पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रावकवी ना. धों. महानोर

१९८७ साल असावे. तेव्हा मी अलिकडेच निवडणुकांवरून चर्चेत आलेल्या एस. टी. बँकेत शाखा तपासणीस म्हणून कार्यरत होतो. एकदा औरंगाबादवरून एस.टी.ने जळगावला निघालो होतो. मी व माझ्या परिचयातला नायर नावाचा एक दाक्षिणात्य असलेला एस.टी.चा अधिकारी आम्ही क्रमांक १ व २ च्या सीटवर बसलो होतो. बस सुटायच्या वेळी एखाद्या ग्रामीण नेत्यासारखे वाटणारे एक आदबशीर व्यक्तीमत्वाचे गृहस्थ चार पाच गावकऱ्यांसोबत बसमध्ये चढले. कंडक्टरने आदबीने पुढे येऊन तीन चार नंबरवर बसलेल्या पॅसेंजरना उठवून तिथे त्यांना बसायला जागा करून दिली. पण " बसलेल्या माणसांना उगीच कशाला उठवताय?"असे म्हणत ते गृहस्थ आपल्या सोबतच्या माणसासह ड्रायव्हरच्या सीटच्या मागील, रिकाम्या बाकड्यावर बसले.
बस सुरू झाली. माझ्या सोबतचा मित्र मधूनच पाय लांब करून समोरच्या बाकड्यावर ठेवायचा. बसने थोडेसे जरी वळण घेतले तरी त्याचे पाय सतत त्या गृहस्थांना लागायचे. ते गृहस्थ त्या गावकऱ्यांबरोबर त्यांच्या काही मागण्या संबंधात चर्चा करत होते. माझ्या मित्राचे पाय त्यांना सतत लागायचे पण ते गृहस्थ जराही विचलित होत नव्हते. मला मात्र ते बघवेना, मी माझ्या मित्राला दोन-चार वेळा सांगून पाहिले पण त्याच्या डोक्यात काही शिरत नव्हते. शेवटी मी त्याच्यावर खेकसलो. तेव्हा ते समोरचे गृहस्थ म्हणाले, "जाऊ द्या हो साहेब, जोंधळ्याच्या रानात तण उगवते, ते जोंधळ्याच्या धाटाबरोबर वैऱ्यासारखे वागते. त्याचे अन्न खाते पण ते धाट त्याच्या वागण्याकडे लक्ष देत नाही; जाऊदे, खाऊदे म्हणते. तसे आपणही क्षमाशील असावे लागते. तुमचे शेजारी काही माझे वैरी नाहीत, अशा बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचे नसते आणि खरे सांगू, आमच्यासारख्या समाजकारण करणाऱ्या मंडळींनी तर अधिक सहिष्णु असायला हवे, वागायला हवे ." असे म्हणत, त्यांनी हसत हसत टाळीसाठी माझ्या पुढे हात केला.
माझा शेजारी वरमला, नायरला मराठी चांगले समजत होते." I am sorry Sir, " असे म्हणत त्याने पाय खाली घेतले.
बस अजिंठ्याला आली. तिथे बस अजिंठा लेण्यापर्यंत मागे जाऊन परत येते. ते गृहस्थ कंडक्टरला म्हणाले, " तुम्ही लेण्याकडे जाऊन परत येईपर्यंत मी इथे थोडे पाय मोकळे करतो." आणि ते तिथे उतरले.
बस लेण्यांच्या दिशेने निघाल्यावर मी कंडक्टरला," हे गृहस्थ कोण ? "असे विचारले. कंडक्टर म्हणाला, " हे आमदार ना.धों. महानोर. अजिंठा सोडल्यावर लगेचच त्यांचे पळसखेड गाव लागते, तिथे ते उतरतील. असा मोठ्या मनाचा माणूस मी तरी आजपर्यंत बघितला नाही. आमदार असूनही कसला तो रुबाब नाही."
तर असा आहे रानकवी ना.धों महानोर यांच्या संबंधीचा माझा व्यक्तीगत अनुभव. एका साहित्य संमेलनात महानोरांची कविता ऐकून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी ज्याची नाळ जोडली गेली अशा संवेदनशील साहित्यिकाच्या अनुभवाचा आपण लाभ उठवला पाहिजे असा विचार करून यशवंतरावांनी महानोरांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून राज्याच्या विधान परिषदेवर घेतले.
मोठी माणसे नेहमीच मोठी असतात, म्हणूनच आपण त्यांच्या मोठेपणाचा गौरवाने उल्लेख करतो. ना. धों. महानोर हे थोर कवी, साहित्यिक होते, शिवाय माणूस म्हणूनही फार मोठे होते; त्यांच्या निधनाचे वृत्त मनाला फार चटका लावून गेले. या थोर सारस्वताला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
*सर्जेराव कुइगडे.*
०३/०८/२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू