पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अध्यापन अन् अध्ययनाच्या सरहद्दीवर

*अध्यापन अन् अध्ययनाच्या सरहद्दीवर* 



     समोर अंधा-या बोळी , दिशाहिन रस्ते अन् मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे आजची शिक्षणव्यवस्था असावी का ? असं वाटण्याचं कारण म्हणजे माझ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलेला प्रश्न होय.  मोबाईलवर टाईमपास करत असलेल्या घोळक्याला मी अभ्यास करण्याचा सल्ला देऊ लागताच त्यातला एक विद्यार्थी म्हणाला , " मॕडम , अभ्यास करणारेही इथेच आहे अन् न करणारेही इथेच आहे. बी.एस. सी.  अन् एम. ए. वाल्याच्या हातातही  डवरेच आहे आणि दहावी नापास होऊनही तेच  आहे."  आजच्या काळाचं सखोल दर्शन घडवणा-या त्या वाक्यात चिडही होती अन् उदासिनताही होती.   शिक्षणाचा उद्देश नोकरी नसून ज्ञान मिळवणे आहे किंवा जीवनाचं समृद्ध  दर्शन शिक्षणामुळे होतं वगैरेसारखे वाक्य वाचायला ठिक आहेत पण प्रत्यक्षात काळाच्या जत्रेत हातात पैसा असल्याशिवाय सगळंच हरवत जाणारं . मग अपमानास्पद तडजोड स्विकारत आयुष्य  रेटणं अन् जीवनसंघर्ष करता करता जीवनच संपून जाणं असा काहीसा तो प्रवास. 


       शहरी आणि  ग्रामीण  भागातली अनुभवाची मौलिकता वेगळी. सहाव्या वर्गापासून JEE व NEET  साठी मुलांना फाऊंडेशन  कोर्स लावून त्यांच्यामागे धावणारे शहरी पालक कुठे आणि  सकाळीच शिळी भाकर घेऊन पोटासाठी  मैलोनमैल शेत तुडवणारे पालक वेगळे . पाटीवरचं दप्तर खाली ठेवताच भरलेल्या पोटात बदामाचा शिरा रिचवू बघणारे पालक अन् अतिपोषीत विद्यार्थी वेगळे अन् पोटातले कावळे ओरडून थकतात तेव्हा  दिड केव्हा वाजतो म्हणून खिचडीच्या खोलीत चकरा घालणारे ग्रामीण चिमुकले वेगळे.  दोन्ही वास्तवांचा संघर्ष कसा साधायचा ?  काळाच्या कसोटीवर हा ग्रामीण बालक उतरायला हवा म्हणून तोच आणि  तेव्हढाच अभ्यासक्रम त्याला पण.... पायाच नसलेल्या विद्यार्थ्यांंची पायाभूत चाचणी कशी घ्यायची हा पुन्हा  वेगळा प्रश्न  .....मुळातच दप्तरमुक्त असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक दिवस शासन कमी करणार आणि पुन्हा त्याची गुणात्मक वाढ तपासणार ती सुद्धा शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने. ....


      मातृभाषेतून   शिक्षण घेतल्यास मुलांच्या सर्व क्षमता विकसित होतात असे शिक्षणतज्ञ म्हणतात मग कोरकू मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास कसा साधायचा ?....सहावीला हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय ....ही सुंदरशी कविता आहे . कवीचं दुःख हे फक्त  कवीचंच नसतं  ते एकंदरीतच  सर्व माणसांचं दुःख असतं...आईविषयीच्या तरल भावना त्यात मांडलेल्या आणि त्यात  आई नुकतीच मला सोडून गेल्यामुळे माझेही पापणकाठ ओलावलेले अशा स्थितीत ती कविता  शिकवत असतांना त्यांना हंबरने म्हणजे  काय ,वासरू म्हणजे  काय ?   जवळजवळ कुठलाच मराठी शब्द ठाऊक नसेल तर इथे तिघांची भावनिक हत्या घडून आल्यासारखं होतं....एक तर  शब्दांतून दुःख मांडणारा कवी , दुसरा त्या शब्दांतील भावनांना अर्थ देऊ बघणारा अध्यापक अन् तुमची भाषाच आम्हाला  कळत नाही  तो तुमचा प्राॕब्लेम आहे असे निर्विकार चेहरे असलेले विद्यार्थी ....दोष कुणाचा ?....सरसकट एकच अभ्यासक्रम असण्याचा...एकाच भाषेत असण्याचा की शिक्षक कोरकू भाषिक नाहीत याचा ? 


        बाविस तेविस वर्षापूर्वीचा काळ ...." *मला न भेटलेले पौर्णिमेचे चांदणे* "  असा काहिसा सातवीला पाठ होता . पेपर विक्रेता चुणचुणीत मुलगा लेखकाकडे पेपर टाकतो तेव्हा त्याची परिस्थिती लेखकाला कळते पण मध्येच त्याचं येणं बंद होतं...अशी काहीशी ती सत्यकथा होती. शाळेतले शिक्षक  पाठ शिकवत होते आणि  शिकवतांना ते इतके भावनिक झाले की आॕफिस मध्ये येऊन रडायला लागले.मी तासिका घेऊन आॕफिसमध्ये आली तेव्हा  सरांच्या डोळ्यात पाणी बघितलं तेव्हा  ते पाठाबद्दल सांगू लागले . मी त्या वर्गात डोकावून आले. पाठ शिकवतांना सर इतके भावूक होऊ शकतात तसे विद्यार्थी  पण झाले का हे बघायला....काही  मुलांचे चेहरे सैरवैर दिसले...काही  स्तब्ध ...तो काळ अध्यापन आणि  अध्ययनाचा होता...मध्ये सरहद्दच नव्हती...एकाने शिकवायचं ...दुसऱ्याने आत्मसात करायचं....एकाने ठोकायचं दुसऱ्याने निमुटपणे सहन करायचं...मारण्यातूनही घडणं होतं....उपक्रमांचा मारा नाही  की राजकिय हस्तक्षेप नाही ....हा सप्ताह साजरा करा आणि  तो पंधरवाडा साजरा करा असं काही  नव्हतं....मुळात देशच माझा असल्यावर देशप्रेम व्यक्त करायला तीन दिवस तिरंगा फडकवण्याची  आणि शाळेत वर्षभर अमृतमहोत्सवी उपक्रम साजरा करण्याची गरजच काय ?


       जीवनातील अस्थिरता, प्रश्नात्मकता, आशानिराशात्मकता, सभ्रमावस्था  या जीवनविषयीच्या क्रिया प्रतिक्रिया ....अध्यापन अन् अध्ययन या प्रक्रियेत या क्रिया प्रतिक्रियेचे उत्तरं शोधता यायला हवीत....हे तेव्हाच घडू शकेल जेव्हा अध्यापन अन् अध्ययनातले अडथडे दूर होतील....आपले म्हणणे समोरच्याच्या गळी उतरवणे म्हणजे  अध्यापन नाही ....ती फक्त पाॕवर ची व्याख्या झाली....अंतर्बाह्य सृष्टीला  आपल्या सर्व ज्ञानेद्रियांनी पिऊन घेण्याची इच्छा  समोरच्या मनात निर्माण करणे म्हणजे  अध्यापन....पण मधले अडथडे इतके की सगळ्या जिज्ञासा मराव्या....


     असंख्य  स्वप्न मनात असलेला विद्यार्थी  अन् त्या स्वप्नांना वास्तवाशी जोडू बघणारा अध्यापक शासनाला भावशुन्य  कंपनीला का विकावा वाटत असेल ?....उद्याचं भविष्य असं कंत्राटी करून या बालकांच्या स्वप्नाशी खेळणे म्हणजे ती स्वप्न चुरगाळणे.... आत्ता आत्ता मिळालेला शिक्षणाचा हक्क बजावत असतांना तळागाळातल्या मुलांच्या हक्काचं दमन करणारं शासन शिक्षणप्रक्रियेत सुधार करण्या ऐवजी शिक्षणव्यवस्थाच विकायला काढणार ....आता अध्यापन अन् अध्ययन प्रक्रियेतली सरहद्द कोणती असणार....अदानी की अंबानी ....



              सौ. वर्षा मेंढे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू