पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गोळाबेरिज

*गोळाबेरिज* 

 

 *विटले जगाचे रंग अन्* *प्राणासही गेले तडे !* 

 *जेव्हा अचानक* *भेटतो ....परकाच मी मज सापडे !* 

 

       "  *सुरेश भट ह्यांची निवडक कविता* " या काव्यसंग्रहातली ही बोलकी आणि  जीवनाचा प्रत्यय दर्शवणारी  गझल ... ...गझलसम्राट सुरेश भट म्हणजे मराठी साहित्यविश्वाला पडलेलं एक गोड स्वप्न...त्यांची गझल अन् कविता या जीवनाच्या सर्व आणि  दूरवर्ती किनाऱ्याला स्पर्श करणाऱ्या ....भावनांच्या कोवळ्या स्पर्शात न्हाऊन निघालेले त्यांचे " *केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली  ."*  हे शब्द कुठे अन्  " *कण्हते उगीच आता ही धूळ यौवनाची ...केव्हाच स्वप्नसाक्षी आकाश जून झाले* ...हे जळजळीत सत्य कुठे ?  

 

" सुरेश भटांची कविता वाचतांना त्यातल्या दुःखाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटून संवाद सूरु होतो . इथेच भटांचे यश आहे...हे सुरेश भटांबद्दलचे मत आहे साहित्यविश्वातले  सर्वांचे आवडते दैवत पु. ल. देशपांडे यांचे .... एका हास्यसम्राटाची दुसऱ्या  शब्दसम्राटाला दिलेली ही  दिलखूलास दाद ....काय नसतं सुरेश भटांच्या शब्दांत...प्रणयातील उदात्तता   पण अन् शृंगारातील संकोचीपणा पण ...  सोबतच वास्तवातील जीवनाशयाचे, विचाराशयाचे प्रतिबिंब सुद्धा ते आपल्या शब्दमखरातून अभिव्यक्त करतांना दिसतात.... *मालवून टाक दिप , चेतवून अंंग अंग तसेच ... तरूण आहे रात्र अजूनी राजसा निजलास का रे*   या तारुण्यसुलभ  प्रणयभावनेसोबत शब्द खेळवत ठेवतांना ," *अद्यापही सु-याला माझा  सराव नाही  ,अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही*    असे म्हणत ते वास्तव जीवनाच्या दर्पणातही डोकावतात...त्यांचा एकेक शेर म्हणजे  जगण्याची एकेक चव , एकेक प्रत्यय !  मानवाचं दुःख बोलकं करण्याची त्यांची शैली आगळीच ...सामाजिक दंभ अन् पाखंडीपणावर ते असे काही  आग ओकतात की समोरचा दांभिक लगेच मागे हटावा.... *दिवसात चोरट्यांनो जाळू नका मशाली* 

 *अजूनी न सूर्य केला तुमच्या कुणी हवाली*  ही दमटादी करावी ती फक्त  सुरेश भटांनीच...जीवंत हृदयापर्यत त्यांचे शब्द सहज पोहोचले अन् रुजले सुद्धा.... अशीच त्यांची  एक हृदयात रुजलेली गझल आहे  *गोळाबेरिज* 

 

 *विटले जगाचे रंग अन् प्राणासही गेले तडे* 

 *जेव्हा अचानक भेटतो ...परकाच मी मज सापडे*!  

 

     एक बंदिस्त दुःख स्वअस्तित्वाच्या शोधात भटकत असल्याचा भास या चार ओळीत प्रत्ययास  येतो . जगाविरुद्धची ही बंडखोरी स्पंदनशील कवीनी तरी  का करावी ?  का नात्यांचे रंग विटले असतील ? नेमकं कुठली घटना  कवीमनावर वेदनेचे तरंग उमटवून गेली?  या सहज प्रश्नांचा शोध घ्यायला मन आपसुकच पुढच्या शब्दांकडे वळतं...

 

 *न कळे कशासाठी पुन्हा* *संदर्भ माझे थांबले* ?

 *माझ्यातल्या गर्दीतुनी* 

 *येऊ कसा माझ्याकडे* ? 

 

      गझलसम्राट मिसरानंतर प्रश्नचिन्ह देतात तेव्हा त्यांचा उद्देश आपल्याला त्याच प्रश्नात पाडण्याचा तर नसावा न ?....सुरेश भटांचा जीवनासंदर्भातला आत्मशोध सुरु असतांना मनात उसळलेली विचारांची गर्दी त्यांना अस्वस्थ करून गेली असेल का ? ....जीवनावर पराकोटीचे प्रेम करणारा एक कलंदर कवीहृदयाचा माणूस अचानक का थिजला असावा ? कुठला विरह, कुठलं शल्य कवीला पोखरत चाललं असेल ? 

 

 *पुसूनी मला जाती ऋतूः* *"असतोस वा नसतोस तू ?"* 

 *उसळे फुलांची लाट अन्* *माझ्या गळ्यामाजी अडे!*

 

       गझलसम्राटाचा आवडता ऋतू सर्वांनाच ठाऊक आहे , तो म्हणजे  वसंत . ब-याच गझलेत वसंताचा उल्लेख येतो पण इथे ऋतू त्यांना विचारत आहेत ," असतो की नसतो तू ?  " कवीचं हे हरवलेपण साधं तर नसावच ...कदाचित ते कवीला गुदमरून टाकणारं असावं . कुठेतरी एक सुखद लाटही कवीला गळ्यात अडणारी वाटावी यापेक्षा जीवन कोमेजून टाकणारी जाणीव ती कोणती ? 

 

 *मधुनीच कोलाहल कुण्या गंधोत्सवाचा ऐकतो* 

 *मधुनीच चाचपुनी मला भेसूर मी येथे रडे* ! 

 

     कवीच्या आजूबाजूला वसंत फुललेला आहे . गंधोत्सव सुरू आहे पण कवीच्या मनात मात्र ग्रीष्म आग ओकतोय ...आणि  ग्रीष्मासह जळण्याचा छंद कुणालाच नसतो. माणसाची  दुःख झेलण्याचे सहनशीलता संपली की वसंताचा ग्रीष्म होण्यास वेळ लागत नाही ...कवीचं हे असं मन चाचपणं रसिकाच्याही पापणकडा पाणावतं....

 

 *मागेच सारा डाव मी उधळून माझा टाकला* 

 *प्रत्येक दाणाच्या क्षणी मी नेमका उलटा पडे !* 

 

  कवीवर्य सुरेश भटांचा काही  काळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत गेलेला आहे. अपंगत्व आणि दारिद्रय या परिस्थितीत सांस्कृतिक फसवेगिरी या कोलाहलात स्वतःचीच ससेहोलपट ते वेदनेच्या शब्दातून मांडतात....स्वतःच स्वतःच्या जीवनाचा डाव उधळून टाकण्याची धमक या कणखर व्यक्तीमत्वात होती हे ही या ओळीतून निदर्शनास येईल....परिस्थितीशी तडजोड न करता परिस्थितीशी दोन हात करणारा हा कलंदर कवी म्हणूनच रसिकांच्या  मनात घर करतो.

 

 *आता त्रयस्थासारखा आयुष्य विझले पाहतो...* 

 *चुकूनी बसे चटका जशी* *माझ्यातूनी ठिणगी झडे !* 

 

 

      कवीच्या पापणीतले अश्रू केव्हाच आटले... आता हे लोंबकळणारे अस्तित्व  घेऊन कवी पुन्हा  पुन्हा जखमांना कुरवाळतो अन् त्या जखमा ओल्या होऊन कवीला भुतकाळात घेऊन जातात . प्रेमाविना जगण्याचे कवच माणसाला मिळाले असते तर ? .... तर  मनात अशा ठिणग्या उडाल्या नसत्या... एकाकीपणालाही  एक वेगळेच परिमाण मिळाले असते ...मानवी जीवनावस्थेचे असे भयान उदासपण बघावयास मिळाले नसते... 

 

 *आजन्म मी मजला जरी* *सव्याज फेडत राहिलो* 

 *आले तगाद्याला पुन्हा इथले जिव्हाळे कोरडे !* 

 

   भावनांची ही विकलांगता कशामुळे उमटली असावी ?....दुःख खोल आहे म्हणून  ते जीवघेणे आहे.... जे कवीने स्विकारले आहे अगदी कुठलाही आक्रस्ताळेपणा नं करता तरीही जेव्हा पुन्हा पुन्हा तसेच कोरडे उमाळे देऊन कुणी कवीच्या हृदयाला चुचकारत असेल तर ते कवीला कधीच आवडणार नाही ....हा अहंकार नाही  तर तो स्वाभिमान आहे....जीवनेच्छेला आव्हान देणारा स्वाभिमान. कवीवर्य सुरेश भट शून्यातून मुर्तिमान झालेले व्यक्तीमत्व. माणसाच्या माणूसकीचे अन् निर्दयपणाचे क्षण गोळा करत ते जगण्याचं आव्हान स्विकारत राहिले. शरीराने विकलांग असूनही त्यांनी मनाला पंगू होऊ दिलं नाही  म्हणून त्यांच्या सगळ्या वेदनांचा *झंझावात* आज आपल्या हृदयात घर करून बसला आहे. परपरांवाद्यांशी त्यांनी  केलेला *एल्गार* म्हणजे  लढण्याची अन् जगण्याची जिद्द . सुरेश भट नावाचा झंझावात त्यांच्या तरलतेसह अन् वेदनेसह रसिकमनाला सततच भुरळ पाडत राहिल यात शंका नाही .

 

            सौ. वर्षा मेंढे

              अमरावती

          8459273560

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू