पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महाभारतातील एक पात्र--- द्रौपदी

ललित लेखन    महाभारतातील एक पात्र--- द्रौपदी!



तेजस्विनी.. लावण्यखणी.. स्वाभिमानी..शूरवीर पांडवांची लाडकी राणी...महाराणी.. सम्राज्ञी... याज्ञसेनी..    इंद्रप्रस्थ राज्याची स्वामिनी..  द्रौपदी...  महाभारताची महा नायिका..!!????


          द्रुपदराजाची दुहिता.. यज्ञातून प्रगट झालेली ती अग्निप्रमाणे पवित्र..याज्ञसेनी.. पांचाल नगरीत जन्मलेली पांचाली सुकुमार..सुकोमल..सुकेशिनी.. सुरूपिणी.. कृष्णसखी कृष्णा.. 

तिचे वर्णन करावे तेवढे थोडेच.!पण तरीही संपूर्ण महाभारताचा विचार केल्यास  एक स्त्री म्हणून तिचे स्थान थोडे  दुय्यम वाटते आहे. महाभारत घडविण्याच्या दोषही तिला दिला जातोय. 

      

        अर्जुनाने मत्स्यनेत्र भेदून स्वयंवराची अट पूर्ण केली. नी पांचाली ने त्याला वरले. पण पांडव माता कुंतीने,भिक्षा आणली असे समजून भिक्षा पुत्रांनी वाटून घ्यावी असा आदेश दिल्याने ती पांच पांडवांची पत्नी झाली.  इथे तिच्या इच्छेचा विचार झालेला दिसत नाही. उलट,ज्याने स्वयंवर जिंकले त्या अर्जुनावर तिचे विशेष प्रेम होते याचा तिलाच दोष दिला जातो. 


          अतिशय सुंदर असल्याने तिचा मोह दुर्योधनालाही झाला होता. पांडवांना राज्य मिळू नये म्हणून द्यूत खेळण्याची कुटील निती करण्यांत आली.  त्यांत युधिष्ठिराने सर्व काही गमावले. द्रौपदीला ही पणाला लावून तो तिला हरला. तेव्हा ,स्वत:ला पणाला लावून हरल्यानंतर त्या राजाला पत्नीला पणाला लावण्याचा अधिकार आहे का? असा तडफदार सवाल तिने राजसभेत केला. स्त्रीच्या हक्कांविषयी उठणारा हा सवाल असा पुरातन काळचा आहे.जो आजच्या काळातही  अनुत्तरीत वाटतो आहे. इथे द्रौपदीचा बाणेदारपणा.. स्वाभिमानी वृत्ती.. लढाऊ वृत्ती दिसून येते. 


           त्यानंतर त्या तेजस्विनी चा  जो  अपमान केला गेलाय,इतके लांच्छनास्पद कृत्य इतिहासात दुसरे कुठले नसेल. एका , त्यांच्याच कुळातील राणीला भर सभेत ओढत आणून तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करण्यांत आला.  तिचे पाच शूरवीर पती,सासरे ,आजेसासरे काहीच करू शकले नाहीत तेव्हा तिचा कृष्णसखा मदतीला धावून आला व वस्त्रे पुरवून लज्जा रक्षण केले. स्त्रीच्या प्रश्नांना वाचा फोडणारी ती महाभारतील पहिली स्त्री होती. ????????

      

         पांडवांना राज्य मिळाले नाही .त्यांना बारा वर्षे वनवास नी एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला.  वनवासांतही तिची खूप परिक्षा पहाण्यात आली. सर्वांचे जेवण झाल्यावर ,अक्षय थाळी धुवून ठेवल्यावर दुर्वास ऋषींना त्यांच्याकडे पाठविण्यात आले.  भोजन पूर्तता न झाल्यास कोपीष्ट दुर्वास ऋषींचा शाप नक्की मिळणार होता पण मदतीला पुन्हा कृष्णसखा हाजिर! भाजीचे एक पान अक्षय पात्राला चिकटले होते त्यामुळे पात्रातून पुन्हा अन्न निर्मिती  करण्यांत  आली नी प्रसंग निभावला.


           अज्ञात वासांत तर  या सम्राज्ञीला दासी बनावे लागले. तिथेही सौंदर्यामुळे तिला किचकाचा सामना करावा लागला.  भीमाने किचकवध करून तिला वाचविले.  काय हे तिच्या नशिबाचे भोग! राणी असूनही दास्यत्व स्विकारावे लागले. 


   कौरव पांडवांच्या युद्धात तर,तिचे पांच पुत्र कपटाने मारण्यात आले .केवढा हा पुत्रशोक!  तिचे वडिल,भाऊ यांनाही या युद्धात तिने गमावले. राजकन्या असो..महाराणी असो ..की सम्राज्ञी...पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे!! प्रारब्धापुढे कोणाचेही चालत नाही.


        पुढे युद्ध जिंकून युधिष्ठिर सम्राट झाला. द्रौपदीही सम्राज्ञी झाली. पण खूप मोठी किंमत चुकवावी लागली. सगेसोयरे..पुत्र पौत्र. सैन्यसैनीक.. भीष्म पितामहसारखे अनमोल हिरे गमवावे लागले.   पांचाली सैरभैर झाली. कृष्णसख्याने  तिला मग समजावले.


 बरीच वर्षे राज्य केल्यानंतर पांच पांडव नी द्रौपदी स्वर्गारोहण करते झाले. त्यात पहिल्यांदा तिचाच मृत्यु झाला. कां तर ,तिचे पांच पांडवामध्ये अर्जुनावर  जास्त प्रेम होते. अर्जुनानेच जर पण जिंकला होता तर तिला तसे वाटणे सहाजिकच आहे न!  हो की नाही!



    अशी ही श्यामल कृष्णा...कृष्णसखी.. निर्धारी,.. पतिव्रता...पंच कन्या मध्ये जिचा समावेश आहे.;ज्यांच्या स्मरणाने मनुष्य शुद्धचित्त होतो.‌,पापमुक्त होतो... अशी...अत्यंत स्वाभिमानी... आत्मनिर्भर...आत्माभिमानी  शूरसेनी.... द्रौपदी....! महाभारतातील तिचे हे  स्त्रीपात्र  म्हणूनच सर्वांना प्रिय आहे.  


सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर 





      




             

 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू