पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्राद्ध

आज सर्वपित्री अमावस्या या निमित्ताने माझी एक लघुकथा.

श्राद्ध
आज नेहाच्या वडिलांचं दहावं वार्षिक श्राद्ध होतं. दिवसभरआॉफिसात काम करून नेहाने घरी येतानाच श्राद्धासाठी लागणारे सामान, भाजीपाला वगैरे आणलं होतं तरी घरी आल्यावर आईने तिला प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. दरवर्षी बाबांचे अगदी जीवश्च कंठश्च मित्र श्राद्धाला प्रसादाला घरी यायचे. नाही म्हटलं तरी वीस एक लोकांच्या जेवणाची तयारी लागायची.त्यातून तिचा दादा अगदी वेळेवर मुंबई हून ट्रेनने श्राद्धाच्या दिवशी सकाळी दहापर्यंत यायचा.पहिल्या एक दोन श्राद्धांना तो सपरिवार यायचा परंतु त्याच्या बायकोला गावी येणं आवडत नसल्याने नंतर तो एकटाच येत असे.तेही एकच दिवस .त्या एक दिवसाची आई चातकासारखी वाट पहात असे.त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं तिला वाटत असे. वडिल गेल्यानंतर दादाच्या शिक्षणासाठी नेहाने अनुकंपा नियुक्ती वर वडिलांच्या बँकेत नोकरी पकडली होती.लग्नाचे वय सरून गेले होते.जात्याच हुशार असल्याने वडिल तर तिला मुलगाच मानत.आणि तिने ते सार्थ करून दाखवलं होतं.वडिल गेल्यावर घराची सर्व जबाबदारी तिनं स्वतःच्या खांद्यावर पेलली होती. तरी आईचं झुकतं माप दादाकडे असायचं.या गोष्टीचं तिला नेहमी वाईट वाटत असे.लग्न झाल्यानंतर दादा पूर्णपणे वहिनीच्या मुठीत गेला होता.आईच्या भावना जपण्यासाठी ती दादाला येण्यासाठी सेकंड ए. सी.च दरवर्षी आईला कळू न देता तिकीट पाठवत असे. महिन्याभरापूर्वीच आईच्या आजारपणात खूप पैसे खर्च झाल्याने ती तिकिट पाठवू शकली नव्हती.त्यावर दादाने तिला श्राद्धाला येण्यासाठी नकार दिला होता.तिने त्याची खूप मनधरणी केली होती पण त्याने स्पष्ट नकार दिला होता आणि कारण काय दिलं तर त्याच महिन्यात बायकोच्या वाढदिवसाला त्याला तिच्यासाठी नेकलेस घ्यायचा होता.सर्व ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं आईला हे कसं सांगावं याच विचारात रात्री ती उशीरापर्यंत घरातली कामं करून झोपली होती.मनात कुठंतरी आशा होती की दादा येईल.रात्री मध्येच आई कुणाशी तरी जोराने बोलत असल्याचं तिला जाणवलं होतं पण दिवसभर काम करून ती दमली होती.पहाटे लवकर उठायचं होतं.

श्राद्धाच्या दिवशी सकाळपासून घरात शांतता पसरली होती.नेहाला कळेचना की काल रात्रीपर्य़त दादा येणार म्हणून चाललेली आईची लगबग, बडबड सर्व शांत होतं.अधुनमधून आई डोळ्याला पदर लावत होती.बाबांची आठवण येत असेल म्हणून नेहाने पण लक्ष दिलं नाही.स्वयंपाकाची बाई आली होती.अकरा वाजता गुरूजी आले होते.बाबांचे मित्र वगैरे आले होते.दादाचा पत्ता नव्हता.कदाचित गाडी लेट असेल या विचाराने नेहा काम करत होती.नेहमी दादाची वाट पहात आई शंभर वेळा दारापर्यंत चक्कर लावायची.साडेअकरा वाजले तसे गुरूजींनी आईला दादाला बोलावण्यास सांगितले.आता काय करायचे या विचारात नेहा असतांनाच आई म्हणाली ,"गुरुजी आपली हरकत नसेल तर आज श्राद्ध नेहाच करेल."
नेहा म्हणाली ,"नाही नाही आई दादा येतच असेल .गाडी लेट झाली असेल गुरूजी आपण थोडावेळ वाट पाहू या ".
आई एकदम चिडून बोलली, "अगं दादाच्या चुकांवर किती पांघरूण घालशील ?मुलगा होण्याचं एकतरी कर्तव्य आजवर त्याने केलं आहे का ?मला सर्व माहिती झालं आहे काल रात्री त्याचा फोन आला होता.‌ तू यावर्षी त्याला येण्याजाण्याचं तिकिट पाठवलं नाही म्हणून तो येणार नाही.अगं असा मुलगा काय काय कामाचा आणि अशा रुढी परंपरा पण काय उपयोगाच्या ?बापाला साधं पाणी पाजायला देखील जो मुलगा येत नाही आपली आई जिवंत का मेली यांची त्याला काळजी नाही.मुलाच सर्व कर्तव्य तर तू करते आहेस मग श्राद्ध करण्याचा अधिकार पण तुलाच मिळायला हवा .तसंही तुझे बाबा तुला मुलगाच म्हणायचे.मीच मुर्ख की मुलात आणि तुझ्यात नेहमी भेदभाव केला ,पण आता मी ती चूक दुरुस्त करणार आहे.काय सर्वांना पटतं आहे ना? " बाबांच्या मित्रांनी आणि गुरूजींनी होकारदि ला. नेहा पाणावल्या डोळ्यांनी श्राद्ध करायला बसली . डोळ्यांच्या कोप-यातूंन तिने बाबांच्या फोटोकडे पाहिले.क्षणभर बाबांनी तिच्याकडे पाहून हसल्याचा तिला भास झाला. आज.  ख-या अर्थाने तिच्या जगण्याला न्याय मिळाला होता!


सौ ऐश्वर्या डगांवकर.इंदूर.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू