पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मोबाइल चा अतिरेकी वापर

शाळा कॉलेजमध्ये, मराठी असो , हिंदी असो वा इंग्लिशचा पेपर, परीक्षेत निबंध म्हंटला की हमखास येणारा एक विषय असायचा...

" विज्ञान शाप की वरदान" ?

मानवाने त्याच्या कुशाग्र बुद्धीने विज्ञानात उत्तरोत्तर प्रगती केली...निरनिराळे शोध लावले... पण त्याचा चुकीचा वापर केल्याने काही शोध घातक ठरले, तर काही शापित....

"मोबाईल" ....हा विज्ञानाचा अतिशय प्रगत शोध आहे...पण अति तेथे माती, म्हणजे करायला नको तिथे आणि नको तितका त्याचा वापर केल्यामुळे शाप आहे की काय असे वाटायला लागले...

कोरोना काळात तर त्याचे भरभरून पीक आले...मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून " online teaching" सुरू केले. आणि धड बोलताही न येणाऱ्या मुलांच्या हातात.. *officially*.. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर द्यावे लागले ..नाही म्हणायला सुरुवातीला त्याचा योग्यच वापर झाला..

नंतर जसजसा कोरोना वाढत गेला तसे कुणाकडे जायचे नाही,
बागबगीचे बंद झाले...मैदानी खेळ बंद पडले..मित्र भेटणे बंद झाले... मन रमवणार तरी कसे? आणि मग अभ्यासापेक्षा टाईमपास म्हणून मोबाईलचा उपयोग सुरू झाला...आपसूकच सर्व ॲप
माहीत झाले.. सर्वजण मोबाईल मध्ये चॅट करताना घरातील लोकांशी बोलणे मात्र कमी झाले..

मोबाईल आपल्यासाठी आहे,
आपण मोबाईलसाठी नाही. त्याला हातात नाही तर आपल्या मुठीत ठेवा..त्याच्या अधिन आपण जायचे नाही . तर त्याला गरजेपुरता आपण वापरायचे.. हात आपल्या लोकांचा धरा..
अपघात झाला तर मोबाइलवर फक्त जागा कळवू शकतो आपण, पण पुढची धावपळ आपली माणसं करणार हे विसरू नका..

शाळेत लक्ष नसलं तर शिक्षक खडू मारून फेकत आणि विद्यार्थी खडबडून जागा होई...पण मोबाईलचे काय ? मुले मोबाईल बंद करून, लाईट गेले, मोबाईल चार्ज नव्हता ही कारण सांगून online क्लास bunk करू लागले.

3G, 4G, 5G update करताना, अन् त्यांच्या terms & condition accept करताकरता मुले त्यांच्या...गुरूG चे ... (गुरुजी,टीचर) आज्ञापालन करायचे विसरली...त्यामुळे ही Generation अधोगतीला तर जाणार नाही ना अशी भीती वाटते...

पूर्वी आई वडीलांसोबत किंवा मोठ्या भावाबहिणींसोबत पिक्चर बघितले जायचे..ते सुद्धा निवडक.. देवांचे, संतमहात्म्यांचे, कौटुंबिक वगैरे... आणि आता तर काय?.... गोष्टी सांगणारे आजी आजोबा आणि अभ्यास घेणारे आईवडील स्वतःच मोबाईलच्या अधिन गेल्यावर, मुलांना मोबाईलचे व्यसन न जडले तरच नवल!!

गूगल, यूट्यूबवरून मुलं सर्रास कुठलेही पिक्चर बघतात.. नको त्या वयात नको ते बघायला, वाचायला मिळते...नको त्या गोष्टींची उत्सुकता वाढली...पोर्न व्हिडिओमुळे लैंगिक आणि हिंसक प्रतिक्रिया वाढली..अत्याचार, बलात्कार वाढण्यास सोशल मीडिया हे सुद्धा कारणीभूत आहे...कारण मुले त्यांची उत्सुकता प्रत्यक्षात उतरवायला लागले..
"त्याला शिक्षा नाही झाली, तर माझे कोण काय वाकडं करणार"... ही प्रवृत्ती वाढली..

खरे तर आपण जगातील घडामोडी, भौगोलिक माहिती, फळाफुलांची, प्राण्यांची इत्यंभूत माहिती गूगल मधून कळावी म्हणून हे ॲप वापरण्याऐवजी त्याचा नको ती माहिती हुडकून काढण्यासाठी वापर केला तर त्यात त्या निर्जीव मोबाईलचा दोष म्हणता येईल का?

मोबाईलवरून पोलिस गुन्हेगाराचे लोकेशन ट्रॅक करू लागले तसे गुन्हेगार मोबाईल दुसरीकडे ठेवून तिसरीकडे पळू लागले...पोलिसांच्या तपास कार्यात अडथळे येऊ लागले...

हळू हळू मोबाईलवर रमी पत्ते...हे game सुरू झाले...
थोडक्यात काय तर एकप्रकारचा जुगार सुरू झाला..

ग्राहकांना बँकेच्या लांबच लांब रांगेत उभे राहायला लागू नये, गरजेच्या वेळी क्षणात पैसे पोचावे, या हेतूने मोबाईल बँकिंग सुरू केले..त्याचाही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी एखाद्याचे अकाऊंट साफ करण्यासाठी उपयोग केला असेल तर त्यात मोबाईलचा काय दोष??.

बँकेतून फोन करतोय असे सांगून ग्राहकांना Otp मागून Fraud, Cyber क्राईम सुरू झाले..सेकंदात लाखांचा balance zero वर यायला लागला...

एटीएम पिन, ऑनलाईन बँकिंग पासवर्ड, हे डोक्यात ठेवण्याऐवजी मोबाईल मध्ये सेव्ह होऊ लागले...पण तो कुप्रवृत्तीच्या माणसाच्या हातात पडला तर? हा विचारही डोक्यात न येण्याइतके आपण मोबाईलवर विश्वास ठेऊ लागलो...जणूकाही मोबाईल हॅकर्सला आपणच आपले अकाऊंट साफ करण्याचे लायसेन्स दिले...

किराणा दुकानाची यादी, पिझ्झा बर्गरची ऑर्डर, ऑनलाईन कंपन्यांना देऊन त्यांना आपण आपले डिटेल्स, घराचा पत्ता देऊ लागलो. घरबसल्या सर्वच मिळते म्हंटल्यावर शारीरिक हालचाली मंदावल्या. वजन उचलायची सवय गेली... शारीरिक वजन मात्र वाढत गेले...

लग्न झालेल्या मुलींच्या संसारात ढवळाढवळ करण्याचे प्रकार वाढले ..वाचायला जरा रुचणार नाही...पण नाकारले म्हणून सत्य खोटे ठरत नाही...मात्र ही वस्तुस्थिती आहे...पूर्वी
पत्रानेसुद्धा मुली आपले प्रोब्लेम सांगू शकत नव्हत्या. कुणी आपले पात्र वाचले तर, कोण काय म्हणेल याचेही दडपण असायचे..

पण मोबाईलच्या जमान्यात काय होतंय की, लग्न झालेल्या, नोकरी करणाऱ्या पोरीचा पाय घरात पडतो न पडतो...तो पर्यंत आईचा फोन किणकिणतो..
" काय ग आलीस का घरी, थकली असशील ना, सासूबाईंनी काही स्वयंपाकाची तयारी केली की नाही, की तूच आता सर्व करणार ? आराम कर जरा.. आणि त्यांनाही कामाला लाव... नाहीतर ये चार दिवस माहेरी" ..

अरे मुलीला उजवायची जेवढी घाई, त्यापेक्षा माहेरी परत आणायची जास्त घाई....नवीन नवरी नवऱ्याच्या घरात रमायच्या आधीच तिचे ब्रेन वॉशिंग सुरू होते...आणि मुलीचे डोकं उलट चालू लागत. मग वादविवाद आणि कलह सुरू होतात...हे सर्वच घरात होते असे नाही....पण असेही होत हे नाकारून चालणार नाही..

बाईच्या तालावर नाचणाऱ्या माणसाला " बाईलवेडा" म्हंटले जाते..आता तर सर्वचजण
"मो..बाईल " वेडे झालेत. ऑनलाईन फ्रेंड्स वाढले..त्यातून फसवेगिरी वाढली..

अभ्यासासाठी दिलेल्या
" स्टडी रूम " च्या बंद खोलीत बॉयफ्रेंडला, हवे तसे व्हिडिओ काढून पाठवणे, आणि बरबादीला आमंत्रण देणे, हे तर मोबाईलच्या
शोधामागाचे उद्देश नव्हते ना? दूरवर राहणारा माणूस जवळ आहे असे वाटावे म्हणून व्हिडिओ कॉल वरून बोलणे व्हावे हा उदात्त हेतू बाजूला राहिला...गैरवापर माणूस करतोय...बदनाम मात्र मोबाईल होतोय..

प्रेमात असताना मोबाईल मध्ये काढलेले फोटो नंतर त्याच प्रेयसीला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जातात...हे प्रगत माणसाचे लक्षण आहे का?

आणि आता तर मोबाईल "चॅटिंग" द्वारे धर्मांतर घडवून
आणण्याचा घातक प्रकार चाललाय...अजून किती नुकसान होईपर्यंत मोबाईल कुरवाळत रहायच ????

उठता बसता, खाता पिता हातात मोबाईल लागतो.. टॉयलेटमध्ये मोबाईल नेणारे महाभागही काही कमी नाहीत...
मोबाईल चार्जिंगला लावला
असेल तरी पाच मिनिट धीर धरवत नाही..बोलणे चालूच...

प्रत्येकाचे व्हॉट्सॲप ग्रुप तरी किती!!...एकदा सुप्रभात, शुभरजनी म्हणून मन भरत नाही... चारचार वेळा तेच msg फिरत राहतात...आणि महत्वाचे msg वाचायचेच राहतात...

किचनमध्ये गॅसमुळे मोबाईलने पेट घेतल्याच्या किती तरी बातम्या कानावर येतात...

पाण्यात बुडणाऱ्याला वाचवायचे सोडून, पडणाऱ्याला मदतीचा हात द्यायचा सोडून, रस्त्यात मुलीला छेडणाऱ्याला अद्दल घडवायचे आणि मुलीची अब्रू वाचवायची सोडून व्हिडिओ कसले हो काढतात मुर्दाड मनाचे लोक..

मोबाईलने डोळ्यांचे आजार वाढले, मेंदूवर, झोपेवर, स्मरणशक्तीवर परिणाम झाला, ताणतणाव वाढून नैराश्याचे बळी वाढले..मानदुखी, पाठदुखी वाढली...आता तरी त्याचा अतिरेकी वापर थांबेल का ?

बऱ्यावाईट, अतिमहत्वाच्या बातम्या तत्परतेने कळाव्या म्हणून मोबाईलचा उपयोग होण्याऐवजी खोट्या राजकीय बातम्या पसरवून धार्मिक दंगली घडवून आणण्यासाठी साठी त्याचा वापर केला जाऊ लागला...

घराला कुलूप लावून
सहकुटुंब " Long Tour " वर फिरायला गेलेल्याचे फोटो प्रत्येक दिवशी फेसबुकवर, इंस्टाग्रामवर लोकेशनसहित टाकणारी मंडळी चोराला जणू आता घर तुमचेच आहे, असे आमंत्रण देतात की काय?..

नदीच्या किनारी आहोत, की डोंगर कड्यावर आहोत याचे भान न ठेवता सेल्फी काढताना जीव धोक्यात घातलेले, जीव गमावल्याच्या किती बातम्या ऐकायला मिळतात...

टूव्हिलरवर ट्रिपलसीट बसून एका हातात बाळ एका हातात मोबाईल असल्यावर अपघात न वाढले तरच नवल...

एकवेळ खाण्यासाठी पैसा नसेल पण मित्रमंडळीत शान वाढण्यासाठी मात्र लाखोंचा मोबाईल आणि त्याला साजेसे हजारोंचे कव्हर ही जास्त गरजेची वस्तू वाटायला लागली ..

नुकतेच NEET या परीक्षेत देशात प्रथम आलेल्या नवीन खंडेलवाल या विद्यार्थ्याने त्याच्या यशाचे गुपित सांगताना " गेल्या दोन वर्षात त्याने एकदाही स्मार्टफोन वापरला नाही...आणि दिवसभरात सात ते आठ तास अभ्यास केल्याचे सांगितले"....ते वाचून तरी आपल्याला मोबाईल बाजूला ठेवायची...आपला मौल्यवान वेळ सत्कारणी लावायची बुद्धी सुचली तरी खूप झाले..
विरंगुळा म्हणून मोबाईल वापरा, व्यसन म्हणून नको..

मोबाईलवर "वाद" वाढवण्या पेक्षा समोरा समोर भेटून "संवाद" वाढवा.. 

सौ.सरोजिनी दिलीप बागडे,

मोबाईल नंबर...9833556629
डोंबिवली..
दि. २१.०६.२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू