पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती पावसातली भेट ( आमची लव स्टोरी )

" ती पावसातली भेट "
(आमची लव स्टोरी )


आजही आठवतोय तो दिवस 25 जुलै

 2010 श्रावण नुकताच सुरु झालेला . मी माझ्या ऑफिस मध्ये कामात गर्क होतो आणि मोबाईल वर कॉल आला. आणि माझे नाव विचारून समोरच्या व्यक्ती ने हसत माझी विचारपूस केली. मला तिने स्वतः बद्दल काहीच न सांगता तिने माझ्या बद्दल बरेच काही विचारत होती. बोलता बोलता तिनेच सांगितलं की माझ्या एका नातेवाईकांनी तिला माझा बायोडेटा  पाठवला होता. स्थळ आहे म्हणून.


मला ही  नवलंच वाटले की इतक्या हळुवार प्रेमळ बोलणारी व्यक्ती कोण आणि माझी सर्व माहिती तिला कशी?  खूप छान बोलत होती. साधारण अर्धांतास बोलून तिने फोन ठेवला. मी हीं ऐकत होतो प्रेमळ आवाजात जादू होती. छान अहो-जाहो मोठया आदराने बोलत होती.

पुन्हा फोन करणार असे मला सांगितलं होतं. म्हणून मी तिच्या फोन चीं वाट पाहू लागलो. ती रात्र गाढ विचारात गेली माझी. दुसऱ्या दिवशी नेहमी पेक्षा मी लवकर तयार झालो आलो आणि ऑफिस ला पोहोचलो. का, कोण जाणे  माझे सारखे मोबाईल कडे लक्ष होते. त्या गोड आवाजाच्या  व्यक्ती शी कधी बोलतोय असे झाले होते,

 मला अनेक प्रश्न मला तिला विचारायचे होते.तिची ओळख वाढवायची होती. सकाळी 9 वाजल्या पासून दुपारी 4 पर्यंत मी फोन ला एकटक पाहत होतो. अखेर माझं सबुरीचीं वेळ आली आणि तिचा फोन 4.30 वाजता आला. ती  लँडलाईन वरून बोलत असल्यामुळे मला कळायला भाग नव्हते कुठून बोलतेय. कसे आहात तिने विचारताच  मी  लगेच तिला म्हटलं प्लीज आपण तुमच्या बद्दल सांगा. तिने  मला माझ्या नातेवाईक यांच्याकडुन तिचे नातं सांगितलं आणि सध्या गोदरेज मध्ये  सर्व्हिस करीत आहे असे सांगितले. तिने काय करते, कुठे राहते ते सांगितले पण नाव सांगितले नाही. म्हणून मला मला थोडे वाईट वाटले होते. तिने मला भेटून स्वतः नाव आणि काही गोष्टी सांगेन असे कबूल केले होते. या वेळी तिने मला तिचा मोबाईल नं. दिला होता. आणि कधीहीं कॉल करू शकता असे सुचविले होते.


मीही तिला अधून मधून कॉल करू लागलो होतो. नकळत आमची फोन वरून खूप सुंदर मैत्री झाली होती. मी  तिला तिचे गोड आवाजावरून '  डॉली ' असे नाव ठेवले होते.
आमच्या दोन्ही कुटुंबातील लोकांना कदाचित माहिती नव्हते. की आम्ही बोलतो आणि आम्ही ओळखतो.

असेच बोलत आम्ही 15 -20दिवस  झाले. आणि आम्ही भेटण्याची वेळ ठरवूया असे नक्की केले. निसर्गाला हीं आम्हाला भेटू द्यायचे नव्हते. नेमके आम्ही भेटणार त्या दिवशी पावसाने मुंबईला झोडपून काढले आणि ट्रेन बंद असल्यामुळे  आम्हाला भेटता आले नाही. आतुरता वाढत होती. त्या दिवशी मी तिला सुखरूप आहात ना म्हणून विचारपूस केली आणि मोजकेच बोलून फोन ठेवला. पाऊस हा प्रत्येकाला आवडतो. तसा मला हीं आवडतो पण त्या दिवशी मला त्या पावसाचा राग येत होता. माझ्या आवडत्या व्यक्ती ला भेटण्याची वेळ चुकली होती.


  मी पुन्हा पाऊस कमी होवो न होवो. तिला भेटण्यासाठी कॉल केला आणि तिने हीं वेळ नक्की न सांगता येण्याची तयारी दाखवली. पाऊस येत जात होता. संध्याकाळी तिचे ऑफिस 5.20 ला सुटल्यावर ती येणार होती. ती विक्रोळी आणि मी भांडुप मध्ये असल्यामुळे  आम्हाला जास्त वेळ प्रवास नव्हता. संध्याकाळी पाऊस ओसरला होता वातावरण शांत आणि गार होते. तिला किंवा मला कुणी ओळखीचे भेटू नये म्हणून मी तिला कांजूरमार्ग स्टेशन जवळ हुमा मॉल  येथे बोलावले. मी इतका भेटण्यासाठी आतुर होतो की घाईत छत्री घेतलीच नाही. मी 5 15 ला  पोहोचलो. आणि तिला फोन केला. तिने हीं 5.30 पर्यंत येते म्हणून सांगितले. वेळ जात नव्हता मी मॉल शेजारी तब्ब्ल  3  वेळा  चहा घेतला. त्यावेळी मटका चहा कांजूरमार्ग मध्ये फेमस होता. तोही 10 रुपये..


असो  डॉली च्या येण्याची मी वाट पाहत होतो शेवटी न  राहवून मीच  स्वतः  रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म वर  जाऊन उभा राहिलो. तिचा फोन वाजत होता रिंग वाजतेय पण ती उचलत नव्हती. म्हणून मी बेचैन झालो म्हटलं हीं आजपण भेटणार नाही वाटतं.
मोबाईल कडे पाहत इकडे तिकडे करीत होतो इतक्यात  फोन वाजला. मला तिचा समोरून फोन आला की मी समोरच्या प्लॅटफॉर्म वर आली आहे. माझी नजर तिला चोहोबाजूने शोधत होती. ओळखणार कसे पहिलेच नव्हते.  तिनेच मला सांगितले की काळा पांढरा ड्रेस परिधान केला आहे आणि तिच्या गळ्यात ऑफिसचे आयकार्ड आहे. मीही साधारण प्लेन पिंक  शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलीय असे तिला सांगितले होते. काही क्षण जातात न जाताच या मला मागून खांद्यावर हात ठेवून लपल्या. मीहीं आता खूप मोकळा मित्र झालो होतो. तिला  पाहताच मला कळलेच नाही की मी आज पहिल्यांदा भेटतोय. ती सुंदर दिसायला होती, नाजूक, बारीक, खूप बोलकी होती मला ती आवडेन की नाही यात मला शंका होती. कारण मी बारीक उंच, हडकुळा होतो. माझे टापटीप राहणीमान, स्वच्छता आवडते हे मी तिला सांगितले होते. आम्ही लगेच तिथे उभे राहून गप्पा न मारता काही नास्ता करीत बोलू या म्हणून जवळच्या " मीटिंग पॉईट " या  हॉटेल मध्ये गेलो. नवल बघा आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि योगायोग की काय हॉटेल चे नाव पण "  मिटिंग पॉईंट ".  खास आमच्या सारख्याना  भेटण्यासाठी असावे म्हणून की काय.


मी  डॉली च्या पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटल्यावर तिला तिचे खरे नाव विचारायचं असे पक्क ठरवलं होतं. तिचा नेमका उपवास आहे म्हणाली म्हणून मी  पोटॅटो चिप्स मागवले आणि चहा. ऑर्डर आली आणि तिचे आयकार्ड मला टेबल वर ठेवले होते ते मला बघायला मिळाले. नावं होतं. वृषाली गणपत भगत. पोस्ट - ऍडमिन. मी तिला म्हटलं का खरे नावं सांगितलं नाहीस तर ती म्हणाली भेटून सांगायचं होतं.  आणि मी डॉली नावं ठेवलं हे ऐकून तिला हसू आलं. आम्हा दोघांना प्रत्यक्ष भेटून खूप समाधान झाले होते तिने माझा बायोडेटा आणि माझा स्वभाव कसा आहे याची खात्री केली होती. आणि म्हणूनच ती मला भेटायला आली होती. आम्ही  सलग दोन तास आम्ही गप्पा मारीत  चिप्स खाण्यासाठी वेळ दिला. मला ती आवाजामुळे आवडू लागली होती. आणि प्रत्यक्ष पाहिल्यावर मी तिच्या प्रेमातच पडलो. वेळ तसाच थांबून राहावा असे वाटत होते. तिने मला बोलता बोलता माझा तिच्या घरच्यांना भेटण्याची इच्छा आहे हे कळले. ऐकून आनंद झाला. कसे दोन तास भेटीला झाले कळलेच नाही.

 आम्ही हॉटेल बाहेर पडणार तोच पाऊस सुरु झाला. थोडेसे पुढे गेलो नाही तोच पाऊस जोरात पडू लागला, मी छत्री विसरलो होतो तिच्या बॅगेतून तिने छत्री काढली आणि पटकन उघडली आणि चल म्हणाली मी थोडा लाजत होतो, अचानक पावसाने आम्हाला जास्त जवळ आणल्याने मला मनातून आनंद झाला, छोटया छत्रीत दोघेही होतो , मी उंच असल्यामुळे छत्री घेऊन तिला सांभाळून मी जास्त भिजत होतो, तिला जाणवलं आणि खूप प्रेमाने तिनेच पुढाकार घेऊन मला बिनधास्त राहा म्हटलं, मलाही खूप बरं वाटलं एका छत्रीत दोघेही.  नकळत मला तिच्या खांद्यावर हात ठेवावयास मिळाला आणि तिनेही मला आपलंस केलं. मला तिचा स्पर्श आंनंदून गेला हवाहवासा वाटू लागला. काही पावले मस्त छान सोबत पावसात भिजत भिजत आम्ही स्टेशनं जवळ आलो. मी खूप खूष होतो. दूर जावे वाटतंच नव्हते. मी तिच्या प्रेमात तुडुंब बुडालो होतो. काही वेळ जास्त सोबत व्हावी म्हणून मी पुन्हा चहा घेऊ असा आग्रह केला आणि जवळच्या टपरी वर कटिंग  चहा मागविला तिने एकच सांगितला होता. मला चहा आवडतो हे तिला कळून चुकले होते. पावसात गरमा गरम चहा फुरके मारत पिण्याचीं  मजाच कमाल असते. मी हळूच चहा आनंद घेऊन तिला पाहत पीत होतो मध्येच मी तिला पडताळण्यासाठी माझा चहा ऑफर केला, तेव्हा तिनेही तो चहा माझ्या हातून घेत माझा विस्वास सार्थ केला. तिला हीं मी आवडलो होतो.


  आता पाऊस गेला होता, छत्री बंद होऊन चहा सपंला होता. पुन्हा हा पाऊस असाच पडत राहो आणि छत्रीत  एकत्र राहण्याचा आनंद मिळावा असे वाटत होते. आम्ही आता खूप जवळचे झालो होतो मी तिला माझी संमती दिली होती सोबतच तिला लग्नाचे  वचनहीं दिले. ती  हसली आणि धावतच  रेल्वे प्लॅटफॉर्म वर गेली. मी  ती फलाटवर  जाई स्तोवर पाहत होतो ट्रेन आली आणि तिने पकडली व हळूच हसत मागे माझ्याकडे मी दिसें पर्यंत पाहत राहिली.
ती पावसातली भेट, माझी आणि वृषाली चीं आयुष्य बदलून टाकणारी झाली. माझी  फोन मधील मैत्रीण  डॉली  आता  वृषाली आहे मी काही महिन्या नंतर मी माझ्या घरच्यांना सांगितलं आणि आम्ही रीतसर 15  आगस्ट 2010 ला मागणी घातली. माझ्या प्रेमाचे मी लग्नाच्या बेडीत परिवर्तन केले.


30 नोव्हेंबर 2010 ला खूप धूम धडाक्यात देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, सर्व नातेवाईकांच्या मनाप्रमाणे लग्न केले.

आज मी पावसाचे आभार मानतो, डॉली  मैत्रीण नंतर  प्रेयसी वृषाली  आणि नंतर माझी प्राणसखी, अर्धांगिणी कधी झाली हे कळलंच नाही.
त्या पावसाने  कळत नकळत मला प्रेम, करायला शिकवले.व माझे प्रेम मला मिळवून दिले.


ती पावसातली  भेट.
माझ्यासाठी
अविस्मरणीय आणि सुखद  आयुष्य बदलवून टाकणारी ठरली.
तेव्हापासून मी, व  वृषाली पावसाच्या आठवणी कायम जपतो


आणि एंजॉय करतो.






लेखक : श्री. लव गणपत क्षीरसागर
9867700094 ( विक्रोळी )

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू