ्या नवरा बायकोत होतात तशी भांडण आमच्यातही व्हायची पण ती पाण्यावरील दवासारखीं असायची . क्षणात विरून जायची." इन्स्पेक्टर शिंदे अनेक प्रश्न विचारून एखादा धागा हाती लागतो का ते पाहत होते . त्यांना योग्य धागा सापडत नसावा.


          श्रुतिकाचा खूनी कोण असेल हा प्रश्न सतत माझ्याही डोक्यात असायचा. पोलिसांप्रमाणे मीही प्रत्येकाकडे संशयित नजरेने पाहायला लागली होती. श्रुतिकाच्या आईच्या डोक्यावर दुःखाचे आभाळच कोसळले होते. रूमच्या बाहेरच ती येत नव्हती. त्या मानाने श्रुतिका ची बहीण मीनल मात्र बरीच रिलॅक्स वाटली. सकाळी चहा घेतला .आता नाष्टा करत होती. हिला काहीच दुःख झालेले दिसत नाही माझ्या मनात शंकेची पाल चुकचूकली. श्रुतिका चा  श्रीमंत नवरा , तो करत असलेले तिचे कौतुक या सर्वांमुळे मत्सर भावनेने तर तिने हे पाऊल उचलले नसेल ना ? विचाराने माझे डोके गरगरायला लागले. पण मीनल अतिशय घाबरट आहे .साधी मुंगी मारायचे धाडस नाही तिला . ती असे करणे शक्यच नाही. इन्स्पेक्टर शिंदे ही केस कशी आणि कधी सोडणार देवत जाणे पण मी मात्र अगदी एखाद्या गुप्तहेर याप्रमाणे काही पुरावा हाती लागतो का याची कसून पाहणी करत होते .कारण श्रुती का माझी जिवाभावाची मैत्रीण होती. ही केस लवकरात लवकर सोडवली जावी ही साऱ्यांचीच इच्छा होती .सर्वांना घराची ओढ लागली होती .श्रुतिकाच्या खूनानंतर या रिसॉर्टवर थांबणे साऱ्यांनाच एक प्रकारची शिक्षा वाटत होते .निदान सर्वांच्या फिंगरप्रिंटचे रिपोर्ट येईपर्यंत तरी इथे थांबणे आवश्यक होते.  एवढ्या दुःखातही अशोक साऱ्यांची काळजी घेत साऱ्यांची चौकशी करून हवे नको ते पाहत होता .बिचारा अशोक त्याच्यासोबत असे व्हायला नको होते. श्रुतिकावर त्याचे मनापासून प्रेम होते .आई-वडिलांचा विरोध पत्करून त्याने श्रुतीकाशी लग्न केले तिच्या सगळ्या हौशी पूर्ण करण्यासाठी आधी नोकरी नंतर सॉफ्टवेअरचा बिजनेस उभारत त्याने स्वतःला यशाच्या शिखरावर नेले.आज सारी सुखे पायाशी लोळण घेत असतानाच श्रुतिकाचे असे अचानक जाणे किती त्रासदायक असेल त्याच्यासाठी ..देव त्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो . एव्हाना जेवणाची वेळ झाली होती .माझ्या सर्व मैत्रिणी जेवणास निघाल्या होत्या ." काय हे अग कुठे हरवलीस ?  एकटीच काय राहते आहेस? सकाळपासून दिसली नाहीस तू? जेवायला तरी येणार आहेस ना आमच्याबरोबर का तेही एकटीने करणार आहेस?" निशा रागाने बोलत होती मी मात्र ते हसण्यावारी नेत त्यांच्यासोबत जेवण्यास निघाले .चूक माझीच होती. हेरगिरी करण्याच्या नादात मी माझ्या ग्रुपला सोडून एकटीच राहत होते सकाळपासून . "ए तो बघ तो कालचाच वेटर आहे ना. काल आपण संध्याकाळी डान्स करत असताना सारखा श्रुतिकाकडे बघत होता ."  "हो ग तोच आहे हा पण कालपासून कुठे गायब झाला होता तो?" निशा व मी दोघीही त्या वेटरचे निरीक्षण करू लागलो .त्याच्या हालचाली मला जरा संशयास्पद वाटत होत्या. तेवढ्यात इन्स्पेक्टर शिंदे तिथे आले. माझा बऱ्यापैकी परिचय झाला असल्याने मी सरळ त्यांच्याकडेच जाऊन त्या वेटरबद्दल कालचा अनुभव त्यांना सांगितला .इन्स्पेक्टर शिंदेनी लगेच त्या वेटरला बोलवून घेतले ."तू इथे वेटरच्या कामाबरोबर  महिलांचे निरीक्षण करण्याचे काम करतो असं माझ्या कानावर आले.". " नाही सर" वेटर चाचरत म्हणाला ."मग काल या सर्वजणी येथे डान्स करत होत्या तेव्हा तू सगळ्यांकडे कसा डोळे फाडून पाहत होता विशेषता श्रुतीका मॅडम कडे?"  " सर फक्त एक दोनदा बघितले.  त्या खूप छान दिसत होत्या म्हणून". " फक्त छान दिसत होत्या म्हणून का त्यांनी घातलेले सोन्याचे दागिने आवडले म्हणून? खरं सांग त्या दिवशी तू त्यांचे दागिने चोरण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेला त्यांनी तुला चोरी करताना पाहिले .त्या तुला रागवल्या कदाचित पोलिसांची धमकी दिली असेल तू त्यांची गायावया केली. माफी मागितली. कसाबसा तिथून निघाला पण त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी तू त्यांना रात्री ठार मारले .बोल असच झालं ना सगळं ? "नाही.. नाही असं काहीच झालं नाही. म्हणजे  तुम्ही म्हणता तसं मला त्यांचे दागिने आवडले होते. ते चोरण्याचे प्लॅनिंग होते माझे. पण हिम्मत होत नव्हती. त्या दिवशी रात्री त्यांनी चहा मागितला म्हणून मी त्यांना नेऊन दिला पण गळ्याशप्पथ सांगतो मी त्यांना मारले नाही." " मग कोणी मारले"? "मला नाही माहिती सर ." "मग तू कालपासन कुठे गायब होता"? "श्रुतीका मॅडमचा खून झाला हे पाहून मी घाबरलो. सगळे माझ्यावरच  संशय घेतील अशी भीती मला वाटली. म्हणून मी इथून निघून गेलो .पण मला गावाकडून फोन आला माझ्या आईचे डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे. त्यासाठी पैसे पाठवायचे होते गावाकडे. म्हणून साहेबांकडून पैसे घ्यायला आलो होतो शेवटी जे व्हायचं  तेच झालं .पण साहेब मी खरंच काहीच केले नाही".  "ठीक आहे .आता तू जाऊ शकतो पण आम्हाला विचारल्याशिवाय तुला कुठे जाता येणार नाही कळलं.." " ठीक आहे साहेब". असे म्हणत तो वेटर तेथून चालला गेला. श्रुतिकाचा कुणी आता लवकरच सापडला जाईल या माझ्या अपेक्षेवर पुन्हा एकदा पाणी फिरले, श्रुतिकाच्या आठवणींचे  सावट साऱ्यांवर अजूनही होते . पुढेही राहणार होते. तिच्या आईची अवस्था तर पहावत नव्हती. डोळ्यातील पाणी थांबत नव्हते त्यांच्या. काल सकाळी तर तिच्यात आठवणीच्या गर्तेत त्यांचे बोट दारात चेंगरले गेले. आम्ही रूम मध्ये गेलो तर बोटाला बँडेज लावून बसल्या होत्या. वेदनेने विव्हळत होत्या. 


         इन्स्पेक्टर शिंदे निघून गेल्यावर निराश होऊन मी माझ्या रूममध्ये जायला निघाले. श्रुतिकाच्या रूम समोरून जात असताना मला तिच्या रूममध्ये कसला आवाज आला. दरवाजा लोटलेलाच होता मी हळूच फटीतून आत पाहिले माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना .अशोक तिच्या खोलीत काहीतरी शोधत होता .बराच अस्वस्थ दिसत होता तो. मी घाईतच तिथून माझ्या रूम मध्ये आले. काय शोधत असेल तो?  श्रुतिका चा खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर करत नसेल?  तसे तर पोलिसांनी त्या रूमची झडती घेतली होती कालच. कदाचित त्याने एखाद्या गुप्त ठिकाणी एखादा पुरावा लपून ठेवला आणि आता तो तो न्यायला आला असेल .  काय करावे कळतच नव्हते. शेवटी न राहून मी इन्स्पेक्टर शिंदेंना फोन करून सारी हकीकत सांगितली. एक गोष्ट चांगली होती ते म्हणजे इन्स्पेक्टर शिंदे समंजस आणि सुस्वभावी असल्याने मी दिलेल्या माहितीचा ते लगेच पाठपुरावा करत .नाही तर एखाद्याला त्यांच्या कामात मी ढवळाढवळ करतीये याचा रागच आला असता .चांगले सुनावले देखील असते मला.  इन्स्पेक्टर शिंदे तसे नव्हते. संध्याकाळी ते रिसॉर्टवर आले तेव्हा आधी ते श्रुतिकाच्या रूममध्ये गेले आणि रागातच बाहेर येत त्यांनी सर्वांना विचारले," श्रुतीकाच्या रूम मध्ये जाण्यास आम्ही सक्त मनाई केलेली असताना कोण गेले होते तिथे ? बऱ्याच वस्तू आम्हाला तिथे विखुरलेल्या दिसत आहेत लवकर सांगा कोण गेले होते तिथे नाहीतर परत फिंगरप्रिंट घ्यावे लागतील ." "मी गेलो होतो श्रुतीकाच्या रूममध्ये ". अशोक समोर येत म्हणाला.  " पण का ? आम्ही सक्त मनाई केलेली असताना तुम्ही का गेला तिथे? कोणते पुरावे नष्ट केले तुम्ही तिथे जाऊन ? आणि केले असले तरी तुम्ही पोलिसांची तावडीतून सुटू शकणार नाही ".  "कोणतेही पुरावे मी नष्ट केले नाही.  मुळात  मी खून केलेलाच नाही."  " मग का केला होता तुम्ही श्रुतिकाच्या रूम मध्ये?".  " सर मला दम्याचा त्रास आहे. आधी तो फारसा जाणवत नव्हता .मागील वर्षी मला फारच त्रास झाला अगदी दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले होते. त्यामुळे इथे येण्या आधीच मी फॅमिली डॉक्टर कडे जाऊन गोळ्या घेऊन आलो होतो. कारण इथे पाऊस व थंडी दोन्ही जास्त असणार मला माहित होते. थोडासा निष्काळजीपणा नंतर त्रासदायक ठरला असता मला म्हणून मी तातडीने दवाखान्यात गेलो होतो. त्या दिवशी निघताना मी त्या गोळ्या श्रुतिकाकडे दिल्या होत्या शिवाय इन्हेलर देखील होते . तिने तिच्या पर्समध्येच त्या ठेवल्या होत्या त्या गोळ्या. श्रुतिकाचा खून झाल्याचे दुःख पचवणे मला खूपच कठीण झाले होते त्यात बाहेर सारखा पाऊस सुरू होता .वातावरण थंड झाले होते दुपारी अचानक मला दम्याचा अटॅक आला. मला खूपच त्रास व्हायला लागला त्यामुळे मी तिच्या खोलीत जाऊन ती पर्स शोधली.  त्या गोळ्या घेतल्या तेव्हा बरे वाटले मला .तुम्हाला हवं तर मी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन दाखवतो ." असे म्हणत अशोक परत श्रुतीकाच्या रूममध्ये गेला तिच्या पर्स मधून त्याने त्या गोळ्या व प्रिस्क्रिप्शन काढून इन्स्पेक्टर शिंदेंना दाखवले.   " ते ठीक आहे पण यामुळे तुमच्यावरचा संशय कमी होत नाही .असेही असू शकते की तुम्ही तिथे वेगळ्या कारणाने गेले असाल आणि आम्हाला वेगळे कारण दाखवत असाल.,". सर  माझे खूप प्रेम होते तिच्यावर.मी तसे का करू?"  " ते कळेलच तपासांती . बर , तुमचे ते बिजनेस पार्टनर कुठे आहेत? "त्यांच्या बहिणीचा नवरा हार्ट अटॅक ने वारला श्रुतिका चा खून झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी .त्यामुळे त्याला तातडीने गावी जावे लागले." " ही गोष्ट कितपत खरी आहे हे आम्ही पाहूच " असे म्हणत इन्स्पेक्टर शिंदे श्रुतीकाच्या खोलीत आणखी काही पुरावे मिळतात का ते बघण्यास गेले .


         माझे तर डोके  कामच करत नव्हते .ज्यांच्या ज्यांच्या संशय होता ते सर्वच आम्ही खून केला नाही असे ठासून सांगत होते. दुसरा कोणी खून करेल असे वाटत नव्हते चार वाजले तेव्हा थोडा कडक चहा घ्यावा व थोडे फ्रेश व्हावे असे मला वाटले वेटरला खोलीत चहा आणण्यास सांगून मी फ्रेश होण्यास गेले. चहा घेतल्यावर जरा तरतरी आली. खाली गार्डनमध्ये जरा चकरा माराव्यात पाऊस थोडा उघडलाय म्हणून मी खाली जाण्यास निघाले तो श्रुतीकाची आई माझ्याकडे येत म्हणाली," बर झालं तू दिसलीस .मी तुझ्याकडेच येणार होते इथे जवळच एक गणपतीचे मंदिर आहे .जरा दर्शन घेऊन येऊ म्हणते तेवढेच अस्वस्थ मनाला शांतता मिळेल .तू येतेस का माझ्यासोबत?" " हो का नाही ? " असे म्हणत मी त्यांच्यासोबत जाण्यास निघाले. बाहेर पाऊस नसला तरी आभाळ भरून आलेले होते .आम्ही भरभर  चलत मंदिर गाठले.  चप्पल काढून आम्ही मंदिरात गेलो .तेवढ्यात श्रुतिकाच्या आईचे लक्ष मंदिराच्या उजव्या बाजूस असलेल्या उमललेल्या गुलाबाच्या फुलांकडे गेले. गणपतीला वाहण्यास एखादे फुल तोडून आणावे म्हणून त्यांची पर्स माझ्याकडे देत त्या फुल तोडण्याकरता गेल्या. त्या येईपर्यंत आपण पाय धुऊन घेऊ म्हणून मी जरा घाईतच उठले तोच त्यांनी माझ्याकडे दिलेली पर्स खाली पडून त्यातील सामान बाहेर पडले .मी जरा खजील होत सामान पर्समध्ये टाकू लागले तेवढ्यात माझे लक्ष गाठ बांधलेल्या रुमालाकडे गेले. काकूंनी  चिल्लर वगैरे बांधून ठेवली वाटतं असा विचार करतच मी ते पर्समध्ये टाकायला लागले पण हाताला ते वेगळेच भासल्याने मी  गाठ सोडली कोणता  तरी फोटो चोळामोळा करून त्यात ठेवलेला होता. मी तो उघडून पाहिला तर समीर कौशिक चा फोटो होता तो. एका बाजूने फाटलेला . मला एकदम काहीसे आठवले आणि अचानक माझ्या छातीचे ठोके वाढले. त्या दिवशी श्रुतिकाच्या देहाजवळ तिचा कोणातरी सोबतचा फोटो फाडून टाकला होता. म्हणजे तिच्या फोटोचा तुकडा तिथे होता पण तिच्या सोबतच्या व्यक्तीच्या फोटोचा तुकडा गायब होता.  म्हणजे तिचा आणि समीर कौशीक चा एकत्रित फोटो कोणीतरी मधोमध फाडून दोन तुकडे केले होते. पण का आणि कशासाठी ?  त्यातील हा तुकडा काकू कडे कसा आला ? त्यांनी तो इतका लपवून का ठेवला? डोके नेहमीप्रमाणे गरगरायला लागलं.मी पटकन तो फोटो रुमाला सहित माझ्या पर्समध्ये टाकला .काकू फुल घेऊन येताच दर्शन घेऊन आम्ही वापस आलो .एक कप गरम चहा घश्या खाली ओतत मी शांत डोक्याने विचार करू लागले. श्रुतिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी भोवतालचा परिसर पाहून वापस येत असताना रिसॉर्टच्या प्रवेशद्वारा जवळ श्रुतिका आणि समीर कौशिक बोलत होते तेव्हा वर गॅलरीतून काकू काहीशा रागातच त्यांच्याकडे पाहत होत्या. बहुता त्या बऱ्याच वेळेपासून तिथे उभ्या होत्या आणि ती दोघं काय बोलत आहेत याचा अंदाज घेत होत्या. पण राग जरी आला तरी काकू श्रुतिका चा खून.. नाही नाही ते शक्य नाही .मायेचे पाश त्यांना असं करू देणार नाही.पण मग तो फोटो त्यांच्याजवळ कसा आणि हो आणखी एक गोष्ट पोलीस सगळ्यांचे फिंगरप्रिंट घेत होते तेव्हाच नेमकी काकूनी बोट चेंगरल्याचे कारण सांगत हाताला बँडेज बांधले होते. आज मात्र त्यांच्या हाताला कुठलेही बँडेज नव्हते. ना जखमेचा व्रण .बापरे !! अवघड वाटत असले तरी इन्स्पेक्टर शिंदे ना फोन करून या गोष्टीची कल्पना देणे गरजेचे होते.

 म्हणजे त्यानुसार त्यांनी त्यांच्या तपासाची सूत्रे फिरवली असती. 

         इन्स्पेक्टर शिंदेंना मी हे सांगताच त्यांची खात्रीच पटली की श्रुतिकाच्या आईनेच तिचा खून केला आहे .फक्त आता त्या फोटोच्या आधारे त्यांच्या तोंडून खरे वदवून घेणे गरजेचे होते .श्रुतिकाची आई तिच्या रूममध्ये माळ जपत बसल्या होत्या . इन्स्पेक्टर शिंदे रूम मध्ये आलेले पाहताच माळ बाजूला ठेवत त्या उठून उभ्या राहिल्या. " अहो मी आलो म्हणून थांबवलेत का माळ जपणे तुम्ही ? चालू ठेवा तेवढेच पाप धुतले जाईल  तुमचे.तुमच्या लेकीच्या खुनाचे." इन्स्पेक्टर शिंदे असे बोलताच काकू ओरडून म्हणाल्या, "काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर ? मी  कोणाचा खून नाही केला .माझ्या मुलीचा खून मी का करेन ? " ,"तेच तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे की काय कारण होते? पुरावा आम्हाला मिळाला आहे " असे म्हणत इन्स्पेक्टर शिंदेने तो फोटोचा अर्धा तुकडा त्यांना दाखवला . "हा फोटो तुमच्या पर्समध्ये सापडला यांना. तुमच्याकडे कसा आला तो फोटो"?   काकूंनी माझ्याकडे रागाने बघत म्हटले ," यावरून हे सिद्ध होत नाही की खून मी केला आहे .," "ठीक आहे. त्या दिवशी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या बोटाला लागले असल्याने तुमचे फिंगरप्रिंट्स घेता आले नव्हते तसे तर आता तुमच्या बोटाला पट्टी नाहीये आणि जखमेची कोणती खूनही दिसत नाहीये बोटावर. तेव्हा आपण तुमचे फिंगरप्रिंट घेऊ"  हे ऐकताच काकू अस्वस्थ होऊन ओरडल्या," मी नाही देणार फिंगरप्रिंट्स .मी खून केला नाही.. नाही.. नाही केला मी खून ". " मग फिंगरप्रिंट तरी द्या नाहीतर गुन्हा कबूल करा"  शिपाई फिंगरप्रिंट घ्या यांचे. " थांबा... हो मीच केला श्रुतिका चा खून ," असे म्हणत काकू जोराने रडायला लागल्या . "तुम्हाला काय वाटलं खूप आनंद झालाय मला तिचा खून करून? हृदय पिळवटून निघते माझं क्षणाक्षणाला .". "मग का केला तुम्ही तिचा खून?"  " श्रुतिकाने आमचा सगळ्यांचा विरोध पत्करून अशोकशी आंतरजातीय लग्न केले. त्याचा धक्का सहन न झाल्याने तिच्या वडिलांना अटॅक आला आणि त्यातच ते गेले. तिच्या मोठ्या बहिणीचेही तिच्या लग्नामुळे लग्न ठरवायला उशीर झाला .दिसायला आणि परिस्थितीने जेमतेम असणाऱ्या तरुणाशी तिचे नाईलाजाने आम्ही लग्न ठरवले. मीनल या लग्नामुळे अजूनही सुखी होऊ शकली नाही . मनावर दगड ठेवून आम्ही साऱ्या गोष्टी पचवल्या. अशोकचा लाघवी स्वभाव आम्हा सगळ्यांना आवडला. तो तिची काळजी घ्यायचा .त्याची आर्थिक स्थिती उत्तमच होती . एवढे असूनही आजकाल समीर कौशिकशी वाढत जाणारी तिची जवळी मला खटकायला लागली होती. मी तिला याबद्दल बोलून विरोधही केला होता पण तिने नेहमीप्रमाणेच लक्ष दिले नाही .स्वार्थीपणाने केवळ स्वतःचाच आनंद सुख बघण्याचे तिचे आता वय नव्हते. तिची एकुलती एक मुलगी तनया तिच्यावर काय संस्कार झाले असते ? माझा जीव तळमळत होता .श्रुतिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी ती आवरण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली. बाकीचे सारे देखील त्यांच्या रूममध्ये तयार होण्यासाठी गेले. वाढदिवसाची  तयारी एकदा नजरे खालून घालीत मी माझ्या रूम मध्ये जाण्यास निघाले तेव्हा समीर श्रुतिकाच्या रूम मध्ये जाताना मी पाहिले . मला आधीच त्यांची वाढत जाणारी जवळी खटकत होती. मी त्यांच्या मागोमात गेले. दार नुसतेच लोटलेले होते. श्रुतिका व समीर बराच वेळ हसत काहीतरी बोलत होते. समीरने चक्क श्रुतिका चा हात हातात घेतला होता तो तिला कोणता तरी फोटो दाखवत होता. अशोकशी घटस्फोट घेऊन तिला समीरशी लग्न करायचे होते. त्यांच्या त्याच गप्पा चालल्या होत्या.  मला हे सहन झाले नाही .पैशाच्या ,स्वार्थाच्या हव्या सापोटी तिची डासाळणारी नैतिक मूल्य पाहून माझे मन पिळवटून निघत होते. हे प्रकरण पुढे वाढले तर पुन्हा बदनामी होईल. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होईल. समीरला बोलून फायदा नाही त्यामुळे तो गेल्यावर मी तिच्या रूममध्ये जाऊन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती नेहमीप्रमाणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शिवाय तिने समीर सोबत ड्रिंक देखील घेतले होते .शब्दाने शब्द वाढत गेला मी तिचा व समीरचा कॉटवर ठेवलेला फोटो फाडून टाकला  तेव्हा तिने चक्क रागाने तिथे टेबलवर ठेवलेला चाकू माझ्यावर उगारला. माझाही राग अनावर झाला. अशी अवगुणी मुलगी असल्यापेक्षा नसलेली बरी. रागाच्या भरात मी तिच्या हातातून तो चाकू हिसकावून घेत तिच्यावर वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. मी भानावर आले.

. काय करावे सुचेना. मी पटकन रुमालाने चाकू पुसला. तिच्या हातात ठेवला. फोटोचे तुकडे त्याच रुमाला गुंडाळले आणि माझ्या रूम मध्ये आले .पण चुकून त्या फोटोतील एक तुकडा माझ्याही नकळत खाली पडला आणि त्यानेच घात केला असे म्हणत काकू पुन्हा रडायला लागल्या. आम्ही सारे सुन्न होऊन ऐकत होतो .इन्स्पेक्टर शिंदे काकूंना घेऊन गेले आम्ही सारे आपापल्या घरी दुःखी मनाने जाण्यास निघालो .बाहेर पाऊस कोसळत होता पण आज मनातल्या पावसाने कहर घातला होता कारण आज उद्ध्वस्त झाले होते एक सुंदर हसरे घर...!!


✍????सौ.दीप्ती समीर कुलकर्णी...

      औरंगाबाद.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू